भुस्सा शेगडी

0
14
_Bhusa_Shegadi_1.jpg

गृहिणींना इंधन मिळवण्यासाठी सात दशकांपूर्वी, स्वातंत्र्यपूर्व काळात खूप हाल सोसावे लागले. त्यांनी त्याकरता डोळ्यांतून टिपेही गाळली आहेत. उच्चवर्गीय, सुस्थित महिलादेखील त्यातून वगळल्या गेल्या नव्हत्या. तो दुसऱ्या महायुद्धाचा काळ. रॉकेलवर (केरोसीन) चालणारे स्टोव्ह स्वयंपाकघरात आले होते. कोळशाच्या शेगड्यांची हकालपट्टी झाली होती. परंतु युद्धाच्या दोन-तीन वर्षांच्या काळात स्टोव्हमध्ये भरण्यासाठी रॉकेलच उपलब्ध नव्हते! ब्रिटिश राज्यकर्त्यांचा शत्रू पूर्वेकडून भारताच्या दारात येऊन ठेपला होता. ब्रिटिश-अमेरिकन सैनिक मोठ्या संख्येने भारताच्या बचावासाठी भारतात उतरले होते. पेट्रोल-रॉकेलसारखी इंधने युद्धकार्यासाठी प्राधान्याने जात होती. सर्वसामान्य गृहिणीला शिधापत्रिकेवर (रेशन) गॅलनभर रॉकेल महिन्याला मिळत होते. त्यासाठी लांब लांब रांगा लागलेल्या असत. तो पुरवठाही काही वेळा खंडित होत असे. त्यातून एक कल्पना पुढे आली. सुतारकामातून वा लाकडाच्या वखारीतून फेकला जाणारा भुसा इंधन म्हणून वापरण्याची टूम निघाली. त्यासाठी पत्र्याच्या वेगळ्या शेगड्या बनवण्यात आल्या. पत्र्याच्या गोलाकार डब्याला आतून जाळ येण्यापुरती मध्ये जागा ठेवून; त्याभोवतीची जागा इंधनाला मोकळी ठेवलेली असायची. सिलेंडर आकाराच्या डब्याला तळाला तीन इंचाचा एक झरोका असे. गृहिणी वखारीतून लाकडाचा पोतेभर भुसा आणि मोठा गोल दांडा आणून ठेवत असे. तो लाकडी दांडा डब्यामध्ये उभा धरून ठेवल्यानंतर उर्वरित मोकळ्या जागेत भुसा रेटून भरला जायचा. तो खालच्या झरोक्यातून रॉकेलमध्ये भिजवलेल्या काकड्याने पेटवला जात असे. भुशाने पेट घेतला, की वरील मोकळ्या जागेतून ज्योत बाहेर येत असे. त्यानंतर स्वयंपाकासाठी आवश्यक भांडे ठेवले, की त्यातील पदार्थ रांधला जायचा. त्यास वेळ लागायचा. घरात खूप धूर यायचा. 

भुशाची शेगडी वापरयोग्य करण्यासाठी गृहिणीला तासभर झगडावे लागत असे. घरात जेमतेम रॉकेल असेल ते राखून राखीव ठेवले जाई – चहा करण्यासाठी आणि आंघोळीचे पाणी तापवण्यासाठी!

अखेर, युद्धात हिरोशिमावर अणुबॉम्ब पडला. जपानने शरणागती पत्करली, युद्धविराम झाला आणि काही महिन्यांतच रॉकेल उपलब्ध झाले व घराघरात पुन्हा स्टोव्ह पेटू लागले.

– मधुसूदन फाटक
 

Previous articleविरगावचा भोवाडा
Next articleकला-संस्कृती विचार आजच्या परिस्थितीत आणा!
मधुसूदन फाटक 'भारतीय लेख आणि लेखा परिक्षण' सेवेत कार्यरत होते. तेथे असताना आणि निवृत्तीनंतरही त्‍यांनी विविध वृत्‍तपत्रांमधून लेखन केले. ते गेली चाळीस वर्षे विविध वृत्तपत्रांच्‍या पुरवण्‍यांमधून, विशेषतः मुंबई विषयक लेखन केले आहे. त्‍यांनी 'फोटो जर्नालिझम' या प्रकारात 1963 साली लेखनास सुरूवात केली होती. वृत्‍तपत्रांसोबत त्‍यांनी दूरदर्शन व आकाशवाणी या माध्‍यमांकरता लघुनाट्यलेखन केले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9820719882