भाजीपाला रोपवाटिकेतून हरितक्रांती- दत्तू ढगे यांची यशोगाथा

1
10
carasole

नाशिक जिल्ह्यामधील सातपूरपासून पाच किलोमीटर अंतरावर बेळगावढगा नावाचे तीन हजार लोकवस्तीचे गाव आहे. तेथे दत्तुभाऊ ढगे नावाचा हाडाचा शेतकरी माणूस राहतो. त्याचे वय एकोणचाळीस वर्षें. त्याचे एकत्र कुटुंबपद्धत अवलंबणारे वीस–बावीस माणसांचे मोठे घर. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा परंपरागत उद्योग.

दत्तू हे चार भावंडांपैकी एक. घरातील माणसे सतत शेतीउद्योगात व्यस्त असत. मुलांचे लहानपण शाळेत शिकण्याबरोबरच वडीलमंडळींना शेतकामात मदत करण्यात गेले. दत्तुभाऊंना लहानपणापासून रोपे बनवण्याचा छंद होता. दत्तुभाऊंनी मानसशास्त्रात पदवी नाशिकमधील महाविद्यालयातून घेतली, पण मातीची ओढ त्यांना वेगळा मार्ग दाखवत होती. त्यांनी नाशिकच्या ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’च्या कृषिसंशोधन केंद्रातून बी.एस्सी. (फलोद्यान विद्या) ही पदवी प्राप्त केली. पण शेतीतील भौगोलिक आव्हानांना आणि निसर्गावरील परावलंबनाला पदवी पुरून उरणार नव्हती. भात, गहू , हरभरा, द्राक्ष अशी  हंगामी पिके  घेतल्यानंतर, नाशिकमधील इतर उद्योगधंद्याकडे डोळे लावून बसणारा आणि वेळी स्थलांतराला शरण जाणारा नाशिक शहरालगतचा तो ग्रामीण पट्टा. इतर उत्पन्नाला मर्यादा खूप. ढगे कुटुंबाकडे तीन एकर जमीन होती. त्यातील सत्तर टक्के जमीन पडिक. दत्तुभाऊंना तशा परिस्थितीत भक्कम उत्पन्नासाठी नक्की काय करता येईल या विचाराने जणू पछाडले. पडिक जमीन मानसिक पातळीवर स्वीकारून आयुष्यभर शांत – निवांत राहणारे खूप सारे लोक घरात, गावात, समाजात होते. दत्तुभाऊ मात्र नव्या संधीच्या शोधात होते. ती संधी अचानकपणे त्यांच्या समोर आली. विद्यापीठाच्या कृषिसंशोधन केंद्रातर्फे रोपवाटिका व्यवस्थापनाविषयी कार्यशाळा भरवण्यात आली. दत्तुभाऊ कार्यशाळेत सहभागी झाले. दत्तुभाऊंनी फलोद्यान विद्येच्या जोडीला पॉलिहाऊस तंत्रज्ञानाचेही शिक्षण घेतले होते.

महिन्याभराच्या प्रशिक्षणाने दत्तुभाऊंच्या पुढील प्रयत्नांची दिशा पक्की झाली. ते गावाला परतल्यावर नवीन प्रयोगाची उभारणी जोमाने करू लागले. जोडीला पत्नी रोहिणी होती. ती बावीस माणसांच्या कुटुंबात सुनेची जबाबदारी खुशीने पार पडताना दत्तुभाऊंच्या शेतकामातील प्रयोगांसाठीही त्यांच्या बरोबरीने सज्ज असते.

दत्तुभाऊंना वडीलांशी थोडा वाद घालूनच पहिली तीस हजारांची गुंतवणूक मिळवावी लागली. पण नंतर प्रयत्नांना यशाची साथ मिळत गेली.

सुरुवातीच्या टप्प्यात, त्यांनी वापरात नसलेल्या द्राक्षाच्या अॅन्ग्लसचा उपयोग करून दहा बाय चार फुटांच्या पॉलिटनेल शेडमध्ये रोपवाटिका सुरू केली. परिसरातील मागणीनुसार रोपे बनू लागली. त्यांना आत्मविश्वास वाढल्यावर एका टप्प्यात वीस हजार रोपे बनवता आली. त्यांनी शेतातच दहा गुंठे जमिनीवर कमी खर्चाचे पॉलिहाऊस उभारले. त्याचे चांगले परिणाम दिसून आले. त्यांनी गावाच्या ओढ्याकाठची जमीन त्यासाठी निवडली. त्यांनी स्वतः बारा गुंठे क्षेत्रावर कमी खर्चाच्या पॉलिहाऊसची रचना करून त्यात कोबीची रोपे विकसित केली. त्यांनी व्यवसायात लाभ वाढत असताना शेतीचा विस्तार करण्यावर, त्यात गुंतवणूक करण्यावर भर दिला. त्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानाच्या माध्यमातून तीस गुंठे क्षेत्रावर मोठे पॉलिहाऊस उभारले. त्यात सिमला मिरचीचे उत्पादन केली. सिमला मिरचीची रोपवाटिका त्या शेजारी दहा गुंठ्यांवर उभारली. शेतासाठी शेततळी शासकीय योजनेच्या माध्यमातून उभारली. दत्‍तुभाऊ तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करत रोपवाटिका व्यवसायात यशस्वी ठरले.

त्यांच्या शेतात टोमॅटोसह सिमला मिरची, खूप मागणी असणारी ज्वाला मिरची, पिक्याडो, वांगी, कार्ले, भोपळे, दोडके गिलके, काकडी, टरबूज, खरबूज, भेंडी, फ्लॉवर, कोबी, वाल; त्याचप्रमाणे, विविध परदेशी भाजीपाला अशी सुमारे दीडशे प्रकारची तब्बल बारा लाख रोपे महिन्याकाठी तयार केली जातात. रोपांना महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेश राज्यांतील शेतकऱ्यांकडून मागणी असते.

त्र्यंबक भागातील लोक शेतीत फारसे काही मिळत नसल्याने भाताचे पीक घेतल्यानंतर रोजगारासाठी इतरत्र जात, तर कित्येक जण स्थलांतर करत. काही जण जमिनी विकतसुद्धा. मात्र दत्तुभाऊंच्या रोपवाटिकेमुळे त्या भागातील लोक भाजीपाला पिकाकडे वळले आहेत. भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर कमी पाण्यावर होत आहे. लोकांमध्ये शेतीची आवड निर्माण झाली आहे.

दत्तुभाऊंचा जनसंपर्क महाराष्ट्राबाहेरीलही शेतकऱ्यांशी आपुलकीचे संबंध जोडले गेल्याने वाढला आहे. त्यांच्याशी होणाऱ्या चर्चांतून विकासाची आणखी कवाडे खुली होत आहेत. ते सातत्याने व जोमाने नवनवीन प्रयोग करत आहेत. कोलम्बो, श्रीलंका आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनीही त्यांच्या प्रयोग क्षेत्रास भेट दिली आहे.

शहरातील बंगल्यांच्या आवारात शोभेची झाडे लावली जातात. त्या झाडांचा शोभेशिवाय फारसा उपयोग नाही. त्यामुळे ढगे त्या झाडांच्या जागी तुळशीसारख्या औषधी वनस्पतींची रुजवात व्हावी यासाठी प्रयत्नशील असतात. त्यांना औषधी वनस्पतींच्या संवर्धनासोबत दुर्मीळ वृक्षांचे संवर्धनही महत्त्वाचे वाटते.

दत्तुभाऊ ढगे यांनी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या दिल्लीत झालेल्या कार्यशाळेत ‘कमी खर्चाच्या हरितगृहात मोठ्या प्रमाणातील भाजीपाला रोपनिर्मिती’ या विषयावर सादरीकरण केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते दत्तुभाऊ ढगे यांना संशोधन आणि कृषी उत्पादनातील विशेष कामगिरीबद्दल गौरवण्यात आले. केंद्रीय कृषिमंत्री डॉ. राजेंद्र सिंग यांनीही ढगे यांच्या उपक्रमाची दखल घेऊन त्यांचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्या सोहळ्यात देशातील एकूण एक्कावन्न शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

दत्तुभाऊ आणि त्यांच्या पत्नी रोहिणी, कुटुंबातील इतर सदस्य यांच्या बरोबरीने भाजीपाला रोपवाटिकेच्या कामात आणखी दहा सहकारी सहभागी असतात. दत्तुभाऊ यांचे यश हे त्या सांघिक मेहनतीचे फलित आहे; मुळाशी आहे दत्ताजींची मातीची ओढ आणि नवनिर्मितीक्षम संशोधनाची आस.

दत्‍तू ढगे – 9423049859

– अलका आगरकर-रानडे

Last Updated on 17th FEB 2017

1 COMMENT

  1. आपला लेख शेतकऱ्यांना खुपच
    आपला लेख शेतकऱ्यांना खुपच प्रेरणा देणारा आहे सुंदर घन्यवाद

Comments are closed.