ब्लॉग सहिष्णू आहे म्हणून …

ब्लॉग सहिष्णू आहे म्हणून …

– अवधूत डोंगरे

‘इंटरनेट’ या शब्दाचे शब्दशः मराठी भाषांतर होते, ‘आंतरजाल’. ‘वर्ल्ड वाईड वेब’चे शब्दशः मराठी भाषांतर होते, ‘जगभर पसरलेले जाळे’. ही भाषांतरे एवढयासाठीच दिली, की या शब्दांमध्ये असलेली सहिष्णुता समजावी. माणसांना जोडणारे जाळे किंवा जगभर पसरलेले जाळे या संकल्पना मुळातच सहिष्णू आहेत. त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारची उतरंड नाही. या संकल्पनांशीच संबंधित असलेला विषय आहे, ‘ब्लॉग’. तोही अर्थात सहिष्णुपणा बरोबर घेऊनच आला आहे. यावरून एवढे तरी स्पष्ट व्हावे, की ब्लॉग हे एक सहिष्णू आणि म्हणूनच बहुजनांचे माध्यम आहे.

ब्लॉग हे बहुजनांचे माध्यम आहे, असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ असा, की या माध्यमाचा मूळ कल बहुजनांचे माध्यम होण्याचा आहे. भारतासारख्या देशात आर्थिक, तांत्रिक, भाषिक वगैरे अडचणींचा विचारही या संदर्भात करायला हवा. (उदाहरणार्थ, भारतात केवळ सहा ते सात टक्के लोकांना इंटरनेट उपलब्ध होते याची खंतयुक्त जाणीव ठेवणे आवश्यक आहे. संदर्भ – http://www.internetworldstats.com/asia/in.htm

माणूस म्हटला की व्यक्त होणे हा एक महत्त्वाचा भाग आला. किंबहुना त्यातून माध्यमांची वाढ झाली नि होते. भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशात प्रत्येक व्यक्तीला पुरेसे व्यक्त होता येईल एवढी जागा आहे का? म्हणजे एवढ प्रमाणात माध्यमे आहेत का? याचे सरळ उत्तर ‘नाही’ एवढेच आहे. शिवाय, मुख्य माध्यमांमधील कंपुशाही नि साचलेपणा हे मुद्दे आहेतच. अशा वेळी, ब्लॉग हा अभिव्यक्तीची प्राथमिक गरज भागवू शकतो. ब्लॉगमध्ये मुख्य माध्यमांमध्ये होणारा गाजावाजा नाही. प्रसिध्दी मिळण्याचे प्रमाण कमी, प्रतिसादही कमी, किंबहुना आपल्या अभिव्यक्तीचा होणारा परिणामही मर्यादित, हे जरी खरे असले तरी कोणीही अव्यक्त राहण्यापेक्षा कुठल्यातरी प्रमाणात व्यक्त होणे, हे सामाजिक आरोग्यासाठी हितकारक आहेच की!

व्यक्त होण्यासाठी आपण भाषा वापरतो. ब्लॉगमध्ये कोणी कोणती भाषा वापरावी यावर कोणतेही बंधन नाही. प्रमाणभाषा वगैरेंसारख्या गोष्टी तिथे नाहीत. प्रत्येकाने आपापल्या भाषेत जमेल ते लिहावे. याचा असाही फायदा होतो, की भाषेची विविध रूपे आपोआप जतन होत जातात.

‘महाजालावरील वही’

‘ब्लॉग’ (‘वेब-लॉग’चा संक्षेप) या शब्दाचे शब्दशः मराठी भाषांतर करायचे झाल्यास ‘महाजालावरील वही’ असे करता येईल. (काही मराठी ब्लॉगकार ‘अनुदिनी’, ‘जालनिशी’ असेही शब्द वापरतात). ब्लॉग ही एक साध्या वहीपेक्षा अधिक सोईसुविधा असलेली ऑनलाईन वही किंवा व्यासपीठ आहे. ज्याप्रकारे वहीला कोणते कव्हर घालायचे, ती वही कोणत्या विषयासाठी किंवा विषयांसाठी वापरायची, ती कोणाला वाचायला द्यायची किंवा नाही, हे आपण ठरवतो तसेच आपला ब्लॉग काय प्रकारचा असावा, हे ठरवण्याचे स्वातंत्र्य आपल्याला आहे. ब्लॉग हे (अ)नियतकालिक असू शकते, ब्लॉग ही वैयक्तिक अनुभव लिहिण्यासाठीची डायरी असू शकते, ब्लॉग हा छायाचित्रांनी सजवलेला आल्बम असू शकतो. थोडक्यात सांगायचे तर ब्लॉग हे एक छोटेसे संकेतस्थळ असते; त्याची मांडणी व त्यातील मजकूर ठरवण्याची जबाबदारी ब्लॉगकाराची. ब्लॉगविषयी प्राथमिक तांत्रिक माहिती इंटरनेटवर सहजी उपलब्ध आहे. http://www.blogger.com (गुगलची सेवा) किंवा http://worldpress.com या संकेतस्थळांच्या माध्यमातून ब्लॉगशी ओळख करून घेता येईल.

ब्लॉग हे दस्तावेजीकरणाचेही माध्यम ठरू शकते. वैयक्तिक अनुभवांचे दस्तावेजीकरण आहेच, पण काही लोकांना वहीमध्ये कात्रणे कापून ठेवण्याची सवय असते, तसे ब्लॉगवर एखाद्या विषयाशी संबंधित माहितीचे संकलन करून दस्तावेज तयार करता येऊ शकतो. कात्रणांची वही आणि ब्लॉग यांच्यात फरक एवढाच, की कात्रणांची वही ती तयार करणा-यापुरती उपयोगी पडते तर ब्लॉग मात्र जगात कोणालाही उपयोगी पडू शकतो. म्हणजे आपली कात्रणांची वही प्रकाशित केल्यासारखेच आहे, म्हणा ना! आणि या वहीत शब्दांबरोबर छायाचित्रे. चलत् चित्रे यांचाही वापर करता येतो, हा एक फायदा. शिवाय, यातून कदाचित आपण तयार केलेल्या दस्तावेजात कोणी अधिक भर टाकू शकते, हा अजून एक फायदा. आणि शिवाय टिकाऊपणा जास्त!

ब्लॉगच्या नकारात्मक बाजू अर्थातच आहेत. एकतर छापील माध्यमापेक्षा ब्लॉग सुरू करणे आणि चालवणे हे कोणत्याही प्रकारे कष्टदायक काम नाही. त्यामुळे उथळपणा वाढण्याची शक्यता आहे. शिवाय, वाचकांचे लक्ष केंद्रित ठेवण्याच्या बाबतीतही छापील माध्यमापेक्षा ब्लॉग मागे आहे. एखाद्या गोष्टीवरची तात्कालिक प्रतिक्रिया जेव्हा आपण कागदावर लिहून काढतो तेव्हा लिहिण्याच्या कृतीबरोबर आपण विचारही करत राहतो, त्यामुळे ती प्रतिक्रिया अधिक निवळत जाते, आणि त्यापुढे ती छापेपर्यंत तर अजून काळ जातो, त्यामुळे एकूण सगळी कृती विचारपूर्वक घडण्याची शक्यता अधिक असते. पण ब्लॉगच्या बाबतीत मात्र प्रतिक्रिया तात्कालिक लिहून प्रसिध्द करण्याची क्रिया एवढ वेगाने घडते की त्या प्रतिक्रियांवर विचारमंथनाची प्रक्रिया फारशी होत नाही. अर्थात या गोष्टींवर उपाय शोधण्यासाठी माध्यम-साक्षरता वाढवण्याची गरज आहे.

‘हे विश्वचि माझे घर’ असे ज्ञानेश्वर म्हणून गेला. सोईसोईने, ज्ञानेश्वराची परंपरा सांगणारी मराठी माणसे अशी संवेदना दाखवतात का, हे शोधायचा प्रयत्न केला. तर काय दिसते? बरेच काही दिसू शकेल. त्यातले एक सांगायचे तर ‘आर्कूट’सारख्या संकेतस्थळावर उघडलेल्या जातीय कम्युनिट्या. म्हणजे या लोकांना सहिष्णू माध्यम द्या नाहीतर काहीही द्या, त्यांच्यात भिनलेली उतरंडीची संकल्पना काही जात नाही! मग हे ब्लॉगमध्येही हा घोळ घालतात. मराठी ब्लॉग वाचल्यावर तो लक्षात येतोच. पण ज्ञानेश्वरांची संवेदना प्रत्यक्षात आणण्याची ताकद मात्र ब्लॉग या माध्यमात आहे. त्या दिशेने जाणारा एक प्रयत्न पाहायचा असेल तर पुढील संकेतस्थळाला भेट द्या. http://globalvoicesonline.org/ हे अर्थातच भारतीय किंवा मराठी संकेतस्थळ नाही. हे आदर्श उदाहरण आहे असाही दावा नाही, पण जगातील न ऐकले जाणारे आवाज एकत्र करण्याचा हा उल्लेखनीय प्रयत्न नक्कीच आहे. असे अजूनही प्रयत्न आहेतच. पण असं काही ज्ञानेश्वरांची परंपरा सांगणारे आपण करतो का, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.

जागतिकीकरणाचा सरळ तोटा आहे तो सांस्कृतिक सपाटीकरण हा. म्हणजे अमुक एका प्रकारचे कपडे घातले की आधुनिक किंवा जागतिक, अमुक एक भाषा, अमुक एका पध्दतीने बोलली की आधुनिक. मग याचाच परिणाम म्हणून एकाच प्रकारची कॉफी विकणा-या दुकानांची साखळी, एकाच प्रकारचे कपडे विकणा-या दुकानांची साखळी, असे ते सगळे वाढत जाते. यात बाजाराचे काय नियम असतील ते असतील. मग या सगळयांवर उपाय काय? उत्तर – माहीत नाही, पण एवढे मात्र सांगू शकतो, की सांस्कृतिक सपाटीकरणाच्या या प्रक्रियेत जे भरडले जातात, म्हणजे छोटया भाषा नि संस्कृती (उदाहरणार्थ, दर दोन आठवडयांमागे एक भाषा मरते तसे), त्यांचे अस्तित्त्व टिकवण्यासाठी ब्लॉग नि पर्यायाने इंटरनेट ही महत्त्वाची माध्यमे ठरू शकतात. त्याचे कारण पहिल्या परिच्छेदात सांगितले तेच, ही माध्यमे सहिष्णू आहेत म्हणून!

– अवधूत डोंगरे

ईमेल:dongareavadhoot@gmail.com