बोजेवार आणि अध्वर्यू

‘थिंक महाराष्ट्र’चे संपादक दिनकर गांगल यांनी संस्कृतिकारण हा शब्द मराठीत रूढ केला. तो त्यांनी ‘ग्रंथाली’च्या ग्रंथप्रसार यात्रेत 1982 साली प्रथम वापरला. त्या यात्रेची भूमिकाच साहित्यातील संवाद व समन्वय अशी होती. त्या धर्तीचे बरेच कार्यक्रम त्या यात्रेत आणि ‘ग्रंथाली’च्या नंतरच्या ग्रंथएल्गार, संवादयात्रा, ग्रंथमोहोळ, वाचकदिन अशा विविध उपक्रमांमध्ये होत गेले. समाजात राजकारणाचा, अर्थकारणाचा प्रभाव गेल्या काही दशकांत वाढला. समाजावरील तो प्रभाव संस्कृतिभावाचा असण्यास हवा असे संस्कृतिकारणाचे ढोबळ वर्णन करता येईल. गांगल यांनी या सिद्धांताचा पाच दशके सतत जो पाठपुरावा केला त्याचा आढावा घेणारा लेख ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ‘महामुंबईचे षड्दर्शन: घडविते हात’ या सदरात, 2021 च्या मावळत्या वर्षात 30 डिसेंबरला  प्रसिद्ध झाला. तो सुदेश हिंगलासपूरकर व अरुण जोशी या, गांगल यांच्या जुन्या सहकाऱ्यांनी लिहिला आहे. लेखाचे शीर्षक आहे – संस्कृतिकारणाचे अध्वर्यू. त्या लेखानंतर गांगल यांना व लेखकद्वयास खूपच प्रतिसाद लाभला. ‘मटा’मध्येही अनेक विचारणा झाल्या.

‘मटा’चे ‘निवासी संपादक (मुंबई)’ श्रीकांत बोजेवार यांची या सदराची मूळ कल्पना. त्यात मुंबईचे, ‘मटा’ सुरू झाल्यापासूनचे गेल्या साठ वर्षांतील विलोभनीय सामाजिक-सांस्कृतिक दर्शन होते. संस्कृतिकारणाचा लेख प्रसिद्ध झाला तेव्हा ‘मटा’तील तिशीचा एक तरुण क्रीडा पत्रकार बोजेवार यांच्याकडे गेला आणि त्याने बोजेवार यांना विचारले, ‘अध्वर्यू’ म्हणजे काय हो? लेख मला आवडला, पण हेडिंग किती जड, अवघड आहे !

बोजेवार यांनी त्या तरुणाकडे एक क्षण पाहिले आणि म्हणाले, की वन डे, ट्वेंटी-ट्वेंटी, आयपीएल असे तऱ्हतऱ्हेचे क्रिकेट आहे ना ! आणि केवढी लोकप्रियता त्यास लाभली आहे ! तर मग आता पाच दिवसांच्या कसोटी सामन्यांना, ते कंटाळवाणे, बऱ्याच वेळा रसहीन होतात, म्हणून डच्चू द्यायचा का? तो तरुण पत्रकार म्हणाला, “छे ऽ छे ऽ तेथे तर क्रिकेटपटू घडतात ! त्यांची तेथे विविध तऱ्हांनी तालीम होते !”

बोजेवार म्हणाले, की भाषेचे तसेच आहे. नवनव्या मंडळींनी नवनवे शब्द आणावे, रुळवावे, त्यामुळे तर भाषा विकसित होते, परंतु त्याचा अर्थ जुने टाकून देऊ नये. त्या जुन्या शब्दांनी तर भाषा घडवलेली असते.

तो तरुण पत्रकार तेथून सुटला आणि ‘अध्वर्यू’ या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी शब्दकोश पाहू लागला !

थिंक महाराष्ट्र 9892611767/ 9323343406 info@thinkmaharashtra.com

———————————————————————————————-