गव्हर्नर माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांना महाराष्ट्राच्या परिस्थितीचे आकलन होते. ते त्या पदावर 1819 पासून होते. त्यांनी सामाजिक समरसतेचा प्रयोग सर्व क्षेत्रांत सुरू केला. त्यांनी नव्याने राबवण्यात येत असलेली शिक्षणपद्धत हिंदू धर्माच्या विरूद्ध आहे हा गैरसमज दूर करण्यासाठी समन्वयवादी भूमिका घेतली. त्यांनी धर्मबंधने ही कायद्यापेक्षा अधिक बळकट असतात हे ओळखले होते. त्यामुळे त्यांनी येथील भारतीय लोकांच्या धर्मभावना न दुखावता त्यांच्यासाठी नीती, विज्ञान, साहित्य, संस्कृती यांवर आधारित अशी शिक्षणपद्धत सुरू केली. आर्चबिशप बार्नेस यांच्या प्रयत्नातून 1815 मध्ये मुंबईत एक वेगळीच संस्था स्थापन झाली. तिचे नाव ‘द सोसायटी फॉर प्रमोटिंग द एज्युकेशन ऑफ दि पुअर विदीन द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे’. पण त्यातून फक्त इंग्रज अधिकारी, विद्यार्थी यांनाच शिक्षण मिळण्याची सोय होती. त्यामुळे सर्वांना शिक्षणाची संधी मिळावी म्हणून मुंबईतील काही प्रमुख नागरिकांच्या सहकार्याने त्या संस्थेची एक शाखा ‘बॉम्बे नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी’ या नावाने 21 ऑगस्ट 1822 पासून सुरू झाली. स्वत: गव्हर्नर हेच त्या संस्थेचे अध्यक्ष होते. सदाशिव काशिनाथ छत्रे, जगन्नाथ शंकरशेठ, मुल्ला फिरोज, धाकजी दादाजी असे वेगवेगळ्या जातिधर्मांचे विद्वान त्या संस्थेत शिकून तयार झाले होते.
———————————————————————————————-