बूच : नावातच जरा गडबड आहे!

_buch

माझ्या गेटसमोर एका बाजूला प्राजक्त आणि दुस-या बाजुला बूच आहे. पावसाळयात दोघांचा मिळून गेटसमोर सडा पडतो. दोहोंचा सुगंध नाकात शिरताच शाळेपासून कॉलेजापर्यंतचे कोठलेही हळवे क्षण ताजे होऊन समोर उभे ठाकू शकतात.

फुलांचे शेकडो घोस बुचावर लटकलेले असतात. त्यांना उंची दागिन्यांचा फिल असतो. वा-याची झुळूक आली, की फुले हलकेच झोके घेऊ लागतात. त्यांची मिजास अशी, की जसे काही एखाद्या लावण्यवतीच्या कानातील झुमके. लोकांची भिस्त खाली पडणा-या फुलांवरच असते. ती अलगद खाली येतात आणि भूमातेच्या अंगावर झोपावे तशी सर्वत्र विखरून पसरून राहतात. ती इतर फुलांप्रमाणे कधीच तोंडावर पडत नाहीत. त्यांचे ते लवंडणे राजेशाही असते. त्यांच्या दांड्या एकमेकांत गुंफून गजरे केल्याच्या आठवणी घरोघरी सापडतात. पण, बुचाबद्दल एक खंत मला कायम वाटत आली आहे; ती नावासंबंधी आहे. एवढे स्वर्गीय देखणेपण आणि सडसडीत उंची लाभलेले फुलाचे दुसरे झाड नसेल. पण, त्याचे नाव फारच निरस आहे. 

बकुळ, सोनचाफा, पारिजात ही किती चपखल नावे आहेत. त्या झाडाचे नाव मात्र बूच. त्याच्या खोडापासून बाटल्यांसाठी बूच बनवायचे म्हणून त्याचे नाव बूच म्हणे. त्याची पाने जराशी निंबासारखी असतात म्हणून त्याला आकाशनिंबही म्हणतात. असे दुस-याशी दिसण्यात साम्य आहे; म्हणून कोणी त्याचे नाव जोडून देत असतात का? त्याला आकाशमोगरा आणि गगनजाई अशी आणखी दोन नावे आहेत. त्यातही आकाश आणि गगन यांना मोगरा आणि जाई या फुलांची नावे जोडून त्याच्या नावाला एक प्रकारे पानेच पुसली गेली आहेत. म्हणजे त्या नावांतही बिचा-याचे स्वत:चे, स्वतंत्र असे काही नाही. दुस-या कोणाच्या गुणावगुणावर त्याचे नाव आधारित असेल तर ते किती अवमानकारक म्हणायचे?

त्याला आणखी एक नाव आहे असे म्हणतात, लटक चमेली. त्या नावातील  लटक वगैरे किती बेकार वाटतो. ते नाव आहे की वर्णन? चटकमटक चांदणी फतक फतक स्लिपर उडवत चालल्यासारखेच वाटले.

_buch2पण, बुचाला एवढी नावे असूनही उपयोग तसा काहीच नाही. त्यापैकी कोणत्याच नावाने कोणीच त्याला ओळखत नाही. आणि तसेही एकही नाव त्याच्या खानदानी सौंदर्याला शोभेल असे आणि त्याचे राजबिंडेपण अधोरेखित करेल असे नाही. त्यापेक्षा बूचच म्हणणे बरे; म्हणून ते टिकले असावे. पण तरीही एवढ्या शाही झाडाला बूच म्हणणे म्हणजे एखाद्या उत्तुंग व्यक्तिमत्वाच्या माणसाला, केवळ त्याचा साखर कारखाना आहे म्हणून गन्नाशेठ किंवा चिपाडभऊ म्हणण्यासारखे आहे. त्या फुलांना बंगाली भाषेत सीताहाराची फुले म्हणतात म्हणे. ते नाव जबरा आवडले! त्या फुलांना शोभणारे आणि न्याय देणारेच आहे.

-धनंजय चिंचोलीकर 9850556169
c.dhanu66@gmail.com
 

Previous articleमेणवलीतील घंटेचे देऊळ
Next articleउग्रतारा चामुंडा देवी
धनंजय चिंचोलीकर यांचे 'मराठवाडी ग्रामीण भाषे'तील मराठी साहित्य गाजले. त्यांचे औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील चिंचोली - लिंबाजी हे गाव. ते राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर लिहिणारे लेखक आहेत. ते दैनिक तरुण भारत, देवगिरी (औरंगाबाद) येथे पत्रकार होते. त्यांनी बी ए आणि बी जे (पत्रकारिता) पर्यंत शिक्षण घेतले. ते त्रेपन्न वर्षाचे आहेत. त्यांनी 'पुन्यांदा चबढब' ,'बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी', 'टर्ऱ्या, डिंग्या आणि गळे', 'आमादमी विदाऊट पार्टी' ही पुस्तके आणि 'चौथ्या इस्टेटच्या बैलाला' हे नाटक लिहिले. त्यांच्या 'आमादमी विदाऊट पार्टी' या पुस्तकाला महाराष्ट्र सरकारकडून पुरस्कार मिळाला. ‘पुन्यांदा चबढब’ या पुस्तकाला 1998 सालचा राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीचा 'दत्तू बांदेकर' हा पुरस्कार मिळाला; तर, 'टर्र्या, डिंग्या आन् गळे' या पुस्तकाला बी. रघुनाथ पुरस्कार, नाशिकचा विमादी पटवर्धन पुरस्कार प्राप्त झाला आहे. लेखकाचा दूरध्वनी 9850556169