बुद्धविहार संस्कृतीच्या शोधात… (Integration Of Buddhavihar Culture)

0
16
बुद्ध विहार समन्वय समितीने बुद्ध विहार संस्कृती निर्माण करण्यासाठी 2014 ते 2040 या काळादरम्यान सत्तावीस वर्षांचा कार्यक्रम आखला आहे. पैकी 2014 ते 2020 हा प्रथम चरण पूर्ण होत आला असून त्यात दहा हजार बुद्ध विहारांच्या पाचशे प्रतिनिधींची परिषद नागपूरला भरवली गेली होती. परिषदेचे शीर्षक होते बुद्ध विहारोंका प्रथम अधिवेशन. त्यास भिख्खुगण, उपासक, विचारवंत, लेखक यांची उपस्थिती होती. बुद्ध विहार समन्वय समितीने महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांतील सर्व विहारांचे राज्यस्तरीय अधिवेशन नागपूरला आयोजित करणे ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे. अधिवेशनामधील निर्णय सर्वमान्य, उपयुक्त असतात. अधिवेशन हा सर्वांनी मान्य केलेला कायदाच असतो. त्यामध्ये संघटनेची ध्येयधोरणे, उपक्रम, मार्गदर्शक, प्रशिक्षक, कार्यालय, प्रशिक्षित कार्यकर्ते, समर्थक, संघटनेचे आर्थिक नियोजन, जनतेचे प्रश्न समजून त्यासाठी जन आंदोलन, चर्चा, बहुमताने निर्णय घेणे, निर्णयाची अमलबजावणी करणे, विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देणे,बौद्धजनांत बौद्ध प्रतीके, चिन्हे यांविषयी आदर निर्माण करणे, बौद्ध धम्म सहलींचे आयोजन कमीत कमी दरात उपलब्ध करून देणे त्या सर्वांचा समावेश होता. त्यामुळे बौद्ध धम्माचे धार्मिक व आचरणशील जैविक संस्कार विकसित होतील अशी आशा आहे.

सत्तावीस वर्षांच्या कार्यक्रमातील पहिल्या टप्प्यात काही उत्तम गोष्टी घडून आल्या आहेत. 1. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, तेलंगण, गोवा, उत्तर प्रदेश या पाच राज्यांतील पाचशे बुद्ध विहारांत पंधरा हजार लोकांनी पाली भाषेची परीक्षा दिली आहे. 2. बुद्ध विहार संस्कृती साप्ताहिक व्याख्यानमाला नागपूर येथे छत्तीस विहारांत चालवण्यात येत आहे. 3. दहा हजार डायऱ्यांचे वितरण केले गेले आहे. 4. अर्थशास्त्र विकसित करण्यासाठी पाढऱ्या साड्या, पांढरे शर्ट, पायजमे यांचे वितरण करून, धम्मदानातून विहार समन्वय समितीचा खर्च भागवला जात आहे.

 

श्रद्धा व्यक्त करावी, मन:शांती मिळावी म्हणून विहारांकडे पाहिले जाते. धम्माच्या सद्गुणांचे परिपोषण विहारांच्या माध्यमातून होत असते. त्यामुळे बौद्ध धम्माच्या अस्तित्वाकरता, मानवाच्या सुखी जीवनाकरता, प्रगतीकरता विहार ही आवश्यक गोष्ट ठरते. अशा सर्व बौद्ध विहारांचा समन्वय ही काळाची गरज आहे. तेच कार्य बुद्ध विहार समन्वय समितीने हाती घेतले आहे. बौद्ध धम्म हा वैचारिक, परिवर्तनशील, मानवतावादी धम्म आहे. विहारांतून नमो बुद्धाय, जयभीम, बावीस प्रतिज्ञा, पंचशील; तसेच प्रज्ञा, करूणा हे शब्द ऐकण्यास मिळतात. मानवी मूल्यांची प्रतिष्ठापना, परिवर्तनवादी दिशेने प्रवास कसा करायचा, काय सोबत घ्यायचे व काय सोबत घेऊ नये, नव्या परिस्थितीशी सामना कसा करावा, नवे प्रश्न कोणते, परिवर्तनाची ताकद वाढवण्यासाठी सम्यक उत्तरांबरोबर सम्यक आचरणाची जाण असे विविध तऱ्हेचे मार्गदर्शन विहारांतून व्हावे हे अपेक्षित आहे. अनेक बुद्ध विहार 14 ऑक्टोबर 1956 नंतर बांधले गेले आहेत. मात्र त्यांचा वारसा अशोककालीन स्तूप, विहार,नालंदा-तक्षशिला-विक्रमशीला-उदंती-अजिंठा लेणी असा ऐतिहासिक आहे.

 

धम्माचा आशय कळावा म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्महा वैज्ञानिक ग्रंथ लिहिला. आता गावागावांत, वस्ती-मोहल्ल्यांत विहार झाले आहेत. बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर साठ वर्षे झाली, तरी बौद्ध संस्कृती किंवा विहार संस्कृती मात्र निर्माण होऊ शकलेली नाही. संवाद-संबंध जुळले गेलेले नाहीत. करुणा, मैत्री, त्याग, सहकार्य, आपुलकी, अहिंसा या मानवी मूल्यांपासून समाज दूर जाताना दिसत आहे. राग, द्वेष, लोभ, भय, दु:, शोक, माया या विकारांनी समाज पछाडला आहे.

विहारांचे जीवनात असलेले महत्त्व न कळल्यामुळे विहार संस्कृती निर्माण होऊ शकलेली नाही. बाबासाहेबांविषयी जेवढी श्रद्धा समाजात आहे तेवढीच श्रद्धा बौद्ध धम्माबद्दल असण्यास हवी, पण तसे दिसत नाही. तशी आस्था रूजवण्यास भिक्खुसंघ, उपासक, कार्यकर्ते कमी पडले आहेत. राजकारणी, विविध पक्षांचे लोक स्वार्थ, अहंकार, पदांची लालसा यांत गुरफटले आहेत. त्यामुळे धम्माकडे दुर्लक्ष झाले आहे. धम्मावर चांगले भाषण करणारा जर आचरणशून्य असेल तर धम्मधर होऊ शकत नाही. तसेच भाषेचा अभाव म्हणजे पाली भाषेतील वंदना-पूजापाठ याचा अर्थ कळण्यासाठी पाली भाषा मुळापासून शिकल्यास बुद्ध वंदन हृदयापर्यंत पोचू शकेल. बुद्ध-धम्म-संघ याविषयी सखोल विचार केल्यास भगवान बुद्ध हा मार्गदाता, महामानव म्हणून त्यावर आदरयुक्त श्रद्धा ठेवली गेली पाहिजे. देव, कर्मकांडे नाकारली पाहिजेत. युवा वर्गाला विहारात येण्यासाठी, धम्म कार्यात सहभागी होण्यासाठी कार्यक्रम, उपक्रम यांचे आयोजन केले गेले पाहिजे. बालसंस्कार शिबिरे, धम्म शिबिरे, गीतस्पर्धा, काव्यस्पर्धा, निबंधस्पर्धा वगैरेंद्वारा आंबेडकर स्टडी सर्कल तयार करून वाद-संवाद, चर्चा यांमार्फत धम्मज्ञान वर्ग चालवले गेले पाहिजेत. त्यासाठीच बुद्ध विहार समन्वय समिती स्थापन झाली आहे. ती समिती गावापासून ते राष्ट्रीय स्तरावर समन्वय साधत आहे.

विहार समन्वय समितीच्या अधिवेशनात भदन्त मेघंकर महाथेरो (श्रीलंका) यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण व उद्घाटन झाले. धम्मचारी मैत्रीवीर नागार्जुन (हैदराबाद) यांचे धम्मावरील भाषण झाले. त्याशिवाय 1.  भगवान बुद्ध शासन समृद्ध करने की आवश्यकता, 2. 2021 में होनेवाली जनगणनामे क्या लिखना चाहिए ताकी बौद्धोंकी संख्या भी बढे और सवलतीयाँ भी बरकार रहे | 3. धम्मसंस्कार मजबुतीका कार्य महिला वर्ग अच्छी तरहसे कर सकती है | 4. बुद्ध विहार संस्कृती का मूलाधार भिक्खु संघ है| अशा चार विषयांवर विचारवंत व अभ्यासकांनी व्याख्याने दिली. अधिवेशन अशोक सरस्वती बोधी यांच्या प्रयत्नातून साकार झाले.

बाबासाहेब आंबेडकर यांनी सामुदायिक प्रार्थना कशी करावी याबद्दल सांगितले, की मी बौद्ध धम्माचा उपासक आहे. मी नुसता बौद्ध धम्म घेतलेला नाही, नुसता बोलतो असेही नाही, तर प्रत्यक्ष कृती करून दाखवीन. माझे शेवटचे आयुष्य मी आता बुद्ध धम्माच्या प्रचारासाठी खर्च करण्याचे निश्चित केले आहे. बाबासाहेबांचे हे विधान अधिवेशनामध्ये वारंवार उल्लेखले गेले. विहार समन्वय समितीच्या अधिवेशनातील अतिशय ज्वलंत प्रश्नांवरील परिसंवाद म्हणजे 2021 मध्ये होणाऱ्या जनगणनेमध्ये भरल्या जाणाऱ्या फॉर्ममध्ये 7 नंबरच्या धर्माच्या रकान्यात आपण पेनाने (पेन्सिलने नाही) बौद्ध असे लिहावे आणि 8 नंबरच्या रकान्यात अनुसूचित जाती किंवा एस.सी. असे लिहावे. असे अनेक अभ्यासकांचे मत पडले. त्यावर अनेकांनी साधकबाधक चर्चा केली. जिज्ञासूंचे प्रश्न पुढीलप्रमाणे होते –

1. आम्ही धर्मांतर केले, आता आम्ही बौद्ध झालो. बौद्ध हा धर्मच नाही तो धम्म आहे.

2. जातीच्या रकान्यात जर महार लिहिले तर आपला स्वाभिमान, अस्मिता याचे काय? जाती नष्ट करणण्यासाठी आम्ही बौद्ध धम्म घेतला.

3. जनगणनेत जात लिहिली तर बौद्ध धम्मात आल्यावरही जाती-जातीव्यवस्था कायम राहणार असेल तर कोणी कशाला बौद्ध धर्मात येतील? आमची ओळख बौद्ध महार, तेली बौद्ध, कुणबी बौद्ध, भटके बौद्ध अशी होईल.

4. आम्ही आई-वडिलांनी ठेवलेली नावे राम, कृष्ण, घन:श्याम, रामदास, देवीदास अशी कितीतरी देवादिकांचे बदलली नाहीत. त्या नावांनी जन्मभर मिरवतो. त्यातून हिंदू धर्माची पदोपदी आठवण होते. त्याचे काय करावे?

5. आडनावांवरून जात ओळखली जाते, ती आडनावे आपण बदलावी काय? आज आम्ही बौद्ध धम्म घेतला तरी नव्वद टक्के नवबौद्ध (जे सुशिक्षित, स्वाभिमानी असूनही) मुलांच्या प्रमाणपत्रात केवळ हिंदू व महार लिहिणारे असल्याचे दिसते. काहींचे म्हणणे असे की आपण फक्त दर दहा वर्षांनी येणाऱ्या जनगणनेत फॉर्म भरून देण्यापुरता विचार करत आहोत. म्हणून बौद्ध-एस्सी असे लिहावे. आपल्याला सवलती बाबासाहेबांनी मिळवून दिल्या. बौद्ध धम्मही दिला. मनात बौद्ध धम्माचे अनुकरण करावे. संविधानाला प्रमाण मानावे. भावनात्मक रीतीने वाटचाल न करता बुद्धिवादी दृष्टीने समाज सुशिक्षित, संघटित बनवण्यासाठी प्रयत्न करावा. जागतिक स्तरावर आपली बौद्धांची संख्या वाढणारच आहे. भाषेत मातृभाषेबरोबरच पालीचा उल्लेख करावा. अशी मत-मतांतरे चर्चिली गेली.

अशा प्रकारच्या अधिवेशनाची तुलना बुद्धकालीन धम्म संगितीशीच केली जाऊ शकते. बाबासाहेबांचे भारत बौद्धमय करीन हे स्वप्नही साकार झाल्याशिवाय राहणार नाही. गोव्यात एकही बुद्धविहार नाही म्हणून 22 सप्टेंबर 2019 रोजी भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते बुद्धविहाराचे उद्घाटन झाले. त्यासाठी बुद्ध विहार समन्वय समितीने पंचवीस लाख रुपयांची मदत केली आहे. तसेच बुद्ध विहार बचाव मोहीम हाती घेतली आहे. नागपूरच्या दोनशेपेक्षा जास्त विहारांना पाडण्याच्या सूचना प्रशासनाकडून मिळाल्याने या समितीने लगेच मेळावे, मोर्चे, धरणे आंदोलने करून यश मिळवले. समता सैनिक दलाने त्यात मोलाचे सहकार्य केले.


आशा थोरात 9049549150

आशा माधवराव थोरात यांनी एम.ए, बी.एड या पदवी मिळवल्या आहेत. त्या विदर्भ महाविद्यालयातून (अमरावती) सेवा निवृत्त झाल्या. त्यांचा पीएच. डी. चा विषय मराठी लोक साहित्यातील दलित जीवन हा होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली बारा विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे. त्यांचा पानगळ कवितासंग्रह, अंगठा ते सही भाग एक ही पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्या अस्मिता दर्शन, लोकानुकंमा, रमाई इत्यादी मासिकांत लेखन करतात.

———————————————————————————————-