बालगिर्यारोहक शर्विका म्हात्रे – विक्रमच विक्रम! (Sharvika Mhatre – child she is but walks mountains and forts)

8
25

शर्विका म्हात्रे महाराष्ट्राची हिरकणी म्हणून ओळखली जाते ! तिने दीड वर्षे वयापासून गिर्यारोहण क्षेत्रात पदभ्रमणाला सुरुवात केली. तिने त्यांनंतर अडीच वर्षात म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत गिर्यारोहण क्षेत्रातील यशाचे शिखर गाठले. शर्विकाने शिवनेरी, हडसर, मंडणगड, कर्नाळा, बाणकोट असे सव्वीस किल्ले वयाच्या चार वर्षात सर केले आहेत ! तिच्यात किल्ल्यांच्या संवर्धनाची जाणीव आहे. तिला गडावर प्लास्टिक टाकू नये ही समज आहे. तिच्या आईचे नाव अमृता आणि वडिलांचे जितेन. शर्विकाची आई खासगी शिकवणी चालवते आणि वडील उरण येथे एका खासगी कंपनीत नोकरीला आहेत. त्यांची सर्व आवडनिवड आणि श्रद्धा शर्विकात उतरली आहे. म्हात्रे कुटुंब रायगड जिल्ह्याच्या अलिबाग तालुक्यातील लोणारे या गावचे. शर्विकाचा जन्म 12 मार्च 2017 चा.

गोष्ट घडली ती अशी शर्विकाच्या आईवडिलांना सह्याद्री प्रतिष्ठान ह्या दुर्गसंवर्धन संस्थेची माहिती मिळाली आणि त्यांना त्यांचा छंदच गवसला ! त्या दोघांच्या गडकिल्ल्यांच्या प्रवासाला सुरुवात झाली. ते सांगतात, मुळात आम्हा दोघांच्या रक्तात इतिहासाची आवड आणि शिवाजी महाराज ह्यांच्याबद्दल विलक्षण निष्ठा होतीच; आम्ही शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल सारं काही जाणून घेऊ इच्छित होतो. तसा गडकिल्ल्यांचा शोध घेत होतो. त्यात आम्हास सह्याद्री प्रतिष्ठानचा शोध लागला. आमच्या मुलीमध्ये ते सर्व उतरणे स्वाभाविकच आहे. खाण तशी माती अशी म्हण मराठीमध्ये आहेच.”

शर्विका आई अमृता आणि वडिल जितेन यांच्यासमवेत

 

शर्विकाने पहिली यशस्वी मोहीम 26 जानेवारी 2019 रोजी केलीती महाराष्ट्रातील कठीण दुर्गांच्या यादीत असणारा कलावंतीण सुळका सर करून ! त्यामुळे महाराष्ट्राला तिची ओळख झाली. शर्विका आणि तिचे आईबाबा या तिघांचे किल्ल्यावर जाण्याचे बेत चालत. कधी प्रत्यक्ष जाणेही होई. एके दिवशी, त्यांचे कलावंतीण मोहिमेचे नियोजन ठरले. महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या पनवेल, कर्जत या तालुक्यांच्या सीमेवर असणारा कलावंतीण सुळका म्हणजे प्रबळगड किल्ल्याचा एक भाग. दगडात कोरलेल्या पायऱ्या, निसरडी वाट,अंगात धडकी भरवणारी खोल दरी, वेडीवाकडी वळणे असा तो सुळका सर करणे म्हणजे एक भयानक अनुभव. परंतु शर्विकाने तो सुळका लीलया सर करून वेगळा इतिहास घडवला !

शर्विकाला आणि विशेषतः तिच्या आईवडिलांना त्या गोष्टीची पुसटशीही कल्पना नव्हती, की ती मोहीम त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण देणारी ठरेल. गडकिल्लेकऱ्यांची संख्या, विशेषतः महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे. ‘वीकेण्ड’ला तर मुंबई-पुण्याभोवतीचे उंच उंच सुळके पार करण्याची इर्षाच तरुणांत असते. शर्विकाची कलावंतीण शिखर मोहीम चालू असताना अनेक जण अवाक होऊन तिच्याकडे पाहत होते. शर्विकाचे छोटेपण त्यांना अचंबित करून गेले. शर्विका सुळका आरोहण करत असताना अनेकांनी तिचे व्हिडिओ काढले आणि तिचे व्हिडिओ व्हायरल झाले. शर्विका ही एवढ्या लहान वयात अवघड सुळका सर करणारी महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील सर्वात लहान कन्या होती ! त्यानंतर मीडिया, वृत्तपत्रे अशा सर्व माध्यमांनी तिच्या कामगिरीची दखल घेतली आणि तिची नोंद इंडिया बुक आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली, ‘इंडिया बुकमध्ये तिची भारतातील सर्वात लहान गिर्यारोहक म्हणून नोंद झाली, तर ‘आशिया बुक रेकॉर्ड’ने तिला ‘ग्रँडमास्टर’ हा किताब दिला. अशा प्रकारे, शर्विकाची गिर्यारोहण क्षेत्रात ग्रँड एंट्री झाली.

शर्विकाने वयाच्या तिसऱ्या वर्षी 10 ऑक्टोबर 2020 रोजी महाराष्ट्रातील सर्वात उंच असा साल्हेर किल्ला साडेपाच तासांत सर करून कोरोना योद्ध्यांना मानवंदना दिली. तो तिच्या स्वतःच्या नावावरील नोंदला गेलेला सलग पाचवा विक्रम आहे.

शर्विका कळसूबाई शिखरावर

 

शर्विकाची कळसुबाई मोहीम 26 जानेवारी 2021 रोजी आखण्यात आली. त्या मोहिमेत शर्विकासोबत पस्तीस जणांची टीम सहभागी झाली होती. त्यामध्ये डॉ. राजाराम हुलवान, पोलिस अधिकारी जयश्री बोरकर, वकील सुधाकर निषाद, शिक्षक अशोक वारगे, ड्रोन ऑपरेटर प्रणित माने आणि साहित्यिक सलोनी बोरकर, दीपक लाल सहभागी झाले होते. शर्विकाने कळसुबाई शिखर अवघ्या तीन तास दहा मिनिटांत सर केले आणि महाराष्ट्रातील सर्वात उंच असलेल्या त्या शिखरावर स्वतःचे नाव कोरणारी ती जगातील सर्वात लहान कन्या ठरली. शर्विकाच्या नावावर वयाच्या साडेतीन वर्षात तब्बल दहा विक्रम आहेत.

शर्विकाला मिळालेले पुरस्कार

 

शर्विकाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा, ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तीन वेळा, ‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’ (लंडन) मध्ये दोन वेळा, ‘डायमंड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये एकदा आणि ओ.एम.जी. रेकॉर्डमध्ये एकदा अशी नोंद झाली आहे. तसेच, तिला आदर्श बाल गौरव क्रीडारत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्याखेरीज कुलाबा जीवन गौरव, मावळा सन्मान, तेजस्विनी पुरस्कार असे काही पुरस्कार तिच्या नावावर आहेत.

मोहिमेत सहभागी झालेली टीम

 

शर्विका शिवाजी महाराजांची गारद प्रभावीपणे आणि आत्मविश्वासाने म्हणते. ती महाराजांच्या राजमुद्रेवर काय लिहिले आहे ते स्पष्टपणे बोलून दाखवते. तिला महाराजांच्या आयुष्यातील लहानमोठे प्रसंग माहीत आहेत. तिला महाराजांच्या आईचे, वडिलांचे, मुलांचे इतकेच नव्हे तर महाराजांच्या आठ राण्यांची नावेही माहीत आहेत. यू ट्यूबवर तिच्या नावाचे sharvika mhatre vlog चॅनेल आहे. त्या चॅनेलवर तिचे किल्ले चढताना व्हिडिओ, मुलाखत तसेच विविध मोहिमा यांची माहिती मिळते.

तिचा चौथा वाढदिवस 2021 च्या मार्चला इर्षाळगडावर साजरा केला तो केक कापून नव्हे तर रानावनातील मुलांना खाऊ आणि फळे देऊन. तिला वाढदिवसानिमित्ताने साहित्य संपदाग्रूपतर्फे पुस्तके मिळाली. तिने ती माणुसकी प्रतिष्ठानने राबवलेल्या मोफत वाचनालय या उपक्रमाला दिली आहेत.

जितेन म्हात्रे9764607060

वैभव धनावडे 99300 80375 dhanvai@gmail.com

वैभव दिलीप धनावडे यांनी साहित्यसंपदा या ग्रूपची स्थापना केली. त्या अंतर्गत विविध स्थानिक साहित्यसंमेलने, गझल, कविता, कथा अशा विषयांवरील कार्यशाळा यांचे आयोजन आणि मुलांसाठी साहित्यसंस्कार या उपक्रमाची मांडणी केली. त्यांचा ‘माझा एकलेपणा’ हा चारोळी संग्रह प्रकाशित आहे. ‘गोष्ट तुझी माझी’ हा कथासंग्रह आणि ‘हायकूची दुनिया’ हा हायकू संग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे. ते त्र्याण्णवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निमंत्रित कवी होते. ते इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर आहेत.

———————————————————————————————————————————————————————-

8 COMMENTS

  1. शर्विकााच्या कळसुबाई शिखर मोहीमेत पेटकर कुटुंब सहभागी होते.एक अविस्मरणिय क्षण होता तो.वैभव यांनी छान माहिती दिली

  2. अतिशय सुंदर लिहिला आहे लेख अशा ह्या अविस्मरणीय क्षणांमध्ये आम्हाला सहभागी होता आले.माहीम फत्ते केली ह्याचा आनंद गगनात मावत नव्हता.

  3. खूप सुंदर माहिती सादरीकरण!! आपल्या सर्वांच्या पाठिंब्यामुळे आणि शुभाशिर्वाद ह्यामुळेच आम्हाला नेहमी नवीन नवीन मोहिमा यशस्वी करण्याची प्रेरणा मिळते.जय शिवराय!!!!धन्यवाद

  4. वैभव सर खूपच सुंदर लेखन. चिमुकली शर्वीका अवघ्या पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरली.सॅल्युट सर उर्जादायी लेखनाकरिता..👍💐💐

  5. खूप छान माहिती दिली…एवढ्या लहान वयात एवढ मोठ कार्य केले आहे ह्या मुलीने… खरच hats off to her��������

  6. खूपच छान लेख सर . आजची मुले टीव्ही आणि मोबाईल मध्ये आपला आनंद शोधतात पण शर्विकाने येवढ्या लहान वयात गड कील्यांशी मैत्री करून त्यात आपला आनंद शोधून एक आदर्श ठेवला आले सर्व मुलांसाठी. तुमचा हा लेख मुलांना आणि त्यांच्या पालकांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल.