बाबुराव भारस्कर यांचा निवडणूक चमत्कार!

0
60

बाबुराव भारस्कर यांच्यावर गांधीवादाचे संस्कार झाले. ते मातंग समाजातून कॅबिनेट मंत्रीपदापर्यंत पोचलेले साठच्या दशकातील पहिले नेते. बाबुराव यांनी वंचित घटकांच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले…

शेवगावचा पूर्व-पश्चिम विस्तार लक्षात घेतल्यास शेवगावची सुरुवात भारस्कर वाडी पासून आणि शेवट भारदे गल्लीने होतो. त्या दोन्ही ठिकाणांहून दोन अशी व्यक्तिमत्त्वे उदयास आली, की त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाची आणि विचारांची छाप सबंध महाराष्ट्रावर पाडली. त्यातील अग्रणी म्हणजे ‘महाराष्ट्राचे बुद्धिवैभव’ पद्मभूषण बाळासाहेब भारदे, तर दुसरे राजकारणातील त्यांचे शिष्योत्तम बाबुराव नामदेव भारस्कर! दोघांमध्ये वयाचे पंधरा वर्षांचे अंतर. बाबुराव मांगवाड्यात-दलित वस्तीत जन्मले. ते पुढे महाराष्ट्राचे समाजकल्याण मंत्री झाले. त्यांना शेवगावी प्राथमिक शिक्षण घेत असताना, गांधी विचारांनी झपाटलेल्या बाळासाहेब भारदे यांचा परीस स्पर्श झाला आणि त्यांच्या आयुष्याचे सोने झाले!

भारस्कर यांचा जन्म 30 फेब्रुवारी 1930 रोजी झाला. ते नगरला मॉडर्न हायस्कूलमध्ये शिकले. तेथे त्यांना आपटे, मामासाहेब हतवळणे या सरांच्या संस्कारांनी घडवले. पटवर्धन बंधूंच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि त्यांच्यातील कार्यकर्ता तयार झाला. त्यांनी पुण्यातून इंजिनियरिंगची पदवी मिळवली.

बाळासाहेब भारदे नगर जिल्हा काँग्रेसचे सर्वेसर्वा होते. त्यांनी श्रीगोंद्याच्या राखीव जागेसाठी उमेदवार म्हणून बाबुराव यांना आमदारकीचे तिकिट 1952 साली मिळवून तर दिलेच, पण त्यांचा प्रचार करून त्यांना निवडूनही आणले. बाबुराव वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी आमदार झाले! ते 1957 च्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या लाटेत मात्र विजयी होऊ शकले नाहीत. ते आमदार म्हणून पुढे 1962, 65, 67 मध्ये निवडून आले. मंत्रिपदाची माळ त्यांच्या गळ्यात 1962 मध्ये पडली खरी, पण त्यांना मंत्रिमंडळात घेण्यास प्रस्थापितांचा मोठा विरोध होता. कारण त्यावेळी नगर जिल्ह्याचे बाळासाहेब भारदे विधानसभेचे सभापती, बी.जे. खताळ व आबासाहेब निंबाळकर उपमंत्री होते. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी बाबुरावांना समाजकल्याण मंत्री जिल्ह्यातील मातब्बरांचा विरोध डावलून केले. त्या खात्याच्या उपमंत्री प्रतिभा पाटील होत्या. त्या पुढे राष्ट्रपती झाल्या.

बाबुरावांना 1967 च्या निवडणुकीत तिकिट नाकारले गेले. तेव्हा त्यांचा अर्ज मात्र भरलेला राहिला, तो मागे घेतला गेला नाही. त्यांनी पक्षादेश पाळून मला मते देऊ नका, काँग्रेसच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा अशी पत्रके वाटली; तरी जनतेने मात्र बाबुरावांनाच निवडून दिले! त्यांच्या त्या राजकीय चमत्काराची चर्चा तेव्हा देशभर गाजली.

त्यांनी समाजकल्याण मंत्री असताना शेवगावमध्ये महादेव गृहनिर्माण सोसायटी स्थापन करून दलित बांधवांना टुमदार घरे बांधून दिली, पंढरपूर येथे कैकाडी मठासाठी जागा उपलब्ध करून दिली, तर धुळे येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह स्थापन करून वंचितांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. बाबुरावांचे महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या सर्व माजी आमदारांची संघटना बांधली. तिचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्या संघटनेमार्फत त्यांनी आमदारांच्या अनेक मागण्या मान्य करून घेतल्या. त्यांनी शेवगावच्या मागासवर्गीय महिलांना रोजगार मिळावा यासाठी जरीची वस्त्रे विणण्याचे केंद्र सुरू केले होते. त्यांचा विशेष लोभ माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यावर होता. सुशीलकुमार मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचा पहिला सत्कार बाबुरावांनी शेवगावच्या भारस्कर वाडीत दिमाखाने केला होता. बाबू जगजीवन राम यांनी बाबुरावांना पुत्रवत प्रेम दिले. बाबुरावांनी जगजीवन राम यांची जन्मशताब्दी बिहार येथील सासरण येथे मोठ्या उत्साहात साजरी केली. बाबुराव त्यांच्या राजकीय गुरूंना कधीही विसरले नाहीत. त्यांनी शेवगावला बाबू जगजीवन राम यांच्या नावाने संकुल निर्माण करून अनेक गरिबांना रोजगार मिळवून दिला, तर बाळासाहेब भारदे यांच्या नावाने सांस्कृतिक मंदिर उभारले आहे.

त्यांनी उत्तरप्रदेशचे माजी राज्यपाल असलेल्या राम नाईक यांचे एक छोटेसे काम केले. त्याची जाणीव ठेवून राम नाईक यांनी अटलजींच्या काळात बाबुरावांना गणपतीपुळे येथे पेट्रोल पंप मंजूर केला.

– रमेश भारदे, शेवगाव 9326383535 meshrag@gmail.com

——————————————————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here