बडोद्यातील दुष्काळ निवारणाच्या नोंदी (Sayajirao’s Scarcity Notes)

2
52

भारताला दुष्काळ काही नवीन नाही. दुष्काळ भारत देशाचे नाव हिंदुस्तान असतानाही पडत होते आणि दुष्काळ पडला, की लोकांच्या मदतीसाठी काही योजनाही केल्या जात असत. बरोडा संस्थानचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी एक छोटे पुस्तक लिहिलेले आहे – “Notes on Famine Tour by H H Maharaja Gaekwar.प्रकाशन वर्ष 1901. त्या पुस्तकाच्या पहिल्या पानावर खासगी रीतीने छापलेले असा उल्लेख आहे. ते गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सया संस्थेच्या डिजिटल लायब्ररीवर उपलब्ध आहे.

सयाजीराव यांनी डिसेंबर 1899-जानेवारी 1900 या काळात बडोदा संस्थानच्या विविध भागांना भेटी दिल्या, तेथील योजनांची पाहणी केली. काही नव्या योजना चालू केल्या. त्या सगळयांची पद्धतशीर नोंद ठेवून तो अहवाल तयार झाला आहे.

सयाजीराव यांनी पहिल्याच प्रकरणात एक मार्मिक नोंद केली आहे- दुष्काळाची चिन्हे ऑगस्ट 1899 च्या उत्तरार्धात स्पष्ट जाणवू लागताच, मी दुष्काळाबाबतीतील नियमांचा शोध घेतला. ते नियम वाचून त्यांचे वर्गीकरण केले. मी यंत्रणा उभी करण्यावर भर दिला. कारण त्या बाबतीतील नियम एक तर अस्तित्वात नव्हते किंवा असले तरी फार अपुरे होते.त्या भेटीदरम्यान, सयाजीराव सर्वसामान्य अनेक दुष्काळग्रस्तांना भेटले आणि तेही ते महाराज आहेत हे प्रकट न करता! “त्या सुस्वभावी माणसांबरोबर वार्तालाप करणे फार आनंददायी होते. त्या लोकांबरोबर त्यांच्या बोलीभाषेत बोलण्याने जेवढा आनंद मिळाला तेवढा पूर्वी कधीच मिळाला नव्हता – खास करून, अनेकदा, मी कोण होतो हे त्यांना कळू न देता! त्यांनी त्यांच्या व्यथा अगदी मत्सरासकट मला सांगितल्या. पीके कशी बुडाली, सावकारांनी कसे छळले वगैरे. त्याचबरोबर त्यांनी शेजारपाजारच्या अधिक गरिबांना मदत कशी केली तेही सांगितले.

मात्र सयाजीराव यांचा हेतू जनतेशी संवादसाधण्यापेक्षा अधिक काही होता. जनतेची मानसिकता जाणून घेऊन त्यानुसार दुष्काळ निवारणाच्या कामात आवश्यक ते बदल घडवून आणणे हा त्या दौऱ्यामागील मोठा मानस होता. त्यानुसार त्यांनी त्यांची काही निरीक्षणे नोंदली आहेत. जेथे धर्मार्थ संस्थांची मदत पोचू शकत नाही, तेथे सरकार मदतीला धावून जाणे योग्य आहे. सर्व प्रांतांत धर्मार्थ गृहे उघडण्याची वेळ अजून आलेली नाही. त्याचा वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वावलंबी वृत्ती त्यामुळे लोप पावू शकते.

सर्वत्र दिसली ती दुष्काळबाधितांची कमी श्रम करून दुष्काळी कामांवरील मिळणारी मजुरी मिळवावी व पोट भरावे ही वृत्ती. दुष्काळी कामांवर मजूर नेमताना त्यांच्याकडून काही किमान दर्ज्याचे व किमान आकाराचे काम झाले पाहिजे अशी भावना देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या मनात रुजली नव्हती. त्यांना ती त्यांची जबाबदारी आहे याची जाणीव नव्हती.

दुष्काळी कामे काढताना ती संख्येने विपुल, परंतु दीर्घकाळ फायदा होण्याच्या दृष्टीने निरुपयोगी अशी कामे काढल्याने दुष्काळी काम काढण्याचा हेतू साध्य होत नाही. त्याऐवजी, सयाजीराव यांचे धोरण थोडी उशिरा पण दीर्घकाळ चालणारी कामे काढावी व त्यातून दीर्घकाळ फायदा होईल हे बघावे असे होते. त्यांना त्या दुष्काळात ब्रिटिश सरकारचे सहकार्य काही वेळा मिळाले नाही. त्यांनी त्याची तशी एक नोंदही केली आहे.

बडोदा संस्थानला चितळ (खिजरिया) ते अमरेली आणि पुढे, चलाला व धारी असा रेल्वे मार्ग सुरू करावा असे वाटत होते. तो मार्ग निर्जन भागातून गेला असता, पण तो उभारल्यावर त्यावर बडोदा सरकारचा ताबा असावा हे ब्रिटिश सरकारला मान्य नव्हते. त्यामुळे त्यांनी परवानगी नाकारली. त्यामुळेच तो प्रकल्प सोडून द्यावा लागला. त्याऐवजी ट्रॅमचा रूट सुरू केला.हे वाचले, की आजच्या केंद्र-राज्य संघर्षाची आठवण अपरिहार्यपणे होते.

शहरांत मोठ्या संख्येने भटके, निरूद्योगी असे लोक दाखल झाले. त्यांना कोणते तरी दुष्काळी काम हवे होते किंवा इतरांच्या दयेवर जगायचे होते. मला असेही सांगण्यात आले, की दुष्काळी कामावर जाण्यापेक्षा भुकेने उपासमार होऊन जीव गेला तरी बेहेत्तर अशी वृत्ती बऱ्याच जणांची होती. त्यांना गरिबांसाठीची आसराघरे नको होती. कारण तसे करण्यात त्यांच्या स्वातंत्र्यावर बंधने येत होती. त्यांना एकच गोष्ट हवी होती- आसरागृहात अन्न आणि इतर वेळी बाहेर भीक मागण्याचे स्वातंत्र्य.

देशी संस्थानांत जुलूम होतो – नव्हे, तो असतोच हे वास्तव आहे अशी तक्रार बऱ्याच लोकांची असते. परंतु त्यांना हे माहीत नसते, की  सकृतदर्शनी कठोर वाटणारा हुकूम आवश्यक असल्यानेच दिला जात असतो आणि तरीही त्याची अंमलबजावणी फार क्वचित पूर्णपणे केली जाते.

या कामांत (दुष्काळ निवारणाच्या) रस आणि उत्साह यांच्यात सातत्य दिसणे फार दुर्मीळ असते. माझा संबंध दुष्काळबाधितांशी जितका जवळून आला, तितका इतरांचा आला नसेल. त्यामुळे मला ते जाणवले असेल. ही दुःखद उणीव काही अंशी योग्य शिक्षणाच्या अभावामुळे असेल. ते कर्तव्यपालनातील आनंदाबाबत अज्ञान असल्याने होत असेल. काही अंशी, तो सरकारी प्रोत्साहन पद्धतीतील असंवेदनशील धोरणाचा परिपाक असावा.

एकंदरीत असे वाटते, की दुष्काळ निवारण हे काम गुंतागुंतीचे असते; इतके, की त्याने सयाजीराव गायकवाड यांनासुद्धा काही वेळा कोड्यात पाडले.

सुदैवाने, सयाजीराव यांनी त्या नोंदी गुजरातीत न करता इंग्रजीत केल्या आहेत. दुष्काळ निवारणाच्या धोरणांचा अभ्यास करण्यास चालना मिळावी असे ते छोटे पुस्तक आहे.

टेलिग्राम

व्हॉट्सअॅप

फेसबुक

ट्विटर

रामचंद्र वझे 9820946547 vazemukund@yahoo.com

रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ’शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ’टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ग्रंथालीकडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा अनेक मासिकांमधून प्रसिद्ध  झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍सआणि लोकसत्ताया दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परिक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

——————————————————————————————————————————————————————————————————————————–

About Post Author

Previous articleझाडीपट्टीतील वाडे : एका लुप्त संस्कृतीचे दर्शन (Remnants of Palace’s Show History of Zadipatti – East Vidarbh)
Next articleमराठी प्रमाण भाषा व बोली यांची परस्पर परावलंबिता (Spoken languages make language perfect)
रामचंद्र वझे हे निवृत्‍त बँक अधिकारी. त्‍यांनी बँकेत चाळीस वर्षे नोकरी केली. त्‍यांनी वयाच्‍या तेविसाव्‍या वर्षांपासून लिखाणास सुरूवात केली. त्‍यांना प्रवासवर्णनांचा अभ्‍यास करत असताना काही जुनी पुस्‍तके सापडली. ती पुस्‍तके लोकांसमोर आणणे गरजेचे आहे असे त्‍यांना वाटू लागले. त्‍यांनी तशा पुस्‍तकांचा परिचय लिहिण्‍यास सुरूवात केली. रामचंद्र वझे यांची ‘शेष काही राहिले’, ‘क्‍लोज्ड सर्किट’, ‘शब्‍दसुरांच्‍या पलिकडले’ आणि ‘टिळक ते गांधी मार्गे खाडीलकर’ ही पुस्‍तके ‘ग्रंथाली’कडून प्रकाशित करण्‍यात आली आहेत. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा हंस, स्‍त्री, अनुष्‍टुभ, रुची अशा मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. त्‍यांचे ’महाराष्‍ट्र टाईम्‍स’ आणि ‘लोकसत्ता’ या दैनिकांमधून लेख आणि पुस्‍तक परीक्षणे प्रसिद्ध झाली आहेत.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here