फ्रेनर ब्रॉकवे आणि सोलापूरची गांधी टोपी

‘सत्याग्रहा’ची विलक्षण देणगी महात्माजींनी जगाला दिली ! त्यामुळे हिंदुस्थानातील राष्ट्रीय चळवळीचे पाठीराखे जगभर निर्माण झाले. साम्राज्यशाहीने अमानुष जुलुमाच्या जोरावर हिंदुस्थानाला पारतंत्र्यात जखडून ठेवले होते. ती अमानुषता सत्याग्रहातून जगासमोर आली. सत्याग्रहाची ती कल्पनाच एवढी सुसंस्कृत होती, की पाशवी साम्राज्यसत्ता त्यापुढे निष्प्रभ झाली आणि जगभर त्या कल्पनेला सहानुभूती मिळत गेली. खुद्द इंग्लंडमध्ये, महात्माजींच्या चळवळीला उचलून धरणारे लोक होते. त्यामुळेच सोलापुरात जे काही घडले त्याचे पडसाद इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये उमटले. सविनय कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूरवर जो उघड-उघड अन्याय चाललेला होता तो ब्रिटिश पार्लमेंटच्या अशाच एका सभासदाला सहन झाला नाही; त्याचे नाव फ्रेनर ब्रॉकवे !

त्यांचा जन्म कलकत्ता येथील. ते मजूर पक्षाचे सभासद होते. त्यांच्यावर महात्माजींच्या विचारप्रणालीचा मोठा प्रभाव होता. सोलापूरचा आणि ब्रॉकवे यांचा प्रत्यक्ष संबंध कोठलाही नव्हता, पण साम्राज्य सरकारने सोलापुरात जे काही चालवले होते ते कोणत्याही सुसंस्कृत माणसाला चीड आणणारे होते आणि म्हणूनच ब्रॉकवे यांनी १४ जुलै१९३० रोजी कॉमन्स सभेत सोलापूरसंबंधी प्रश्न विचारला. सोलापुरात लष्करी कायद्याच्या अंमलात काँग्रेसची चिन्हे म्हणजे गांधी टोपी व राष्ट्रीय निशाण धारण करण्यास मनाई करण्यात आली होती. गांधी टोपी घालून कामावर निघालेल्या गिरणी कामगारांना सोल्जरांनी हात-पाय मोडेपर्यंत मारहाण केली होती. ‘गांधी टोपी काढा’ म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांवर बंदुका रोखल्या होत्या. ब्रॉकवे यांनी सोलापुरातील या गांधी टोपी प्रश्नाविषयी कॉमन्स सभागृहाचे लक्ष वेधले. भारतमंत्री वेजवूड बेन यांनी त्या आरोपात तथ्य नसल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. सोलापूर प्रकरणाची चर्चा सर्वत्र चाललेली असताना गुंटूरच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनेही गांधी टोपीला मनाई केली होती. गुंटूरच्या डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा तो निर्णय ब्रॉकवे यांनी बेन यांच्या निदर्शनास आणून दिला व सदर हुकूमाची प्रत सभागृहापुढे दाखवण्याची तयारी दर्शवली. त्यावर बेन यांनी याची चौकशी केली जाईल असे सभागृहात सांगितले.

ब्रॉकवे यांनी प्रश्न असा विचारला, की ‘केवळ साधी गांधी टोपी घातल्याने हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्यकारभारास धोका येतो असे तुम्हाला वाटते काय?’ आणि त्यांनी त्यांच्या खिशामधून गांधी टोपी काढून ती सभागृहाला दाखवली ! साऱ्या सभासदांनी साम्राज्यशाहीला हादरवणारी ती ‘गांधी टोपी’ आहे तरी कशी ते पाहिले. त्यावेळी कित्येक सभासदांनी ‘डोक्याला घाला… डोक्याला घाला’ अशा आरोळ्या मारल्या. तेव्हा फ्रेनर ब्रॉकवे यांनी गांधी टोपी डोक्यावर घातली. ‘सोलापूर मार्शल लॉ’मध्ये गाजलेली गांधी टोपी अशा तऱ्हेने ब्रिटनच्या पार्लमेंटमध्ये पोचली. त्यावेळी अन्य एक सदस्य मिस्टर थर्टल यांनी ‘गांधी टोपीवरील मनाई दूर करण्याविषयी सरकार हिंदुस्थान सरकारला कळवील काय?’ असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नास भारतमंत्र्यांनी उत्तर दिले नाही. त्यानंतर अवघ्या चार दिवसांत हिंदुस्थान प्रश्नावर पार्लमेंटमध्ये झालेल्या खडाजंगीत फ्रेनर ब्रॉकवे यांना काही काळासाठी निलंबित केले गेले व त्यांची पार्लमेंटमधून हकालपट्टी करण्यात आली.

गांधी टोपी ही कायदेभंगाच्या चळवळीत सोलापूरच्या अस्मितेचे प्रतीक बनली होती. त्या गांधी टोपीसाठी सोलापूरकरांनी काय सोसायचे बाकी ठेवले होते? प्रसंगी छातीवर बंदुकीच्या गोळ्या झेलल्या होत्या. अहिंसक मार्गाने चाललेल्या सोलापूरच्या चळवळीवर सरकार आणि त्यांची भाट असणारी वृत्तपत्रे हिंसेचा आरोप सतत करत होती. परंतु अल्पशिक्षित असणारा सोलापूरचा कामगार हा केवढा सुजाण आणि सुसंस्कृत आहे हे गांधी टोपीच्या माध्यमातूनच प्रतीत होत गेले. निवृत्त झाल्यानंतर मायदेशी परत निघालेल्या युरोपीयन गिरणी मास्तरांना पानसुपारी करून निरोप देते वेळी सोलापूरचे गिरणी कामगार गांधी टोपीची भेट देत ! हिंदुस्थानच्या राजकारणात गांधी युगाच्या उदयानंतर स्वातंत्र्य चळवळीचे लोण सामान्यातील सामान्य माणसापर्यंत कसे पोचले होते याचे सोलापूरच्या गिरणी कामगारापेक्षा दुसरे उदाहरण देता येणार नाही ! महात्माजींनी निर्भयतेचा मंत्र सर्वसामान्यांना दिलेला होता. महात्माजींनी निर्भयतेने सर्वसामान्य जनता उभी राहिली तर साम्राज्यशाहीचे जोखड ती सहजतेने झुगारून देऊ शकते ही जाणीव तिला करून दिली होती. हिंदुस्थानात झालेली ही जागृती म्हणजे साम्राज्यशाहीच्या अस्ताची नांदी होय आणि त्याचे अध्वर्यू सोलापूरकर होते.

महात्माजींनी कधी काळी घातलेली आणि त्यांच्याच नावाने प्रख्यात झालेली गांधी टोपी हे तर केवळ एक प्रतीक आहे. साम्राज्यशाहीला हिंदुस्थानातून परतीची वाट दाखवणारी ती गांधी टोपी लंडनमधील वस्तुसंग्रहालयात विराजमान आहे.

– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com

————————————————————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here