फरिदा लांबे – सेवारत्न

carasole1

व्यासपीठावरून संबोधताना फरिदा लांबे फरिदा लांबे यांचा जन्म मुंबईतला. सुरुवातीचं शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतल्यानंतर दहावीपर्यंतचं शिक्षण ग्रँट रोडच्या सेंट कोलंबो शाळेतून पूर्ण केलं. त्यांनी एलफिन्स्टन कॉलेजमधून सोशिओलॉजी आणि पॉलिटिकल सायन्समधून ग्रॅजुएशन पूर्ण केलं.

निर्मला निकेतनमध्ये समाजसेवेचं शिक्षण सुरू असतानाच लांबे यांनी महापालिका शाळांमधील गळती रोखण्याचं काम केलं. तिथूनच लांबे यांची समाजसेवक म्हणून ओळख होऊ लागली. महापालिका शाळांमधून प्राथमिक स्तरावर हे काम सुरू होतं. सुमारे ३० वर्षांपूर्वी तब्बल अडीच लाख मुलं शाळेबाहेर होती. जी मुलं शिकत होती, त्यातही गुणवत्तेचा अभाव होता. म्हणूनच वस्ती आणि शाळा यांच्यामधला दुवा म्हणून लांबे यांच्या प्रतिनिधीत्वाखाली संघटनांनी काम करण्यास सुरुवात केली. महापालिकेने या कामासाठी निधीही दिला होता.

वेश्या वस्तीतील महिलांच्या मुलांसाठी चालवले जाणारे नाइट केअर लांबे यांनी कामाठीपुरा भागातील शरीरविक्रय करणा-या स्त्रियांच्या मुलांसाठीही काम करण्यास सुरुवात केली. त्या स्त्रियांची कामाची वेळ रात्रीची असल्याने या स्त्रिया त्यांच्या मुलांना ट्रँक्विलर किंवा ओपी देऊन झोपवत. अशा मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी ‘डे केअर’च्या धर्तीवर ‘नाइट केअर’ सुरू करण्याची योजना पुढे आली. महापालिकेच्या शालेय समाज शिक्षण प्रकल्पांतर्गत तो उपक्रम राबवण्यात आला. ते साल होतं १९८५. मात्र तो उपक्रम सुरू करण्यासाठी तब्बल दीड वर्षं लागलं. कारण कोणी जागाच देत नव्हतं. त्याचवेळी अशाप्रकारची ‘नाइट केअर सेंटर’ सुरू करून शरीरविक्रयाला चालना दिली जात आहे, असा आरोपही करण्यात आला. मात्र तरीही लांबे यांनी नेटानं अशी सेंटर सुरू केली. संध्याकाळी सहा वाजता आलेली मुलं दुस-या दिवशी दुपारी १२ वाजता त्या सेंटरमधून बाहेर पडत. त्या कालावधीत बालवाडी भरायची, मुलांसाठी विविध खेळ खेळले जायचे.

शालेय विद्यार्थ्यांसह फरिदा लांबे प्रेरणा संघटनेमार्फत सुरू झालेल्या त्या कामाचं प्रतिनिधीत्व लांबे यांनी केलं. तर युवा संघटनेमार्फत झोपडपट्टीतल्या तरुणांना योग्य दिशा दाखवून त्यांना सोशल वर्कच्या डिप्लोमाच्ं शिक्षण देण्यात आलं. अशा प्रकारचा पॅरा प्रोफेशनल सोशल वर्क कोर्स पहिल्यांदाच सुरू झाला होता.  झोपडपट्टीतल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी चांगला मार्ग मिळाला होता. अशाप्रकारे स्थानिक पातळीवर कामं सुरू असताना लांबे यांची ओळख डॉ. माधव चव्हाण यांच्याशी झाली आणि तिथूनच प्रथमचा प्रवासही सुरू झाला. अर्थात ही सर्व जबाबदारी त्या निर्मला निकेतनमध्ये असताना पार पाडत होत्या.

विद्यार्थीदशेपासून ते दोन वर्षांपूर्वी निर्मला निकेतनमधून व्हाइस प्रिन्सिपल म्हणून निवृत्त होईपर्यंत त्यांनी वेगवेगळ्या प्रकल्पांचं प्रतिनिधीत्व केलं. त्यांनी शाळेतील सोशल सर्व्हिस या विषयाचा सिलॅबस कसा हवा, यासाठी सरकारसोबत काम केलं. यूनिसेफच्या माध्यमातून चाइल्ड ट्रॅफिकिंगविरोधातही त्या लढल्या. १९९२च्या दंगलीनंतर दंगलग्रस्तांचं पुनवर्सन करण्याचं काम लांबे यांच्याकडे आलं. त्यावेळी पत्र्यापासून ते तांदळापर्यंत सर्व वस्तू दंगलग्रस्तांना मिळाव्यात यासाठी कागदपत्रांवर कलेक्टर आणि लांबे यांची सही लागायची. त्या खडतर काळात त्यांना पिडीत अशा दोन्ही समाजांशी बोलता आलं, त्यासाठी मराठी, हिंदी आणि उर्दू या तिन्ही भाषा चांगल्या अवगत असल्याचा फायदा झाला, असं त्या आवर्जून सांगतात. सलोखा संघटनेमार्फत मोहल्ला कमिटीचीही स्थापना त्यांनी केली. दंगली, त्सुनामी, गुजरात भूकंप, २६ जुलै, २६/११चा दहशतवादी हल्ला… असे कोणतेही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकट नाही, ज्यात लांबे यांनी त्यांच्या सहका-यांच्या मदतीनं, कॉलेजच्या सोबतीनं पिडीतांसाठी काम केलं नाही. त्यांनी नॅशनल पॉलिसी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून सर्वेक्षण करून प्रत्येक आपादग्रस्तांना मदत मिळवून दिली.

सेवातरत्न पुरस्कारासह २६/११च्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची संख्या अधिक होती. पालिका, सरकारी हॉस्पिटलमधून उपचार घेणा-या जखमींना शोधून, त्यांचं सर्वेक्षण करून त्यांना मदत मिळवून देण्यात आली.

प्रथम संस्थेच्या सहसंचालिका असणा-या फरिदा लांबे सध्या सर्व शिक्षा अभियान, राज्य महिला धोरण समिती तसेच बालकामगारविरोधी समितीच्या सदस्य अशा अनेक जबाबदा-या यशस्वीपणे सांभाळत आहेत. मात्र एवढं असूनही त्यांचे पाय जमिनीवर आहेत, हे विशेष! सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल दूरदर्शननं मार्च २०१३ मध्ये त्यांना सह्याद्री ‘नवरत्न’ पुरस्कारांपैकी ‘सेवा रत्न’ पुरस्कार  देऊन गौरवलं.

सुचित्रा सुर्वे
९७६९२४३६६६
suchitra.surve@gmail.com

Previous articleहरीश सदानी – स्त्रीवादी पुरुष!
Next articleलंडनचा गणेशोत्सव
सुचित्रा सुर्वे 2008 सालापासून पत्रकार म्‍हणून कार्यरत आहेत. त्‍यांनी 'बॉम्‍बे कॉलेज ऑफ जर्नालिझम'मधून पत्रकारितेची पदवी मिळवली. सध्‍या त्‍या दैनिक 'महाराष्‍ट्र टाईम्‍स'मध्‍ये काम करतात. सभोवताली घडणाऱ्या घटनांचे प्रतिबिंब स्वतःच्या लेखणीतून समाजासमोर मांडणे त्‍यांना आवडते. त्‍या लेखन, चित्रपट पाहणे, पुस्तक वाचणे असे छंद जोपासतात. समाजासाठी चांगले काम करू पाहणाऱ्यांना जगासमोर आणणे त्यांना महत्‍त्‍वाचे वाटते. लेखकाचा दूरध्वनी 9869948938