पोलिसांचे हीन जिणे

मुंबईत वांद्र्याला कलानगर नाक्यापासून साहित्य सहवासकडे जाताना मध्ये काही भाग लष्करी छावणी असल्यासारखा दिसतो. दोन-तीन ठिकाणी बंकरमध्ये पोलिस जवान स्टेनगन रस्त्याकडे रोखून खडे असतात. त्यांच्या आजुबाजूस दोन-तीन पोलिस हवालदार व अधिकारी गप्पा छाटत बसलेले वा उभे असतात. थोडे पुढे गेले, की डाव्या हाताला मोठी निळी पोलिस व्हॅन दिसते. तेथून कंट्रोलरूमशी सतत संपर्क चालू असतो. तेथेच रस्त्याच्या उजव्या हाताला लांबलचक अर्ध-पक्की झोपडी बांधलेली आहे. त्यामध्ये पाच-सहा पोलिस चड्डी-बनियान घालून झोपलेले, पत्ते खेळताना अथवा स्वत:चे आवरताना दिसतात. हा सारा बंदोबस्त असतो ठाकरे कुटुंबीयांसाठी. सेनाप्रमुख, त्यांचे चिरंजीव उध्दव आणि युवानेते आदित्य ही सारी मंडळी कलानगर वसाहतीत ‘मातोश्री’ नावाच्या बंगल्यामध्ये राहतात. त्या बंगल्याभोवती पुन्हा पहारा असतोच.

मी जेव्हा जेव्हा त्या रस्त्यावरून जातो. तेव्हा तेव्हा पोलिसांचे ते हीन जिणे पाहून दु:खी होतो. माझ्यासारख्या त्रयस्थाला पोलिस माणसांची अशी अवहेलना पाहून त्रास होतो तर दस्तुरखुद्द कलावंत असलेले ठाकरे पिता-पुत्र (एक व्यंगचित्रकार, दुसरा फोटोग्राफर!), त्यांना किती यातना होत असतील बरे? शिवाय, त्या रस्त्याने पुढे गेले, की साहित्य सहवास, पत्रकार आणि आर्टेक अशा तीन संवेदनशील लोकांच्या वसाहती आहेत. तेथील सुमारे हजार-दोन हजार रहिवाशांना रोज त्या रस्त्याने जा-ये करावी लागत असणार. त्यांच्या जीवाचे तर पाणी पाणी होऊन गेले असेल! पोलिसांना पगार उत्तम द्यायला हवेत, त्यांचे कपडे चांगले असायला हवेत, त्यांनी ड्युटीवर असताना सभ्यतेने, सुसंस्कृतपणे वागायला हवे. या सगळ्या गोष्टी हव्या तर त्यांच्या ‘सर्व्हिस कंडिशन्स’ उत्तम हव्यात. त्यांची अशी अवहेलना त्यांना मानसिक दृष्ट्या परावलंबी व खच्ची करत असते.

मी मला डाचणारा हा प्रकार प्रथम ‘लोकसत्ते ’मध्ये २००५ साली लिहिला. त्यावर मला पाच-दहा लोकांची पत्रे मिळाली, फोन आले. माझी व्यथा व्यक्त झाल्याचे समाधान त्यावेळेपुरते लाभले. परंतु तेथून जाताना होणारे दु:ख काही कमी झाले नाही.
 

तो रस्ता तसा अरुंदच आहे. तेथे सुखवस्तू वस्ती राहत असल्याने गाड्या-मोटर सायकली यांची वाहतूक भरपूर आहे. आजुबाजूच्या वसाहतींमध्ये राहणारे ज्येष्ठ नागरिक आणि तरूण-तरूणी त्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणावर पदभ्रमण करताना दिसतात. हे सारे फिरणारे लोक सुरक्षिततेच्या नावाखाली अनधिकृत झोपडे बांधून, गाडी सतत पार्क करून ठेवून, फुटपाथवर सिमेंटचे बांधकाम करून तो अडवून व पादचार्‍यांना रस्त्यावरून चालायला लावून… अशा सर्व गैरसोयी का सहन करतात?
 

सिध्दिविनायकाच्या मंदिराजवळदेखील पादचार्‍यांची अशीच गैरसोय करून ठेवली गेली आहे. सर्व- सामान्य माणसाचे रोजचे जिणे हराम करून त्या देवाला काय संतोष मिळत असावा?

कायद्याच्या रक्षकांच्या जीवनाबाबत आपण इतके बेपर्वा राहिलो आणि त्याचबरोबर स्वत:ही गैरसोयी सहन करून घेतल्या तर आपल्या जगण्याची प्रत ती काय राहिली? मला हा मुख्यत: सांस्कृतिक प्रश्न वाटतो. आपण त्याकडे विचारभावनेने पाहिले पाहिजे. संवेदना संपल्या, की जीवन संपल्यागतच होते. तालिबान्यांनी बामियान येथील बुद्धाच्या मूर्ती फोडल्या, त्यावेळीच जर सार्‍या जगाने त्यांना जाब विचारला असता तर दहशतवादाचे पुढचे महाभारतच घडले नसते अशी शक्यता आहे. येथे तर सुरक्षितता भोगणारे नेते लोकप्रतिनिधी आहेत किंवा ठाकरे पिता-पुत्रांसारखे कलावंत आहेत किंवा सिध्दीविनायकासारखे देवदेवता तरी आहेत. (शिवाय, पोलिस ही माणसे आहेत, पुतळे नव्हेत) त्यांना त्यांच्या सुरक्षिततेपोटी होणारा हा अन्याय निश्चितच कळू शकेल व तो दूर व्हायला हवा हे पटेल.
 

दिनकर गांगल
thinkm2010@gamil.com