पाटोदा – निवडक अकरातील एक गाव (Patoda)

6
56
_Patoda_1.jpg

पाटोदा गाव औरंगाबादपासून सात किलोमीटर अंतरावर आहे. ते औरंगाबाद जिल्ह्याच्या संभाजीनगर तालुक्यात येते. गावाची लोकसंख्या पुरुष एक हजार सहाशेचौपन्न आणि स्त्रिया एक हजार सहाशेशहाण्णव अशी एकूण तीन हजार तीनशेपन्नास आहे.

केंद्र शासनामार्फत ग्रामविकासविषयक अभ्यासाकरता देशातील अकरा गावांची निवड झाली आहे. त्यात पाटोदा ग्रामपंचायतीचा समावेश आहे. गावाने आगळेवेगळे उपक्रम राबवले आहेत. गावामध्ये रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे आरओ प्युरिफिकेशन प्लँट पिण्याच्या पाण्यासाठी लावला गेला आहे. गावातील प्रत्येक घरासाठी पाण्याचे एटीएम कार्ड वितरित केले गेले आहे. लोक त्यांना पिण्यासाठी लागणारे पाणी उत्साहाने एटीएम वापरून, ऐटीत घेऊन जातात. लोक पिण्याचे पाणी पन्नास पैसे प्रतिलीटर दराने विकत घेतात. त्यासाठी गावाने वीस-वीस लीटरच्या बाटल्या ग्रामस्थांना पुरवल्या आहेत. वीस लीटर पाण्यासाठी दहा रुपये मोजावे लागतात. गावासाठी एकाच पद्धतीची पाणीवहन सुविधा आहे. त्यामुळे कोणाला पाणी जास्त मिळाले व कोणाला पाणी मिळाले नाही अशी भानगडच उद्भवत नाही. सगळ्यांना हवे तेवढे मुबलक पाणी! गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे. एक पिण्याचे आरओ पाणी, दुसरे वापराचे पाणी, तिसरे साधे पाणी आणि चौथे गरम पाणी. वापराचे व साधे पाणी दोन वेगवेगळ्या नळांद्वारे चोवीस तास उपलब्ध असते. गावात शौचालये – सार्वजनिक आणि खासगीदेखील आहेत.

पाटोदा गाव सौरऊर्जेबाबतीतही मागे नाही. गावातील रस्त्यावर सौर दिवे आहेत. तसेच, घराघरांत सौरकंदील वापरले जात आहेत. गावातील चौका-चौकात गरम पाणी सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध असते. ते सौर उर्जेवर तापवले जाते. गावात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे. घंटागाडी ओला कचरा गोळा करून, तो कंपोस्ट खतनिर्मिती करणाऱ्या नियोजित जागी नेऊन टाकते; तर सुक्या कचऱ्याचीही यथोचित विल्हेवाट लावण्यात येते. गावातील सांडपाण्याची व्यवस्था उत्तम करण्यात आली आहे. सांडपाणी सात वेगवेगळ्या फिल्टर्सद्वारे वाहून नेण्यात येते. फिल्टर्स दगड, विटा, वाळू, माती अशा नैसर्गिक घटकांचे बनलेले आहेत. त्या सात फिल्टर्समधून गेल्यानंतर ते पाणी मोकळ्या जमिनीवर सोडण्यात येते. गावाने त्या अडीच एकर जमिनीवर सांडपाण्यावर ऊसाचे उत्पादन काढले आहे. गावातील नागरिक आणि बाहेरून येणारे पाहुणे मंदिराला देणगी न देता ग्रामपंचायतीला देणगी देतात. ग्रामपंचायत मासिक जमाखर्च नोटीस बोर्डवर दरमहा प्रसिद्ध करते.

मुंबईसारख्या शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यावरून एकमत झालेले नाही. राज्यात एकही महापालिका किंवा नगरपालिका किंवा नगर परिषद संपूर्ण हद्दीत सीसीटीव्ही बसवू शकलेली नाही; पाटोदा गाव मात्र सीसीटीव्ही निगराणीखाली अखंड आहे. गावात बेचाळीस सीसीटीव्ही बसवण्यात आलेले आहेत. सगळ्या सीसीटीव्हींचे ‘मॉनिटरिंग’ ग्रामपंचायतीच्या कार्यालयातून केले जाते. ग्रामपंचायतीद्वारे महत्त्वाच्या घोषणाही मध्यवर्ती पद्धतीने दिल्या जातात. गावात त्यासाठी चार ध्वनिक्षेपक बसवण्यात आले आहेत. गावातील एकही घर महत्त्वाच्या सूचनेपासून वंचित राहत नाही. गावातील प्रत्येक घराची मालकी त्या घरातील पुरुष आणि महिला या दोघांच्या नावावर आहे. थंड पाण्याचे कुलर गावात बारा ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत. नागरिकांना शुद्धपाणी पिण्यासाठी जलशुद्धिकरण प्रकल्प कार्यान्वित आहे. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी आहे. संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रूप कार्ड आहे. फळझाडे गावात लोकसंख्येच्या दुप्पट आहेत. एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही. वयोवृद्धांना बसण्यासाठी खुर्च्या व बाके ठिकठिकाणी आहेत.

_Patoda_3.jpgअंगणवाडी सेविकांनी स्वयंप्रेरणेने किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम गावात आयोजित केले. शालेय शिक्षकांनी प्रत्येक शाळकरी मुलाच्या वाढदिवसाला त्याच्या हस्ते गावात पाच रोपे लावण्याची प्रथा सुरू केली आहे. मुलांचे वाढदिवस साजरे होतात आणि सामाजिक वनीकरणासही चालना मिळते. गावात पहिली ते आठवीपर्यंत जिल्हा परिषदेची शाळा असून, शाळा डिजिटल व गुणवत्तापूर्ण आहे. गावात दळणासाठी पूर्ण गावात एकच गिरणी आहे. त्या गिरणीवर दळण मोफत दळून मिळते. त्याचे इंगित काय? तर, ग्रामपंचायत कराचा संपूर्ण भरणा करणाऱ्या प्रत्येक घरासाठी एक कार्ड दिले जाते. त्या कार्डावर महिन्यातून तीन वेळा याप्रमाणे वर्षभर मोफत धान्य दळून मिळते. ग्रामपंचायतीने पंचायत कराचा भरणा वेळेवर करा आणि वर्षभर फुकटात धान्य दळून घ्या अशी योजनाच आखली आहे. त्यामुळे कराचा शंभर टक्के भरणा चालू वित्तीय वर्षांच्या जून महिन्यापर्यंत केला जातो. ग्रामपंचायतीला करवसुलीसाठी मेहनत करावी लागत नाही आणि ग्रामस्थ करचुकवेगिरी करत नाहीत.

गावात ग्रामपंचायतीद्वारे सामुदायिक विवाह पार पडतो. गावातील प्रत्येक ग्रामस्थाचा वाढदिवस ग्रामपंचायतीच्या फलकावर सहज दिसेल अशा पद्धतीने लावण्यात येतो. महिन्यातील सर्वांचे वाढदिवस प्रत्येक महिन्यातील एका शनिवारी एकत्रित रीत्या साजरे करण्यात येतात. जातीपातींच्या निरपेक्ष अखंड गाव त्या दिवशी ‘बर्थडे पार्टी’साठी एकत्र जमते. मग करियर गायडन्स, जीवनविषयक प्रबोधन, शासकीय योजनांची माहिती, धार्मिक प्रवचन-राष्ट्रीय कीर्तन अशा पद्धतीने लोकप्रबोधनही केले जाते. संपूर्ण गाव साक्षर आहे – अगदीच वयस्कर झालेली माणसे वगळता. सगळ्या संस्थांच्या निवडणुका खेळीमेळीच्या वातावरणात पार पडतात. गावात कोणताच राजकीय पक्ष नाही. प्रशासकीय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्रासह पुरस्कार दिला जातो.

प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी घनकचरा व्यवस्थापनासाठी दिली जाते. गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसवण्यात आलेले आहेत. त्या रस्त्यांसाठीही वेगमर्यादेचे फलक आहेत. गावात सरासरी वीस-पंचवीस घरांना मध्यवर्ती ठरेल अशा बेताने रस्त्यालगत बेसिन बसवण्यात आली आहेत. ती ग्रामस्थांच्या हाताला रस्त्यातून जाताना काही घाण लागली तर हात स्वच्छ करण्यासाठी वापरली जावीत अशी अपेक्षा आहे. त्या बेसिनना पाण्याचे कनेक्शन असे ठेवले आहे, की एका मर्यादित गतीनेच त्यातून पाणी येत राहील. म्हणजे पाण्याची बचत आणि गावात स्वच्छताही कायम. गाव तंटामुक्त, निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहे. सार्वजनिक धोबी घाट धुणी धुण्यासाठी बांधलेले आहेत. ग्रामपंचायत कराची रक्कम फक्त धनादेशाद्वारे स्वीकारली जाते, म्हणजेच गावात घरटी किमान एक बँक खाते आहे. ग्रामपंचायतीचे वार्षिक उत्पन्न पंचवीस लाख रूपये आहे. ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित (एसी) यंत्रणा बसवण्यात आलेली आहे. एक गाव एक गणपती हेदेखील गावाचे वैशिष्ट्य आहे.

_Patoda_2.jpgपाटोदा गावचे माजी सरपंच आणि तेथील स्वच्छता अभियान समितीचे अध्यक्ष भास्करराव पेरे-पाटील यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण जनमानसाची नाडी अचूक जाणली आहे. त्यांचे साधे तत्त्वज्ञान – माणसाने त्याच्या कामातून काय ते बोलावे, उगाच जगाला तत्त्वज्ञान सांगत हिंडू नये! त्या माणसाचे जीवनसूत्र एकदम साधे आहे – जो बदल समाजात घडावा असे वाटते तो बदल आधी स्वत:त घडवून आणावा. त्या बदलाचे फायदे काय होतात ते लोकांना-समाजाला दिसू द्यावे, समाज आपोआप त्या माणसाच्या मागे येईल! भास्करराव पेरे-पाटील सांगतात, “आम्ही गावातील महिलांना सांगितले, की बायांनो, तुमच्या घरचे नळ वाहतात. ते बंद करा. त्यांनी स्वाभाविक दुर्लक्ष केले. मग आम्ही ग्रामपंचायतीचे अधिकार वापरून गावागावांत पाण्याच्या वापराची मोजणी करणारे मीटर बसवले. वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक थेंबासाठी पैसे मोजणे आले. आता, पाण्याची टाकी घरावर भरायला लावली, की आई तिच्या लेकीला सांगते, बाई, जरा वर जाऊन उभी राहा आणि टाकी भरत आली की सांग. मग लेक टाकी भरायला थोडीशी बाकी असतानाच ओरडते, पाणी बंद कर गं, टाकी भरत आली… आपोआप प्रत्येक जण पाण्याच्या वापराबद्दल जागरूक झाला. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचू लागला,” धोबीघाटांविषयी ते सांगतात, की “त्याची गंमत आहे. एकदा रस्त्यातून चालता-चालता दोन बायकांचा संवाद कानावर पडला. ‘काय गं कशी आहेस? बऱ्याच दिवसांत दिसली नाहीस.’ मला प्रश्न पडला, की एकाच गावात राहणाऱ्या महिला एकमेकींना बऱ्याच दिवसांत दिसत नाहीत, हे कसे काय? मग लक्षात आले, गावात शौचालये बांधली गेली. त्यामुळे त्या निमित्ताने बाहेर उघड्यावर जाणाऱ्या महिलांच्या भेटी थांबल्या आणि त्यांच्यातील संवाद तुटला. मग ठरवले, की त्यांच्यासाठी काही करायला पाहिजे. त्यातूनच मग महिलांसाठी धोबीघाट बांधण्याचे ठरवले. छान पाण्याची काँक्रिटची टाकी, बाजूला बसण्यासाठी गुळगुळीत दगड आणि कपडे धुण्यासाठी दुपारची निश्चिंत वेळ. गावातील बायकांमधील संवाद जिवंत आहे.”

गावात माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी येथील विद्यार्थी वाळुंज आणि बजाज नगर येथे जातात. गावात बाजार भरत नाही. तेथून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या वाळुंज MIDC येथे सोमवारी आठवडी बाजार भरतो. गावात ऊस, कापूस आणि गहू यांचे उत्पादन घेतले जाते. गावात जाण्यासाठी औरंगाबाद येथून खाजगी वाहतुकीने प्रवास करावा लागतो. गावापासून पंचवीस किलोमीटरवर वेरूळची लेणी आहेत. गावात हनुमान, महादेव आणि लक्ष्मी माता अशी मंदिरे आहेत. गावातून खाम नदी वाहते. गावाचे ग्रामदैवत हनुमान आहे. गावात जत्रा नसते. पण, दसऱ्याला मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे त्याच दिवशी गावात उत्सव साजरा केला जातो. कोणाच्याही घरी जेवण बनवले जात नाही. त्यादिवशी सामूहिक भोजन केले जाते. गावात सात दिवसांचा सप्ताह होत नाही; मात्र प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी देणगीदारामार्फत कीर्तन व सर्व गावकऱ्यांना भोजन असा बेत असतो. त्याला ‘मासिक भंडारा’ असे म्हटले जाते. पाटोदाच्या तीन-चार किलोमीटर परिसरात पंढरपूर, वळदगाव अशी गावे आहेत.

माहिती स्त्रोत – सरपंच पेरे-पाटील – 9850954925

– नितेश शिंदे

niteshshinde4u@gmail.com

6 COMMENTS

 1. खूप छान लेख आणि गावाची…
  खूप छान लेख आणि गावाची सविस्तर माहिती मिळाली… धन्यवाद

 2. खूप छान. आपल्या गावातील…
  खूप छान. आपल्या गावातील उपक्रम वाचून खूप छान वाटले…तुम्हाला सलाम.

 3. छान सुव्यवस्थित गांव पहावयास…
  छान सुव्यवस्थित गाव पाहण्यास मिळाले. भास्कररावजी यांचे भाषण ऐकले. त्यांच्यासारखे दूरदृष्टी लाभलेले, शिस्तप्रिय सरपंच सगळ्या गावांना मिळोत हीच सदिच्छा.

 4. खूप छान गावातील उपक्रम…
  खूप छान गावातील उपक्रम राबविण्यात आले आहेत.

 5. लेख वाचून खूप आंनद झाला…
  लेख वाचून खूप आंनद झाला पाटोदा गाव चे कौतुक कराव तित्के कमी

  Shaikh Anis at.po. YEHALEGAON gavli TQ. kalamnuri dist.hingoli

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here