पां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट

0
101

मकरंद करंदीकर हे टपाल तिकिटे व अन्य संबंधित कागदपत्रे यांचे संग्राहक पंचावन्न वर्षांपासून आहेत. त्यांना एक प्रश्न सतत टोचत असे. इतर भारतरत्नांवर टपाल तिकिटे अनेकदा प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय टपाल खात्याने, डॉ.पां.वा. काणे यांच्यावर टपाल तिकिट एकदासुद्धा न काढण्याचे कारण काय ?…

मी टपाल तिकिटे व अन्य संबंधित कागदपत्रे यांचा संग्राहक पंचावन्न वर्षांपेक्षा अधिक काळापासून आहे. मला एक प्रश्न सतत टोचत असे. इतर भारतरत्नांवर टपाल तिकिटे अनेकदा प्रसिद्ध करणाऱ्या भारतीय टपाल खात्याने, डॉ.पां.वा. काणे यांच्यावर टपाल तिकिट एकदासुद्धा न काढण्याचे कारण काय? मी त्याबाबत एक प्रदीर्घ लेख माझ्या फेसबुकवर 20 एप्रिल 2019 रोजी लिहिला. तो व्हॉट्सअॅप, इमेल अशा सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाला. काणे कुलपरिवाराचे अध्यक्ष सॉलिसिटर हिमांशू काणे हे माझे जवळचे मित्र असल्याने, मी त्यांच्यापुढे तो प्रश्न मांडला. त्यांनी त्यांच्या कुलपरिवार सभेत त्या संदर्भात ठराव पारित करून प्रयत्न सुरू केले, पण यश मिळत नव्हते.

मी त्यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वसामान्य माणसाचे ऐकतात असे ऐकले होते. मला स्वतःसाठी तर काहीच नको होते. म्हणून मी त्या मागणीची पत्रे खुद्द पंतप्रधानांच्या नावाने एक आणि त्यांच्या ऑफिसला दुसरे अशी 22 फेब्रुवारी 2022 रोजी पाठवली. मला त्यांची रीतसर पोच आली. मी माझी मागणी योग्यच असल्याने मान्य होईल अशा आशेने वाट पाहत होतो.

आणि अचानक चमत्कार घडला ! अगदी असाच विचार करून महाराष्ट्रातील राजकीय नेते शरद पवार यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र लिहिले होते. पवारसाहेबांच्या विनंतीचा मान ठेवून, भारतरत्न डॉ. पां.वा. काणे यांच्यावर टपाल तिकिट काढणार असल्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांना 16 मार्च 2022 रोजी कळवण्यात आल्याचे वृत्त वाचले. भारतरत्न असूनही फक्त डॉ. पां. वा. काणे यांच्यावर एकदासुद्धा टपाल तिकिट न काढल्याचे, टपाल खात्याने मान्यही केले.

मी माझ्या कुवतीने जी खटपट तीन वर्षे करत होतो तिला यश आले. एक मोठी त्रुटी दूर होणार. मोठे काम झाले !

– मकरंद करंदीकर 9969497742 makarandsk@gmail.com

————————————————————————————————————————————–

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here