परदेशातील भारतीयांना एकत्र जोडणारा गणेशोत्सव

0
18
carasole

रॅले येथे साजरा करण्‍यात येणारा गणेशोत्‍सवगणेश हे महाराष्ट्राचे आराध्यदैवत. विघ्नविनाशक, सिद्धिविनायक म्हणून त्याला मराठी मनात एक विशेष स्थान आहे. अमेरिकेत ‘एशियन एक्सक्लूजन अॅक्ट’ नावाचा कायदा १९२४ पर्यंत होता. त्यानुसार एशियन लोकांस अमेरिकेत वसण्याची मनाई होती.  त्यानंतर ते चित्र बदलले व १९५० च्या दशकाच्या अखेरीस तुरळक भारतीय अमेरिकेत स्थायिक होऊ लागले. त्यावेळी बहुतेकजण एक पेटी नि आठ डॉलर्स हातात घेऊन आलेले. त्यात मराठी, संख्येने अत्यंत थोडे पण त्यांनी निदान गणपतीचे चित्र बरोबर आणलेले असे. मग ते टेपने भिंतीवर चिटकवायचे नि मनोमन त्याची प्रार्थना करायची. काही वर्षे गेली. शिक्षण-नोकरी यांत स्थैर्य आले. घरात मुलांचे आगमन झाले नि आपल्या मुलांना आपल्या संस्कृतीबद्दल माहिती द्यायला हवी, सभोवताली संस्कारशील अनुकूल वातावरण नाही; तेव्हा आपणच मुलांना ते शिकवायला हवे याची जाणीव प्रबळ होऊ लागली. मराठी माणसांची संख्या हळुहळू वाढत होती. गावोगावी असतील तेवढी मराठी मंडळी कुणाच्या तरी घरी एकत्र जमत. त्या काळात तेथे मिळत असलेले सामान घेऊन जमेल तेवढे भारतात गणपतीच्या दिवसांत बनवतात तसे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करत. सर्वजण एकत्र टाळ्यांच्या गजरात ‘सुखकर्ता दु:खहर्ता’ आरती म्हणत. कुणीतरी पेटी हाती घेई, कुणी गाणी म्हणत नि शनिवार-रविवारचा दिवस पाहून केलेला गणेशोत्सव असा साजरा होई. आपल्या मुलांना निदान गणपती म्हणजे काय ते दाखवल्याचे समाधान होई. आपली मुले गणेशास अमेरिकनांसारखे ‘एलिफंट गॉड’ न म्हणता गणपती म्हणताहेत, गणपतीच्या रूपामागील प्रतीकात्मकता त्यांना कळू लागली आहे एवढे समाधान पालकांना असे.

रॅलेतील गणेशेत्‍सवात स्‍थापन करण्‍यात आलेली गणेशमूर्तीप्रथम डॉक्टर्स, नतंर इंजिनीयर्स, विद्यार्थी नि संगणक निपुण असे करत भारतीयांची व त्याच बरोबर मराठी माणसांची संख्या वाढत गेली… लोकांना बारशापासून ते श्राद्धापर्यंत, तसेच सत्यनारायण वगैरे विधी करण्याची गरज भासू लागली. प्रथम आमच्यातीलच कोणीतरी आपल्याजवळील पोथी काढून जमेल तसे पूजा सांगण्याचे काम करत असत. समाजाजवळ थोडी ठेव जमा झाली नि ठिकठिकाणी देवळे बांधली गेली. त्यात विविध देवांची स्थापना करण्यात आली. भारतातून उपाध्ये मंडळींना आणण्यात आले. देवळांचादेखील जम बसत गेला. आजमितीस अमेरिकेत अदमासे दोनशेसाठ देवळे आहेत. शिवाय हरेकृष्ण पंथ, योग सेंटर्स, मेडिटेशन सेंटर्स वगैरे मिळून हिंदू धर्माशी निगडित असलेली जवळजवळ एक हजार स्थाने आहेत. स्वामी नारायण मंदिरांची संख्या वाढत आहे. देवळात मूर्ती कोणती ठेवायची यावरून भारतीय परंपरेस साजेसे वादवितंड होतात. दक्षिणी लोकांचे प्रामुख्य असलेल्या देवळांत बालाजीस व उत्तर भारतीयांचे प्रामुख्य असलेल्या देवळांत राधाकृष्ण वा सीताराम या देवतांस मानाचे स्थान मिळते. हळुहळू दुर्गा, शंकर वगैरेंनीदेखील आपले स्थान ग्रहण केले. गणेशदेव मात्र लहानमोठ्या स्वरूपात सर्वत्र वावरताना दिसत. साऱ्यांनाच विघ्नहर्त्याची गरज भासते ना!

मी कनेक्टिकट नावाच्या प्रांतात अनेक वर्षे राहून नंतर नार्थ कॅरोलिना नावाच्या प्रांतात राहण्यास आले, तेव्हा येथील देऊळ नुकतेच बांधले गेले होते. वाद नको म्हणून येथील भारतीय पुढाऱ्यांनी नामी योजना आखली. त्यांनी जवळजवळ सा-या देवतांस एका रांगेत बसवले. मराठी मंडळींस ‘तुम्ही गणेशोत्सवाची जबाबदारी घ्या,’  दाक्षिणात्यांस ‘तुम्ही ओणम साजरा करा,’ गुजरात्यांस ‘तुम्ही जन्माष्टमीची जबाबदारी उचला’ अशी वाटणी करून दिली गेली. प्रत्येक समुहाने त्याच्या त्याच्या सणास सा-या भारतीयांस जेवायला बोलावायचे, एकत्र प्रार्थना करायची, मोदक, गोपालकाला, पुरणपोळी वगैरे काय असेल तो प्रसाद सा-यांनी बरोबर खायचा अशी वहिवाट सुरू झाली. सारे सण शनिवार-रविवारची सुट्‌टी पाहून साजरे केले जात; अजूनही केले जातात. भारतीयांची व त्याचबरोबर मराठी माणसांची संख्या वाढत आहे. हजारो व्यक्तींस एकत्र येणे कठीण होत आहे. दाक्षिणात्यांनी बालाजीचे सुंदर देऊळ अगदी भारतीय कारागीर आणून बांधले ते मॉरीसव्हील नावाच्या नार्थ कॅरोलिनातील गावाचे स्थापत्यकलेतील भूषण बनले आहे. गुजराती मंडळींनी स्वामी नारायणाच्या देवळाची स्थापना केली आहे. तरीपण मुळचे हिंदू देऊळ येथील सा-या भारतीयांसाठी केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे मुख्य केंद्रस्थान बनून राहिले आहे.

या, अशा, पार्श्वाभूमीवर फिलाडेल्फियातील मंडळी दहा दिवसांचा गणपती उत्सव करत असल्याची बातमी आमच्या कानी २००७ मध्ये आली. मग काय, नार्थ कॅरोलिनातील मराठी मंडळींनादेखील स्फुरण चढले.  प्रसाद सातघरे, ललित महाडेश्र्वर, जयंत येते व संजय भस्मे ही चार तरुण मंडळी पुढे आली. आपणदेखील दहा दिवसांचा गणपती उत्सव करुया, तो गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या दिवसांतच करायचा, रोज सकाळ-संध्याकाळ आरती करायची, मूर्तीसमोर दहा दिवसांचा भरगच्च कार्यक्रम व तिचे विधिपूर्वक विसर्जन करायचे अशी योजना त्यांनी मांडली. सा-यांची पहिली प्रतिक्रिया होती; ‘बापरे , आपले गाव राजधानीचे उपनगर असले तरी तसे लहान आहे; दहा दिवस कामधंदा सांभाळून लोक येऊ शकतील का?; एवढ्या कार्यक्रमांची आखणी करणे-ती कार्यान्वित करणे हे सारे मुठभर लोकांस जमेल का?’ अशी होती. तरीपण त्या तरुण मंडळींचा उत्साह पाहिला नि काळजी वाटली तरी, त्यांना मोडता न घालता ‘आगे बढो’ म्हणण्याचे सामंजस्य बहुतेकांनी दाखवले. या उत्साही मंडळींनी ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे’ या उक्तीचा प्रत्यय आणून दिला नि २००८ सालापासून नार्थ कॅरोलिनात दहा दिवसांच्या गणपती उत्सवाची प्रथा सुरू झाली. ती आजतागायत सुरू आहे.

लोकमान्यांचा आदर्श समोर ठेवून, उत्सवाच्या निमित्ताने हिंदू सोसायटीच्या छत्राखाली सर्वप्रांतीय भारतीयांना एकत्र आणायचे, त्यांच्यासमोर शैक्षणिक, कलावर्धक, क्रीडा क्षेत्रातील तसेच विविध करमणुकीचे कार्यक्रम प्रस्तुत करायचे. त्यातून जमेल तेवढे सामाजिक कार्य साधायचे असा विचार ठरला.

गणेश मिरवणूकीत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण लेझीमनृत्‍य करतानासध्याचे गणेशोत्सवाचे स्वरूप : गणपतीच्या काही दिवस अगोदर काही कार्यकर्ते न्यू जर्सी प्रांती जाऊन तेथील भारतीय व्यापा-याकडून (सूमा फूड्‌स) भारतातून मागवलेल्या गणेशमूर्तीची निवड करून ती येथे आणतात. मूर्तीची निवड करताना ती पर्यावरणास अनुकूल आहे याची खात्री करून घेतली जाते. गणेश चतुर्थीच्या दिवशी वाजतगाजत, लेझीमच्या तालावर नाचत तिची प्रस्थापना करण्यात येते. तिची साग्रसंगीत पूजा होते. न सांगता-विचारता अनेक जण मूर्तीसमोर ठेवायला म्हणून नेवैद्य आणतात. दहा दिवस सकाळ-संध्याकाळ कामातून वेळ काढून मूर्तीसमोर सामूहिक आरती होते. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर होतो.. रोज गणेश यज्ञ केला जातो. स्वयंसेवक रोज सकाळ-संध्याकाळ कार्यकर्त्यांसाठी जेवण बनवून आणतात. पर्यावरणास अनुकूल म्हणून येथील राजकीय संस्थांनी स्थानिक तलावात मूर्ती विसर्जन करण्याची परवानगी दिली आहे. वाजतगाजत गणपतीस तेथे नेऊन त्याचे विधिपूर्वक विसर्जन केले जाते. त्याआधी त्यास ‘पुढच्या वर्षी नक्की या’ अशी मनःपूर्वक विनवणीदेखील केली जाते. अशा तऱ्हेने मोठ्या माणसांच्या मनातील, भारतातील गणेशोत्सवाच्या आठवणींची उणीव भरून येते, तर येथे जन्मलेल्या व वाढत असणाऱ्या आमच्या बछड्यांस गणेशोत्सव म्हणजे काय व कसा असतो ते कळण्यास मदत होते.. कौतुकाची गोष्ट ही, की गणेशाच्या नावाने सर्व प्रांतांतील भारतीय स्वेच्छेने व उत्साहाने एकत्र येतात, हा गणपतीचा मोठा प्रसाद मिळतो असे आम्हास वाटते. गणपतीसाठी एकत्र येणाऱ्यांत जातपात व धर्मभेद केला जात नाही हे विशेष. धार्मिक भावनेचा हा सकारात्मक आविष्कार असे म्हणण्यास हरकत नाही.

गणेशयज्ञगणपतीपुढे सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमातदेखील तीच भावना प्रतीत होताना दिसते. ठरवलेले ध्येय लक्षात घेऊन कार्यक्रम आखले जातात. त्यात बुद्धिबळ, क्रीडाक्षेत्रातील माहिती स्पर्धा, वक्तृत्वकला, खास मुलांसाठी विविध कलास्पर्धा (चित्रकला, भेंड्या, निबंधस्पर्धा) इत्यादी आयोजित केल्या जातात. शिवाय रोज मंचावर विविध प्रांतातील करमणुकीच्या कार्यक्रमांचे सादरीकरण होते. साऱ्यांनाच रस असलेले बहुप्रांतीय कार्यक्रम होतात. आतापर्यंत अनुराधा पौडवाल, मिलिंद ओक, हृषीकेश रानडे, हरिप्रसाद चौरासिया, अमजद अलीखान, बप्पी लाहीरी, सुरेश वाडकर, सुदेश भोसले अशांसारख्या कलाकांरानी; तसेच, अनेक उत्तम स्थानिक कलाकारांनी येथील गणपती उत्सवात गायन-वादन-नृत्य-भजन-काव्यवाचन वगैरे अनेक कार्यक्रम केले आहेत. कार्यक्रमांस हजारोंची उपस्थिती असते. बऱ्याच कार्यक्रमांस तिकिट लावले जाते. त्यातून खर्चवेच वजा जातो. होणाऱ्या नफ्याची रक्कम हिंदू सोसायटीस दिली जाते. परिणामी, हिंदू सोसायटी कार्यान्वित करत असलेल्या सार्वजनिक कार्यास हातभार लावला जातो.

असा हा काही थोडक्या लोकांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या गणेशोत्सवाचा निर्झर आता चांगला वाहू लागला आहे. त्यातून आपली सांस्कृतिक, शैक्षणिक, भावनिक, सामाजिक व राजकीय गरजांची तहान भागवण्यास नक्की मदत होते.

पुढील वर्षी भारतास पूर्णत: प्रगत देश बनवण्यासाठी काय करता येईल या विषयावर चर्चासत्र सुरू करण्याचा विचार आहे. त्यासाठी भारतातील व अमेरिकेतील विचारवंतांस, विचारांच्या देवाणघेवाणीसाठी एकत्र आणण्याची योजना आखली जात आहे. त्यातून काही योजना आचरणात आणता येतील अशी आशा व विश्वास आहे…

मार्गारेट मीड नावाच्या कार्यकर्तीने म्हटले आहे, की “दोन-चार लहान लोकांच्या हातून काय होऊ शकेल अशी शंका कोणी घेऊ नये. किंबहुना अशा थोडक्या लोकांनीच मोठे कार्य केले आहे असे इतिहास सांगतो.’’

विजया बापट,
bapatvijaya@gmail.com