नि:शब्द लघुकथासंग्रह – दिव्यांगांच्या व्यथा-वेदना

0
26
_Divyanganchya_VythaVedna_1.jpg

‘नि:शब्द…’ हा पल्लवी परुळेकर-बनसोडे यांचा छोट्या-छोट्या प्रसंगांचा काव्यात्म लघुकथासंग्रह. त्यांनी त्या संग्रहात त्यांच्या डोळ्यांसमोर आलेल्या आणि मनाला चटका लावून गेलेल्या अपंगांविषयी लिहिले आहे, त्याला मराठी साहित्याच्या कोठल्या दालनात बसवावे – म्हणजे लघुकथा, कविता की, आणखी काही हा प्रश्नच पडतो? ‘नि:शब्द’मध्ये अनेक प्रसंग मुंबईच्या लोकलमध्ये पोटासाठी हिंडणाऱ्या अपंग लोकांचे आहेत.

पल्लवी परुळेकर यांनी ज्या अपंग व्यक्तींच्या व्यक्तिरेखा चितारल्या आहेत, त्या खरे म्हणजे शब्दांच्या पलीकडील आहेत, म्हणूनच ते सगळे प्रसंग म्हणजे लघुकथेच्या धाटणीमध्ये कविताच झाल्या आहेत. प्रत्येक प्रसंगातून लेखिकेच्या मनात भरभरून वाहणारी करुणा आविष्कृत होते आणि ते प्रसंग वाचले की वाचक शोकमग्न होतो.

अपंगांना त्यांच्या अस्तित्वासाठी नाही, तर रोजच्या पोटापाण्यासाठीही प्रचंड झगडावे लागते. कारण त्यांच्या क्षमतांवर, कुवतीवर तथाकथित सुबुद्ध समाज विश्वास ठेवण्यास तयार नाही. पल्लवी परुळेकर यांनी दाहकतेचे चटके देणारे विस्तवातील वास्तव प्रखरतेने रेखाटले आहे. त्यांनी त्यांच्या नजरेत भरलेले विकलांग लोक तन्मयतेने जिवंत केले आहेत, की अंतर्मुख होऊन जातो. दुसऱ्याचे दु:ख टिपण्यासाठी लेखकही संवेदनशील असायला हवा; तरच ती वेदना-संवेदना कागदावर उतरते. त्यांनी एकेक प्रसंग सजीव करताना प्रत्येक कथेची सुरुवात कवितेपासून केलेली आहे. त्या मुळात कवयित्री असल्याने त्या-त्या प्रसंगांना त्या-त्या चार ओळी चपखल बसतात, तो प्रसंग करुणेत ओला होऊन बाहेर येतो. सांताक्रुझ स्टेशनबाहेरच्या ब्रिजवरून चालताना वाट अडवणारे भिकेचे हात, कमानीसारखे कुबडे शरीर वाकून मातीने अन् धुळीने माखलेले देह, कुष्ठरोगी, अर्धा पाय नसलेली बाई, नागड्या मुलाला गलिच्छ कपड्यांवर निजवून मातृत्व भिकेला लावणारे हात आणि अंध माणसाची मनाला अस्वस्थ करणारी डफलीवरील थाप!

लेखिका मुंबई लोकलमध्ये विकलांगांच्या डब्याला आधाराला धरण्यासाठी मधील दांडाच नसतो हे सांगताना गहिवरते. अंधबाई चालवत असलेला लॅपटॉप, दोन्ही हात नसलेला आणि लोकांनी त्याच्या अंथरलेल्या रुमालावर टाकलेले पैसे गोळा करणारा मुलगा, टोलनाक्यावर थांबलेल्या गाड्यांच्या रांगेत प्रवाशांची वाट चोखाळणारा – एकाच वेळी हास्य आणि दु:ख देऊन जाणारा भिकारी, वार्धक्याने पूर्ण वाकलेले आजोबा तंबोरा घेऊन सावळ्याचा अभंग तल्लीन होऊन गातात आणि त्याचा हरिजप या शेवटच्या दिवसात वणवणतो आणि चिल्लरीच्या विश्वात सुख शोधण्यास लावतो.

एक अंधबाई काठी टेकत-टेकत नायगाव रेल्वे स्टेशनवर लोकल पकडण्याच्या घाईत असते. लेखिका तिला बघून अस्वस्थ होते. ती अंध बाई एवढ्या गर्दीत चढणार कशी? असे तिला आपसूकच वाटून जाते. लेखिका निसर्गाने स्त्रियांना तरी निदान अंध करू नये ही खूप उच्च दर्ज्याची मानवी भावना जेव्हा व्यक्त करते तेव्हा वाचक नतमस्तक होईल. मित्तल हॉस्पिटलमध्ये एक अतिशय सुंदर तरुणी प्रियांका, जिला परिचयातील लोक हिंदी सिनेमातील नायिकेच्या नावाने संबोधायचे, तिचा अचानक अपघात झाला, त्यात तिची वाचा गेली, हातपाय आणि इतर अवयव पूर्ण निकामी झाले. ती अडीच वर्षांपासून मरणयातना भोगतेय. तिचे वृद्ध वडीलच तिच्या आंघोळीपासून ते ‘शी’पर्यंतचे सर्व करतात. बापाच्या यापेक्षा कोठल्या मरणप्राय वेदना असू शकतात? सदर प्रसंग वाचताना प्रियांकाचे वेदनेने कण्हणे सतत वाचकाच्या मेंदूत फिरत राहते. इतके जिवंत लिहूनही लेखिकेच्या मनात एक मानवीय प्रश्न पडतो, की ‘माणूस का नाही त्या व्यक्तीच्या जागी स्वत:ला ठेवून बघत…?’

‘नि:शब्द’मधील प्रत्येक प्रसंग हृदयाला चिरे पाडत असतो. लेखिकेने तिच्या आयुष्यात आलेल्या हृदयस्पर्शी घटना शब्दबद्ध करण्याचा जिवाचा प्रयत्न केला आहे. मनावरील कितीही जळमटे काढली तरीही पुन्हा सवयीने ती जळमटे कोपरा धरून बसतातच! पल्लवी परुळेकर यांची मानवीय वेदना म्हणूनच ‘नि:शब्द’मधील प्रत्येक प्रसंग नि:शब्द करून टाकते.

पल्लवी बनसोडे – 9923030101
नि:शब्द…
लेखिका : डॉ. पल्लवी परुळेकर-बनसोडे
मुखपृष्ठ : अरविंद शेलार
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठं : 80
किंमत : 100 रु

– लोकनाथ यशवंत

('महाराष्ट्र टाईम्स’वरून उद्धृत)