निर्व्याज प्रेम

0
49
वैशाली परब यांची मुलगी रिया सिंडीसोबत
वैशाली परब यांची मुलगी रिया सिंडीसोबत

वैशाली परब यांची मुलगी रिया सिंडीसोबत     माझ्या मुलीचा जन्म ही माझ्या जीवनातील अशी घटना ठरली, की त्यानंतर माझे आयुष्याचे तत्त्वज्ञान बदलत गेले. 'ब्लॅक ऍंण्ड व्हाईट'मध्ये 'ग्रे' असतो याची जाणीव प्रकर्षाने होऊ लागली. काही गोष्टी आपल्या आवाक्याबाहेर असतात व तरीही त्यांचा स्वीकार करावा लागतो. आम्ही गेली तेरा वर्षे अमेरिकेत राहतो. बे ऐरिया – सिलिकॉन वॅली येथे भारतीयांची जी जीवनपध्दत आहे तीमध्ये आम्हीसुध्दा सहभागी आहोत. रियाचा जन्म इथेच झाला. दोन्ही संस्कृतींचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करत तिची जडणघडण होत आहे. तिला निसर्गाचे विलक्षण वेड.

    ती नुकतीच चालायला लागली होती तेव्हाची गोष्ट. आम्ही दोघी नेचर वॉक करायचो. पाने, फुले, काडया, झाडांचे कोन, पिसे असे काहीही तिला आकर्षित करे. ते पाहात आम्ही आमच्या घराच्या आसपास बराच वेळ हिंडायचो. तिला घराच्या बंदिवासात कधीच जायचे नसायचे. रस्त्यात भेटणा-या प्रत्येक प्राण्याशी खेळूनच मग ती इतर मुलांबरोबर खेळायची. कुत्रे, मांजरी, खारी, पक्षी, एवढेच नाही तर गोगलगायीसुध्दा तिला तेवढयाच आकर्षित करायच्या. एकदा, माझी एक मैत्रीण किरण माझ्याकडे कॉफी प्यायला आली होती. आम्हा दोघींच्या गप्पा रंगल्या होत्या. रियाला मोकळे रान मिळाले. ती बाहेर अंगणात बराच वेळ रमली होती. हाक मारूनही आली नाही. म्हणून आम्ही बाहेर गेलो. बघतो तर आमच्या बाईसाहेब मातीत फतकल मारून बसलेल्या. दोन्ही हात व पाय गोगलगायींनी बरबटून ठेवले होते. तिच्या अंगावर तिने एकेक करून पंचवीस-तीस गोगलगायी रचल्या होत्या! त्या गोगलगायी व ती यांच्याही गप्पा आमच्या इतक्याच रंगल्या होत्या. तिच्या कुरळया केसांतही त्या रमल्या होत्या. मी व माझी मैत्रीण किरण या दृश्याकडे बघून चकित झालो. खरेतर गोगलगायीचा चिकटपणा खूप जणांना किळसवाणा वाटतो, पण रियाच्या मते, त्या खूप फ्रेंडली होत्या. त्या तिच्याशी बोलत होत्या व मुख्य म्हणजे तिचे सांगणे ऐकत होत्या!

     दुस-या दिवशी, पुन्हा चारच्या सुमारास बेल वाजली. किरण आणि तिची मुलगी पवित्रा दारात उभ्या होत्या. एकीच्या हातात कार्डबोर्डचा बॉक्स व दुसरीच्या हातात कसल्या तरी झाडाचा पाला व कोवळया फांद्या! पवित्राच्या वर्गात कॅटरपिलर्स स्‍कूल पेट म्हणून पाठवले होते. त्यातलेच डझनभर, तिच्या आईने रियाकरता आणले होते. त्यांच्या दोन-तीन दिवसांच्या खाण्याची सोय म्हणून mulberry च्या वेगवेगळ्या फांद्या व पाने!

     रियाच्या चेह-यावरचा आनंद शब्दांत वर्णन करणे कठीण आहे, पण माझ्या चेह-यावरचे प्रश्नचिन्ह व आठी बघून किरणने समजावले, की त्यांची काळजी घेणे सोपे आहे… तिला त्यांच्याबद्दल खूप माहिती होती. ती व पवित्रा त्यांना लागणारा पाला आणून देतील इत्यादी इत्यादी. रियाचे विश्वच बदलले. खाणेपिणे, सगळे त्यांच्या बरोबरीने! झोपतानाही ती तो बॉक्‍स जवळ ठेवून असायची. कितीही क्‍यूट असल्या तरी वळवळणा-या एक डझन अळया बाळगून झोपणे मला पटेना. मग मी तिची कशीतरी समजूत काढली व अळयांची रवानगी बेडरूमच्या बाहेर झाली.

     एके दिवशी, मी उठल्यावर प्रथम अळयांना तपासायला बॉक्स उघडला तर अळया तीन-चार उरलेल्या. मी घाबरले, इकडेतिकडे शोधाशोध करून सटकलेल्या अळयांची जमवाजमव केली. त्यानंतरच आमच्या बाईसाहेबांना उठवले. अळी ते फुलपाखरू स्थित्यंतर अनुभवताना मला माझे विलपार्ल्यातले बालपण आठवले. रियाबरोबर एकेक करून घरातील सर्वजण अळयांमध्ये, त्यानंतर कोषांमध्ये गुंतून गेलो. फुलपाखराच्या पहिल्या दर्शनाने तर आमचेही मन फुलपाखराप्रमाणे तरल झाले व निसर्गाच्या या किमयेने हरखून गेलो. त्याचबरोबर आता त्यांना मुक्त केले पाहिजे याची जाणीव झाली.

नितीन परब आणि सिन्बा     रियाची समजूत पटकन पटली पण तिने एक अट घातली. मला दुसरे कुठलेतरी पेट् हवे! तिचे म्हणणे जरी पटले तरी तेव्हा आम्हाला ते शक्य नव्हते. मग 'जेव्हा आपण आपल्या घरात जाऊ तेव्हा तुला नक्की पेट आणू' असे वचन दिले व एकेक करून फुलपाखरांना निरोप दिला. त्या क्षणी मी मनाशी निश्चय केला की ती जोपर्यंत मजजवळ आहे, तो पर्यंत तिला कुठल्याही नात्यापासून व प्रेमापासून वंचित करायचे नाही. पण हे मी स्वत:ला दिलेले आश्वासन प्रत्यक्ष अमलात आणणे किती कठीण आहे याची जाणीव, माझ्या त्याक्षणी मुलीविषयीच्या जिव्हाळ्याने कमकुवत झालेल्या मनाला अजिबात नव्हती.

     एप्रिल २००१ मध्ये आम्ही स्वत:चे घर घेतले. कबूल केल्याप्रमाणे, रियाला दोन गोल्ड फिश आणून दिले. एका काचेच्या बाऊलमध्ये ती छोटीशी पिल्ले रमली. नर का मादी हे सांगणे एवढया लहान पिलांबद्दल शक्य नसल्याने त्यांची नावे ठेवणे कठिण होते, पण एकाचे मॅक्स व दुस-याचे मॉन्‍डी असे नामकरण झाले. रिया उठली की आधी, त्यांना चिमुटभर खाणे घालायची व त्यानंतर तिचा दिनक्रम सुरू व्हायचा. शाळेत जाताना ती त्यांच्याजवळ घुट्मळायची. त्यांचे बराच वेळ हितगुज चालायचे. तेच परत आल्यावर, सर्वप्रथम त्यांची तपासणी व्हायची. हे मासे तसे हाताळायला सोपे असले तरी घाण खूप करत. नियमितपणे त्यांच्या बाऊलची स्वच्छता करावी लागायची. अर्थात ते काम माझेच, पण रिया तिच्यापरीने मदत करायची. आमचे मॉन्‍डी आणि मॅक्‍स आता मोठे झाले. आमची चाहूल लागताच काचेजवळ खेळायला यायचे. बघता बघता, त्यांच्यातही जीव गुंतला. कधी कुठे प्रवासाला जाताना शेजा-यांशी बोलून आधी त्यांची सोय करावी लागायची. दोन-अडीच वर्षांनंतर मॅक्‍सला बहुतेक टयुमर झाला. त्याचे डोळे मोठे होत गेले.

     पण त्या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नव्हतो. कधी कधी, तो उलटा पडायचा. आम्ही घाबरून त्याला सरळ करायचा प्रयत्न करायचो, पाणी बदलायचो, पण दिवसेंदिवस त्याची सवय होत गेली. हळुहळू रियाला समजावले, की त्यांचे आयुष्यमान तीन-साडेतीन वर्षं आहे. आता कधीही त्यांना काहीही होऊ शकेल, तिला ते समजायचे, पण त्याबद्दल बोलणे आवडायचे नाही. या दोन जिवांनी आम्हाला खूप निखळ आनंद दिला होता.

     मॅक्‍सचे वारंवार उलटे पोहणे चिंताजनक होते. एकदा रिया शाळेतून घरी आल्यावर मॅक्‍स पुन्हा उपडा पडला होता. पाणी बदलले, खाणे दिले, पण तरी तो सरळ होईना. रात्रीपर्यंत तो तसाच पडून होता. मॉन्‍डी पण अस्वस्थ वाटत होती. आम्हाला वाटले, की प्रकार नेहमीपेक्षा वेगळा आहे. कुणाचा तरी सल्ला घ्यावा यासाठी मी प्रयत्न करत होते, पण तेवढयात मॅक्‍स पठ्ठा सरळपणे पोहायला लागला. जणू काही झालेच नाही या आवेशात! मग आम्हाला या प्रकाराची सवय झाली. घरी येणा-या प्रत्येकाला मॅक्स-माँडीच्या कथा सांगितल्या जायच्या. ज्यांनी त्यांचा आमच्या गैरहजेरीत सांभाळ केला होता त्यांनाही त्यांनी जीव लावला.

     असेच एका सकाळी लक्षात आले, की मॅक्‍स उलटा झाला आहे. नेहमीप्रमाणे सर्व सोपस्कार केले, रियाला शाळेत व मला ऑफिसला जाणे भाग होते. पण त्यादिवशी लक्षण काही ठिक नव्हते. मी रियाला प्रॉमिस केले की त्या दिवशी नेहेमीपेक्षा लवकर येऊ. तिला दुपारी शाळेतून घरी आणले तेव्हाही मॅक्‍स उलटाच होता. मॉन्‍डी ठिक वाटत होती, पण ती सारखी त्याच्याजवळ जाऊन त्याला जागे करण्याच्या प्रयत्नात होती. पुन्हा नेहमीचे सारे सोपस्कार केले, पण या वेळेस मी मॅक्‍स आणि मॉन्‍डीला वेगळे ठेवले. जर का काही लागण असेल तर निदान मॉन्‍डी तरी वाचेल हा विचार करून! मग मी माझ्या घरच्या कामात गुंतले. रियाचा अभ्यास, स्वयंपाक, कपडे धुणे इत्यादी. रिया अधून मधून मॅक्‍सची चाहूल घेत होती. आमचे वॉशिंग मशीन गराजमध्ये होते. मी कपडयांच्या नादात असल्याने घरातला आवाज मला गराजमध्ये येत नव्हता. घरात येताच मला रियाचे गदगदून रडणे व रडक्या आवाजात बोलणे ऐकू आले. त्या क्षणीच मला जाणीव झाली की नक्की, मॅक्‍सचे काहीतरी झाले! पण प्रत्यक्षात पाहते तर काय, मॉन्‍डीचा मृत्यू झाला होता! आमच्या मॉन्‍डीचे असे अचानक जाणे सगळयांनाच धक्का देऊन गेले. त्यानंतर आश्चर्य म्हणजे मॅक्‍स सुधारला, पण एक महिन्याच्या अंतरात तो ही गेला.

     आता रियाने पुन्हा अजून नव्या साथीदाराचा हट्ट धरला. तिच्या समजुतीकरता अजून मासे आणले, पण या वेळेस मात्र मासे काही आम्हाला लाभले नाहीत. मग आम्ही हॅमस्‍टर आणायचे ठरवले. छोटया गिनी पिगसारखा हॅमस्‍टर आम्हाला सर्व दृष्टींनी योग्य वाटला, पण मग दुकानदार म्हणाला, की ससा घ्या. ससा हातात धरता येतो. रियाला नक्कीच त्याला हाताळणे जास्त आवडेल. तिथे असलेले गुबगुबीत ससे पाहून आम्ही सर्वच जण भुललो. आमच्या नव्या सदस्याचे नामकरण झाले सिंडी – रायमिंग विथ मॉन्‍डी.

     पुन्हा नव्याने आम्ही सगळे जण सिंडीच्या  लिलांमध्ये रमलो. खरेच खूप गोड आहे ती. सशाचे संगोपन कसे करायचे हे आम्ही पुस्तके व इंटरनेट वापरून शिकलो. थोडयाच दिवसांत, तिच्या खोडया व विध्वंसक उद्योग सुरू झाले. कधी कारपेट कुरतड तर कधी वायर. आम्ही घरभर सिंडीच्या मागे फिरायला लागलो. तिची सगळयात आवडीची जागा म्हणजे पलंगाच्या खाली लपणे. एकदा, तिकडे कोप-यात बसल्यावर खाऊ मिळाल्याशिवाय कधीच बाहेर यायची नाही. पण उचलून घेणे तिला फारसे आवडत नाही.

     नितिन व रिया आता नविनच मागणी करू लागले. आपली सिंडी खूप छान आहे. पण आता आपण कुत्रा आणू. पहिल्यांदा मी चेष्टा म्हणून ऐकून घेतले. नंतर वाटले की किती दिवस भूणभूण करणार? आज ना उद्या गप्प बसतील. पण नितिनकडे लहानपणी कुत्रा होता आणि त्याने त्याला कॉलेजमध्ये जाईपर्यंत खूप प्रेम दिले. त्याचे म्हणणे असे  की कुत्र्याचे प्रेम निरपेक्ष असते. हा आनंद तू आम्हा दोघांपासून वंचित करत आहेस.

     अचानक मला मी खूप दुष्ट आहे असे वाटू लागले. पण तरीही माझी तयारी झाली नाही. एके दिवशी रिया आजारी झाली. नितिनने सुट्टी घेऊन तिच्याबरोबर क्षण न क्षण घालवला. त्या दोघांचे काही हितगुज झाले असेल तर माहीत नाही, पण तिला थोडे बरे वाटल्यावर मन रमवण्याकरता कुत्रे बघायला जायचे ठरले. जर्मन शेफर्डच्या बिडरकडे जायचे आहे हे नितिनने सांगताच मी निश्चितपणे होकार दिला. एवढा मोठा कुत्रा काही आपण आणणार नाही याची नितिन व रियाने मला आधीच आश्वासने दिली होती. त्यांच्या इच्छेला मान देऊन मी बरोबर गेले. आमचे पुलिस जिकडून कुत्रे घेतात त्या ब्रिडरकडे आम्ही पोचलो. अचानक एक पिल्लू दुडकत् माझ्याकडे धावत आले. त्याच्या पायाचे पंजे त्याच्या शरीराच्या मानाने मोठे होते. त्यामुळे की काय ते पिल्लू सिंहाच्या पिल्लासारखे वाटले. रिया व नितिन पाहता क्षणी त्याच्या प्रेमात पडले. पुन्हा एकदा मला आठवले, की कुणाच्या प्रेमापासून कुणाला वंचित करायचा मला काय अधिकार आहे? पण सिंडी मुळे आपण एका प्राण्यात किती अडकतो व त्या नात्याने रोजच्या दैनंदिन जीवनात किती बदल घडतो हेही अनुभवले होते. कळत असूनही वळले नाही व कुत्र्याचे हे आंगतूक पिल्लू आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनले.

वैशाली परब, रिया आणि सिन्बा     त्याचे नामकरण झाले, सिन्‍बा. त्याने घरात पाऊल ठेवल्यापासून घराची पूर्ण उलथापालथ केली किंवा करायला लावली. त्याचे फिरणे, खाण्याच्या वेळा आमचे दैनंदिन वेळापत्रक ठरवू लागले. सर्वात जास्त फरक पडला सिंडीच्या आयुष्यात. सिन्‍बाची शक्ती व आकार तिला झेपण्यातले नाही, पण तरीही त्यांच्यात मैत्रीचे नाते जुळत गेले. अर्थात पिंज-याआडून. हळुहळू दोघेही एकाच वेळी खाऊ लागले. सिन्‍बा आडदांड व मनस्वी, म्हणून त्याला खाणे आधी द्यायचे. त्याच्या खाण्याच्या वासाने सिंडी उडया मारायला लागते, कारण त्याच्या मागोमाग तिला खाऊ मिळतो. दोघांनाही नंतर एकाच वेळी ग्‍लुकोल बिस्‍कीट मिळतात.

     सिन्‍बामुळे आम्ही नियमितपणे चालायला लागलो. सकाळी पाचचा गजर ऐकला की उठायचा कंटाळा येतो. विशेषत: थंडीत, पण तोपर्यंत त्याची नाचानाच व उत्साह पाहून पांघरुणाची ऊबही नको वाटते. सकाळची ताजी थंडगार हवा जेव्हा चेह-याला स्पर्श करते, तेव्हा खूप छान वाटते व नव्याने उत्साह निर्माण होतो. नितिनचे व माझे चालताना वेगवेगळया विषयांवर बोलणे होते. संध्याकाळी ऑफिसमधून घरी आल्यावरही आम्ही एकत्र फिरतो. तेव्हा रिया बरोबर येते. दिवसभराच्या साठलेल्या गप्पा होतात.

     आमच्या प्राण्यांनी आम्हाला खूप निर्व्याज प्रेम, उत्साह व शिस्त दिली आहे. सिन्‍बा तर आता आमच्या गल्लीचा पुलिस बनला आहे. त्याच्या जीवावर मी माझ्या रियाला घरी एकटी ठेवू शकते. रियाबरोबरच मीही पुढे शिकू शकले. नोकरीतही जास्त जबाबदारीचे काम करू शकते. आमचे नक्कीच गतजन्मीचे ऋणानुबंध असणार! या सर्व जिवांनी आमचे आयुष्य अर्थपूर्ण केले.

     अंतराळवीर सुनिता विलियम्स जेव्हा पृथ्वीवर परत आल्या तेव्हा त्या म्हणाल्या, की त्यांना त्यांच्या अंतराळयात्रेत सर्वात जास्त आठवण त्यांच्या कुत्र्याची आली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे प्राण्यांचे निर्व्याज प्रेम. मी सुनिता विलियम्सशी सहमत आहे. आमच्या सर्व पाळीव प्राण्यांकडून खूप काही शिकायला मिळाले आहे. कदाचित मी यापुढे अजून प्राणी बाळगणार नाही, कारण त्यांचे बंधन असते व पुढे मला बंधनमुक्त आयुष्य जगायचे आहे, पण त्याकरता त्यांनी दिलेले प्रेम व लावलेल्या शिस्तीची खूप गरज आहे.

वैशाली परब
  सॅन होजे, कॅलिफोर्निया

Previous articleईप्रसारण
Next articleसंपादकीय 2
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.