नाना भोसेकर आणि सांगोल्याची बोर-डाळींबे!

2
18
carasole

मी केशव वासुदेव तथा नाना भोसेकर सांगोल्याचा कायम रहिवासी असून, शास्त्र शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पुरे केल्यानंतर, स्टेट बँक ऑफ इंडिया, सांगोला शाखेत एप्रिल 1967मध्ये क्लेरिकल केडरमध्ये रुजू झालो. स्टेट बँकेने 1972-73 पासून शेतकऱ्यांना त्यांच्या विविध गरजांसाठी कर्ज पुरवठा करण्यास सुरुवात केली होती, त्यावेळेस कर्ज वितरण विभागात काम करण्याची जबाबदारी माझ्यावर टाकण्यात आली. त्यानिमित्ताने तालुक्यातील व आजुबाजूच्या जत, मंगळवेढा, पंढरपूर, माळशिरस इत्यादी तालुक्यांत कर्जवाटपासाठी फिरत असताना प्रदेशाचा, निसर्गाचा, शेतकऱ्यांच्या मानसिकतेचा व पीक पद्धतीचा डोळे व मन उघडे ठेऊन अभ्यासही करत होतो.

नोकरी स्वीकारताना व ही जबाबदारी स्वीकारल्यानंतर एक जाणीव मनामध्ये कायम ठेवली होती, ती म्हणजे मिळालेली खुर्ची ही केवळ माझ्या स्वत:च्या प्रपंचासाठी मिळाली नसून, तिचा वापर प्राधान्याने जनतेसाठी व त्यायोगे संस्थेसाठी/बँकेसाठी होणे आवश्यक आहे. अशा मानसिकतेमुळे शेतकरी वर्गाचा, त्यांच्यातीलच एक बनून, त्यांच्या अपयशांचा अभ्यास करून लक्षात आले, की मराठी शेतकरी कष्टांत कमी नाही, मात्र त्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे.

आमचा सांगोला हा दुष्काळी तालुका, येथील पावसाळा अत्यंत लहरी, उन्हाळा मात्र आमच्या पाचवीला पुजलेला. शेजारी तीर्थक्षेत्र पंढरपूर. निसर्गाशी झगडत हतबल झालेल्या शेतकऱ्यांची मानसिकता ‘ठेविले अनंते तैसेची राहवे, चित्ती असू द्यावे समाधान’ अशी बनलेली. शेतकऱ्यांच्या डोळ्यांपुढे प्रगतीची, सुबत्तेची स्वप्ने कधी आलीच नाहीत. कसे तरी का होईना, अर्धवेळचे का होईना उदरभरण होणे इतपत पिकले तरी बास ही त्यांची मानसिकता. त्यातही त्यांच्या स्वत:च्या पोटाबरोबर दारातील भाकड गायीगुरांच्या चाऱ्यासाठी भुसार पिकांची ओढ फार, त्यामुळे पाऊस झाला, की शेजाऱ्यांनी त्यांच्या ओटीत काय घेतले ते पाहायचे, तेच आपल्या मुठीत घ्यायचे व चिमटीने भूमातेची ओटी भरायची. एवढे झाले, की आभाळाकडे डोळे लावून त्या भगवंतावर भार टाकून प्रतिक्षा करायची. एवढेच त्याच्या हाती राहायचे.

आमचा शेतकरी अर्धपोटी असल्या कारणाने व कोणीतरी अगोदर करावे व त्यातून तो जगूनवाचून चांगल्या प्रकारे बाहेर पडला तर आपण विचार करावा अशी वृत्ती. अपुऱ्या व लहरी पावसाने भुसारही नीट पिकत नव्हते व अपुऱ्या पाण्यावर ऊसही त्यांच्या गरजा भागवू शकत नव्हता. तशाही परिस्थितीत येथील शेतकरी माणूस म्हणून नीतिमान, कष्टाळू व भावूक होता.

त्यावर एकच उपाय होता व तो म्हणजे पीक पद्धतीत बदल करून त्यांना त्याद्वारे मिळणाऱ्या पैशांची व पैश्याद्वारे होणाऱ्या प्रगतीची ओळख करू देणे. मला 1978-79 च्या दरम्यान गावीच नोकरी मिळाली. मी माझ्या स्वत:च्या शेतीत लक्ष घातले होतेच. त्या अनुषंगाने, शेती खात्यातील कै. वसंतरावदादा सावंत यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. तसेच, कृषी पदवीधर झालेले साहेबराव ढेकळे यांनी त्यांच्या ‘कृषी सेवा केंद्रा’साठी आमच्या बँकेमार्फत कर्ज घेतले होते. त्यांच्याशीही आमची पीक पद्धतीबाबत चर्चा असायची. त्या दरम्यान तासगाव भागातील शेतकऱ्यांनी द्राक्ष बागांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीच्या कहाण्या कानी यायच्या. त्यामुळे मी बँकेमार्फत प्रगती करू इच्छिणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या तासगाव भागातील सर्वश्री गणपतराव म्हेत्रे, वसंतराव आर्वे, नामदेव बापू माने, भगवानराव पवार इत्यादी बागायतदारांशी भेटी घडवून आणल्या. त्यांच्या बरोबरच्या चर्चेचे फलित म्हणून आमच्या तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या व माझ्या शेतात द्राक्ष बागा उभ्या राहिल्या. मी आमच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने बँकेमार्फत आर्थिक साहाय्याची हमी घेतली. परंतु आमचाही प्रयत्न प्रथम वाया गेला. कारण होते, आमचा तोकडा निसर्ग व कुंठेत मानसिकता. कारण एप्रिल महिन्यातील खरड छाटणीनंतर फळकाडी तयार करण्यासाठी लागणारे पाणी आमच्याकडे नव्हते. त्यामुळे काडी व्यवस्थित तयार झाली नाही. हंगाम वाया जाऊ लागला. एकमेकांकडे जाणे, पिकांच्या समस्यांचा विचार करणे, त्यांच्या सोडवणुकीसाठी सामुदायिक प्रयत्न करणे यासाठी लागणारी सहकार्याची मानसिकता तयार नव्हती.

त्यातूनच, मी आमच्या निसर्गाच्या लहरीपणाचा अभ्यास जेव्हा बारकाईने करू लागलो तेव्हा लक्षात आले, की येथील निसर्गाच्या लहरीपणाला तितक्याच सक्षमपणे तोंड देऊ शकेल व जेव्हा आमच्याकडे योग्य परिस्थिती असेल तेव्हा ते पीक साथ देईल अशा पिकाची निवड करणे गरजेचे होते. त्या विचारमंथनातूनच ‘डाळींब’ हे फळझाड माझ्यापुढे आले. अत्यंत काटक, गरजा माफक व पाहिजे तेव्हा सेवेत हजर राहणारे ते पीक. ते पीक तसे कोणाच्या विचारात नव्हते!

साहेबराव ढेकळे यांचे ‘महाराष्ट्र कृषी केंद्र’ हे आमच्या  बँकेच्या अर्थसहाय्यावर सुरू होऊन फार काही दिवस झाले नव्हते. त्यामुळे ते युनिट म्हणजे आम्ही म्हणजे आमची बँक आमचे पाल्य असेच समजत होतो. त्या नवीन पीक पद्धतीच्या समावेशामुळे त्यांच्या शैक्षणिक ज्ञानाचा, गुणवत्तेचा शेतकरी वर्गास उपयोग होणार होताच; खेरीज, त्यांचा ‘कृषी सेवा केंद्रा’च्या प्रगतीसही उपयोग होणार होता. बँकेने त्यांच्या पाल्याच्या आरोग्याबाबत नुसतेच सतर्क राहून चालत नाही तर सहकार्यही करणे गरजेचे असते. कै. वसंतराव सावंतसाहेबांचा पिकांच्या सर्वांगीण गरजांचा व उपायांचा अभ्यास मोठा होता. तेही तळमळीचे, निरपेक्षपणे अहोरात्र सेवेस तत्पर असणारे कृषी सहाय्यक होते. आम्ही डाळिंबाच्या समावेशाचा निर्णय घेतला.

साहेबराव ढेकळे यांच्या संपर्कातून पुणे येथील गणेशखिंड शासकीय रोपवाटिकेमधून गणेश डाळिंबाची रोपे आणली. मी माझ्या स्वत:च्या शेतात त्यांची लागवड केली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या प्रबोधनाच्या उद्देशाने साहेबराव ढेकळे यांना प्रोत्साहित करून, त्यांच्या कृषिविद्यापीठातील प्राध्यापकांशी संपर्क साधून त्यांची मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली. तशाच एका कार्यक्रमास, पुणे अॅग्रिकल्चरल कॉलेजचे प्रा. द.पां. भोरे आले. त्यांनी माझ्या नवीन लावलेल्या डाळींब बागेस भेट दिली. त्यांनी आमच्या समस्यांचे निराकरण करताना सोडवणुकीसाठी नर्सरी तयार करण्यास सुचवले. त्यासाठी आवश्यक असणारी तांत्रिक माहिती, कलम बांधणीचे शिक्षण वगैरे देण्यासाठी विद्यापीठाचे माळीही सोबत पाठवले. त्याप्रमाणे मी ‘श्री नर्सरी’ नावाने सांगोला तालुक्यातील पहिली नर्सरी सुरू करून त्याद्वारे डाळिंबाची रोपे निर्मिती आरंभली. कोठल्याही चांगल्या कामाच्या सुरुवातीस त्याच्यावर टिकाटिपणी होत असते तशी ती झाली. परंतु त्यामुळे मी माझ्या ध्येयापासून विचलित झालो नाही.

आपल्या शेतीची सद्यस्थिती, सातत्याने करावा लागणारा अडचणींचा सामना व त्याचे योग्य निराकरण यांसाठी डाळींब पीक हे निसर्गमित्र होय. त्याचे ते महत्त्व सांगण्यासाठी आम्ही वरच्यावर बैठका सुरू केल्या. पहिली बैठक जत, जिल्हा सांगली येथील धनप्पा ऐनापुरे यांच्या माडीवर झाली. काही लोक तयार झाले. जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुरुवातीस चांगला प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास टाकला. आम्हीही त्यांच्या बागा आखून देण्यापासून त्यांना येणाऱ्या प्रत्येक अडचणींच्या सोडवणुकीसाठी वेळ, काळ न पाहता तत्पर हजर राहिलो. मी सर्व कामे सामाजिक बांधिलकी म्हणून केली. इच्छुक परंतु आर्थिक दुर्बलता असणाऱ्यांना विनामूल्ये रोपे दिली. साहेबराव ढेकळे यांनी त्यांच्या कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून पिकांच्या संगोपनासाठी आवश्यक असणाऱ्या गरजा भागवल्या व पिके उभी केली.

तेथून महत्त्वाचा भाग सुरू झाला. म्हणजे येऊ घातलेल्या मालाच्या विक्रीचा. तासगाव भागातील बऱ्याच द्राक्षबागायतदारांना मुंबई, दिल्ली येथील व्यापाऱ्यांनी पैशांच्या व्यवहारात फसवल्याचे कानावर होते. शेतकरी वैयक्तिक रीत्या विक्री करत असल्याने असे घडत होते. त्यावर इलाज म्हणून आम्ही सहकारी तत्त्वावर विक्री व्यवस्था निर्माण करण्याचे ठरवले. त्या दृष्टीने ‘पंढरीप्रसाद फल उत्पादक संघा’ची स्थापना केली, जत व सांगोले तालुक्यांतील शेतकऱ्यांची डाळिंबे मुंबई मार्केटला पाठवून त्यांचे पैसे त्यांना घरी पोचते केले. त्यामुळे त्या शेतकऱ्यांचा आमच्यावरील विश्वास वाढला. तेथूनच डाळींब पिकाने त्याची मुळे घट्ट जमिनीत रोवण्याची सुरुवात केली. मी स्वत:ची ‘श्री नर्सरी’ रोपे लागवडीसाठी, रोपे उपलब्धीसाठी निर्माण केली. त्या रोपांच्या संगोपनासाठी आवश्यक तंत्रज्ञान व माहिती मोफत उपलब्ध करून दिली. तसेच, तयार झालेल्या मालाच्या विक्री व्यवस्थेचा, विक्रीसाठी पॅकिंग, ट्रान्सपोर्ट इत्यादीसाठींचे प्रश्न असा सर्वांगीण अभ्यास विचारात घेऊन ते प्रश्न अगोदरच सोडवले होते.

डाळींब पिकाने आमच्या शेतकऱ्यांना पैशांची ओळख करून दिली. त्यांच्यातील उर्मी जागृत केली. पूर्वी ज्या शेतकऱ्यास त्याचे तण-तणस, घर शेकारणे, डागडुजी करणे होत नव्हते. त्याच जागी त्याच शेतकऱ्यांचे सुमारे पन्नास-साठ लाखांचे बंगले झाले आहेत. दारात ट्रॅक्टर व इतर अवजारांसोबत एक-दोन चार चाकी गाड्या, प्रत्येकी मोटारसायकली दिसू लागल्या. दूरदृष्टीच्या शेतकऱ्यांनी त्यांची मुले इंग्रजी शाळांत घातलीच; परंतु त्या पुढे जाऊन, कोणी पन्हाळ्यास तर कोणी पाचगणीस शिक्षणासाठी ठेवली. ज्यांच्या लाडक्या लेकी लग्नाला आल्या म्हणजे घोर पडायचा तोच शेतकरी त्याच्या प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी पंचवीस-तीस लाख ते कोटी खर्चाची भाषा बोलून शोर माजवू इच्छित आहे.

डाळिंबाच्या लागवडीमुळे पैशांची जशी ओळख झाली तशीच त्यांना नवी दृष्टी मिळाली आहे. शेतीकडे लक्ष गेल्यामुळे भांडणाकडील लक्ष कमी झाले. कारण भांडणतंट्यात वेळ घालवणे किती व्यर्थ आहे ते डाळींब पिकाच्या उत्पादनतंत्रातून त्याला जाणवले. तीन रुपये मजुरीवर डाळिंबाच्या लागवडीसाठी खड्डे काढण्यास जाणारा मजूर डाळींब उत्पादक, डाळींब व्यापारी बनला आहे. शेतमजुरातही अनेक स्तर निर्माण झाले आहेत. कोणी कलमे बांधणाऱ्या टोळ्या बनवत आहे, कोणी बागांच्या छाटणीच्या टोळ्या बनवत आहे, तर कोणी मार्केटिंगसाठी ग्रेडिंग, पॅकिंगच्या कामात गुंतला आहे. शासनाला बेरोजगारीचा जो प्रश्न सोडवता आला नाही तो शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या माध्यमातून सोडवला आहे.

आमच्या निसर्गाशी जुळवून घेणाऱ्या डाळिंबानंतर पिकाच्या शोधात आम्ही होतोच, ‘राहुरी कृषी विद्यापीठा’त गेल्यानंतर, तेथील ‘उमराण’ जातीच्या बोरीच्या बागा पाहिल्यानंतर आमची शोध मोहीम सार्थकी लागली! डाळिंबामुळे व बँक संपर्कामुळे बरेच शेतकरी माझ्याकडे आणखी कोणते पीक करावे असे विचारण्यास आले, तेव्हा  मी त्यांना बोर लावा म्हणून सांगितले. ती त्यांना त्यांची चेष्टा वाटायची. त्याची पदरमोड करून नव्याच्या फंदात पडण्याची तयारी नसायची. प्रथम माझ्या व सर्वश्री ढेकळे-सावंत यांच्या एकत्रित शेतीमध्ये बोराची लागवड केली. ती यशस्वीही झाली. गावोगावचे हौशे-नवशे येऊन बाग बघून, नवीन जातीच्या बोरांची चव चाखून जात, परंतु लागवडीच्या नावाखाली ते पीक घेण्यास धजावत नव्हते. बोर लागवडीच्या बाबत तासगावचे कै. गणपतराव म्हेत्रे आबा यांनी आम्हास कायम आग्रही प्रोत्साहन दिले.

मी माझ्या ‘श्री नर्सरी’मध्ये बोर रोपांची निर्मिती केली. बोरीच्या लागवडीबाबत व उत्पादनवाढीसाठी राहुरी विद्यापीठातील प्राध्यापक मंडळींचे मार्गदर्शन लाभले. डाळिंबाप्रमाणे लागवडीबाबत चर्चासत्रांद्वारे व शेतकऱ्यांच्या शेतीची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून, शेतकऱ्यांमध्ये जागृती घडवली. त्यामुळे बोरीच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली.

आम्ही बोरीच्या विक्रीबाबत नवीन तंत्र अवलंबले. बोर उठावदार दिसण्यासाठी ती नायलॉन नेटच्या पिशवीतून बाजारात पाठवली. एकेक किलो बोरांचे पॅकिंग केले. तशा चार नेट्सच्या म्हणजेच चार किलो वजनाच्या बोरांचा बॉक्स मुंबई मार्केटला पाठवले. त्यावेळी (1984-85) तो (चार किलोचा) बॉक्स शंभर रुपये दराने म्हणजे प्रती किलो पंचवीस रुपये दराने विक्री झाली. बोर लागवडीमधील तो महत्त्वाचा टप्पा तर ठरला. मुंबईतील प्लॅस्टिक नेट विक्रेते संजयभाईंकडे मागणी इतकी वाढली, की ते स्वत: सांगोल्यास आले. त्यांनी कांद्यासाठी व इतर उत्पादनांसाठीसुद्धा नेट्स बनवणे सुरू केले. द्राक्ष बागायतदार तर चक्रावूनच गेले, त्यांच्या द्राक्षालासुद्धा असा भाव मिळाला नव्हता.

बोर हे पीक दुष्काळी भागासाठी वरदान ठरले आहे. बोर पीक जमिनीच्या बाबत फारसे चोखंदळ नाही! परंतु जी जमीन चुनखडीयुक्त, इतर पिकांसाठी निकृष्ट ती त्या पिकासाठी उत्कृष्ट, पीक पाण्याच्या बाबतींत हावरे नाही. गरजेपुरते मिळाले तरी मालकाचा चेहरा चमकवणारे, मालकाच्या चुकांच्याबाबत क्षमाशील, छाटणी चुकू देत, खताची मात्रा चुकू दे अथवा पाण्याची पाळी, छाटणी झाली, की नवे धुमारे हे मोहोर घेतच बाहेर पडणार, फक्त त्याचा सांभाळ योग्य रीत्या शेतकऱ्यांनी करायचा. योग्य वेळेत विक्रीस गेल्यास बोर चांगला भाव मिळवते.

डाळींब व बोर यांच्या लागवडीची व त्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाची चर्चा जशी सुरू झाली तसे शासनाचे लक्षही तिकडे वेधले गेले. फळ शेतीचे महत्त्व सर्वांनाच समजून आले. महाराष्ट्र शासनात पूर्वी फक्त कृषी खाते व कृषी मंत्री असायचे. मात्र त्यानंतर फलोत्पादन मंत्रालय निर्माण झाले. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाने मा. शरदरावजी पवारसाहेबांनी शंभर टक्के अनुदानावर बागा लावण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले.

हे सर्व मी माझ्या बँकेच्या व बँकेतील अधिकाऱ्यांच्या पूर्ण पाठिंब्याने, शेतकऱ्यांचा माझ्यावर असणाऱ्या विश्वासामुळे तसेच त्या प्रगतीत माझ्याबरोबरीने कामाचे वाटप करून घेणारे माझे स्नेही कै. वसंतराव सावंत तसेच श्री. साहेबराव ढेकळे यांच्या सहकार्याने साध्य करू शकलो.

नोकरी करत असतानासुद्धा थोडे चाकोरीबाहेर जाऊन सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने केलेल्या कार्याने कसे आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक परिवर्तन घडून येऊ शकते याचे हे जिवंत उदाहरण आहे.

– नाना भोसेकर

 

2 COMMENTS

Comments are closed.