नाना प्रयोगाकारणे

0
42

 

“जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल घडवू शकतो, ह्यावर आपली परिस्थितीच नाही तर उत्क्रांती अवलंबून असते. माहिती ही सतत, अनंत हस्ते मिळत असते, जगण्याच्या ढोबळ किंवा प्राथमिक उद्दिष्टांसाठी आपण सर्वच जीव काही समज (माहिती) प्रयत्नपूर्वक वेचत असतो, …..

– दिनकर गांगल

“जगाबद्दलची नवी माहिती, नवी समज आपण कशा पद्धतीने गोळा करतो, त्यांचा संबंध आपल्या अनुभव-परिघाशी कितपत जोडू शकतो आणि त्यांच्या मदतीने आपल्या भोवतालात काय बदल घडवू शकतो, ह्यावर आपली परिस्थितीच नाही तर उत्क्रांती अवलंबून असते. माहिती ही सतत, अनंत हस्ते मिळत असते, जगण्याच्या ढोबळ किंवा प्राथमिक उद्दिष्टांसाठी आपण सर्वच जीव काही समज (माहिती) प्रयत्नपूर्वक वेचत असतो, पण त्यापुढे जाऊनही आपण सूक्ष्म संदर्भ, सूचक उदाहरणे आणि अप्रत्यक्ष संकल्पनांच्या वा भाववाचक नावांच्या महासागरात दिवसरात्र डुचमळत असतो. अशा विनासायास दिसणार्‍या खुणांचा अन्वय लावण्याचा प्रयत्न मी या सदरात करणार आहे. संपूर्णपणे व्यक्तिकेंद्रित असल्याने त्यात सार्वभौम, त्रिकालाबाधित असे काही बहुधा नसेलच, पण तरी अशा गोष्टींची निदान नोंद तरी व्हावी हा माझा हेतू साध्य होईल.”

ऋचा गोडबोले यांनी त्यांच्या 'थिंकमहाराष्ट्र'वरील नव्या लेखमालेची ओळख करून दिली आहे ती अशी. ‘थिंकमहाराष्ट्र’ या वेबपोर्टलचा मुख्य हेतू महाराष्ट्राच्या संस्कृतिसंचिताची नोंद करणे हा आहे आणि भविष्यवेध हा त्या कामाचा गाभा आहे. तथापी संस्कृती ही प्रवाही असते. आपले आजचे जीवन हे उद्याच्या संस्कृतीत गणले जाते. आणि म्हणूनच ‘थिंकमहाराष्ट्र’वर वर्तमानाचा वेधही तितकाच महत्त्वाचा ठरतो. त्यादृष्टीने आपण वाचकांच्या व मान्यवरांच्या वर्तमानकालीन घटनांवरील टिकाटिप्पणी 'दैनिक मल्लिनाथी'मध्ये नोंदवत असतो. त्यामध्ये आता काही लेखमालांची भर टाकण्याचे योजले आहे. त्यांतील पहिले लेखन ऋचा गोडबोले यांचे आहे. म्हटले तर ही लेखमाला म्हणजे गोडबोले यांचे साप्ताहिक सदर होय. दर आठवड्याच्या सोमवारी त्यांचा नवा मजकूर अपलोड केला जाईल. याच पद्धतीने आणखीही काही अभ्यासू व बहुश्रूत व्यक्तींना ‘थिंकमहाराष्ट्र’वर नियमित लेखन करावे अशी विनंती केली आहे. आठवडा-दहा दिवसांत त्यांचे नवनवे सदरलेखनदेखील येथे सुरू झालेले दिसेल.

वेबसाईटचे खरे महत्त्व आहे, ते त्याच्या लोकशाही स्वरूपात; तसेच विकेंद्रित कार्यपद्धतीत त्यामुळे आम्ही सुचवल्यामुळे वेगवेगळ्या तर्‍हेचा मजकूर वेबसाईटवर येत असला तरी वाचकांना, त्यांनी त्यांची मते व त्यांचे लेखन या वेबपोर्टलकडे जरूर सादर करावे असे आमचे आवाहन आहे. आकडेवारीचे फुलोरे – ऋचा गोडबोले   

About Post Author

Previous articleआकडेवारीचे फुलोरे
Next articleकार्तिक पौर्णिमा!
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.