नाणेघाट – प्राचीन हमरस्त्यांचा राजा (Naneghat)

1
114
_Naneghat_2.jpg

सातवाहनांनी महाराष्ट्रात पहिली राजसत्ता सुमारे बावीसशे वर्षांपूर्वी स्थापन केली. त्यांची राजधानीची व प्रमुख नगरे होती जुन्नर, नाशिक, प्रतिष्ठान व तेर ही. त्या नगरांचे संबंध देशाच्या इतर भागांबरोबर व कोकण किनारपट्टीच्या सोपारा, ठाणे, कल्याण, चौल, मांदाड इत्यादी बंदरांमधून ग्रीस, रोम, इजिप्त, आफ्रिकेचा पूर्वकिनारा, इराणी व अरबी आखातातील प्रदेश यांच्याशी होते. तारवे, विविध प्रकारचा माल आणत व घेऊन जात. आल्यागेलेल्या मालाचे संकलन व वितरण कोकणातून घाटमाथ्यावर व नंतर महाराष्ट्राच्या अन्य भागांतून होई. त्यामुळे सह्याद्रीत लहानमोठे घाट दोन हजार वर्षांपूर्वीच अस्तित्वात आले. ते कोकण व घाटमाथा यांना जोडत. कोकणातील ठाण्याचा भाग थळ, बोर, माळशेज व नाणे या घाटांमुळे घाटमाथ्याला जोडलेला होता. त्यांपैकी नाणेघाट हा सर्वात प्राचीन व सोयीस्कर. म्हणून त्यास घाटांचा राजा म्हटले जाते. तो घाट मुरबाडच्या पूर्वेस तीस किलोमीटर, कल्याणपासून चौसष्ट किलोमीटर व जुन्नरपासून सुमारे तेहतीस किलोमीटर अंतरावर आहे. मुरबाडवरून निघाल्यावर सह्याद्रीच्या तळाशी वैशाखरे व पुलुसोनाळे ही गावे येतात.

वैशाखरे गावाची व्युत्पत्ती गझेटियरमध्ये वैश्यगृह (व्यापारी गृह) अशी दिलेली आहे. ते गाव व्यापाऱ्यांचा, लमाणांचा, बौद्धभिक्षूंचा व इतरेजनांचाही घाट चढण्याआधीचा पडाव असावा. घाट चढल्यावर घाटघर लागते. घाटाची चढण प्रधान पाड्यापासून वैशाखऱ्याजवळ सुरू होते. ती घनदाट वनस्पतींच्या भागातून सुमारे साडेचार किलोमीटर अंतर कापून घाटघरजवळ शिंगरू पठारावर येऊन संपते. चढणीच्या शेवटच्या टप्प्यात एकशेतीस फूट लांबीची प्रस्तर घळ असून तिला ‘घाटाची नळी’ असे म्हटले जाते. तो सबंध प्रस्तर खोदून त्यातून वाट काढण्यात आली आहे. ते अभियांत्रिकीतील त्या वेळचे अवघड आव्हान असावे. सातवाहनांनी तो घाट वैशाखरेपासून घाटघर व पुढे जुन्नरपर्यंत कातळ फोडून, त्यात पायर्‍यांची सोय करून बांधलेला होता. त्या पायर्‍यांचे अवशेष पाहण्यास मिळतात.

घाटात अनेक सोयी पुरवण्यात आल्याचे दिसून येते. शिंगरू पठार व पुलुसो नाळ्याजवळ गणेशथाळ येथे दगडात रांजण खोदलेले आहेत. स्थानिक लोक त्या रांजणांना ‘जकातीचे रांजण’ असे म्हणतात. लमाण व्यापार्‍यांकडून घाटाचा वापर केल्याबद्दलचे शुल्क किंवा कर रांजणात टाकण्यात येत असावा. घाटघर व आजुबाजूचे रांजण हे नेहमीप्रमाणे उभट गोलाकार आहेत. मात्र गणेशथाळजवळील रांजण आकाराने चौकोनी आहे. ते सर्व रांजण जकातीसाठी वापरण्यात येत असतील असे वाटत नाही. ती व्यवस्था पांथस्थांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणूनही असेल. घाटघरजवळ छोटे तलावही खोदलेले आहेत. त्याचाच अर्थ प्रवासी, लमाणांचे तांडे व त्यांच्या जनावरांसाठी पाणीपुरवठा करण्याचीही सोय असावी.

_Naneghat_1.jpgकाही रांजणांवरील कोरीव लेख महत्त्वपूर्ण माहिती देतात. शिंगरू पठारावरील रांजण दोन तोंडांचा असून त्यावर प्राकृत भाषेत ‘हा रांजण कामवन येथील व्यापारी दामघोष याने वशिष्ठपुत्र सातकर्णी याच्या राज्यकालाच्या तेराव्या वर्षांत कोरला’ असे म्हटले आहे. तेथेच, थोड्या बाजूला तलावाच्या कडेला दगडात कोरलेले बाक आहे. तो तलाव सोपारा येथील व्यापारी गोविंददास याने खोदला अशी माहिती त्या बाकावर मिळते.

घाट संपण्याआधी वर जाताना उजव्या बाजूला सुमारे एकोणतीस फूट चौरसाकार असलेले सातवाहनकालीन लेणे आहे. त्या लेण्याच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींवर सातवाहन राणी नयनिका हिचा प्रसिद्ध शिलालेख कोरलेला आहे. तो दक्षिण व पश्चिम भारतातील सर्वात प्राचीन लेख ( इसवी सनपूर्व पहिले शतक). त्यात सातवाहन राजघराण्याची व धार्मिक स्थितीची माहिती मिळते. लेण्याच्या एका भिंतीवर सातवाहन राजपरिवारातील व्यक्तींची खंडित शिल्पे आढळतात.

नाणेघाट दुरवस्थेत असला तरी त्याची पद्धतशीर आखणी व रचना करण्यात आली असावी हे तेथील अवशेषांवरून स्पष्ट होते. तो सातवाहन नरेशांनी निर्माण केला असावा. स्थानिक आख्यायिकेप्रमाणे ते काम अभियांत्रिकी क्षेत्रात निपुण असलेल्या नाना व गुणा या दोन तज्ज्ञांकडे देण्यात आले होते. त्यांपैकी जो प्रथम घाट बांधेल त्याचे नाव घाटास द्यावे असे ठरले. दोघांनीही त्यांचे कौशल्य पणाला लावले, घाट बांधणीस सुरुवात झाली. कोकणाकडे तोंड असलेल्या सह्याद्रीच्या उभ्या कड्याला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ‘नानाचा अंगठा’ असे म्हणतात. घाटाच्या निर्मितीस त्या ठिकाणाहून सुरुवात झाली असावी. अंगठ्याच्या दक्षिण भागाकडील काम गुणाला तर उत्तरेकडील भागाचे काम नानाला देण्यात आले. नानाला दिलेला मार्ग गुणापेक्षा अवघड असला तरी त्याने तो वर्ष संपण्याआधी पूर्ण केला. साहजिकच, नानाचे नाव त्या घाटाला पडले. दोन घाट बाजूबाजूलाच बांधण्याचे सातवाहनांचे काही प्रयोजन असावे. त्या काळातील वाहतुक आणि लष्करी हालचाली यांसाठी एकमेकांस समांतर घाट असणे आवश्यक ठरले असावे. सातवाहनांचे शक क्षत्रपांबरोबर संघर्ष सतत सुरू असत. सातवाहनांनी घाटाच्या सुरक्षिततेसाठी उपाय केलेले असावेत हे निकटच्या किल्ल्यांवरून लक्षात येते. जुन्नरपासून सोळा किलोमीटरवर चावंडचा किल्ला, बारा किलोमीटरवर हडसरचा किल्ला व त्यापुढे बहिरव व जीवधन हे किल्ले आहेत. त्याचाच अर्थ त्या व्यापारी मार्गांना संरक्षण मजबूत तटबंदीच्या माध्यमातून देण्याची गरज भासली असावी.

महत्त्वपूर्ण माहिती सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी टॉलेमी या भू – इतिहास विशेषज्ञाने दिली आहे. तो ‘नागुना’ किंवा ‘नानागुना’ नदी असा घाटाचा स्पष्ट उल्लेख करतो. टॉलेमी भारतात आला नव्हता. त्याने इतर प्रवाशांनी दिलेल्या माहितीवरून नाणेघाटाचे वर्णन केले आहे. त्यामुळे तो डोंगरी भाग आहे की ती वाहती नदी आहे असा संभ्रम त्याच्यासमोर पडला व त्याने नाणेघाट ही व्यापारउदिमाची नदी आहे असा समज करून घेतला. नाणेघाटाचा वापर शिलाहार, यादव व मराठी आमदानीतही होई. मुंबई – पुणे व मुंबई – नाशिक हे हमरस्ते ब्रिटिशांच्या काळात बांधले गेल्यामुळे नाणेघाटाचे महत्त्व आपोआप कमी झाले. मुंबईहून कोकण व गोवा या दिशेने जाणारे रस्ते सह्याद्री पर्वतरांगेतील विविध घाटांतून गेलेले आढळतात. नाणे घाट हे प्राचीन वाहतुकीचे उत्तम उदाहरण आहे.

डॉ. दाऊद दळवी

(मूळ लेखन ‘असे घडले ठाणे’ पुस्तकातून)

About Post Author

1 COMMENT

Comments are closed.