नरखेडचे श्री सिद्धेश्वर देवस्थान

carasole

सीना आणि भोगावती या नद्यांच्या मध्यभागी असलेल्या परिसरात नरखेड हे गाव आहे. मोहोळ -बार्शी रस्त्यावरील मोहोळपासून तेरा किलोमीटर अंतरावर बसलेले नरखेड हे सात-आठ हजार लोकवस्तीचे गाव. सिद्धेश्वर हे त्या नगरीचे ग्रामदैवत. तेथील शिवलिंग म्हणजे ‘श्री सिद्धेश्वर’ होत.

समज असा आहे, की ते गाव प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झाले. एवढेच नव्हे; तर साक्षात प्रभू रामचंद्रांनी ते लिंग तेथे स्थापन केले. त्याची पार्श्वभूमी अशी; रावण हा महान शिवभक्त होता. त्या शिवभक्ताचा अंत रामाकडून झाला आणि रामाचा विजय झाला. रामाने स्वतःकडून पातक घडले आहे असे समजून त्यातून मुक्तता मिळवण्यासाठी अयोध्येला पोचेपर्यंत ज्या ज्या ठिकाणी ते विश्रांतीसाठी थांबले त्या त्या ठिकाणी त्यांनी शिवलिंगाची स्थापना केली. त्या अनेक शिवलिंगांपैकी एक शिवलिंग नरखेड येथे आहे!

नरखेडच्या सिद्धेश्वर मंदिराचे मूळ बांधकाम हेमाडपंथी असावे. मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला आहे. त्यामुळे मूळ घडणीपैकी फक्त खांब पाहता येतात. उर्वरित मंदिर आधुनिक बांधकामाने उभे केले आहे. पूर्वीपासून श्री सिद्धेश्वराची पिंड वालुकामय आहे. पिंडीपासून शंभर फुटांवर दगडी नंदी स्थित आहे. त्या दगडी नंदीशिवाय असलेल्या पितळी नंदीच्या दोन्ही शिंगांच्या मध्यभागातून चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी मंदिराच्या समोर पूर्व बाजूने सूर्यकिरण पिंडीवर पडते. मंदिराला चारी दिशांनी कठडा बांधलेला आहे. मंदिर परिसरात गणेशाच्याा प्रतिमा आहेत. तसेच मंदिर परिसरात विवाहमंडपाची मांडणी असलेले बांधकाम आहे. तेथे अनेक विवाह संपन्नत होत असतात.

नरखेडचे गावकरी सिद्धेश्वराच्या मंदिराचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न करतात. गावकरी मंदिर व परिसरात अभक्ष्य किंवा मांसाहार करून जात नाहीत. तसे केल्यास सिद्धेश्वराचा कोप होतो असे मानले जाते. नरखेड गावात दुमजली इमारत आढळत नाही. त्याचे कारण, गावात सिद्धेश्वराच्या  मंदिराच्या कळसापेक्षा जास्त उंचीचे बांधकाम करू नये असा अलिखित नियम आहे. त्या‍ प्रकारचे बांधकाम केल्यास ती वास्तू धन्यास लाभदायक ठरत नाही असे मानले जाते. गावात चोरी होत नसल्याचे गावकरी सांगतात.

श्री सिद्धेश्वराचे मंदिर गावाच्या उत्तरेकडे उंचवट्यावर, ग्रामपंचयतीच्या जवळ आहे. चैत्र शुद्ध नवमीला सिद्धेश्वशराची यात्रा भरवली जाते. देवाचा छबिना ग्रामप्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याव दिवशी गावात खिरीच्या प्रसादाचे वाटप केले जाते. दूरदूरचे भक्तगण सिद्धेश्वपराच्या यात्रेला येतात. बाहेरगावी नोकरीनिमित्त गेलेली सर्व मुले, लग्न झालेल्या मुली यात्रेला न चुकता हजेरी लावतात. यात्रेचा व्याप साभाळण्यासाठी सिद्धेश्वर देवस्थान पंच मंडळी, नरखेड ग्रामस्थ मंडळी, सरपंच, ग्रामपंचायत विविध तऱ्हेचे संयोजन करत असतात. ट्रस्ट १९७४ पासून स्थापन झाला आहे.

यात्रेनिमित्त सतरा वर्षांपासून तीन कोटी हरिनामाचा नाम जप केला जातो. त्यासाठी सप्ताह बसवला जातो.

माहितीसंकलन साह्य – अरुण झाडे 8007601544 / डॉ. मधुरा बाजारे 8888358726

5 COMMENTS

  1. नरखेङ गावा विषयी अधिक
    नरखेड गावाविषयी अधिक माहितीचे पैलू या लेखात वाचनास मिळाले. लेखक पेटकरांचे व अरुण झाडे यांचे आभार.

  2. आम्ही नरखेड गावी व्यापारी
    आम्ही नरखेड गावी व्यापारी म्हणून आलो आहोत. आम्हांस नरखेड गावाविषयी मोलाची माहिती उपलब्ध करून दिली त्याबद्दल डॉ.मधुरा बाजारे आणि अरूण झाडे यांचे आभार. आणखी ऐतिहासिक माहिती संकलित करा. आपल्या कार्यास शुभेच्छा!

  3. थिंक महाराष्ट्र या वेब
    मी ‘थिंक महाराष्ट्र’ या वेबपोर्टला धन्यवाद देतो. ‘थिंक महाराष्ट्र’ या वेबपोर्टलसाठी आम्ही सोलापूर विद्यापीठातील जनसंज्ञेपन व पत्रकारिता विभागाच्या वतीने मी सांगोला व मोहोळ तालुक्यात चार दिवस माहिती संकलनाची जबाबदारी पार पाडली. ती संधी दिल्याबद्दल सन्माननिय किरण सरांचे व आदरनिय डॉ. चिंचोळकर सरांचे विशेष आभार.

Comments are closed.