धर्मा पाटीलची शोकांतिका

1
22
_DharmaPatilchi_Shokantika_1.jpg

धर्मा पाटील या शेतक-याने विष पिऊन आत्महत्या केली, ती सुद्धा मंत्रालयात! मी ती बातमी कळल्यापासून अस्वस्थ आहे. मी सर्व व्यवहार करत आहे, पण बेचैन आहे. रघुनाथदादा पाटील या शेतकरी संघटनेच्या गटनेत्याने टीव्हीवरील एका चर्चेत म्हटले, की अशी पहिली सहकुटुंब आत्महत्या वर्ध्याला पंचवीस-तीस वर्षांपूर्वी झाली, तेव्हापासून साठ-सत्तर हजार आत्महत्या घडून आल्या आहेत. त्यांनी त्या घटनेचे करुण वर्णन केले तेव्हापासून तर माझ्या मनातील अस्वस्थता खोल रुतून बसली आहे – सारखी वर येते. काय करावे – कोणा कोणाशी बोलावे – नित्य व्यवहारात त्या अस्वस्थेतेचा उल्लेख करावा का? काही सुचत नाही.

का करत आहेत शेतकरी आत्महत्या? त्यांची दुर्दशा तर पुरातनकाळापासून, इतिहासकाळापासून ऐकत आलो आहोत. मी मराठवाड्यात भूक मुक्ती मोर्च्यात सामील होतो. ज्या गावी पदयात्रेचा मुक्काम असे तेथे रात्री ग्रामस्थांबरोबरच्या गप्पांत आत्महत्यांचा विषय हमखास निघे. तेव्हा आत्महत्या विदर्भात होत होत्या. त्यांचे लोण मराठवाड्यात आले नव्हते. लातूर जिल्हाच्या एका खेड्यात रहिवासी म्हणाले, की आमच्या मराठवाड्यात शेतकऱ्यांचे दारिद्र्य पुरातन आहे, पण म्हणून आम्ही आमचे जीव नाही दिले!

गावागावातील हे कोडेदेखील कधी सुटले नाही, की गावातील बैलजोड्या कमी झाल्या आणि ट्रॅक्टरची नांगरणी वाढली, बैलगाड्या/छकडे गेले आणि हरगावी चौदा ते वीस मोटारसायकलींसमान दुचाकी वाहने आली. प्रत्येक गावात भडक रंगांनी चट्टेरीपट्टेरी रंगवलेले, गेल्या दहा-पंधरा वर्षांत बांधलेले देऊळ असेच असे. याचा अर्थ गावात संपत्ती येत होती. पदयात्रेची कल्पना अनिल शिदोरेची. ती नगर जिल्ह्यातून निघून वर्ध्यापर्यंत पोचली. अनिलने त्या निमित्ताने अनेक तऱ्हांनी ग्रामीण भाग प्रत्यक्ष पाहून नोंदलेला अभ्यास मांडला.

माझ्या डोक्यात मात्र शेतकऱ्यांच्या दु:स्थितीचा, त्यांच्या आत्महत्यांचा विषय राहून गेला व सतत छळत राहिला. मला विदर्भातील शेतकरी औषधी फवारे मारता-मारता मरण पावले तोदेखील आत्महत्येचा प्रकार वाटतो. वर्ध्यापासूनच्या या सर्व घटनांची स्पष्टीकरणे सरकारकडे आहेत. राजकीय पक्ष त्यांच्या सोयीनुसार उलटसुलट बाजू घेत असतात व तशी मांडणी करतात. समाज तर या प्रकारच्या हत्या-आत्महत्यांना इतका सरावाला आहे, की मृत माणसाच्या टाळूवरचे लोणी कोण आणि कसे हडप करत आहे त्याच्या नित्यनूतन कहाण्या प्रसृत होत असतात. मी एक सर्वसामान्य नागरिक म्हणून काय करावे? कवी अरुण शेवते यांनी मनमोहनसिंग सत्तेत असताना, ‘पंतप्रधानांस पत्र’ अशी दीर्घ कविता लिहून प्रसिद्ध केली. साहित्यसंस्कृती क्षेत्रातील लोकांच्या वेगवेगळ्या साहित्य मेळाव्यांमध्ये या मनुष्यहानीकडे कसे पाहवे याबाबत उल्लेख होत असतात, चर्चा निघत असतात. मी ग्रामीण भागांत फिरत असतो तेव्हा तेथील काही बोलके (व्होकल), ‘भूमिका असलेले’ लोक वगळले तर या घटना भिडलेल्या जाणवत नाहीत. लोक टीव्हीवरील चर्चांमध्ये मात्र तावातावाने बोलत असतात.

मृत्यू म्हणजे माणूस नष्ट होणे. मृत्युबद्दलची संवेदना गेल्या दोन-तीन दशकांत बदलून गेली आहे. घरातील मृत्यूदेखील नातेवाईकांच्या जीवाला जेवढा लागायचा तेवढा लागत नाही. हे घरोघरी पाहण्यास मिळते. पण जी व्यक्ती मृत्यू पावते ती विशेषतः तरुण असेल तर त्या व्यक्तीचे जगण्याचे आयुष्यच संपलेले असते, ती केवढी भीषण गोष्ट आहे! त्या व्यक्तीबद्दल दुसऱ्याने हळहळणे आणि त्या व्यक्तीचे स्वत:चेच नष्ट होणे यामध्ये केवढी तफावत आहे! तशा परिस्थितीत व्यक्ती स्वत: होऊन मृत्यू का पत्करत असेल? एवढा पराकोटीचा अन्याय तिला सहन होत नसेल? मग तो अन्याय करणाऱ्यांनी काय शिक्षा घ्यावी? त्यांना मनस्ताप पुरेसा आहे? आत्महत्या हे व्यक्ती मनोदुर्बल असल्याचे लक्षण आहे का?

धर्मा पाटील पंच्याऐंशी वर्षें नीटनेटके जगले होते. ते त्यांना जमिनीची नुकसानभरपाई रास्त मिळाली नाही यासाठी झगडत होते. त्यांनी त्यांच्या विनंती अर्जांना दाद मिळाली नाही म्हणून आत्महत्या केली. मी आणि हे वाचणाऱ्या माझ्यासारख्या तुम्ही काय करायला हवे? मला कळत नाही. शेतकरी विषारी औषध फवारताना मरण पावले तेव्हा त्यांना या समाजाने आधुनिक काळातदेखील अडाणी कसे ठेवले? याचे वाईट वाटले व त्याचबरोबर असेही वाटले, की ती दुर्घटना इतकी करुणास्पद आहे, की मुख्यमंत्री त्या ठिकाणी धावत का नाही गेले? त्यांनी त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन का केले नाही? त्यांनी त्यांना आर्थिक मदत जाहीर करून मग्रुरीच दाखवली. तीच गोष्ट धर्मा पाटील यांची. अशा प्रत्येक दुर्घटनेबरोबर संबंधितांना आर्थिक मदत जाहीर करण्यास लावून नोकरशहा मात्र सोकावत आहेत. त्या ठिकाणी धावून जाण्यासाठी म्हणून पुढे एक मंत्री ठेवावा लागेल! परंतु फडणवीसांना घटनेचे गांभीर्य कळले का नाही?

अविनाश धर्माधिकारी यांनी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणात बोलताना दोन मुद्दे मांडले, ते विचारार्ह वाटतात. सुशिक्षित समाजाने त्या दिशेने विचारमंथन सुरू करावे असे सुचवावेसे वाटते. धर्माधिकारी स्वत: आयएएस अधिकारी होते. त्यांच्या पुढे सरकारी यंत्रणेच्या मर्यादा व एक अधिकारी असा पेच उभा राहिला म्हणून त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी राजकारणातून काही जमते का असाही प्रयत्न केला. त्यांना तेथेही अपयश आले, तेव्हा त्यांनी ‘चाणक्य मंडळ’ काढून तरुणांची स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करून घेणे सुरू केले. शिवाय ते विविध सांस्कृतिक संघटनांशी जोडले गेलेले आहेतच. त्यामुळे ते त्यांच्या निष्ठेनुसार मोकळेपणाने मते मांडतात. त्यांनी सरकारी नोकरशाहीतील अनास्था व बेपर्वाई हे खरे कारण धर्मा पाटील यांच्या शोकांतिकेला आहे असे नमूद केले. सरकारी यंत्रणा प्रभावी व कार्यक्षम असणे गरजेचे आहे; तितकेच ती उत्तरदायी असणे, संवेदनाशील असणेही जरुरीचे आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी आपुलकीने, आस्थेने वर्तन केले तरी धर्मा पाटील यांच्यासारख्या शोकांतिका टळतील. ए.आर. अंतुले यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या फक्त एक वर्षाच्या कारकिर्दीत तशी दृष्टी दाखवली व वेळोवेळी स्पष्टपणाने मांडली. तसा वचक अधिकारी-कर्मचाऱ्यांवर निर्माण केला. महाराष्ट्राच्या पंधरा-सोळा मुख्यमंत्र्यांपैकी फक्त त्यांच्या सहृदयतेच्या अशा अनेक गोष्टी नागरिकांच्या लक्षात आहेत. उलट, त्यांचे समकालीन शरद पवार यांनी आयएएस अधिकाऱ्यांचे वर्चस्व ‘त्यांच्या कर्तबगारीच्या नावाखाली’ वाढवत नेले. नोकरशाहीत ‘इनिशिएटिव्ह’ व आस्था या दोन्ही गुणांची गरज आहे. तरच सरकारी अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची नागरिकांना जी पीडा होऊन राहिली आहे ती संपेल. राजकारणीही नोकरशहांच्या कठोर चौकटीतून मुक्त होतील.

– दिनकर गांगल ९८६७११८५१७

Previous articleमैत्री चॅरिटेबल ट्रस्ट
Next articleअंधांना दृष्टी मिळवून देणारे गुरुजी
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

1 COMMENT

Comments are closed.