धनत्रयोदशी

0
29
carasole

आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात. सायंकाळी घराबाहेर दिवा लावून, दिव्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस ठेवल्यास अपमृत्यू टळतो अशी भावना आहे. धनत्रयोदशीला घरातील सोने-नाणे व अलंकार स्वच्छ करून नीट ठेवतात. उपवास करून  विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, गणेश, नाग व द्रव्यनिधी या देवतांचे पूजन करतात. या दिवशी अखंड दीप लावून, पायसाचा नैवेद्य तयार करून यथाशक्ती परोपकार, दानधर्म करण्‍याची पद्धत आहे. धनत्रयोदशीला वस्त्रालंकारांची खरेदी करणे शुभ मानले जाते. धनत्रयोदशीच्यां व्रताची कथा पुढीलप्रमाणे आहे –

एकदा यमराजाने त्याच्या दूतांना विचारले, “तुम्ही प्राण्यांचे प्राण हरण करता त्यावेळी तुम्हाला दु:ख होत नाही का? त्या मरण पावणाऱ्या जीवांची तुम्हाला दया येत नाही का?’’ त्यावर यमदूत म्हणाले, “एकदा असा प्रसंग आला होता होता. हेमराज नामक राजाला एक पुत्र झाला. षष्ठीपूजनाच्या दिवशी सटवीदेवीने येऊन त्याचे भविष्य सांगितले, की ‘हा मुलगा लग्नानंतर चौथ्या दिवशी मरेल’. ते ऐकून राजाने मुलाला एका गुहेत लपवून ठेवले. पण सोळाव्या वर्षी त्याचे लग्न होताच चौथ्या दिवशी आम्ही त्याचे प्राण हरण करायला गेलो. त्या वेळी तेथे झालेला विलाप ऐकून आमचे मन द्रवले. महाराज, तुमची आज्ञा मोडणे शक्य नव्हते, म्हणूनच आम्ही त्याचा जीव काढून घेतला. पण त्या प्रसंगी आम्हाला फारच दु:ख झाले. म्हणून म्हणतो, महाराज! जीवाचा अपमृत्यू टाळण्यासाठी तुम्हीच काहीतरी उपाय सांगा.” तेव्हा यमराज म्हणाले, “धनत्रयोदशीच्या दिवशी जो दीपदानव्रत करील, त्याला अपमृत्यू येणार नाही.”

धनत्रयोदशीबद्दल आणखीही एक दंतकथा सांगितली जाते. इंद्रदेवाने महर्षी दुर्वास यांच्या शापनिवारणासाठी असुरांबरोबर समुद्रमंथन केले. त्यातून चार हात असलेला भगवान धन्वंतरी एका हातात अमृतकलश, दुस-या हातात जळू, तिस-या हातात शंख आणि चौथ्या हातात चक्र घेऊन जन्माला आला. त्या चारही गोष्टींचा उपयोग करून अनेक व्याधींना, रोगांना बरे करण्याचे काम भगवान धन्वंतरी करतो असे मानले जाते. धन्वंतरी हा आयुर्वेदाचा प्रवर्तक. त्‍याने आयुर्वेदाचे तेरा ग्रंथ लिहिले. त्‍याचा जन्‍म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला म्हणून वैद्य या दिवशी त्याची जयंती साजरी करतात. धनत्रयोदशीला कडुनिंबाच्या पानांचे बारीक केलेले तुकडे व साखर प्रसाद रुपात वाटले जाते. कडुनिंबाची उत्पत्ती अमृतापासून झाली असल्याचा समज आहे. धन्वंतरी हा अमृतत्व देणारा आहे, हे त्यातून प्रतीत होते. कडुनिंबाची पाच-सहा पाने जर रोज खाल्ली तर व्याधी होण्याचा संभव नाही. एवढे कडुनिंबाचे महत्त्व आहे.

– आशुतोष गोडबोले

(आधार – भारतीय संस्‍कृती कोश)