दुर्वा

0
119
_durva_1_0.jpg

दुर्वा ही एक तृण वनस्पती आहे. हे तृण पवित्र समजतात. ऋग्‍वेदात त्याचे उल्‍लेख मिळतात. (ऋ. 10.142.8., 10.134.5) दुर्वांना तैतरीय ‘मुलांच्‍या वाढीप्रमाणे आमच्‍या वंशाची वाढ कर’ असे संहितेत प्रार्थिले आहे. (4.2.9.2)

दुर्वा ह्या देवपूजेमध्‍ये वापरल्या जातात; खास करून गणपती पूजेमध्‍ये. गणपतीला दुर्वा का वाहतो? त्याचे एक उत्तर आहे – राज्यात दुर्वांची भरपूर कुरणे राहतील तर प्रजा समृद्ध राहील. कारण त्या वेळचे संपूर्ण जीवनचक्रच हिरव्या गवतावर निर्भर होते. भाद्रपदात रानावनात सर्वत्र हिरव्यागार दुर्वा दिसून येतात. पुढील पावसाळ्यापर्यंत दुर्वायुक्त कुरणे सुरक्षित राहिली पाहिजे; गणाध्यक्ष अर्थात गणप्रमुखाने शत्रूंपासून त्या कुरणांचे रक्षण करावे ही अपेक्षा. जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो सर्व कार्यांत यशस्‍वी होतो असे गणपती अथर्वशीर्षाच्‍या फलश्रुतीत म्‍हटले आहे.

गणपतीला दुर्वा वाहताना एकवीस नामांचा उच्‍चार केला जातो, तो पुढीलप्रमाणे – ॐ गणाधिषाय नमः ॐ उमापुत्राय नमः ॐ अभयप्रदाय नमः ॐ एकदंताय नमः ॐ इभवक्राय नमः ॐ मूषक वाहनाय नमः ॐ विनायकाय नमः ॐ इशपुत्राय नमः ॐ सर्वसिध्दीप्रदायकाय नमः ॐ लम्बोदराय नमः ॐ वक्रतुण्डाय नमः ॐ अघनाशकाय नमः ॐ विघ्नविध्वंसकर्मेंनमः ॐ विश्ववंधाय नमः ॐ अमरेश्वराय नमःॐ गजवक्त्राय नमः ॐ नागयद्नोपवितीनेनमः ॐ भालचंद्राय नमः ॐ परशुधारणे नमः ॐ विगघ्नाधिपाय नमः ॐ सर्वविद्याप्रदायकाय नमः

_durva_2.jpgदुर्वांचे वैशिष्ट्य म्हणजे ती वनस्पती उन्हाळ्यात वाळून गेली तरी पाऊस पडताच पुन्हा उगवते, तिला पाळेमुळे फुटतात म्हणून तिला चिरंजिवी मानले जाते. त्यामुळेच दुर्वांना प्रजोत्पादक व उदंड आयुष्यी असेही मानले जाते. दुर्वांचा रस गर्भाधान विधीत स्त्रीच्या नाकात पिळतात. दुर्वांचा रस त्वचेच्या आजारावर उपयुक्त आहे. वंध्यत्व जाण्यासाठीसुद्धा दुर्वांचे सेवन हितावह असल्याचे आयुर्वेदात सांगितले गेले आहे. नाकातून रक्त येत असल्यास, शरीरावर डाग पडल्यास दुर्वांचा रस औषधी आहे. नागीण झाल्यास दुर्वा वाटून त्यांचा लेप लावल्यास दाह शांत होतो.
मुलाच्‍या वाढदिवशी अक्षतांसह दुर्वांकुर मुलाच्‍या मस्‍तकावर ठेवतात. मुलाचे आयुष्‍य वाढावे हा त्‍याचा हेतू असतो. मृतांच्‍या आत्‍म्‍याला शांती मिळावी म्‍हणून दुर्वापूजन करण्‍याची चाल गुजरातेत आहे. दुर्वेचे वडाशी लग्‍न लावण्‍याची प्रथाही क्‍वचित आढळते.

दुर्वा मातीला घट्ट पकडून ठेवतात, पर्वतांना आणि नद्यांच्या किनाऱ्यांना ढासळू देत नाही. दुर्वा पाण्याला स्वच्छ आणि निर्मळ करतात. त्या सूर्यप्रकाशात प्राणवायूही उत्सर्जित करतात. ‘दुर्वा’ धातूचा अर्थच नष्ट करणे हा आहे. दुर्वा त्रिदोषनाशक आहेत. वात-कफ-पित्त दोषांना संतुलित करतात, म्हणून आयुर्वेदिक औषधांमध्ये दुर्वांचा वापर होतो. प्राकृतिक चिकित्सक दुर्वांचा वापर औषधी म्हणून करतात.

दुर्वांना हरळी, मंगला, शतमूला, हरियाला अशी आणखी काही नावे आहेत.

– प्रतिनिधी

About Post Author