आदिमानवाने अग्नी निर्माण केला तेव्हा तो इतर प्राण्यांपासून वेगळा आणि श्रेष्ठ ठरला. त्याच वेळी,अग्नीमुळे मानव निसर्गापासून दूरही झाला. त्याने हळुहळू निसर्गव्यवहारात हस्तक्षेप सुरू केला. मानवाने प्रगती शिकार केलेले मांस अग्नीवर भाजण्यापासून ते अग्नीचा प्रकाशासाठी उपयोग करण्यापर्यंत साधली. वि.म.कुलकर्णी यांची ‘ज्योत’ नावाची सुंदर कविता ‘आठवणीतील कवितां’मध्ये आहे. ज्योतीचा प्रवास दिवटी, पणती, समई, कंदील, बत्ती असा पुढे सरकत बिजलीपर्यंत कसा झाला याचे सुरेख वर्णन त्या कवितेत आहे. त्या कवितेची सुरुवात
आधी होते मी दिवटी
शेतकऱ्यांची आवडती
झाले इवली मग पणती,
घराघरांतून मिणमिणती
या कडव्याने झाली आहे. थोडक्यात दिवटी म्हणजे मशाल. पूर्वी रात्रीच्या वेळी प्रवास करणे झाल्यास काही जण मार्ग दाखवण्यासाठी दिवटी हातात घेऊन पुढे चालत. मशाल किंवा दिवटी हातात धरून मार्ग दाखवणाऱ्या अशा व्यक्तींना मशालजी किंवा दिवटा असे म्हणत. ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात,
तयां तत्त्वज्ञां चोखटां
दिवी पोतसाची सुभटा
मग मीचि होऊनी दिवटां
पुढां पुढां चाले.
त्याचा अर्थ ‘अर्जुना, त्या श्रेष्ठ, शुद्ध प्रेमळ भक्तांकरता तत्त्वज्ञानरूपी मशाल घेऊन, मी स्वत: दिवटा होऊन त्यांच्यापुढे दिवसरात्र चालतो’. श्रीकृष्ण स्वत:ला अशा तऱ्हेने दिवटा म्हणजे मार्ग दाखवणारा, वाटाड्या म्हणवून घेतात.
नंतर मात्र दिवटा या शब्दाला जरा हलका अर्थ प्राप्त झाला. दिवटा म्हणजे वाया गेलेला, दुर्गुणी, वाईट मार्गाला लागलेला असे अर्थ त्याला चिकटले गेले आहेत.
– उमेश करंबेळकर 9822390810
umeshkarambelkar@yahoo.co.in
umeshkarambelkar@yahoo.co.in

———————————————————————————————————————–