दारफळची धान्याची बँक

जेथे पैशाचे सर्व व्यवहार होतात, ती बँक असे प्रत्येकाच्या मनात असते. पण सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील दारफळ या गावी ‘धान्याची बँक’ आहे.

दारफळ हे गाव माढ्यापासून नऊ किलोमीटर अंतरावर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे. ‘राष्ट्र सेवा दला’च्या संस्कारात वाढलेले व साने गुरुजींच्या विचाराने प्रेरित झालेले असे ते गाव. उमराव सय्यद या मुस्लिम तरुणाने दारफळ गावात ‘राष्ट्र सेवा दला’ची मुहूर्तमेढ 1940 मध्ये रोवली. जयप्रकाश नारायण, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे असे मातब्बर 1956 मध्ये दारफळ येथे झालेल्या शिबिरात उपस्थित होते. त्यांनी त्यावेळी स्वयंपूर्ण खेड्याची संकल्पना मांडली आणि त्यातून ग्रामविकास करण्याचा मार्ग सांगितला. गावकऱ्यांनीही उत्साहाने, गावात ‘ग्रामविकास मंडळा’ची स्थापना केली. दारफळचा, पुढे ‘खादी ग्रामोद्योग सधन क्षेत्र योजने’मध्ये समावेश करण्यात आला. त्या योजनेचे त्यावेळचे अधिकारी विठ्ठलराव पटवर्धन यांनी ‘धान्य बँके’ची संकल्पना दारफळकरांसमोर मांडली. गावचे त्या वेळचे तरुण सरपंच तुकाराम निवृत्ती शिंदे यांनी ती कल्पना उचलून धरली. त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने 1 मार्च 1960 मध्ये ‘ग्रामविकास मंडळा’तर्फे ‘धान्य बँके’ची स्थापना केली. त्यामागे कोणते कारण होते?

ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुर यांना सावकारांकडून, बड्या शेतकऱ्यांकडून किंवा व्यापाऱ्यांकडून धान्य (मुख्यत्वे ज्वारी) कर्जरूपाने घ्यावे लागत असे. समजा, एक पोते ज्वारी कर्जरूपाने घेतली तर धान्याची परतफेड, हंगामात एक पोत्यास अडीच पोती अशा हिशोबाने करावी लागे. त्‍या प्रकारास पालेमोड असे नाव होते. सावकार वसुली करण्यासाठी; खळ्यावरच जात असे. मुद्दल व व्याज यांच्‍या पोटीची ज्वारी बळजबरीने वसूल करत असे. त्यामुळे शेतकऱ्याकडे वर्षभर खाण्यासाठी धान्‍य जेमतेम दोन-तीन पोती शिल्लक राही. शेतकरी अगदी रडकुंडीला येत असे. या जुलमी व्यवस्थेला उत्तर म्हणून ‘धान्य बँके’ची स्थापना झाली. त्या गोष्टीला सावकार मंडळींचा अर्थातच विरोध होता. परंतु तुकाराम शिंदे यांच्या पाठीशी सर्व सामान्य जनता खंबीरपणे उभी राहिली.

दुष्काळी स्थितीला तोंड देण्याची एक उपाययोजना म्हणून धान्य बँका १९०५ साली महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात प्रथम सुरू झाल्या होत्या. त्‍यानंतर १९३० च्या आसपास ओरिसात बऱ्याच बँका काढण्यात आल्या. आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, ओरिसा व प. बंगाल या राज्यात धान्‍याच्‍या बँका सुरू होत्या.

दारफळ गावातील ‘धान्य बँके’साठी भागभांडवल जमा करताना, गावातील सर्व थरांतील शेतकऱ्यांचा सहभाग लाभला. तेथील ‘धान्य बँके’ची स्थापना 1960 साली झाली. त्यावेळी शहाऐंशी सभासदांकडून चौपन्न क्विंटल बारा किलो ज्वारी भागभांडवल रूपाने जमा झाली. गावातील प्रत्येक कुटुंबातील किमान एक व्यक्ती बँकेची सभासद आहे. दारफळच्या परिसरातील ग्रामस्थांनाही काही ठरावीक किलो धान्य भागभांडवल रूपाने बँकेत जमा करून सभासद होता येते. कर्जरूपाने घेतलेल्या एक पोते ज्वारीस चार पायली धान्य व्याज म्हणून द्यावे लागते.

धान्याची वसुली सुगीच्या वेळी केली जाते. संपूर्ण धान्य वसूल झाल्याशिवाय, बँकेमार्फत पुढील वर्षाकरता कर्जाचे वाटप केले जात नाही. ‘धान्य बँके’चे कर्ज फेडण्यासाठी चढाओढ असते. जो सर्वांत प्रथम कर्ज फेडतो त्याचे नाव गावातील फलकावर लिहिले जाते!

राष्ट्रीयीकृत बँकेत रक्कम व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी जशी ‘स्ट्राँगरूम’ असते तशी धान्य साठवण्यासाठी बँकेच्या मालकीची ‘पेवे’ जमिनीत बांधलेली आहेत. पेव म्हणजे जमिनीत खोदलेले कोठार. सांगली जिल्‍ह्यातील हरिपूर गावात हळद साठवून ठेवण्यासाठी जमिनीखाली खोदलेल्‍या हजारो पेवांची पारंपरिक व्यवस्था आढळते. दारफळमधील पेवांमध्‍ये वर्षभर धान्याची (मुख्यत्वे ज्वारीची) साठवण सुरक्षितपणे केली जाते. पेव जमिनीमध्ये खोल खोदून तयार केले जाते. त्‍याचा व्‍यास तळाशी वीस फुटांचा तर तोंडाला अडीच फुटांचा असतो. ते उलट्या बादलीच्या आकाराचे किंवा प्रयोगशाळेतील चंबूसारखे असते. पेवाच्‍या आतील संपूर्ण दगडी बांधकाम केलेले असते. एका पेवात साधारण तीनशे क्विंटल धान्य साठवले जाते. दारफळमध्‍ये अशी पाच पेवे जमिनीत बांधलेली आहेत.

‘धान्य बँके’त जमा झालेल्या ज्वारीपैकी, पुढील वर्षासाठी सभासदांसाठी लागणाऱ्या ज्वारीचा साठा शिल्लक ठेवला जातो आणि ‘नफ्याच्या धान्या’ची विक्री केली जाते. ते पैसे गावाच्या विकासासाठी खर्च केले जातात. दारफळ गाव विकासासाठी शासनाच्या मदतीवर अवलंबून नाही.

‘धान्य बँके’ने दारफळ येथील ‘नवभारत विद्यालया’च्या इमारतीच्या बांधकामासाठी देणगी दिली. त्याच विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाला धान्य, विठ्ठल मंदिराच्या बांधकामासाठी; त्याशिवाय, नवभारत वाचनालय, तसेच सभागृहाच्या बांधकामासाठीही देणगी दिली आहे. गावात तालीम, भाजीमंडई, सांस्कृतिक व्यासपीठ, सीना नदीवरील मातीचा बंधारा, स्वच्छतागृह, स्मशानभूमीत शेड उभारणे, धर्मशाळेत फरशी (लाद्या/टाइल्स) बसवणे, पाण्याच्या झऱ्यासाठी मदत, गोदाम, वेताळपार, पीराचा जीर्णोद्धार अशा कामांसाठीही धान्य बँकेची मदत झाली आहे. बँकेने भजनी मंडळाला साहित्य पुरवले आहे. ग्रामपंचायतीची स्वत:ची नळपाणी पुरवठा योजना, ग्रामपंचायतीला विहीर, वीजपंप यांसाठीही बँकेने भरघोस मदत केली आहे. ‘धान्य बँक’च गावच्या यात्रेचा संपूर्ण खर्च करते; गावातील कोणाकडूनही वर्गणी घेतली जात नाही.

बँक सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम वेळोवेळी करत असते. उदाहरणार्थ, 1962 साली पानशेत धरण फुटले तेव्हा, तसेच किल्लारीचा भूकंप झाला तेव्हा बँकेने दुर्घटनाग्रस्तांना ज्वारी तसेच रोख रक्कम सहाय्य दिली आहे.

‘धान्य बँके’चा व्यवहार पाहण्यासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्यासह अकरा संचालकांचे कार्यकारी मंडळ आहे. मंडळाची निवडणूक सहसा बिनविरोध होते. ऑफिसकाम नियमित सांभाळण्यासाठी एक सचिव, दोन सहसचिव व दोन शिपाई आहेत. बँकेचे स्वत:च्या मालकीचे कार्यालय आहे.

(काही संदर्भ – मराठी विश्‍वकोश)
छायाचित्रे – दैनिक ‘लोकसत्‍ते’तून साभार

– पद्मा कऱ्हाडे

12 COMMENTS

 1. दारफळ ची धान्य बॅक हि
  दारफळ ची धान्य बॅक हि अभिमानाची गोष्ट आहे

 2. धान्यबँक ही तालुक्याची
  धान्यबँक ही तालुक्याची जिल्ह्याची आन् राज्याची शान ….म्हणुनच दारफळ गाव महान ….पद्मा कराडे….यांचे शतशःआभार

 3. खुप छान माहीती नवीन पीढीसमोर
  खुप छान माहीती नवीन पीढीसमोर मंडला……खुप खुप अभार….

 4. दारफळ या आमच्या गावाची…
  दारफळ या आमच्या गावाची धान्य बँक ही एक एेतिहासिक ठेवा आहे आणि तो जतन करणे गरजेचा आहे.

Comments are closed.