दंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य

0
240

‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते…

आदिवासींच्या जीवनजाणिवा त्यांच्या लोकनाट्यांतून आविष्कृत होतातच; पण त्याबरोबर त्यांच्या जमातींच्या वेगळ्या सांस्कृतिक मूल्यांची ओळखही होऊन जाते. त्याचे उदाहरण म्हणून आंध आदिवासी जमात हे बोलके आहे. ती जमात महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगण, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये वास्तव्य करणारी आहे. त्यातही मराठवाड्यामधील नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, विदर्भातील चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा ह्या जिल्ह्यांमध्ये त्यांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. ती जमात तिच्या प्रादेशिक, सांस्कृतिक, भाषिक वेगळेपणामुळे लक्षात येते.

आंध जमात वास्तव्य करून असलेला भाग हा दण्डकारण्य म्हणून ओळखला जात असे. दण्डक नावाच्या राजाचे राज्य प्राचीन काळी त्या जंगलामध्ये होते. त्या राजाचे वंशज ही आंध जमात असावी. त्या भागातील जे लोक नृत्य करतात, त्या नृत्याला ‘दण्डारण’ असे नाव आहे. दंडारणाला दंडार किंवा दिंडार असेसुद्धा म्हणतात. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आंध लोक त्याला ‘दिंडार’ असे म्हणतात, तर हिंगोली व नांदेड जिल्ह्यांतील आंध या नृत्याला ‘दंडारणं’ या नावाने ओळखतात. विदर्भातील बहुतांश आंध लोकही त्या नाट्यास ‘दंडारण’ या नावानेच संबोधतात. दंडार हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. ते नृत्यनाट्य वैशिष्ट्यपूर्ण आहे.

आंध जमातीच्या दंडारणात नृतक, गायक, वादक, सोंगाडे, सहाय्यक कलावंत अशी एकूण पंधरा-वीस जणांची संख्या सोयीनुसार असते. दंडारण साध्या मोकळ्या जागेवर, जत्रेच्या ठिकाणी, चौकात, ओट्यांवर किंवा पारावर सादर केले जाते. दंडारणात कुंभई वृक्षाच्या फांदीबरोबर म्हादेव, मरीमाय, पोचमामाय, कामाई, मसाई, वाघाई, कनकाई, आसरा, सटवाई, खोकलामाय, मेसकामाय अशा नावांच्या वाड्यापाड्यांवरील रक्षणकर्त्यांची आळवणी केली जाते. कुंभई वृक्षालाही सालई नावाच्या वृक्षाप्रमाणे पावित्र्य जोडले गेलेले आहे. दंड, टिपऱ्या, ढोलक, ढोलकी, झांज, टाळ, घुंगरू, तुणतुणे, डफ, शिंगाड आणि झाडांच्या डहाळ्या यांच्या साहाय्याने ध्वनिनिर्मिती करून पूर्व आणि उत्तररंग रंगवले जातात. त्या ओघात विविध कला सादर केल्या जातात. निसर्गातील आकाश, सूर्य, पृथ्वी, चंद्र, तारे, पाऊस, नद्या, डोंगर, झाडे अशा, मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आदिवासी समाज हा निसर्गतत्त्वाच्या अनुषंगाने जीवन जगतो. त्यामुळे निसर्गोपासनेला मोलाचे स्थान त्यांच्या नृत्य-नाट्य-संगीतात असते. धर्मापेक्षा जीवनपद्धतीला महत्त्व देणारा आदिवासी समाज जल, जंगल, जमीन यांचा संरक्षक म्हणून ओळखला जातो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते. त्यामुळे ते लोकनाट्यापेक्षा वेगळे ठरते व म्हणून त्याला लोकधर्मी असे संबोधले जाते. त्या नृत्यात उत्स्फूर्तता असते. सारे गाव त्या रात्रभराच्या सोहळ्यात सामील असते. स्वाभाविकच त्यातून लोकसंस्कृती प्रकटते.

दंडारणात समाजातील विविध विषय मांडले जातात. निर्जीव वस्तू सजीवांप्रमाणे वागतात, झाडे माणसाला सहकार्य करतात, मरणानंतर माणसाचे पक्ष्यात रूपांतर होते, जादूवरील श्रद्धा व्यक्त होते… असे काही महत्त्वाचे विषय दंडारण पाहणाऱ्यांचे मनोविश्व बदलून टाकताना दिसतात. दंडारणातील संवादही महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ –

राजाः परधानजी, मी या नगरीचा राजा का?

परधानः व्हय म्हाराज, या पृथ्वीचे राजे तुम्ही, तुमचे परधान आम्ही.

राजाः आपली प्रजा कशी आहे?

परधानः झकास! एकदम सुखी. त्यास्नी कायबी चिंता नाय. साखरच नाय तर ती मिळवायची आन् भाव वाढायची चिंता नाय. अशा बऱ्याच वस्तू हायेत की, त्या गडपच झाल्या; त्यामुळं त्यास्नी चिंता नाय. कसे सगळे मजेत हायत बघा. आन् म्हाराज, तुम्ही लक्ष घालत नाय म्हनूनशान प्रजा सुखी हाय.

दंडारणाचे प्रकार चौचाली दंडारण, टिपऱ्यांचे दंडारण, हातटाळी दंडारण असे पडतात. उपलब्ध रंगांचा उपयोग रंगभूषेसाठी केला जातो. त्यासाठी हळद, कुंकू, राख, गेरू, पावडर, लाली, गंध, काळा रंग, काजळ या जिन्नसांचा अंतर्भाव असतो. पुरूष कलावंतच स्त्रीभूमिका साकारतात. नाट्य रात्रभर चालते. विविध सोंगे वठवली जातात.

आधुनिक आदिवासी समाज दिवसभर जंगला-पहाडांत मजूर, सालगडी, शेतमजूर, ऊसतोड कामगार म्हणून परिश्रम करतो आणि उत्सवप्रसंगी अशा लोकनाट्यात रमतो. त्यामुळे त्याला करमणुकीचे स्वरूप प्राप्त होते. विविध आंधवाड्यांमधील लहान मुले-मुली, पुरूष-स्त्रिया, वयस्कर व्यक्ती असे सर्वजण दंडारण ऐकण्यास व बघण्यास येतात.

दंडारण मूलत: आदिवासी गावागावांत, वाड्यापाड्यांत होत असे, परंतु काळाच्या ओघात त्यांची कलापथके तयार झाली आहेत. कलापथकेदेखील मराठवाडा, विदर्भ भागांतील काही गावांमध्येच शिल्लक असल्याचे दिसून येते. आदिवासींचे जीवनमान भारतीय स्वातंत्र्योत्तर कालखंडात मोठ्या प्रमाणात बदलले आहे. इंग्रजांच्या आगमनाने भारतीय आदिवासी जगाच्या पटलावर आले. त्यांनी त्यांची समृद्ध परंपरा शेकडो वर्षांपासून जतन करून ठेवली होती हे लक्षात आले. त्याच बरोबर इंग्रजांच्या कायद्यांनी आदिवासींच्या जगण्यावर, जंगल स्वातंत्र्यांवर बंधने आली. भारतीय प्रस्थापित व्यवस्थेने ती बंधने कायम ठेवली आहेत. आदिवासी जमातींमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढत चालले आहे, परंतु समूहता, एकता, प्रादेशिकता, भाषिकता, सांस्कृतिकता ही आदिवासी समाजाची वैशिष्ट्ये टिकवण्याचे आव्हान नव्या नोकरदार पिढ्यांपुढे असल्याचे प्रकर्षाने जाणवते.

– सखाराम डाखोरे९८५०११६६४५ ssdakhore2000@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here