थिंक महाराष्ट्र डॉट कॉम आणि कोमसाप आयोजित पारितोषिक वितरण समारंभ

    तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेसह आठदहा नवे प्रवाह सध्या प्रचलीत आहेत. त्यामुळे जगभर अपार संधी आहेत. विद्यार्थ्यांनी ते प्रवाह जाणून घ्यावेत आणि जगभर जाण्याचा मार्ग पत्करावा, त्यात त्यांचा उत्कर्ष आहे असे आवाहन अमेरिकास्थित आय टी तज्ज्ञ राकेश भडंग यांनी दापोलीच्या वराडकर-बेलोसे महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी हितगुज साधताना केले. निमित्त होते इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या स्मरणार्थ योजलेल्या माहिती संकलन स्पर्धेच्या पुरस्कार वितरणाचे. ही स्पर्धा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेब पोर्टल आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांनी संयुक्त रीत्या घेतली होती. तिला सहाय्य पुण्याच्या ‘परिमल आणि प्रमोद चौधरी प्रतिष्ठान’चे लाभले आहे.

    भडंग यांनी या मोहिमेत इतिहासाच्या खुणा जपल्या जात आहेत ही कौतुकाची गोष्ट आहे, पण ही माहिती जगभर प्रसारित व्हावी यासाठी तंत्रज्ञानाने इतिहास नजरेसमोर साकारता येणार आहे हे सोदाहरण समजावून सांगितले.

    ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या दापोली तालुका संकलन मोहिमेअंतर्गत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांनी इतिहास संशोधक अण्णा शिरगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ दापोलीतील वराडकर-बेलोसे महाविद्यालयात शनिवारी, 28 जानेवारी रोजी पार पडला.

    निबंध स्पर्धेत प्रथम पारितोषिक अंबरीश सणस, द्वितीय पारितोषिक रजनी देवधर, तृतीय पारितोषिक विद्या पेंडसे व अनुष्का भोसले, उत्तेजनार्थ पारितोषिक सौरभ सोमण व दीपिका चिपत, सहभाग प्रमाणपत्र डॉ. बिपीन शहा यांना देण्यात आले. फोटोग्राफी स्पर्धेत ओंकार राळे व व्हिडिओ स्पर्धेत संभाजी थोरात यांना पारितोषिक देण्यात आले.

    या कार्यक्रमात थिंक महाराष्ट्र डॉट कॉमचे संपादक दिनकर गांगल, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्ष नमिता कीर, वराडकर-बेलोसे महाविद्यालयाच्या अध्यक्ष जानकी बेलोसे, पत्रकार प्रशांत परांजपे, महाविद्यालयाचे प्राचार्य कोळी उपस्थित होते.

    या कार्यक्रमात अमेरिका स्थित आयटी तज्ञ राकेश भडंग यांनी तंत्रज्ञानातील प्रगती आणि परदेशातील संधी या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दिनकर गांगल यांनी ‘थिंक महाराष्ट्र वेबपोर्टल’च्या माहिती संकलन मोहिमेची माहिती देऊन दापोलीकरांनी या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.

    नमिता कीर यांनी अण्णा शिरगावकर यांच्या कार्याचा वेध घेत, केवळ ज्ञानी होऊ नका तर व्यासंगीही व्हा असे विद्यार्थ्यांना सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना जानकी बेलोसे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या केवळ पारंपरिक वाटेवरून न जाता नवनवीन वाटा धुंडाळा असे सांगत मार्गदर्शन केले. उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रा. उत्तम पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कधा खेडेकर यांनी केले, तर अश्विनी भोईर यांनी आभार मानले.

    प्रतिनिधी

    ———————————————————————————————

    About Post Author

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here