डॉ. संदीप राणे यांचे पत्निव्रत

1
45
_sandip_rane

मुंबईच्या चेंबूरमधील पेस्तम सागर भागात राहणारे हृदयरोगतज्ज्ञ डॉ. संदीप राणे यांच्या पत्निव्रताची ही हकिगत. मी स्वत: डॉक्टरांकडे जाऊन उत्सुकतेने ती ऐकली आणि त्यांच्या चंदनी चांगुलपणामुळे भारली गेले. माझी ती भावना वाचकांना सांगावी असे वाटले. संदीप राणे यांनी त्यांच्या वागण्यात समतोल राखून कुशल, यशस्वी डॉक्टर व सुसंस्कृत पती या दोन्ही भूमिका उत्तमपणे गेली सात वर्षें निभावल्या आहेत. त्यात विलक्षण समजुतदारपणा व चांगुलपणा आहे. राणे पर्यावरण चळवळीचे जागरूक आणि सक्रिय कार्यकर्ते पूर्वापार आहेतच. त्यांना ‘महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डा’चे लाइफ टाइम अचिव्हमेंट अॅवार्ड मिळालेले आहे. त्यांचे नाव ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या ‘टॉप टेन’मध्ये आहे (ते नाव मुंबईतील नागरिकांच्या कल्याणकारी कार्याबद्दल नोंदवले जाते). पण त्यांना २०१२ सालापासून गेली सात वर्षें एक जादा जबाबदारी व्यक्तिगत आली आहे, ती पत्नी नीलमची. नीलम स्वत: शरीर आरोग्य विज्ञानाच्या डॉक्टर (फिजिऑलॉजी), पण त्यांना २०१२ साली डोकेदुखीचा अॅटॅक आला आणि राणे पतिपत्नींचा आयुष्यक्रमच बदलून गेला आहे.   
संदीप राणे यांचे व्यक्तिमत्त्व हसतमुख, चिरप्रसन्न आहे. कार्यतत्परता, कर्तबगारी आणि चांगुलपणा हे त्यांचे सहजधर्म आहेत. तशाच नीलमसुद्धा कार्यतत्पर व हसतमुख होत्या, एका गंभीर आजारानंतर सात वर्षांपूर्वीपासून त्यांना विस्मरण बाधा झाली आहे. संदीप यांनी आईवडिलांची वृद्धावस्थेतील जबाबदारी, सामाजिक जबाबदारी समर्थपणे सांभाळली होतीच, पण तेवढ्यात नीलमच्या आजाराचे तुफान चालून आले. पण डॉक्टरांनी तुफानाला हरवले आहे. मला तर त्यांची कहाणी ऐकताना पतिव्रता सावित्रीच्या गोष्टीची आठवण आली. तसेच, ते पत्निव्रताने वागत असतात.

संदीप राणे यांचे हॉस्पिटल पेस्तम सागर रोड नं. २ या भागात आहे. त्या हॉस्पिटलमध्ये संदीप व नीलम हे दोघे पतिपत्नी प्रॅक्टिस करतात. डॉक्टरांच्या स्मृतीत १० ऑगस्ट २०१२ हा गोपाळकाल्याचा दिवस कोरला गेलेला आहे. आजुबाजूला गोविंदांची धमाल चालू होती. संदीप त्यांच्या वैद्यकीय कार्यासाठी फोर्टिस हॉस्पिटलला जाण्यास निघाले होते. ते निरोप घेण्यासाठी नीलम यांच्या रुममध्ये आले, तर तेथे नीलम डोकेदुखीमुळे हैराण झाल्या होत्या. त्यांना डोकेदुखीचा त्रास होता, तो त्रास इतका तीव्र झाला होता, की त्यांच्याच्याने मान वर करून बोलताही येत नव्हते. त्या खाली मान करून संदीप यांना सांगत होत्या, की ‘मी बरी आहे. तुम्ही गेलात तरी चालेल!’ संदीप यांच्या सूक्ष्म डॉक्टरी नजरेला हे काही वेगळेच असल्याचे जाणवले. त्यांनी पत्नीजवळ बसून, त्यांची पल्स पाहिली. पल्स हाताला लागेना. ब्रेन हेमरेज झाले होते! त्यांनी न्युरोलॉजिस्ट डॉ. रमेश पाटणकर यांना फोन लावला. पाटणकर पेस्तम सागर भागातच होते. ते दहा मिनिटांत तेथे पोचले. त्यांनी न्युरो सर्जन डॉ. अशोक हांडे यांना बोलावून घेतले. त्यांच्या सल्ल्यानुसार नीलम यांना फोर्टिस हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले गेले. सगळ्या गोष्टी जलद गतीने घडत गेल्या. संदीप यांनी त्यांचे स्वत:चे सर्व डॉक्टरी कौशल्य पणाला लावले होते. नीलम तेथील ट्रीटमेंट झाल्यावर एका खाजगी हॉस्पिटलमध्ये तीन महिने होत्या. अनेक कॉम्प्लिकेशन्स झाली, सात-आठ ऑपरेशन्स झाली, पॅरालिसिसचा माइल्ड अॅटॅक येऊन गेला.

या सर्व गुंतागुंतींमुळे नीलम यांचा ‘मेमरी लॉस’ झाला आहे. त्यांना काही आठवत नाही. त्या फक्त वर्तमानात असतात. नीलम यांना घरी आणल्यावर त्यांची काळजी एखाद्या लहान बालकासारखी घेणे जरुरीचे होते. त्यांच्या देखभालीसाठी दोन नर्सेस आणि दोन फिजिओथेरपिस्ट अशी सर्व व्यवस्था केली गेली होती. लेडी स्पीच थेरेपिस्ट काम करत होत्या. संदीप नीलम यांना त्यांच्या हातामध्ये शक्ती यावी यासाठी गोल्फ खेळण्यास घेऊन जात असत.

पण मुख्य अडचण होती, की नीलम यांना काही आठवत नव्हते. तशात त्यांचा आजारपणानंतरचा पहिला वाढदिवस (७ ऑक्टोबर २०१३) आला. संदीप यांनी ती संधी साधली आणि त्या वेळच्या परिस्थितीत तो साजरा _sandip_rane_with_him_wifeकेला. नीलम यांना, त्यांनी त्यांचे सर्वात आवडते गाणे गाण्यास सांगितले. काही इष्ट मित्रांना बोलावले. नीलम बराच वेळ मुग्ध होत्या, वाढदिवसाला आलेली पाहुणे मंडळी उत्कंठित होती आणि एकदम नीलम उद्गारल्या – ‘माय हार्ट इज बिटिंग…’ ‘ज्युली’ या सिनेमातील गाणे. ते त्यांचे सगळ्यात आवडते गाणे. डॉ. राणे जिंकले होते. मी गेले तेव्हाही नीलम यांनी त्या गाण्याच्या ओळी म्हणून दाखवल्या. त्यानंतर नीलम गेल्या सहा वर्षांत हळुहळू नॉर्मल होत आहेत. 

संदीप म्हणाले, “मला दोन मुली आहेत. नीलम जरी नात्याने माझी बायको असली तरी मी तिच्या जीवघेण्या दुखण्यापासून तिला माझी तिसरी मुलगी मानतो, माझी परावलंबी मुलगी. मी तिला तशीच सांभाळतो.” नीलम संदीप राणे यांच्या समवेत त्यांच्या कन्सल्टिंग रुममध्ये बसतात. संदीप राणे यांना ‘ध्रुवतारा’ म्हणावे, की ‘शुक्रतारा’!
या सर्व हकिगतीची नाट्यमयता अशी, की संदीप राणे मला सर्व हकिगत कथन करताना नीलम शेजारच्या खुर्चीत बसल्या होत्या. विस्मृतीची व्यथा असल्यामुळे ती हकिगत ऐकत असताना त्यांना डॉक्टरांच्या प्रेमाची जाणीव होत होती, पण त्यांना प्रत्यक्ष आठवत काही नाही! – आणि त्या त्यांचा हात हातात घेऊन वारंवार म्हणत होत्या, ‘इतके केलेस ना तू माझ्यासाठी!’

संदीप राणे यांचे सर्व सार्वजनिक कार्य चालू आहे. सार्वजनिक हिताचे खटले कोर्टात भरून लोकांना न्याय मिळवून देणे ही त्यांची हौस आहे. त्यांना त्यांच्या रुग्णालयाचा ‘नंबर वन’ कायम ठेवायचा आहे व त्याबरोबर गरिबांना रुग्णसेवा उपलब्ध करून द्यायची आहे – त्यांनी तशी सहकाऱ्यांची टीम बांधली आहे, त्यात गेल्या चार वर्षांत गौतम बुद्धाने त्यांना झपाटले आहे – त्यामुळे ते तसे वाचन व आचरण करत असतात आणि या सर्व ध्यासांमध्ये त्यांचा एक डोळा सतत नीलमवर असतो. ते म्हणतात, माझी एकच इच्छा आहे – ‘मला मृत्यू नीलमच्या आधी येऊ नये.’ म्हणून त्यांची प्रार्थना असते – वन डे आफ्टर!

डॉ. संदीप राणे (०२२) २५२५८४०४/०५/०६
sandiprane1@gmail.com

– सरोज जोशी 9833054157
sgj1935@gmail.com 

1 COMMENT

  1. नि:शब्द. सँल्युट राणे सरांना…
    नि:शब्द. सँल्युट राणे सरांना. पत्नीव्रत.Very inspiring.

Comments are closed.