डॉ. प्रेमानंद रामाणी – चैतन्य पेरणारा सर्जन

0
9
carasole

डॉ. रामाणी तबलावादनाचा आनंद घेतानाडॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या नावामध्ये प्रेम आहे आणि आनंद आहे. परंतु त्यांचा तिसरा गुण कार्यमग्नता; तो नावातून निर्देशित होत नाही. डॉ. रामाणी यांनी वयाचा अमृत महोत्सव साजरा केला, तथापि त्यांच्या जीवनातील नियमितता व शिस्तशीरपणा जराही कमी झालेला नाही. किंबहुना त्यामधील काटेकोरपणा वाढत चालला आहे. ते वडाळ्याहून माहीमला राहायला आले त्यास काही वर्षे झाली. ते सातव्या मजल्यावर राहतात. तेथून नऊ वाजता ‘लीलावती’मध्ये ऑपरेशन्सची वेळ पोचायचे, तर त्यांना साडेआठ वाजता निघावे लागते. ‘ब्रेकफास्ट’ आटोपताच खाली ड्रायव्हरला इशारा केला जातो, की गाडी पोर्चात आणणे. डॉक्टर खाली उतरतात, गाडीत बसतात. बाजूचा ‘टाइम्स’ उघडतात व वाचन सुरू करतात.

मी त्यांची नियमितता निरखण्यासाठी ज्या दिवशी सकाळीच त्यांच्याकडे पोचलो व त्यांच्याबरोबर गाडीत बसलो तेव्हा ते म्हणाले, की “ड्रायव्हरला वेळीच निरोप गेल्यामुळे माझे तीस सेकंद वाचतात. तेवढा जास्त वेळ मी नातीचा निरोप घेण्यात देऊ शकतो.” त्यांच्या नातीची शाळेला जाण्याची तीच वेळ असते. त्यांची ‘आर्ट डायरेक्टर’ मुलगी वरच्या मजल्यावर राहते. ती आजी-आजोबांचा निरोप घेऊन रोज शाळेला जाते.

खरोखरीच, डॉक्टरांचे जीवन घड्याळाला बांधलेले आहे. त्यांचा दिवस सकाळी साडेसहाला सुरू होतो. ते त्याआधी एक तासभर तरी उठतात. आठवड्यातले चार दिवस, ते शिवाजी पार्कला राउंड मारण्यासाठी जातात आणि दोन दिवस, ते तबला वाजवण्याचा सराव करतात. ते पूर्ण एक तासभर ताठच्या ताठ बसून वेगवेगळे ताल वाजवतात. त्यांची ती तालीम घेण्यासाठी एक संगीतशिक्षक येतात. त्यांची दाद मिळाली, की रामाणी खूष असतात. त्यांची बोटे तबल्यावर चपळ चालतात असे मी त्यांना म्हणताच ते उद्गारले, की ‘मला कोठे मैफिलीत वाजवायला जायचंय? हा माझा आनंद आहे. माझी लहानपणापासूनची ही इच्छा होती. तेव्हा थोडाफार शिकलोही होतो. नंतर तो छंद राहून गेला. तो आता उत्तरायुष्यात माझ्यासाठी मीच अनुभवतोय ! पण त्याचा मला एक बोनस लाभला, तो म्हणजे शस्त्रक्रियेत माझी बोटे अधिक लवचीकतेने आणि लयबध्द चालू लागली.’

तासभर तबला वाजवून थकवा येत नाही का? असे विचारताच ते म्हणाले, की उलट उत्साह वाढतो. सकाळचे जॉगिंग आणि तबलावादन या गोष्टी माझ्या दिवसभराच्या व्यग्रतेतील आनंदनिधान आहे. डॉक्टर म्हणतात, की जगात कोठेही गेलो तरा माझे जॉगिंग शूज माझ्या बॅगेत असतात.

रामाणींचा दिवस कामाने व्यापलेला असतो. ते नऊ वाजता ‘लीलावती’त पोचले, की त्या दिवशी ज्या पेशंटला डिस्चार्ज मिळणार असेल त्याला भेटतात. तो ऑपेरशननंतर दोन-तीन दिवस रुग्णालयात राहिला असल्याने घरी जाण्यास उत्सुक असतो. डॉक्टर त्याला एकदा तपासतात. त्याच्याशी अवांतर एकदोन गोष्टी बोलतात. ब-याच वेळा हे रुग्ण फार दुरून, राजस्थानातून वगैरे आलेले असतात. त्यांना डॉक्टरांची आस्था स्पर्शून जाते. रुग्णांचे नातेवाईक तर भारावूनच गेलेले असतात.

मग डॉक्टर नवव्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटरकडे वळतात. तिथे त्यांचे ज्युनियर सहकारी ऑपरेशनची सर्व तयारी करून त्यांची वाटच पाहत असतात. तसे, सकाळपासून फोनवर एकदोन वेळा बोलणे झालेले असते, पण डॉक्टर कपडे बदलता बदलता परत उजळणी करतात आणि होतो ऑपरेशनना आरंभ! रोज दोन किंवा तीन ऑपरेशन असतात. त्यात कधी दुपारचे दोन-तीन वाजतात हे समजत नाही. मध्ये बाराच्या सुमारास थिएटरबाहेरच्या कॅंटिनमध्ये चहा पिणे असते. त्यावेळी इतर डॉक्टरांशी अथवा पाहुण्यांशी गप्पा.

 माझ्या लक्षात असे आले, की तिथे एकजात सर्व पस्तीस-चाळीस वयाच्या दरम्यानचे तरुण होते. एकटे रामाणीच वयोवृद्ध! रामाणींनी त्यावर गंमत सांगितली. ते म्हणाले, की या सर्जन लोकांनी ‘नाईट आऊट’ योजली. मी पण सभ्यता म्हणून माझी वर्गणी भरली. तर माझ्या मुलाचा फोन आला, की ‘बाबा, ते तरुण मौजमजा करण्यासाठी जमणार. तुम्ही कोठे त्यांच्यात जाताय? त्यांच्यावर उगाच दडपण येईल.’ डॉक्टरांचा मुलगा, अनूपदेखील मुत्ररोग शल्यक्रियातज्ज्ञ आहे. प्रेमानंद रामाणी यांना ही कल्पना होती, की आपण काही तरुण राहिलेलो नाही. परंतु ऑपरेशन थिएटरमधील डॉक्टरांच्या समूहभावनेपासून त्यांना दूर राहायचे नव्हते. ते समूहभावनेच्या नियमाने बांधलेले होते!

रामाणी यांच्याह मित्रांचा ग्रुप नेहमीच हायकिंगला जात असतो. गेल्याच वर्षी ते लडाखला जाऊन आले. डॉ. रामाणी म्हणाले, की ‘शिस्तीचा आणि नियमाने वागण्याचा माझ्यावरील हा संस्कार बालपणातला. माझे वडील जंगलखात्यात काम करायचे. त्यामुळे त्यांना भटकंती असायची, त्यांच्या बदल्या व्हायच्या. मी आईबरोबर वाढलो. घरी धार्मिक वातावरण. आईची व्रते असायची. आम्हा मुलांचे जीवन त्या व्रतांनी गुंफले जायचे. आमच्या अंगातही ती शिस्त बाणली गेली.’

डॉ. रामाणी यांचा जन्म गोव्यातला. फोंड्याजवळच्या वाडी गावातला. त्या वेळच्या खेड्यांत सगळ्याच त-हेची वंचितावस्था. शिक्षणासाठी दूर जावे लागायचे. डॉक्टर मॅट्रिकनंतर मुंबईत आले, स्वत:च्या हिमतीवर शिकले, पुढील शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये गेले. त्यांनी सर्वत्र उज्वल यश संपादन केले. मेंदू व पाठीचा कणा यांमधील शस्त्रक्रियेमध्ये कौशल्य प्राप्त केले. त्यामधील नवी तंत्रे शोधून काढली. डॉ.रामाणी यांची जगातल्या दहा श्रेष्ठ स्पायनल सर्जन्समध्ये गणना होते. त्यांचे विद्यार्थी देशोदेशी आहेत. ते स्पायनल सर्जन्सच्या जागतिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांचे गेल्या वर्षीच्या बावन्न आठवड़्यांत सत्तावन्न वेळा परदेशी जाणे झाले!

रामाणींचे वैद्यकीय आयुष्य प्रथम शीवच्या टिळक रुग्णालयात गेले व नंतर त्यांचे प्रायव्हेट क्लिनिक. त्यांचे हिंदू कॉलनीमधील क्लिनिक ज्या इमारतीत आहे तेथे पुनर्विकास चालू आहे, त्यामुळे रामाणींचे क्लिनिक ‘लीलावती’मध्येच भरते. ते दुपारी ४ ते रात्री ८ या वेळात असते. त्यांची ऑपरेशन्स लांबतात तेव्हा ते दुपारी जेवायला घरी जात नाहीत. एरवी, ते दुपारी २ ते ४ या वेळात घरी असतात. त्यांना भोजनोत्तर विश्रांती ठाऊक नाही. वाचन व अन्य भेटीगाठी यांसाठी तो वेळ असतो.

डॉ. रामाणी यांचे तरूणपणीचे छायाचित्ररामाणींचे नियोजन एकदम पक्के व तपशीलवार असते. त्यामधून त्यांचे अगत्य, आपुलकी, स्नेहभाव स्वाभाविक प्रकट होतात. ती हातोटी गोव्याच्या लोकांचीच असते, पण रामाणी त्याबाबत अधिक दक्ष जाणवतात. ते त्यांच्या सहवासातल्या, एवढेच नव्हे तर परिचयातल्यादेखील प्रत्येक माणसाची काळजी घेतात. मी ‘लीलावती’त त्यांच्याबरोबर होतो त्या दिवशी क्लिनिकमध्ये जयपूरहून तीन माणसे आलेली होती. त्यांपैकी एकाचे ऑपरेशन रामाणी यांनी केले होते. तो फॉलोअप चेकअपसाठी आला होता. येताना आणखी दोघांना बरोबर घेऊन आला होता. त्यातला एक संभाव्य पेशंट होता. डॉक्टर म्हणाले, की हा डॉक्टरवरचा विश्वास असतो. पाच-दहा हजार रुपये खर्च करून ते मुंबईला दाखवायला आले!

प्रत्येक यशस्वी डॉक्टरची अशी ख्याती असते. परंतु रामाणी स्वत:चे व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवन जसे आखून, नियोजनपूर्वक जगले, तसेच त्यांनी सार्वजनिक हित जपले. त्यांचे वेगळेपण तेथे जाणवते. त्यांनी त्यांचा व्यवसाय विलक्षण कौशल्याने आणि बुद्धीने केला व तो हे करत असताना विलक्षण सखोल सामाजिक दृष्टी दाखवली आहे. एक गोवेकर म्हणून त्यांनी आपल्या वाडी गावाचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. त्यांनी तेथे प्रथम आपल्या राहत्या घरी वाचनालय सुरू केले, तेथेच नवी इमारत बांधून जिमखाना खोलला, योगवर्ग सुरू केले, महिला मंडळांसाठी भजनमेळावे योजले. त्यांची कल्पकता सर्वांत दिसून आली ती अत्याधुनिक खेळण्यांचे मुलांसाठी दालन सुरू करण्यात. तेथे मुलांना मुक्तद्वार आहे आणि दर दोन महिन्यांनी नवीन खेळण्यांचा साठा आणून टाकला जातो.

रामाणी यांना विविध विषय-क्षेत्रांत रूची आहे. येथे दुर्बिणीच्या साह्याने ते आकाशदर्शन करताहेत.रामाणी स्वत: मॅरेथान स्पर्धेमध्ये धावतातपरिसरातील शाळांसाठी निबंधस्पर्धा असते. त्यातील निवडक साठ मुलांना दरवर्षी मुंबईची तीन दिवसांची सैर आखली जाते. त्यांतल्या एका संध्याकाळी प्रेमानंद व प्रतिमा रामाणी, दोघे पती-पत्नी त्या मुलांबरोबर जेवण घेतात. या एका ट्रिपने गोव्याच्या खेड्यांतील मुलांचे जीवनच बदलून जाते. प्रौढांनादेखील जीवनदृष्टी देणारा रामाणी यांचा उपक्रम म्हणजे वाडीत दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात होणा-या मॅरेथॉन स्पर्धा. त्यांनीच त्या घेणे सुरू केले. रामाणी स्वत: मॅरेथान स्पर्धेमध्ये धावतात. मॅरेथान त्यासाठी महिनाभर तसा सराव करतात. या स्पर्धेमध्ये चार-चारशे लोक भाग घेतात. डॉ.रामाणी स्वत: त्यांच्याबरोबर पळतात. त्यांनी गावातले हे सगळे उपक्रम चालवण्यासाठी आईच्या नावाने ट्रस्ट सुरू केला आहे.

डॉक्टर मुंबईतदेखील अनेक संस्थांशी जोडले गेले आहेत. त्यांपैकी गोवा हिंदू असोसिएशन महत्त्वाची, त्याखेरीज सारस्वत संस्था आहेत. खूप भाविक आहेत असे नव्हे, परंतु एक सारस्वत मान्यवर व्यक्ती म्हणून वेगवेगळ्या देवतांच्या पूजा धार्मिक कर्तव्य भावनेने बांधतात, त्यामागे खरा भाव असतो तो समाजस्वास्थ्याचा आणि समाजधारणेचा. त्यांचे मत देवधर्म आणि कर्मकांड हे समाजाला एकत्र आणतात आणि बांधून ठेवतात असे आहे.

रामाणी क्लिनिक संपवून रात्री साडेआठ-नऊला घरी परततात. सध्या ती पती-पत्नी दोघेच घरी असतात. ते व पत्नी. त्यांची मुलगी त्याच इमारतीत वरच्या मजल्यावर राहते. त्यामुळे रामाणींची नातीची सारखी जा-ये करत असते. तिला आजी-आजोबांचा लळा आहे. रामाणी यांचा मुलगा–सून व नातवंडे सांताक्रूझला असतात. परंतु रामाणींचा परिवार एवढाच मर्यादित नाही. तो जसा व्यवसायातून व समाजकार्यातून जोडला गेला आहे, तसा गोमंतक भूमीच्या प्रेमाने जवळ राहिलेला आहे.

रामाणी यांचे जीवनशैलीच्या संदर्भात महत्त्व काय? तर ते आजच्या काळाला अनुरूप असे पैशांचे महत्त्व जाणतात, परंतु त्याबरोबर ते सरस्वतीलाही पूजतात. त्यांची सुसंस्कृतता व रसिकता त्यांच्या जीवनराहणीच्या प्रत्येक घटकातून दिसते. त्यांचा सूट उत्कृष्ट. जणू वस्त्रप्रावरणाची जाहिरात वाटावा असा, केस व्यवस्थित बसवलेले. जणू हेअर-क्रिमच्या जाहिरातीत शोभणार.

रामाणी यांच्या बोलण्याचा ढंग मंदमृदू आहे, त्यामुळे त्यात हळुवारपणा जाणवतो; तो ऑपरेशन थिएटर व क्लिनिकमध्ये थोडा करडा असतो, पण ते अनौपचारिक असतात-बोलतात तेव्हा दिलखुलास असतात. छोट्या छोट्या ‘जोक्स’वर देखील खळखळून हसतात. स्वत: दाद देतातच पण श्रोत्याचीदेखील मिळवतात.

पाठीमागे डावीकडून, मुलगा अनुप आणि सून मधुरा, शेजारी बहिण शालिनी, शेजारी जावई करण आणि मुलगी अंजली, सोफ्यावर पत्नी प्रतिमासह डॉ. रामाणी, सोबत रिती,रोहन आणि रिषी ही नातवंडेगोवेकर कामसुपणाबद्दल फार प्रसिद्ध नाही. त्यांची रसिकता मद्य, मासे, पोर्तुगीज धर्तीची आदबशीर जीवनशैलीअशा विविधता घटकांतून व्यक्त होते, पण रामाणी यांनी त्यामध्ये कार्यव्यग्रतेचा घटक मिळवला आहे.

रामाणी यांनी परंपरा आणि आधुनिकता यांचादेखील झकास मेळ घातला आहे. ते भारतीय जीवनातील जुने संकेत आदराने पाळतात, सर्व सणा-समारंभांना आवर्जून तेही भारतीय झब्बा-पायजमा अशा पोषाखात दिसतात. माहीमला आल्यापासून त्यांचा वावर अशा प्रसंगी शीतलादेवीच्या देवळात हमखास असतो. तितक्याच सहजतेने व आस्थेने ते देशी-परदेशी ताची प्राचीन ज्ञानपरंपरा मधल्या काळात लोप पावली याची त्यांना खंत वाटते आणि आजचे युग ज्ञानाचे आहे व त्यात आपण आधुनिक ज्ञानदानाचे कार्य करतो याचा त्यांना अभिमान वाटतो त्यांनी कण्याच्या विकारासंबंधातील पुस्तके, डीव्हीडी त्याच भावनेने हे साहित्य केले आहे. ते म्हणतात, “ज्ञानाच्या पवित्र धर्म मी नित्य पाळला-हातचं न दाखवता माझ्या जगभरच्या विशेषत: आशियायी विज्ञार्ज्ञाना दिलं. ज्ञानार्जन आणि विद्यादान यांतून मिळणारा आनंद पैशांपेक्षा मोठा आहे.”

पण तो कळायलादेखील जवळ पैसा व सुखसंपन्नता असावी लागते हे आजच्या काळाचं भान त्यांनी यथार्थ जपलं आहे. त्यामुळे त्यांच्या कामात आणि छंदात अत्याधुनिक तंत्रसाधनांचा वापर सर्रास दिसतो. ते त्यात जराही बिचकत नाहीत.

‘पॉझिटिव्ह अॅटिट्यूड’ हा आजचा जगण्याचा परवलीचा शब्द आहे. त्यामुळे ‘अर्धा ग्लास भरलेला’ हा वाक्यप्रयोग लोकप्रिय आहे. रामाणींचा ग्लास सतत पूर्ण भरलेला असतो. ते म्हणतात, मन सकारात्मक विचारांनी भरलेलं हवं आणि तन व्यायामानं सक्षम हवं. तर जीवन रसरशीत आनंदानं बहरुन येतं. रामाणी बोलत नाहीत तर तसे जगतात. किंबहुना, तो क्रम उलटा आहे. ते आयुष्य तीव्र ज्ञानालालसेनं आणि रसरशीत रसिकतेनं जगले आणि मग ते जीवन शब्दमधून ‘ताठ कणा’ व ‘सत्तरीचे बोल’ या पुस्तकांतून मांडले.

डॉ. प्रेमानंद शांताराम रामाणी,
रूम नंबर 27, स्‍पाइन किल्‍निक,
तळमजला, लिलावती हॉस्पिटल अॅन्‍ड रिसर्च सेंटर,
A-791, वांद्रे रेक्‍लमेशन, वांद्रे पश्चिम, मुंबई – 400050
दूरध्‍वनी – 9869212030
drpsramani@gmail.com

डॉ. रामाणी यांच्‍या संकेतस्‍थळास भेट द्या

– दिनकर गांगल

Previous articleपाचीपांडव डोंगराचे रहस्य
Next articleस्त्रियांची बदलती मनोवस्था
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.