झोडगे गावचे माणकेश्वर मंदिर

0
32
carasole

यादव घराण्याचे राज्य महाराष्ट्रदेशी नवव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत होते. तो काळ संपन्न, समृद्ध आणि कलाप्रेमी असा मानला जातो. राजांनी त्यांच्या राजवटीत देखणी, शिल्पसमृद्ध मंदिरे बांधली. तसेच, एक सुंदर माणकेश्वर मंदिर उभे आहे मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या झोडगे या गावी. ते गाव नाशकातील मालेगावपासून तीस किलोमीटर अंतरावर आहे. माणकेश्‍वरचे ते मंदिर सुंदर असूनसुद्धा दुर्लक्षित राहिले आहे. माणकेश्वर मंदिराची रचना ही बरीचशी सिन्नर शहरातील गोंदेश्वर मंदिरासारखी आहे.

झोडगे येथील मंदिर त्रिदल म्हणजे तीन गाभारे असलेले आहे. ते पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची रचना मुखमंडप, खांब नसलेला मुख्य मंडप, अंतराळ व गर्भगृह अशी आहे. मंदिराच्या समोर चौथरा असून त्यावर नंदीची मूर्ती पाहण्यास मिळते. मंदिराचे शिखर पाहिले, की रतनवाडी येथील अमृतेश्वर मंदिराची आठवण होते. शिविपडीचा वारीमार्ग हा नेहेमी उत्तर दिशेकडे असतो. वाटसरूंना दिशा समजण्यासाठी त्याचा उपयोग होत असावा. मंदिर पश्चिमाभिमुख असल्यामुळे मंदिरातील शिविपडीचा वारीमार्ग उत्तर दिशेकडे जाणारा म्हणजेच पर्यटकाच्या डाव्या हाताला दिसतो.

स्थापत्यशास्त्रानुसार ते भूमीज मंदिर आहे. त्याचा पसारा सिन्नरच्या गोंदेश्वर मंदिरापेक्षा लहान असला तरीसुद्धा त्या मंदिरावर असलेली देखणी शिल्पकला मुद्दाम पाहण्याजोगी आहे. मंदिर शैव असल्यामुळे अर्थातच त्यावर शिवाच्या विविध मूर्ती पाहण्यास मिळतात. त्यातही एका देवकोष्ठात असलेली अंधकासुरवधाची शिवप्रतिमा निव्वळ देखणी आहे. त्यासोबतच मंदिराच्या बाह्यांगावर विविध वादक, दर्पणा, नूपुरपादिका अशा सुरसुंदरी, भैरव यांचे केलेले अंकन, शिखरावर असलेले कीर्तिमुख हे मुद्दाम पाहण्याजोगे आहेत. चामुंडेचे भयावह शिल्प त्यातील बारकाव्यांसह तेथे पाहण्यास मिळते. अष्टदिक्पालसुद्धा तेथे मंदिरावर कलाकुसरीने कोरलेले आहेत. शिल्पकामाची एवढी विविधता असलेले हे मंदिर एकांतात वसलेले आहे. गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला झटुंब्याचा डोंगर असे म्हणतात. त्या डोंगरावरील देव हा घोड्यावर बसलेला असून तो गावाचे रक्षण करतो अशी गावकऱ्यांची श्रद्धा आहे. मालेगाव-धुळे परिसरात असलेले हे शिल्पवैभव खास वेळ काढून पाहवे असे आहे.

छायाचित्रे – ओमप्रकाश देसले

– आशुतोष बापट

Last Updated On – 24th Feb 2017