जोडीदार निवडीतील विवेकी विचार

_JodidarNivditil_VivekiVichar_2_0.jpg

‘जोडीदाराची विवेकी निवड'(जोविनि) हा उपक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अनेक वर्षे चालवते. या विषयावरील चर्चेसाठी तरुणांना व्यासपीठ मिळावे म्हणून तीन वर्षांपूर्वी Whats up ग्रुप तयार करण्यात आला. त्याची प्रमुख सूत्रधार आरती नाईक सांगते, की ‘समस्येवर उपाय शोधण्याच्या गरजेतून हा उपक्रम विकसित झाला आहे!’

त्यांना गरज जाणवली ती अशी – शनीशिंगणापूरच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून ‘अंनिस’चे कार्यकर्ते प्रवास करत होते. रिझर्व्ह बँकेतील सचिन थिटे, पोलिस दलातील तुषार शिंदे, आरती व महेंद्र नाईक असे प्रवासात एकत्र होते. प्रवासातील गप्पांत असा विषय निघाला, की सचिन आणि तुषार यांचे लग्न राहिले आहे! सुस्थिर नोकरी असलेल्या त्या मुलांचे लग्न खोळंबले होते, कारण त्यांना त्यांच्या विचारांना अनुरूप असा जोडीदार हवा होता. त्यांची इच्छा कांदेपोहे पद्धतीने, जातीतील, सुंदर मुलगी बघून लग्ने करण्याची नव्हती. त्या मुलांना त्यांच्या त्या अपेक्षांविषयी घरातल्यांशी बोलतादेखील येत नव्हते. त्यांना समविचारी जोडीदार हवा म्हणजे नक्की कसा जोडीदार हवा याविषयी त्यांची स्वतःची काही मते सुस्पष्ट करून घेण्याची गरज जाणवत होती; त्यांची गरज त्यासाठी सातत्याने चर्चा करता येईल असा एखादा गट ही होती!

आरती आणि महेंद्र यांचे लग्न बारा वर्षांपूर्वी झाले, त्यांना तेव्हापासून जोडीदार निवडीचे पर्यायी व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे असे वाटत होते; त्या इच्छेला मूर्तरूप त्या प्रवासानिमित्ताने आले. ‘अंनिस’च्या महाराष्ट्रभरातील किती कार्यकर्त्यांचे लग्न त्या मुद्यावर अडले आहे, हे बघून त्यांना पण त्या उपक्रमात सहभागी करून घेण्याचे ठरले. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाचा whatsapp गट 13 डिसेंबर 2015 रोजी सुरू झाला! ‘अंनिस’चे महाराष्ट्रभरातील लग्नेच्छू कार्यकर्ते त्यात सहभागी झाले. गटात जोडीदाराची निवड करण्याच्या निकषांबद्दल चर्चा व्हावी आणि गटावरील अवांतर संदेश टाळले जावे यासाठी सहभागी तरुणांना नेमके काहीतरी काम देण्याचे ठरले. प्रथम, त्यांचा व्यक्तिगत परिचय मागवला गेला तो वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी ‘बायोडेटा’ अपुरा ठरेल हे लक्षात आले. whatsapp गटावर एक प्रश्न चर्चेसाठी म्हणून दर दिवशी टाकण्याचे ठरले. त्या दिवशी त्या मुद्यावर गटात चर्चा होई. त्याकरता पंचेचाळीस प्रश्नांचा संच तयार झाला. दिवसाला एक प्रश्न, अशी पंचेचाळीस प्रश्नांची चर्चा पंचेचाळीस दिवस सुरू झाली. गटाचा कार्यकाळ पंचेचाळीस दिवस ठेवण्यात आला.

निशा, दीक्षा अशा ‘अंनिस’च्या कार्यकर्त्या नसलेल्या; पण विवेकी विचारांनी समविचारी जोडीदाराची निवड करू इच्छिणाऱ्या तरुणी whatsapp वरून नव्याने जोडल्या गेल्या. त्यांची वरसंशोधनाची गाडी समविचारी जोडीदार कसा शोधावा या प्रश्नावर अडली गेली होती. सचिन-निशा सांगतात, की पहिली बॅच ही प्रायोगिक स्वरूपाची होती. त्या अनुभवातून गट चालवताना सोयीचे ठरणारे मुद्दे लक्षात आले. गट चालवण्यासाठीचे नियम तयार होत गेले. आरती नाईक, महेंद्र नाईक, सचिन थिटे, निशा फडतरे आणि दीक्षा अशी कोअर टीम तयार झाली.

बऱ्याच जणांची प्रवृत्ती गटात स्वतः व्यक्त न होता, इतरांची मते फक्त वाचायची अशी असते. त्यांना त्यातूनदेखील शिकण्यास मिळते; पण गट सहभागी पद्धतीने चालवायचा असेल तर प्रत्येकाने बोलणे गरजेचे असते. त्यामुळे प्रत्येकाने एकदा तरी रोजच्या प्रश्नावर व्यक्त झालेच पाहिजे असा नियम केला गेला. सगळ्यांची उत्तरे रोज ‘सेव्ह’ केली गेली. सहभागी व्यक्तींच्या मतांत हळुहळू बदल कसा घडत गेला हे पडताळून पाहण्यासाठी किंवा उत्तरांमधील अंतर्विसंगती तपासण्यासाठी ‘सेव्हड मेसेजेस’चा उपयोग झाला. पंचेचाळीस प्रश्नांपैकी, सुरुवातीच्या काही प्रश्नांमध्ये स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्यावर तात्त्विक चर्चा होते आणि शेवटच्या काही प्रश्नांमध्ये घरकामाच्या मुद्याची चर्चा होते. सेव्ह केलेली उत्तरे पडताळून पाहताना हे स्पष्टपणे दिसू लागले, की स्त्री-पुरुष समानतेच्या मुद्याबाबत जे सकारात्मक बोलायचे, त्यांचे ‘घरकामातील पुरुषांचा सहभाग’ या मुद्याबद्दलचे मत वेगळे असायचे. मुले त्यांच्या विचारांतील अंतर्विसंगती समोर आल्यावर त्याबद्दल विचार करू लागली. अनेक जण स्वतः उत्तर न देता उत्तरे ‘कॉपी-पेस्ट’ करायचे, ते या गटात चालणार नाही असा नियम केला गेला. गटातील चर्चेत तीनपेक्षा जास्त दिवस सहभागी झाले नाही तर त्यांना गटातून बाजूला करण्यात येईल असाही नियम केला गेला. मुले खोटेपण बोलायची; म्हणजे एखाद्या मुलीचा बायोडेटा एकाद्या मुलाला आवडला आणि तिची जन्मतारीख, समजा 1991 ची असेल तर तो स्वतःचे जन्मसाल 1988 करून टाकायचा, असे! उत्तरे ‘सेव्ह’ करत गेल्याने त्यालापण आळा बसला.

गटात सहभागी होणाऱ्या सर्व मुलांना सांगण्यात येते, की ते त्या गटात का सहभागी होत आहेत हे, त्यांनी घरच्यांशी बोलणे आवश्यक आहे. त्यांनी त्यांना स्वतःला नक्की काय हवे हे सर्वात आधी स्वतःशी, नंतर घरच्यांशी आणि त्यानंतर बाहेरच्यांशी पण बोलले पाहिजे, तरच कांदेपोह्यांच्या कार्यक्रमांना वेगळे वळण देता येईल. ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमांतर्गत परिचयोत्तर विवाहाला प्राधान्य द्यावे असे सुचवले जाते. तशा विवाहात फसवणूक कमी असते व विचारांना अनुरूप जोडीदार मिळण्याची शक्यता जास्त असते. त्या प्रक्रियेमध्ये सहभागी झालेल्या मुलांच्या लक्षात येते, की मुलामुलीचे बोलणे समाधानी सहजीवनासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या मुद्यांवर आधीच होणे गरजेचे आहे. लग्न त्या सर्व प्रक्रियेला किमान सहा महिन्यांचा वेळ दिल्यानंतर ठरले गेले पाहिजे. त्यामुळे ज्यांना या रस्त्याने जायचे आहे, त्यांनी या प्रक्रियेकडे प्रशिक्षण म्हणून पाहवे. गटाचे मुख्य उद्दिष्ट हे स्वतःचे विचार स्वतःला स्पष्ट होणे हे आहे व त्यातून काही जणांचे परिचयोत्तर विवाह घडू शकतील असा विचार त्या मागे होता. तसे ते घडलेही. त्या उपक्रमाच्या माध्यमातून आजवर सहा जोड्या जमल्या. त्यातील सर्वांत महत्त्वाची अट अशी असते, की येथे कोणीही एकमेकाला जात किंवा धर्म विचारणार नाही! व्यक्ती आणि तिचे विचार हे महत्त्वाचे आहेत. गटामध्ये ‘जात-धर्मविरहित जोडीदाराची निवड’ असा शब्द वापरला जातो, कारण जात-धर्मविरहित जोडीदाराची निवड म्हटले, की जात-धर्म हा मुद्दाच नगण्य होऊन जातो.

_JodidarNivditil_VivekiVichar_1_0.jpg‘जोविनि’ उपक्रमातील पहिली ‘संवादशाळा’ पनवेलमध्ये घेण्यात आली. मानसोपचारतज्ज्ञ डॉक्टर प्रदीप पाटकर तरुणांशी संवाद साधण्यासाठी आले होते, तो अनुभव भन्नाट होता! ‘संवादशाळे’त मुलांबरोबर पालकदेखील सहभागी होऊ लागले. संवादशाळा घेण्याच्या निमित्ताने ज्या-ज्या गावात जाणे होई तेथे whatsapp गटातील आठ-दहा मुले असायचीच, मग त्यांची भेट घेण्यासाठी कोपराभेटी सुरू केल्या. महेंद्र नाईकने सांगितले, की ‘जोविनि’च्या या पुढील टप्प्यावर मुले आणि पालक यांच्याशी चर्चा अधिक तपशिलात केली जाते. लग्नाचा विचार करताना काय महत्त्वाचे आहे याचे मुद्दे त्यांना पुरवल्यानंतर ते उभयता वेगळा विचार करू शकतात.

बहुतांश मुलींना कांदेपोहे प्रकाराला तोंड द्यायचे नसते. त्यांना त्यामुळे बाहुली बनवून शोकेसमध्ये ठेवल्यासारखे वाटते. मुलींना स्वतः स्वतःचे लग्न ठरवण्यास मुलांच्या इतका पुढाकार घेणे, त्यासाठी पालकांशी बोलणे-फोन करणे हे सहज जमत नाही, त्यांना हे माध्यम देखील सुरक्षित वाटत नाही, तरीही ज्या मुली येतात त्या विचारांनी ठाम असतात. मुली मुद्दे खूप गांभीर्याने मांडतात, त्यामुळे संपूर्ण गट गांभीर्याने चर्चेमध्ये सहभागी होतो. मुलींच्या अपेक्षा आणि त्यांच्या घरच्यांच्या अपेक्षा यांच्यात तफावत दिसून येते. घरच्यांच्या अपेक्षा भौतिक बाबींबाबत आहेत; घरदार, नोकरी, पगार अशा; आणि मुलींना त्यांच्या विचारांना समजून घेणारा, त्यांना वाव देणारा मुलगा हवा आहे!

‘जोविनि’ गटावर शेकड्यांच्या हिशेबाने मुली येऊन गेल्या, त्यांतील मुलींच्या अपेक्षा साध्या आहेत; पण त्या समाजाच्या दृष्टीने भयंकर आहेत. त्यामुळे ‘मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात’ असे वातावरण निर्माण केले जात असावे. आर्थिक अपेक्षा आहेत; पण अवास्तव म्हणता येतील अशा नाहीत! सासू-सासरे नकोच असे म्हणणारी एकही मुलगी त्यात आढळली नाही. मुलींच्या बाबतीत नोंदवलेले आणखी एक निरीक्षण म्हणजे महाराष्ट्रातील मुली असे म्हणताहेत, की आम्ही जे कमावतोय त्यावर आमच्या पालकांचासुद्धा हक्क आहे. त्यामुळे त्यावर बंधने लग्नानंतर असता कामा नयेत. मुलगा जे आई-वडिलांसाठी करतो त्याला त्याची कर्तव्यबुद्धी म्हणायची आणि मुलगी स्वतःच्या आई-वडिलांसाठी जे करते ते काय? बऱ्याच मुला-मुलींना एक मूल दत्तक घ्यायचे आहे आणि त्यांना त्यासाठी तयार असणारा जोडीदार हवा आहे. जे जात व धर्म यांच्या पलीकडे जाऊन, विचार करून लग्न करू इच्छिताहेत त्यांची, पळून जाऊन लग्न करण्याची इच्छा दिसत नाही.

सहभागींना नरेंद्र दाभोळकर यांची जोडीदाराच्या विवेकी निवडीच्या पाच सूत्रांची ध्वनिफीत whatsapp गट किंवा ‘संवाद शाळा’ यांच्या सुरुवातीला, ऐकवली जाते. ते पाच मुद्दे असे- प्रत्येक लग्नेच्छू तरुण-तरुणीने जोडीदाराची निवड करताना व्यसनाला शंभर टक्के नकार द्यायला हवा, कुंडलीला शंभर टक्के विरोध करायला हवा, रंग-रूप-उंची यांपेक्षा भावनिक-बौद्धिक आणि मूल्यात्मक अनुरूपता तपासायला हवी, प्रेम व आकर्षण यांतील फरक समजून घ्यायला हवा आणि लग्न साध्या पद्धतीने- किमान कर्ज न काढता करायला हवे.

‘जोविनि’ या उपक्रमात हे स्पष्ट आहे, की जोडीदार जात तोडण्यास निघालो म्हणून निवडायचा नाही, तर जोडीदाराची निवड दोघांचे आयुष्य आणखी छान व्हावे यासाठी करायची आहे. त्यामुळे एखादा विवाह आंतरजातीय असूनसुद्धा ती निवड अविवेकी असू शकते आणि एखादा जात्यंतर्गत विवाह ही विवेकी निवड असू शकते. जोडीदार जातीतीलच पाहिजे किंवा तो आंतरजातीयच पाहिजे ही दोन्ही टोके अविवेकी आहेत. सामाजिक चळवळीत कार्यरत असणारे कार्यकर्ते अनेकदा असे म्हणतात, की मुलगी कोठल्याही विचारांची असली तरी चालेल ते तिला बदलवतील; दुसरा असा गट आहे, की त्यांना विधवा, घटस्फोटित, अनाथ, अपंग अशाच मुलीशी लग्न करण्याचे आहे. ‘जोविनि’ उपक्रमात त्यांना असे सांगितले जाते, की लग्नाचा निकष निव्वळ मदत किंवा उपकार हा असू शकत नाही, जोडीदार उपकाराच्या भावनेतून, कोणाचे कल्याण करण्यासाठी नाही निवडत!

पहिल्याच whatsapp गटात सहभागी झालेल्या विजयला स्वतःच्या विचारांना अनुरूप अशी मुलगी जोडीदार म्हणून निवडण्याची होती. त्याच्या आई-वडिलांच्या हेच लक्षात येत नव्हते, की विजयसाठी चांगल्या घरातील मुलगी शोधण्यास ते समर्थ असताना त्याला स्वतःच्या मनाने स्वतःची बायको निवडण्याची गरज काय होती? माधव बावगेसरांनी विजयच्या आई-वडिलांशी संवाद साधला आणि त्यांचे लग्न लागले; पण त्या निमित्ताने पालकांशी संवाद साधण्याचे महत्त्व लक्षात आले. मग मुले-मुली आणि पालक यांच्या एकत्रित ‘संवादशाळां’ना सुरुवात झाली. ‘अंनिस’च्या वेगवेगळ्या शाखा त्यांच्या गावात ‘संवादशाळां’चे आयोजन करतात. दिवसभराच्या कार्यशाळेसाठी शंभर ते दीडशे जण हजर राहतात. चोवीस संवादशाळा चौदा जिल्ह्यांत मिळून झाल्या आहेत.

आरती, महेंद्र, सचिन, निशा, दीक्षा असे पाचजण सध्या whatsapp गट व संवादशाळा या कामात सक्रिय आहेत. ‘अंनिस’च्या प्रशिक्षण विभागाने, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या विषयाचे संवादक बनू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी 26, 27 मे रोजी पिंपरी-चिंचवड येथे प्रशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळादेखील आयोजित केली होती.

संपर्क – सचिन थिटे – 8424041159, आरती नाईक – 8652223803

– मुक्ता दाभोळकर

muktadabholkar@gmail.com

(अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र, जून 2018 वरून उद्धृत, संपादित)

2 COMMENTS

Comments are closed.