जयश्री काळे – जया अंगी मोठेपण!

0
14
carasole

छान बंगला, आर्थिक सुबत्ता, सुदृढ वातावरण असे घर पुण्यात असताना, घरातून उठून झोपडपट्टीत कोण हो जाईल? कोण तेथील लोकांना सुधारणा सुचवण्याचा ध्यास घेईल? त्यांना त्यांच्या पाठी लागून आरोग्याचे महत्त्व पटवून देईल? पण जीवनात असे अवघड वळण स्वीकारलेले सुडौल, प्रसन्न असे एक व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे नाव आहे जयश्री विश्वास काळे.

त्या गणित घेऊन एम.ए. झाल्या. त्यांना मुंबई विद्यापीठाकडून सुवर्णपदक मिळाले. त्यांचे वडील विंदा करंदीकर. त्यांच्या आई, सुमा करंदीकर अंधशाळेत सेवाभावाने शिकवत, दोन बस बदलून रोज शाळेत जात!

जया स्वत: त्यांच्या घरच्या मोलकरणीच्या मुलीला शिकवत. तो प्रसंग त्या समर्पक वर्णन करतात. “मी माझ्या दहावीतील मुलीला अवघड वाटणारी गणिते समजावून सांगत होते. तेवढ्यात माझी कामवाली तिच्या तेरा-चौदा वर्षांच्या चुणचुणीत मुलीला घेऊन आली आणि म्हणाली, “हिला दोन घरची कामं बघा, सातवीला नापास झालीय. आता बास झाली शाळा. पुढील वर्षी लग्नाचं बघाया घेणार.” मला वाईट वाटले. मी तिची फी, पुस्तके, अभ्यास अशी सगळी जबाबदारी उचलते असे सांगून बाईला मनवले. तो प्रयोग यशस्वी झाला. मुलगी चांगल्या मार्कांनी S.S.C. झाली. तेव्हा हुरूप आला आणि वाटले, “वस्तीत अशा अनेक मुली असतील. त्यांच्यापर्यंत आपण का पोचू नये?”

त्यांना त्यांच्यासारखा विचार करणाऱ्या दोन-तीन मैत्रिणींनी – अलका साठे, मंगला पाटील, रेखा बिडकर, शीला कर्णिक – साथ दिली. त्याही जया यांच्याबरोबर हिरिरीने काम करू लागल्या.

जया सांगत होत्या : “प्रथम प्रथम त्या मुलींच्या आयांना आमच्याबद्दल विश्वास वाटायचा नाही. त्या त्यांच्या मुलींना आमच्याकडे शिकायला पाठवायच्याच नाहीत. मोठ्या मुश्किलीने त्या मुली यायच्या. जसजशा त्या त्यांच्या परीक्षांत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण होऊ लागल्या तसतसा त्यांच्या आयांचा आमच्यावर विश्वास बसू लागला. मग मात्र मुली आपण होऊन आमच्याकडे येऊ लागल्या. आता तर, मुलगेपण येतात व आमच्या वर्गाचा फायदा घेतात.’’

पुण्यामध्ये पांडवनगर, रामोशीवाडी, वडारवाडी, वैदुवस्ती या झोपडपट्ट्यांतील विद्यार्थी दहावी-बारावीमध्ये गणित व इंग्रजी या विषयांत हमखास अनुत्तीर्ण होत. त्यांना शिकवता शिकवता जया व त्यांच्या मैत्रिणी यांना झोपडवस्तीतील लोकांना आरोग्य, स्वच्छता, रोगनिवारण या गोष्टींचेही शिक्षण द्यायला पाहिजे याची जाणीव झाली. बालशिक्षण हा त्यातील महत्त्वाचा मुद्दा. अनुभवी, बालशिक्षणाची मनापासून तळमळ असणाऱ्या शामा आंबेडकर आणि प्रीता पाठक या शिक्षिका मुलांना आनंददायी वैविध्यपूर्ण शिक्षण मिळावे म्हणून झटत असतात. बालवाडीपासून ते बारावीपर्यंत दरवर्षी पाचशेच्यावर मुले वर्गातून असतात. मुलांना शिकवणे, घर व बँकेतील नोकरी या तिपेडी व्यापामध्ये जया यांची धावपळ होई. त्यामुळे जया यांनी त्यांच्या बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी पूर्ण वेळ या गरीब वस्तीत सामाजिक कामासाठी देण्याचे ठरवले. त्यांनी ‘जागृती सेवा संस्था, जनवाडी’ ही संस्था झोपडवस्तीत उभी केली. ते साल होते १९९६. जया त्या संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी आहेत.

जया यांच्याबरोबर त्यांच्यासारखे समाजसेवेच्या विचाराने भारावलेले निरनिराळ्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, डॉक्टर, वकील, शिक्षक, विचारवंत असे लोक सामील झाले. संस्था लोकांसाठी संस्कारवर्ग चालवते, आरोग्यशिक्षण देते. कौटुंबिक-कायदेशीर सल्ले देते. एड्सपासून त्यांचा बचाव कसा करायचा ते शिकवते, कुटुंबनियोजनाचे शिक्षण देते; त्या मंडळींनी त्यांच्या पायांवर उभे राहवे, त्यांनी त्यांच्या गरजेचा पैसा मिळवावा व त्यायोगे त्यांना नव्या युगाला नव्या समाजाला, नवीन सामाजिक परिस्थितीला सामोरे जाण्यास शिकावे यासाठी ‘जागृती सेवा संस्थे’तर्फे अभ्यासवर्ग घेतले जातात. शिवणकला, ब्यूटी पार्लर, नर्सिंग, संगणकशास्त्र यांचेसुद्धा अभ्यासवर्ग चालवले जातात. व्यवसाय शिक्षण घेऊन लहानमोठ्या नोकऱ्या आणि स्वत:चे छोटे छोटे उद्योग करणाऱ्या अनेकांना आर्थिक दृष्ट्या साक्षर करून स्वयंपूर्ण करण्यासाठी ‘भगिनी निवेदिता सहकारी बँके’चे सहकार्य असते. ‘इंडसर्च’सारखी ख्यातनाम मॅनेजमेंट संस्था जागृतीतील महिलांनादेखील व्यवस्थापन शास्त्रातील मूलभूत संकल्पना शिकवण्यासाठी पुढाकार घेत आहे हे विशेष! महिलांच्या व्यवसायाच्या आणि वैयक्तिक तातडीच्या गरजा भागवण्यासाठी त्यांना सावकारांच्या आहारी जायला लागू नये म्हणून सुरू केलेल्या ‘हिरकणी’ योजनेला चांगला प्रतिसाद आहे.

‘जागृती सेवा संस्थे’चा स्वतःचा जनवाडीमध्ये दवाखाना आहे. तेथे सर्वांवर मोफत औषधोपचार केले जातात. आरोग्याचे, शिक्षणाचे अनेक प्रश्न शेवटी वाढत्या लोकसंख्येशी येऊन ठेपतात हे लक्षात घेऊन, संस्थेने कुटुंबनियोजनाचेही काम हाती घेतले. वेगवेगळ्या जातिधर्मांच्या लोकांकडून वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रत्यवाय व्हायचे. महत्प्रयासाने मुस्लिम महिलांना ‘दवाई लेने आ रही है’ असे घरी सांगून, जागृतीच्या दवाखान्यात आणावे लागायचे आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजना कराव्या लागायच्या. हळू हळू ‘जागृती’च्या भरवशावर त्या महिला घरी फारसे कळू न देता ऑपरेशन करून घेण्यास तयार होऊ लागल्या. परिस्थिती अशी आहे, की घरातील पुरुष माणसे त्यांना ‘जागृती’त घेऊन येतात आणि त्यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्येही जातात. दहा-बारा वर्षांपूर्वी कृश, निस्तेज, दिवस भरलेली गर्भारशी बाई, तिचे बोट धरून चालणारे तीन-चार वर्षांचे मूल, तिच्या कडेवर सात-आठ महिन्यांचे बाळ आणि घरात एक-दोन मोठी मुले हे चित्र सर्रास दिसायचे. परंतु ते चित्र पालटले आहे. सहसा दोन मुलांवरच थांबले जाते. नवरेसुद्धा नसबंदीची शस्त्रक्रिया कधी कधी करून घेतात. त्याच इमारतीत निरनिराळी प्रदर्शने, प्रवचने, व्याख्याने आयोजित केली जातात. शिक्षणवर्ग घेतले जातात. संस्थेने तिची कार्यकक्षा बिबवेवाडी, इंदिरानगर, हांडेवाडी; इतकेच काय कामशेतपर्यंत रूंदावली आहे.

जया यांच्याबरोबर वस्तीमधील दोन सहकारी आहेत – राजश्री आणि सुजाता. त्यापैकी एक वकील होत आहे. दुसरी इंजिनीयर होऊन नोकरी करत आहे. दोघींच्या घरांमध्ये अभ्यासाला पोषक वातावरण नव्हते. जया यांनी त्यांच्या बंगल्याच्या आऊटहाऊसमध्ये काही तरुणींच्या राहण्याची सोय केली आहे. दोघींनी त्यांच्या वस्तीतील आयाबायांना गोरगरिबांना, मुलामुलींना साक्षर, निरोगी, सुजाण नागरिक करण्याचा चंग बांधला आहे. त्या पण मुलांना शिकवण्याच्या कामात मदत करतात.

संस्थेशी अनेक वर्षें जोडल्या गेलेल्या, वस्तीपातळीवरील कामाचा मोठा अनुभव असलेल्या मंगला पाटील या आरोग्यशिक्षिका वस्तीतूनच तयार झाल्या. त्यांच्यामार्फत व्यसनाधीनता, कुटुंबनियोजन, कौटुंबिक अत्याचार यांबाबत समुपदेशन आणि सहाय्य करत असतात. केव्हाही, कसलीही अडचण आली तर त्या धावून येतील असा वस्तीतील लोकांचा विश्वास आहे. त्यांच्या शब्दाला मान आहे. त्यांना राष्ट्रीय स्तरावरील सन्मान प्राप्त झाले आहेत आणि आंतरराष्ट्रीय परिषदांतून बोलावले जाते.

कमिन्स फाऊंडेशन, इंदिराबाई बेहेरे ट्रस्ट जया यांच्या कार्याच्या मदतीसाठी पुढे आल्या. फ्रेंडस ऑफ जर्मन असोसिएशन यांनी आणि नीला व अशोक रानडे या सामाजिक जाणीव असणाऱ्या, अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी त्यांना आर्थिक सहकार्य केले आहे. ‘सिप्ला कंपनी’ औषधांसाठी मदत देते.

जनवाडीतील वसतिगृह मोठे करताना, त्याचा विस्तार करताना त्यामध्ये ‘शॉर्ट स्टे होम’ सुरू करण्याचा जया यांचा विचार आहे. घरातून असहायतेने बाहेर पडलेल्या किंवा हाकलून दिल्या गेलेल्या स्त्रिया ज्या आत्महत्या करण्यास निघालेल्या असतात, त्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी ‘शॉर्ट स्टे होम’मध्ये प्रयत्न होतील.

संस्थेचे वस्तीपातळीवर चाळीस गरीब होतकरु मुलींसाठी चालवले जाणारे वसतिगृह आहे. शैक्षणिक, व्यवसाय प्रशिक्षण व आरोग्यासाठी असलेले उपक्रम संस्थेच्या स्वत:च्या मालकीच्या तीन मजली वास्तूत – जनवाडी, पुणे ४११०१६ – चालतात. तसेच संस्थेतर्फे मुलांसाठी छोटे वसतिगृह व समुपदेशन केंद्र जवळच संस्थेच्या मालकीच्या छोट्या जागेत आहे. वेगवेगळ्या गरीब वस्त्यांतून आणि जवळपासच्या ग्रामीण भागांतून, वस्तीच्या गरजेनुसार, संस्थेचे उपक्रम, पुणे महानगरपालिकेने संस्थेस कायमस्वरुपी भाडेतत्वावर दिलेल्या समाजमंदिरातून चालवले जातात.

संस्थेच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांनी पुढीलप्रमाणे लाभ घेतला ( २०१५-१६). अ. शैक्षणिक उपक्रम ३४४, आ. व्यवसाय प्रशिक्षण ६५७, इ. आरोग्यविषयक उपक्रम २३,४००

त्याखेरीज सस्ता सेल, वृद्धसभा, समुपदेशन, व्याख्याने व चर्चासत्रे यांमध्ये दरवर्षी साधारण वस्तीपातळीवरील हजारभर लोक सहभागी होतात. संस्थेची वार्षिक उलाढाल साठ लाखांच्या आसपास होते.

संस्थेच्या विविध उपक्रमातून शिकून पुढे गेलेली मुले-मुली त्यांच्या नोकरीव्यवसायात स्थिरावत असताना त्यांची वस्तीच्या प्रती असलेली नागरिकत्वाची जबाबदारी ती जाणतात. ती संस्थेतील कामाच्या जबाबदार्या  समर्थपणे उचलत आहेत. तेथील युवा पिढी कार्यात उत्साहाने सामील होत आहे. संस्थेच्या कार्यकारी मंडळातही त्यांतील तरुणवर्ग आहे. जाणीवजागृतीचे काम पुढे उत्तम रीत्या चालू राहील असा विश्वास जयश्री काळे यांनी व्यक्त केला.

सिद्धहस्त लेखक श्री.वा. काळे हे जया यांचे सासरे. सासुबाई, समजूतदार पती नि मुले यांचे त्यांना पाठबळ लाभले. जया यांना ऑक्टोबर २००३ मध्ये आदिशक्ती पुरस्काराने सन्मानित कले गेले. भगिनी निवेदिता बँकेने त्यांची संचालक पदावर नेमणूक केली आहे.

जया स्वत:ही काव्यलेखन करतात. तो छंद जोपासून साहित्यक्षेत्रातील त्यांच्या मैत्रिणींना ‘बांधवी’ या सुंदर नावाखाली महिन्यातून एकदा त्यांच्या घरी जमवतात. ‘मी माझ्या साहित्यिक घराण्यांचा वारसा जपण्याचा प्रयत्न करते.’ असे त्यांनी सांगितले. जयश्री यांचे पती विश्वास श्रीपाद काळे हे उद्योजक असून पारखे पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांची जयश्री यांच्या जाणीवजागृतीच्या कामात सक्रिय मदत असते. सासरे श्री.वा. काळे हे लेखक व अर्थतज्ज्ञ होते. त्यांनी कौटुंबिक स्वास्थ्यावरची वीस पुस्तके लिहिली. तसेच, त्यांचे वडील व जयश्री यांचे आजेसासरे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ प्रा वा गो काळे. त्यांनी सुरू केलेले ‘अर्थ’ हे नियतकालिक त्यांनी अनेक वर्षे चालवले. त्यांच्या सासुबाई प्रभावती काळे यांनाही सामाजिक कार्यात रस होता, त्या टेनिस क्रीडापटू होत्या. जयश्री यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून त्यांचाही ‘जागृती’च्या कार्यासाठी हातभार असतो.

जयश्री काळे
(०२०) २५६५५३०२, vishwask@vsnl.com

– उमा जोशी

Previous articleअसेल माझा हरी!
Next articleसंजीव वेलणकर – पंच्याण्णव व्हॉटस् अॅप ग्रुपचे अॅडमिन
उमा जोशी या पुणे येथे राहतात. त्‍यांना लेखनाची आणि प्रवासाची अावड आहे. त्‍यांच्‍या लिहिलेल्‍या श्रृतीका आकाशवाणीच्‍या पुणे केंद्रावरून 'गृहिणी' या कार्यक्रमात प्रसारित झाल्‍या आहेत. टी.व्‍ही.वरून प्रसारित होणा-या 'टोकन नंबर वन' या मालिकेत त्‍यांनी लिहिलेला एक एपिसोड प्रसारित करण्‍यात आला होता. जोशी यांनी सहकारी बँकेमध्‍ये पंचवीस वर्षे नोकरी केली आहे. त्‍यांनी लिहिलेल्‍या कथा आ‍णि घेतलेल्‍या मुलाखती 'स्‍त्री', 'किर्लोस्‍कर', 'मानिनी', 'प्रपंच', 'माहेर', 'ललना', 'हंस', इत्‍यादी मासिकांमधून प्रसिद्ध झाल्‍या आहेत. लेखकाचा दूरध्वनी 022 25468213