जयंत खेर – वृद्धत्वी आनंद (Jayant Kher – Economist turned Painter)

13
23

 

ग्रंथाली‘मधून निर्माण झालेल्या आमच्या विशाल स्नेही मंडळात जयंत खेर हा वेगळा होता. तो स्टेट बँकेत उच्चाधिकारी होता. ती नोकरी सोडून तो खाजगी कंपनीत गेला. त्याचे वागणे-बोलणे शिस्तशीर, नेमस्त, तरी आग्रही असे. तो बैठकांमध्येदेखील मुद्द्याला धरून बोले. आमच्या वर्तुळात अर्थविषय तज्ज्ञतेने जाणणारे काही लोक होते, पण जयंत खेरने आम्हाला व्यावहारिक दृष्टी दिली. त्याचा आग्रह प्रत्येक ‘अॅक्टिव्हिटी’ ही ‘प्रॉफिट सेंटर’ असली पाहिजे असा असे. आम्हाला तो पटे पण अंमलात आणता कधीच आणता आला नाही. जयंत खेरने ‘ग्रंथाली‘चा व्यवस्थापन शास्त्रदृष्ट्या यशापयशाचा अहवाल तयार करून घेतला. गंमत म्हणजे आम्ही सगळे बेहिशोबी असूनदेखील त्या कसोटीत उतरलो! त्याचवेळी एक लक्षात आले होते, की त्याच्या व्यवहार चातुर्यात त्याची रसिक वृत्ती छकून जाते की काय!  

          जयंतने त्याची पत्नी संजीवनी हिच्या मदतीने ऑडिओ कॅसेट, व्हिडिओ फिल्म असे प्रयोग करून पाहिले, ते त्याने ‘प्रॉफिट सेंटर’ म्हणून केले की नाही ते मात्र मी कधी विचारले नाही. मला जयंतची तरुणपणी सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे त्याने कर्जतला घेतलेले फार्म हाउस. तो बऱ्याच वेळा शनिवार-रविवार मित्रमंडळींना घेऊन तिकडे जाई. ते नुसते ‘फार्म हाउस’ नव्हते तर तेथे त्याने सहा एकरांत नियोजनबध्द जंगल विकसित केले होते. तेथे फिरताना मोठी मौज येई. पुढे, वये वाढू लागली तेव्हा त्या ‘जंगला’चे काय करायचे अशी चर्चा सुरू झाली. मी त्याला सुचवले, की तेथे पर्यावरण शाळा सुरू करूया. मला जगातील सगळ्या गोष्टी म्हणजे सार्वजनिक क्षेत्र वाटते (सरकारी नव्हे). माझ्या डोक्यात ‘प्रायव्हेट प्रॉपर्टीचा कन्सेप्ट’ कधी शिरला नाही. तेवढीच गोष्ट मजजवळ वडिलोपार्जित आहे. तरीही जयंत व त्याच्यासारखे अर्थविषयातले काही जाणकार माझे जवळचे मित्र राहिले आहेत. तर पर्यावरण शाळेचा मुद्दा तसाच राहून गेला. बघता बघता, आम्ही वृद्ध झालो आणि जयंत खेरला पार्किन्सनने पकडले. त्याची जाणीव त्याला ड्रायव्हिंग करताना झाली. त्याचे वेगवेगळ्या अवयवांतील स्नायू काम नीट करत नाहीत हे ध्यानी आले. त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला त्यातच त्याला हृदयविकाराची बाधा झाली व स्टेन्ट टाकावा लागला. डॉक्टरांनी त्याला अशा दुर्बलता संभाळत यापुढे जगावे लागेल असे सांगितले. त्याचे हात हलू लागले, चाल मंदावली. तो बोलायचा आधीपासूनच मृदू, आता उच्चारण अस्फुट होऊ लागले. पण त्याची बुद्धी आणि त्याची शिस्त मात्र कायम राहिली. बराच काळ त्याने सांस्कृतिक कार्यक्रमांना-बैठकांना येणे चालू ठेवले. पण तेही हळुहळू कमी झाले -समारंभही आटले. तो हिंदू कॉलनीत राहायचा -तेथून मदतनीसाच्या अथवा पत्नीच्या सहाय्याने आंबेडकर रोडवर फिरायला यायचा. तेथे कधी भेट व्हायची. त्याचे बोलणे खूपच कमी झाले होते, त्यामुळे संभाषण वाढत नसे. 

          मी जरी ही वाक्ये सखेद लिहित असलो तरी जयंतला त्या कोणत्याच उणिवेची बाधा वाटत नसावी असे त्याचे जीवन विधायक रीतीने व कार्यमग्न चालले होते. कारण त्याने त्या काळात जॉन मार्शलचे चरित्र लिहिले व ते प्रसिद्धही झाले. त्याचा अर्थशास्त्राचा अभ्यास चालू होताच. तो तत्संबंधी वर्तमानपत्रांमध्ये लिहित असे. त्याखेरीज मेकॉले हा त्याच्या विशेष चिंतनाचा विषय होता. त्यानी मेकॉले चरित्राची चार प्रकरणे लिहिलीदेखील आहेत.
जयंत खेर पेंटिंग्ज करताना

त्याने मास्टर स्ट्रोक मारला, तो म्हणजे त्याची त्या काळातील चित्रकला. त्याला चित्रकलेची आवड पूर्वापार होती. पण जयंतने हाताला कंप असलेल्या अवस्थेत चार-पाच वर्षांत साठ कॅनव्हास चितारले. सर्व चित्रे वेगवेगळ्या आकारांत, वेगवेगळ्या रंगांत आणि अमूर्ताकार! म्हणजे अॅब्सट्रॅक्ट! परंतु विलक्षण अर्थपूर्ण -प्रेक्षकांशी सरळ संवाद साधणारी चित्रे! मी त्याच्या घरी जाऊन चित्रे पाहिली तेव्हा मला अचंबाच वाटला —पार्किन्सननेअधू अवस्थेत वृद्धावस्था व्यतीत करणाऱ्या आमच्या मित्राला कसलीच बाधा नव्हती, अडचण नव्हती. खरे तर, मला संजीवनीकडून जयंतच्या अडचणी, त्याला होणाऱ्या दुःख-वेदना कळत होत्या, पण त्याच्या बोलण्या-वागण्यात आलेले कमालीचे मंदत्व सोडले तर आजाराची वा वृद्धत्वाची कोणतीही खूण नसे. जयंत जीवन रसिकतेने जगत आला आहे. त्याने संगीत-नाटक-चित्रपट-चित्रकला आणि त्या संबंधीच्या गप्पा यांवर भरपूर प्रेम केले. त्याने जीवनोपभोग उत्तम घेतला. तो व संजीवनी, दोघे खूप भटकली. संजीवनीलाही अनेक विषय-व्यक्ती-स्थळे जाणण्याची, त्याबाबत लिहिण्याची खूप हौस आहे. तिचा हात लिहिता आहे. तिने डॉक्युमेंटरीदेखील केल्या.

          मला गंमत जयंतची वाटते, की त्याचे पंच्याऐंशी वर्षांचे आयुष्य असे विविध छंदांत व व्यवसायात गेल्यावर त्याने वृद्धपणी पेंटिंग्ज चितारण्याचा वेगळाच ध्यास घेतला आणि तो पूर्ततेस नेला. त्याला कॅनव्हास उचलून स्टँडवर ठेवताना होणारा शारीरिक अपंगत्वाचा त्रास मी पाहिला आहे. त्याने आलेल्या त्या अपूर्णत्वावर मात करून पूर्णत्वाची कांक्षा धरली. त्यातून ती चित्रनिर्मिती झाली. जयंतला वृद्धत्वी लाभलेल्या या आनंदाची थोरवी प्रत्येक साठीपार माणसाने जाणून घेतली पाहिजे. तेव्हा नवे आनंदी आयुष्य सुरु होऊ शकते हे जयंतने दाखवून दिले आहे.
 संजीवनी खेर 9821411472 sanjeevanikher@gmail.com
दिनकर गांगल 9867118517 dinkargangal39@gmail.com
(दिनकर गांगल हे थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत.)

———————————————————————————————————–

Previous articleसाथ आणि संसर्ग (Mosquito, Corona And infection)
Next articleप्रश्न जीवन मरणाचा की भांडण्याचा? (Domestic Violence)
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

13 COMMENTS

  1. प्रत्येक 'अॅक्टिव्हिटी' ही 'प्रॉफिट सेंटर' असली पाहिजेहे एक वाक्य आज उचलतो इथून !

  2. खरोखरच अनुकरणीय आहे.वृद्धत्व त्या अनुषंगाने येणारे आजार यावर मात करून सकारत्मा कशी जपावी याचे आदर्श उदाहरण! सलाम !अनुराधा म्हात्रे

  3. प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचा परिचय झाला. जयंतजींना सलाम…!👍👍👍

  4. वा फारच छान! अनुकरणीय असे व्यंगत्वाला मात देवुन चित्रकारी।ग़ज़ब! माझे नमन खेर यांच्या वृत्तीला।- अरुण डिके, सोलापूर

  5. धन्यवाद हा शब्द खूप अपुरा आहे. आपण सर्वांनी आपुलकीने लिहिले याचे महत्व आम्हा दोघांना आहे. जयंत यांना अशा प्र शं सेने बळ मिळाले आहे.धन्यवादसंजीवनी खेर

  6. जयंतराव खरोखरच ग्रेट आहेत. आणि संजीवनीही. जिथे असतात तिथे आनंद भरलेला असतो. -प्रकाश कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here