चौलची खाडीसफर आणि नौकांची शर्यत (‘Creek Jaunt’ at Chaul and Korlai)

कोर्लई, रेवदंडा, चौल आणि आग्राव या, रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या चार गावांतील कोळीबांधव गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नौकानयन स्पर्धा योजतात. त्यात परंपरा आहे आणि मौजमस्तीही आहे. आम्ही आमच्या मित्रमंडळींसाठी खाडी सफर ‘Creek Jaunt’ दर वर्षी हाय प्लेसेसच्या माध्यमातून आयोजित करतो. त्या सफरीच्या आयोजनात स्थानिक दीपक मुंबईकर यांचा वाटा सिंहाचा असतो. एका वर्षी सुनील आणि अपर्णा बर्वे, सुहिता थत्ते आणि तिच्या दोन मैत्रिणी स्मिता सरवदे व रोहिणी हट्टंगडी, श्रीराम व शुभदा दांडेकर, डॉ. दीपक रानडे आणि मेधा खाजगीवाले असे पाहुणे आले होते. त्याशिवाय प्रफुल तालेरा यांचा दहाजणांचा वाडिया कॉलेजमधील ग्रूप होता. मृणाल, प्रेम आणि नमा, संजय रिसबूड, बाबा देसवंडीकर आणि त्याचे मित्र असे माझ्या टीममधील नेहमीचे सदस्य सोबत होतेच. आम्ही सारे पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी (7 एप्रिल 2010च्या रविवारी )11 वाजता गोफण येथील जेटीवर भेटलो.

 

कुंडलिका नदीगरुडमाचीजवळच्या दरीत उगम पावते. तीन दिशांनी येणारे स्रोत एकत्र येऊन उत्तरेच्या दिशेने निघतात. त्या ठिकाणी एकाखाली एक अशी तीन कुंडे तयार झाली आहेत. जलप्रवाह एका कुंडातून दुसऱ्या कुंडात अशा उड्या घेत नदी उगम पावते आणि म्हणून कदाचित तिलाकुंडलिकाम्हणत असावेत ! कुंडलिका तिचा पश्चिमेकडील प्रवास एक भलेथोरले वळण घेऊन सुरू करते. त्याच नदीत टाटाच्या भिरा येथील विद्युत केंद्रातून घाटावरून येणारे मुळशी धरणाचे पाणी सोडले आहे. तो विद्युत प्रकल्प म्हणजे टाटांच्या दूरदृष्टीचे द्योतक असे गेल्या शतकातील इंजिनीयरिंग आश्चर्य आहे ! ती नदी समुद्राच्या दिशने पश्चिमेकडील प्रवासात मुंबई-गोवा महामार्ग कोलाड येथे पार करून रोह्याकडे जाते. तिचे रूपांतर खाडीत, रोह्याच्या खाली सात-आठ किलोमीटरनंतर होऊ लागते. ती खाडी तेथून पुढे सुमारे अठरा किलोमीटर अंतर पार करून रेवदंडा येथे अरबी समुद्रास मिळते. आम्ही खाडीसफरीत ते अठरा किलोमीटर अंतर पार करणार होतो.

संबंधित लेख –  चौल, शूर्पारक आणि ‘मडफ्लॅट्स’

खाडीच्या तोंडाशी दक्षिणेस कोर्लईकिल्ला तर उत्तरेस रेवदंड्याचा किल्ला आहे. चौल गाव रेवदंड्याच्या थोड्या आतील बाजूस आहे. चौल म्हणजेच चंपावती हे अतिप्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेले बंदर, पण आज त्या गावाला समुद्राचा स्पर्शही होत नाही ! रेवदंडा आणि चौल या दरम्यानची खाडी गाळामुळे काही शतकांपूर्वी भरून गेली. चौल हे बंदर भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील रेवदंडा बेटाच्या आडोशाला असलेले फार पूर्वी अतिप्रसिद्ध होते आणि त्याचे तसे ऐतिहासिक संदर्भ विविध ठिकाणी आढळतात.

 

प्रफुल्ल तलेरा यांचा एक ग्रूप आणि आमचा दुसरा ग्रूप अशा दोन बोटी होत्या. वेळ भरतीची असल्याकारणाने बोटीवर चढणे सोपे गेले. आम्ही एकमेकांना हात देत आपापल्या बोटींत स्थानापन्न झालो. सर्वच बायकांचा आणि त्यातही विशेष म्हणजे रोहिणी हट्टंगडी यांचा उत्साह कौतुकास्पद होता. आमचा प्रवास खाडीच्या संथ पाण्यावर, बोटीची मंद घरघर ऐकत सुरू झाला. खाडीवरून येणाऱ्या वाऱ्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. प्रवास दोन्ही काठांवरील जमिनीपेक्षा जेमतेम सातआठ फूट खाली असलेल्या पाण्यावरून जात सुरू होता. काठावरील दुतर्फा असलेले खारफुटीचे गर्दहिरवे जंगल आणि अधूनमधून डोके वर काढणारी नारळ व ताडामाडाची झाडे लक्ष वेधून घेत होती. वेगवेगळे पांढरेशुभ्र बगळे आणि मधेच चित्कारणारे सिगल्स यांनी लाटांच्या लपलपाटासोबत एक मस्त लय पकडली होती. शहरी जीवनातील रस्त्यावरील बकालपणा अदृश्य झाला होता. थंडगार बियर, कोकम सरबत यांसोबत मस्त तळलेली सुरमई आणि कोथिंबिरीच्या वड्या अशी दीपक मुंबईकर यांच्या आदरातिथ्याची लयलूट होती. हसणे, खिदळणे आणि सेल्फीयांना ऊत आला होता.

 

पाऊण तासाच्या संथ सफरीनंतर, अचानक धूसर करड्या मृगजळाप्रमाणे भासणाऱ्या पश्चिम क्षितिजावर एक छोटुसे पांढरे शिड दिसू लागले. पाठोपाठ आणखी चार शिडे दृष्टिपथात आली आणि त्यासोबत भळाळणाऱ्या वाऱ्यावर तरंगत ढोलताश्यांचे पुसट स्वर ऐकू येऊ लागले. जादूची कांडी फिरावी त्याप्रमाणे आमच्या भोवतालचा आसमंत पुढील वीस मिनिटांतच पार बदलून गेला! शर्यत खेळणाऱ्या शिडाच्या नौका आणि त्यांच्या भोवती इंजिनच्या थरथराटासह बँजो संगीतावर थिरकणारी पावले घेऊन, अंदाजे बारा हजार कोळीबांधव सुमारे दोनशे बोटींवर स्वार होऊन शर्यतीला प्रोत्साहन देत होते. खास कोळी वेशातील काही बाप्ये, रंगीबेरंगी साड्या, भक्कम सोन्याचे भरघोस दागिने आणि माळलेले गजरे यांसह बेभानपणे नाचणाऱ्या बायका. साऱ्या आसमंतात धुंद करणारे जादुई चैतन्य होते ! बोटीला बोटी अलगद भिडत होत्या. इकडची माणसे तिकडच्या बोटीवर जाऊन बिनधास्त नाचत होती. तुमचं आमचंकधीच विरघळून गेलं होतं. एका अफाट मस्तीत, मौजमजा करत पुढील दीड-दोन तास कसे निघून गेले ते कोणालाच कळले नाही!

 

शंभर वर्षांपूर्वी कोर्लई, रेवदंडा, चौल आणि आग्राव या गावांतील एकवीरा देवीची पालखी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी घाटावरील कार्ला येथील एकवीरेला भेटण्यासाठी, पायी यात्रा करत घेऊन जात असत. गावकरी पायी यात्रेकरूंना मदत म्हणून त्यांना शिडाच्या नौकेने, रोह्याजवळच्या झोळांबे गावी नेऊन सोडत असत. मुंबई-गोवा हायवे तेव्हा नव्हताच! त्या शिडाच्या नौका गंमत म्हणून परतीच्या वाटेवर असताना आपसात शर्यत लावू लागल्या. रस्ते झाले, पायी यात्रा हळुहळू नाहीशी झाली, पण शिडाच्या नौकांची शर्यत मात्र टिकून आहे ! पाडव्याच्या आधी दोन आठवड्यांपासून त्या चारही गावांतील आठ नौका दुरुस्त करून, त्यांना तेलपाणी देऊन सजवल्या जातात. प्रत्येक गावातून दोन बोटी – एक सिनियर आणि एक ज्युनियर अशा स्पर्धेत उतरतात. शर्यत आग्राव ते झोळांबे आणि मग परत येऊन साळावच्या पुलाला वळसा घालून, पुन्हा आग्राव जेटी अशी असते. शंभर वर्षांहूनही अधिक जुनी अशी ती परंपरा आणि त्यासोबत चालणारा उत्सव हे स्थानिक कोळी बांधवांच्या जिवाभावाचे आहे.

 

समुद्रावरील मच्छिमारी, त्यातील धोके आणि अनिश्चितता हे तर कोळी बांधवांच्या पाचवीलाच पुजलेले. आला दिवस आपलाहा स्थायिभाव. म्हणूनच राहणी साधी. आलेली समृद्धी भरपूर सोन्याच्या रूपात बायकांच्या अंगावर. स्वभाव दिलखुलास आणि अगत्यशील. दीपकच्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी आदल्या दिवशीच्या हळदीला गेलो होतो. त्यांना लग्नापेक्षा हळदीसमारंभ महत्त्वाचा! वीस-पंचवीस घरांचा गाव, पण त्या रात्री पाहुणे पाच हजारांच्या वर! सहा-सात घरांत स्वयंपाक झालेला. आठशे ते हजार किलो मटण, त्याच्या दुप्पट मासळी, कापलेल्या कांद्याचा डोंगर आकडेच झीट आणतात ! त्यासोबत मद्य पाण्यासारखे वाहत होते आणि मुंबईकर कुटुंबीयांचा जीवघेणा आग्रह… रात्री खालील मांडवात संगीत दणदणत होते. आमच्या सोबतच्या बायकांना, मृणाल आणि शमा यांना नाचण्याचा आग्रह झाला, पण त्यांच्याकडे पाहून दीपकची आई म्हणाली, ‘कशा गं तुम्ही लंकेच्या पार्वती! ए बायांनो, जरा यांना दागिने द्या गं!शेजारच्या कोळीणींनी क्षणाचाही विचार न करता त्यांच्या गळ्यातील माळा काढून त्या दोघींच्या गळ्यांत घातल्या. प्रत्येकीच्या गळ्यात पाउण किलो तरी सोनं होतं! हे असं निरपेक्ष, बिनहिशेबी प्रेम कळायलाच अवघड, पण ते त्यांच्या रक्तातच असतं !

संबंधित लेख – बेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा

    वसंतची गरुड भरारी

वसंत वसंत लिमये98221 90644 vasantlimaye@gmail.com

वसंत वसंत लिमये हे आऊटडोअर मॅनेजमेंटचे प्रशिक्षण देणाऱ्या हाय प्लेसेसनावाच्या कंपनीचे अध्यक्ष आहेत. ती कंपनी त्यांनी तीस वर्षांपूर्वी स्थापन केली. सध्या त्यांनी लेखनाचा ध्यास घेतला आहे. त्यांची लॉक ग्रिफिन, विश्वस्त, कॅम्प फायर आणि साद हिमालयाची ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांच्या परिवारात पत्नी मृणाल आणि मुलगी रेवती आहेत.

————————————————————————————————————————————————————-