‘चालना’कार अरविंद राऊत यांचे साहित्य

0
22
carasole

अरविंद राऊत यांनी त्यांचा शिक्षकाचा पेशा सांभाळून ‘सुविचारधारक मंडळ’ (१९७५), ‘बुद्धिप्रामाण्यवादी प्रतिष्ठान’ (१९७८), ‘धर्मनिर्णय मंडळ’ अशा काही संस्थांशी संबंधित कार्य केले. ते करत असताना त्यांना त्या काळातील जो बदलता समाज दिसला त्या विषयीच्या प्रतिक्रिया त्यांच्या लेखनातून व्यक्त झाल्या आहेत. म्हणून त्या काळातील समाजजीवनाच्या काही अंगांबरोबर समाज, सामाजिक सुधारणा इत्यादी विषयींचा अरविंद राऊत यांचा दृष्टिकोन त्या लेखनातून व्यक्त होतो व त्यामधून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचेही दर्शन घडते.

‘जीवनगुंजी’ हे एकशेचार पृष्ठांचे छोटेखानी पुस्तक म्हणजे विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात पालघर जिल्ह्यातील वरोर या खेड्यात माणसे कसे जगत होती त्याचे वर्णन आहे. जीवन हे अरविंद राऊत यांचे आजोबा (आईचे वडील) तर गुंजी ही आजी. त्या आजी-आजोबांचे जगणे. त्याचे वर्णन या पुस्तकात आले आहे (लेखन काळ १९६६-१९६९). ‘उत्तर कोकणच्या सागरी विभागाची सामाजिक परिस्थिती मराठी वाङ्मयात उपेक्षित आहे.’ ते लक्षात घेता मराठी साहित्यातील ते पुस्तक वैशिष्ट्यपूर्ण ठरते. अनंत काणेकर, सरोजिनी बाबर, वि.ना. गाडगीळ यांनी या पुस्तकाला पुरस्कार लिहिताना त्या वैशिष्ट्याचा उल्लेख आवर्जून केला आहे. तर, य.न. केळकर यांनी ‘ही कादंबरी नसता व शुद्ध सामाजिक इतिहासासारखे वास्तविक असता हे लेखन कादंबरीसारखेच वठले आहे!’ अशा शब्दांत पुस्तकाचा गौरव केला आहे. तो यथार्थही आहे. पुस्तकात समाजजीवनाचे वर्णन असले तरी ते रुक्ष नाही. निवेदनाच्या ओघात काही प्रसंग, काही व्यक्तिचित्रे, काही काव्यमय वर्णने अशा कादंबरीत सामावणाऱ्या बाबींचा समावेश पुस्तकात झाला आहे. परिणामी, पुस्तकाच्या निवेदनशैलीत वाचकाच्या मनाला आल्हाद देणारे लालित्य सहजपणे आले आहे. त्या लालित्याचा प्रत्यय ‘जीवनगुंजी’ या शीर्षकापासूनच येतो.

मूळ लेखन ‘चालना’ या मासिकातून क्रमशः प्रसिद्ध होत गेले असल्यामुळे आटोपशीर झाले आहे. त्यामध्ये अभिनिवेश नाही, परंतु त्यामधून लहानपणी अनुभवलेले जगणे व जगण्यात झालेले बरेवाईट बदल यांविषयीच्या काही प्रतिक्रिया व्यक्त झाल्या आहेत. आधुनिकतेचा व विवेकनिष्ठ जीवनाचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तीला जाणवणारे जुन्या काळातील ते जगणे अनेक ठिकाणी वाचकाला विचार करण्याला प्रवृत्त करते.

जातीपाती, मानापमान, नाना प्रकारच्या रुढी आणि पराकोटीची उणीवग्रस्तता हे सर्व त्या जगण्यात आहे. आधुनिक दृष्टीने पाहता ते जीवन टाकाऊच म्हणावे! परंतु अरविंद राऊत यांचा दृष्टिकोन जुने ते सर्व टाकाऊ असा नाही. जीवन बदलत असते. नव्या-जुन्याचा संघर्ष चालू असतो. जुने ते सोने नसले तरी त्या संघर्षात कधी कधी जुन्यातील आवश्यक जीवनमूल्ये नष्ट होतात – ही अरविंद राऊत यांची भावना आहे. त्यांना ते जगणे ‘साधेभोळे, आगळेनिराळे ग्रामीण सामाजिक जीवन’ वाटते. अरविंद राऊत यांचा समाजाकडे व परंपरेकडे पाहण्याचा चिकित्सक असूनही सकारात्मक असा हा दृष्टिकोन महत्त्वाचा वाटतो. पुस्तकात परंपरेतील काही बाबींविषयी आस्था असली तरी परंपरेचे गौरवीकरण नाही. तसेच, पुनरुज्जीवनाचीही कल्पना नाही. गौरवीकरण आहे ते त्या जगण्यातून जाणवणाऱ्या काही मूल्यांचे. खंत आहे ती मूल्ये आधुनिकतेच्या रेट्यामुळे हरवली आहेत त्याची. उदाहरणार्थ, त्या पारंपरिक जगण्यात दुसऱ्याच्या मालकीची जपणूक सहजपणे होत असे. जमिनीच्या मालकीवर झाडाची मालकी अवलंबून नव्हती. जमीन कोणाचीही असो, झाड ज्याने लावले – वाढवले त्याचे. हे अतिशय सहजपणे होत असे. मुलांनी स्वतःची टोपली शेण गोळा करताना भरली आणि नंतर कोठे शेण दिसले तर मुले त्यामध्ये काठी रोवून ठेवत. काठी रोवलेल्या शेणाला दुसरे कोणी हात लावत नसे! जुन्या काळातील यासारख्या गोष्टी त्या काळातील समाजात असणारा आंतरिक प्रामाणिकपणा व्यक्त करतात. पु.ल. देशपांडे यांच्या ‘अपूर्वाई’मध्ये इंग्लंडमधील अशा प्रामाणिकपणाचे अनुभव वाचून वाचक त्याचे कौतुक करत. येथे भारतीय समाजातही तो कसा होता हे अरविंद राऊत व्यक्त करतात. नव्या-जुन्याच्या संघर्षात जुन्यातील वाईट गोष्टींबरोबर तो प्रामाणिकपणाही गेला! जुन्या जगण्यात स्वास्थ्य असल्यामुळे आतिथ्यशीलता होती. जातिभेद असला तरी घरी सर्वांना प्रेमाची वागणूक मिळत असे. नातेवाईकांचे स्वागत करण्याचा उत्साह होता. नव्या काळात ते सर्व कमी झाले. सध्या जीवनकलह इतका तीव्र झाला आहे, की नातेवाईकांचे सैन्य सांभाळणे अवघड झाले आहे. त्यात मनुष्य गावातील घराबाहेर राहू लागला आणि उद्योगधंदे, समाजकार्य इत्यादीमुळे त्याचा जनसंपर्क वाढला. नव्याने जोडलेल्या तशा मंडळींनाही नातेवाईकांप्रमाणे किंबहुना अधिकच आस्थेने पाळावे लागते. त्यामुळे स्वाभाविकच ‘‘जीवनगुंजी’ काळात जे नातेसंबंध सांभाळले जात तसे सांभाळणे कठीणच आहे.’ अशी चिकित्सक प्रतिक्रिया नोंदवायला अरविंद राऊत विसरत नाहीत.

‘जीवनगुंजी’च्या काळातील स्त्रियांना वेळ मोकळा नसे. घरकाम आवरल्यावर रिकाम्या वेळात त्यांना काथ्या गुंडीचा (नारळाच्या सोडणांपासून काथ्या करण्याचा) व उंडीचे तेल काढण्याचा अतिशय कष्टप्रद उद्योग करावा लागत असे. त्यातील कष्टांविषयी अरविंद राऊत यांनी सहानुभूतीने लिहिले आहे. स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण व्यवसाय म्हणून त्या धंद्याकडे लक्ष देऊन त्यामध्ये सुधराणा केली असती तर ते गावांच्या दृष्टीने बरे झाले असते हे अरविंद राऊत यांचे मत विचार करण्यासारखे आहे. जुन्या काळाविषयीच्या अरविंद राऊत यांच्या अशा प्रतिक्रिया हे ‘जीवनगुंजी’चे मोठेच वैशिष्ट्य आहे. जुन्या काळाकडे वा परंपरेकडे पाहण्याच्या या दृष्टिकोनाचे पु.ल. देशपांडे यांच्या दृष्टिकोनाशी साम्य आहे. किंबहुना तो दृष्टिकोन जुन्या पिढीतील उदारमतवादी विचारांशी बराचसा सुसंगत आहे.

‘ज्ञान’ या शब्दाला आधुनिक पूर्व काळात आजचा अर्थ नव्हता. वस्तुनिष्ठ ज्ञान या नावाची गोष्टच नव्हती. तशा काळात वावरणाऱ्या गावातील लोकांचे ग्रंथ, गुरू यांविषयीचे ते प्रेम म्हणजे त्यांची ज्ञानाविषयीची आस्थाच होती. त्याला त्या जगण्यात विधायक अर्थ होता हे अरविंद राऊत सांगतात, पण त्याचबरोबर ‘हल्ली ज्ञानाची कवाडे इतकी खुली झाली आहेत, की अशा गुरुपरंपरेची जरुरी उरलेली नाही’ असे स्पष्ट मतही राऊत नोंदवतात. ‘भूत, भगत, भुताळी’ या प्रकरणात भूत-भुताळी या कल्पनांना गावाच्या एकंदर जगण्यात कसे मोठे स्थान होते व त्यावर भगत हा एक उपाय असल्यामुळे साहजिकच, त्यांनाही त्या जगण्यात कसे महत्त्व होते याचे वर्णन अरविंद राऊत करतात, पण ते भगतांकडे केवळ तेवढ्या दृष्टीने पाहत नाहीत. रात्री-बेरात्री बोलावणे आले की भगत जात आणि त्याबद्दल फारसे काही न घेता ते त्यांचे उपचार करत, हे लक्षात घेऊन त्यांचे उपचार ‘चुकीचे असले तरी भगत लोकसेवा करत होते’ अशी सहानुभूतीपूर्वक प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली आहे.

समाज व भाषा या क्षेत्रातील संशोधकाना उपयुक्त अशा काही बाबी अरविंद राऊत यांनी नोंदवल्या आहेत. उदाहरणार्थ, ‘प्रत्येक जातीच्या स्त्रियांच्या लुगडे नेसण्याच्या पद्धतीत फरक असे.’ ‘आजोबांच्या उत्तर काळात काही तरुण केस वाढवू लागले.’ ती प्रथा खालच्या वर्गातून वरच्या वर्गात गेली. जुन्या व्यवस्थेतील इतर बलुती संपली होती. केवळ न्हावी आणि गुराखी यांची बलुती शिल्लक राहिली होती. न्हाव्याचे काम हसनकाका या मुसलमानाकडे होते. फार पूर्वी लग्न जुळवण्याचे काम गावातील भट किंवा न्हावी हे बलुतेदार करत. त्यांना विशेष प्रतिष्ठा नसे. लग्नाच्या संदर्भात मुलाकडून मुलीला मागणी घातली जाई. यांसारख्या नोंदी अरविंद राऊत यांची सूक्ष्म निरीक्षणशक्ती व्यक्त करतात.

लग्नाच्या संदर्भातील रीतिरिवाज, जुन्या काळातील लग्नपद्धत – तिचे सामाजिक स्वरूप यांविषयी पुस्तकात सहा प्रकरणे आहेत. त्यांमधून जुन्या काळातील बऱ्याच वाईट गोष्टींचे दर्शनही समाजाच्या अभ्यासाच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखे आहे.

मुंबई ते उंबरगावपर्यंतच्या किनारपट्टीच्या भागातील बहुजन समाजाची बोलीभाषा सामान्यपणे एक आहे, तरी पण त्या भाषेत प्रत्येक जातीच्या व प्रत्येक गावाच्या बोलण्यात थोडाफार फरक असतो. काही शब्द निराळे असतात. हेलही निराळा असतो. त्या भागात बायकांच्या नेसण्यावरून जशी जात समजते तशी ती त्यांच्या भाषेवरूनही समजते. ‘शिक्षणाचा प्रसार झाल्यामुळे सर्व जातींचे पोषाख व जाहीर बोलण्याची भाषा एकच झाली म्हणून जात ओळखणे जड जाते. ती भाषा हळुहळू नष्ट होऊ लागली आहे….’ शहरी लोकांचा संपर्क वाढेल त्याप्रमाणे ती भाषा अजिबात नष्ट होईल असे अरविंद राऊत यांचे मत आहे. हे त्यांच्या आधुनिक प्रगतिशील दृष्टिकोनाचे दर्शक आहे.

‘जीवनगुंजी’ हे आत्मकथन केवळ स्वतःच्या व्यक्तिगत आयुष्याची जडणघडण निवेदन करणारे नाही. ते एका गावाचा व पर्यायाने त्या भागातील समाजाच्या आधुनिकपूर्व काळापासून आधुनिक काळापर्यंतच्या गतिमान प्रवासाचे थोडक्यात निवेदन करणारे आत्मकथन आहे.

‘खजुरी’ (१९८७) हा कवितासंग्रह व ‘प्रबोधन आणि प्रहार’ हा वैचारिक लेखसंग्रह अशी दोन पुस्तके अरविंद राऊत यांच्या नावावर आहेत. १९३३ ते १९८७ या चौपन्न वर्षांच्या काळात केलेल्या निवडक साठ रचना ‘खजुरी’ या संग्रहात आहेत. त्या रचनांची सुरुवात मराठीत नवकाव्य प्रस्थापित होण्यापूर्वी झाली व पुढील काळात, तेच संस्कार घेऊन रचना होत राहिल्या. अरविंद राऊत यांनी त्यांच्या रचनांवर गोविंदाग्रजांचा प्रभाव आहे असे म्हटले आहे. परंतु एकंदर रचना पाहताना गोविंदाग्रजांबरोबरच ‘रविकिरण मंडळा’च्या कवितेपासून बा.भ. बोरकरांपर्यंतच्या कविता अरविंद राऊत यांच्या वाचनात आली असावी असे वाटते. आजच्या अर्थाने, त्यांची कविता म्हणजे प्रसंगानुरूप पद्ये आहेत. दुष्काळ या विषयाच्या निमित्ताने त्यानी १९३३ मध्ये केलेली रचना संग्रहात आहे. पुढेही, दुष्काळ या विषयाबरोबरच ‘नागवेलीचे मनोगत’, ‘खजुरीची खळखळ’ असे विषय कवितांसाठी संग्रहात आले आहेत. १९८७ मध्ये लिहिलेल्या ‘हे मृत्यो…’ या कवितेत अरविंद राऊत म्हणतात,

मी देवभक्त कधीच नव्हतो
पण परंपरेने देव मानला जाई.
आता खूप विचार करून
बुद्धिप्रामाण्यवादाचा वसा घेतला
बुद्धिवादीही उतारवयात देव देव करतात
मी उतारवयातही घेतला वसा सोडणार नाही.
देव देव करीत मरण्यापेक्षा
दुसऱ्याला देत देत करीत
मरण्यात महानता आहे.
हे मृत्यो, तू कसाहि ये
मी तुझे स्वागत करतो
जीवन सुयोग्य जगल्याचे
मला समाधान आहे.

येथे आयुष्याकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन व्यक्त होतो तो कोणीही लक्षात घ्यावा असा आहे.

त्यांनी ‘चालना’ मासिकात सातत्याने जे लेख लिहिले त्यामधील निवडक लेख ‘प्रबोधन आणि प्रहार’ या ग्रंथात संकलित करण्यात आले आहेत. (संकलित न केलेल्या सर्व लेखांची सूचीही संग्रहाला जोडलेली आहे.) लेखन १९५० ते १९९० या काळातील असल्यामुळे त्या काळातील समाजात कोणत्या हालचाली चालल्या होत्या ते समजून घेण्याच्या दृष्टीने लेखन उपयुक्त ठरू शकते.

‘प्रबोधन आणि प्रहार’ या संकलनात समाजातील अंधश्रद्धांविषयी काही लेख आहेत. त्यांतील काही अंधश्रद्धा आता अप्रस्तुत झाल्या असल्या तरी बुवाबाजी, मृत्यूनंतरचे विधी या काही आजही आहेतच. अशा अंधश्रद्धांविषयीची अरविंद राऊत यांची विवेकनिष्ठ भूमिका पाहण्यासारखी आहे. त्यांचे हे लेखन अलिकडच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीच्या कितीतरी आधी झालेले आहे. गोवध बंदीच्या निमित्ताने १९७६ मध्ये भारतात आंदोलन झाले होते. त्याविषयी लिहिताना ‘तो प्रश्न धार्मिक भावनेने न सोडवता समाजहिताच्या दृष्टीने सोडवला जावा असे त्यांचे स्पष्ट मत आहे’ असे ‘चालना’कारांनी नोदवले आहे.

अरविंद राऊत विचाराने जातीविरोधी होते. साहजिकच, त्या प्रश्नाच्या अनुषंगाने १९५६ पासून त्यांनी अनेकदा लिहिले आहे. ते लेखन त्या प्रश्नाचे राजकीय दृष्टीने विचार न करता व्यापकपणे व गंभीरपणे विचार करताना कोणत्या बाबी लक्षात घेतल्या पाहिजेत हे सुचवणारे आहे. नाहीतरी समाजसुधारणेच्या कामात राजकारणी व्यक्तींना स्थान देऊ नये, कारण मग ते राजकारणी स्वकीय असोत की परकीय असोत. कधी कधी राजकारणातील क्षुद्र साध्यासाठी पोटजातीतील जातीयता जागृत करण्यापर्यंत पाळी जाते असे मत १९५६ मध्ये ‘चालना’कारांनी नोदवले होते. ते म्हणतात, ‘जातीयतेचे विषारी फळ जरी जातिभेदाच्या वृक्षाला येत असले तरी त्या वृक्षाची पाळेमुळे एवढी खोल गेलेली आहेत की, तो उपटून टाकणे कठीण आहे, म्हणून ही विषारी फळे तोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे. सर्पाचे दात पाडले की तो जसा निरुपद्रवी होतो तसे या जातीयतेचे केले तर कालांतराने जातिभेद नष्ट होण्याचा संभव आहे.’ ‘चालना’कारांचे हे मत म्हणजे समाजसुधारणा संथ गतीनेच होत असते हे भान ठेवणाऱ्या दूरदर्शी विचाराचेच दर्शक आहे.

राखीव जागांच्या संदर्भात ‘नीचपणा बरवे देवा’ (१९६७), ‘पुढारलेल्या गरिबांना मागासलेले बनण्याचा मार्ग’ (१९६७), ‘आर्थिक मागासलेल्या जाती माना’ (१९६७) आणि ‘राखीव जागा – विचारवंतांपुढील यक्षप्रश्न व आव्हान’ (१९८१) असे काही लेख या संकलनात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने एकशेअठ्ठ्याहत्तर जातींचा समावेश इतर मागासलेल्या जातींत १९६७ मध्ये केला. त्यानिमित्ताने ऑक्टोबर १९६७ व डिसेंबर १९६७ मध्ये ‘चालना’कारांनी लिहिले आहे, त्या लेखात ‘एक काळ असा होता की आपल्या जातीला मागासलेले म्हटलेले कोणाला आवडत नसे. आता काळ बदलला आहे. पुढारलेल्या जातीचे नाव सांगून रास्त हक्कांनासुद्धा मुकण्यापेक्षा नको ते नाव असे वाटते’ ही वस्तुस्थिती अरविंद राऊत यांनी काहीशा उपरोधिक सुरात नोंदवली आहे. परंतु तेवढ्यावर न थांबता पुढारलेल्या व मागासलेल्या जाती ठरवण्याचा निकष काय व या वीस वर्षांतील आमच्या अनेक शैक्षणिक सुधारणांमुळे कोणत्या जाती मागासलेल्या व पुढारलेल्या झाल्या हे सरकारने जाहीर करावे अशी मागणी ‘चालना’कारांनी केली आहे. ‘नाहीतर एकीकडे, जातिभेद नष्ट व्हावेत, नवसमाज निर्मिती व्हावी असे स्वप्न पाहायचे व दुसरीकडे, शतकानुशतके त्या जातींना कवटाळत बसायचे असे विचित्र चित्र दिसायचे’ असे भविष्यही त्यांनी वर्तवले आहे. ते किती खरे ठरले याचा अनुभव येण्यासारखा आहे.

– आशुतोष गोडबोले