चंदेरी दुनियेतला आश्वासक प्रवास… अभिनय देव

0
14
carasole1

भारतात चित्रपट क्षेत्रामधील कामगिरी बॉलिवूडच्या तराजूवर तोलली जाते, पण चित्रपट हे ‘कथाकथनाचे माध्यम’ म्हणून परिणामकारक ठरू शकते हे अभिनय देव व त्यांच्यासारख्या मोजक्या दिग्दर्शकांनी दाखवून दिले आहे. त्यांना ‘देल्ही बेल्ली’ चित्रपटासाठी ‘पदार्पणातील सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा फिल्मफेअर पुरस्कार 2013 साली मिळाला. ‘कलर्स’वरील ‘24’ ही मालिकादेखील त्याच्या कारकिर्दीमधील मैलाचा दगड ठरली आहे. त्याची स्वत:ची ओळख इंडस्ट्रीमध्ये ‘अॅड मॅन’ अशी आहे. काही सेकंदांसाठी पडद्यावर झळकून जाणारी जाहिरात बनवणे ही प्रक्रिया सृजनशीलतेला कस लावणारी असते, त्यामुळे निर्माता-दिग्दर्शक म्हणून अभिनयचा जाहिरात विश्वामध्ये दबदबा आहे. त्याने जवळजवळ चौदा वर्षे जाहिराती बनवल्या.

अभिनय म्हणाला, ‘माझे शिक्षण आणि माझा व्यवसाय परस्पर भिन्न! सृजनशीलता ही माझ्या रक्तात आहे. मला कलाक्षेत्राची आवड आहे. मी ‘आर्किटेक्चर’मधील पदवी मिळवल्यावर काही महिने ‘इक्बाल चैनी’मध्ये नोकरी केली. तेथे काम ‘क्रिएटिव्ह’ होते, तरी मला ‘स्टोरी टेलिंग’ म्हणजे गोष्ट खुलवून सांगणे या गोष्टीचे आकर्षण होते. मी आठवीत असताना नाटक लिहिले होते. त्या माझ्या पहिल्या-वहिल्या कलाकृतीचे कौतुकही झाले होते. त्यामुळे माझी ती आवड मनात खदखदत होती आणि शेवटी, मी माझ्या आवडीच्या क्षेत्रामध्येच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ते साल होते, 1993.’

अभिनय सांगत होता, “‘फिचर फिल्म’ ह्या माध्यमाचे मला जास्त आकर्षण होते. पण नव्वदच्या दशकात भारतात बनत असलेल्या ‘फिचर फिल्म्स’ प्रभावी आणि प्रगल्भ नसत. हिंदी सिनेमा त्यावेळी पाश्चिमात्य चित्रपटांचे अंधानुकरण करण्याच्या लाटेवर, ‘वाईट… आणि अति वाईट’ या दरम्यान भरकटत होता. ‘जाहिरात’ हे माध्यम त्यावेळी मला जास्त परिणामकारक वाटले आणि मी जाहिरातक्षेत्रामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला.’ जाहिरात क्षेत्रामधील माझा प्रवेश ‘ऑगीलिव्ह अँड मॅथर लिमिटेड’ या जाहिरात कंपनीमधील नोकरीपासून झाला. मी तेथे जाहिरात क्षेत्रातील श्रीगणेशा गिरवला. मी ‘फिल्म एक्झिक्युटिव्ह’ ते ‘क्रिएटिव्ह डायरेक्टर’ म्हणून काम करण्याचा अनुभव 1993 ते 1997 या चार वर्षांच्या काळात घेतला. माझ्यासाठी तो फार महत्‍त्‍वाचा होता. कारण, ‘ओ अँड एम’च्या ‘क्रिएटिव्ह टीम’चा सभासद म्हणून नव्या कल्पना अंमलात आणण्यापासून ते एखादा ‘ब्रँड’ प्रस्थापित करण्यापर्यंतचा अनुभव मला मिळाला. मी जवळजवळ तीस जाहिरातींवर काम केले. त्यानंतर पुढील तीन वर्षे, मी ‘हायलाईट्स फिल्मस् प्रा. लि.’ या देशातील नावाजलेल्या जाहिरात कंपनीबरोबर ‘फिल्म डायरेक्टर’ म्हणून काम केले. मी 2000 साली ‘रमेश देव प्रॉडक्शन प्रा. लि.’मधील जाहिरात विभागामधून स्वतंत्रपणे काम सुरू केले.”

अभिनयची जाहिरातक्षेत्रामधील कामगिरी लक्षणीय ठरली आहे. अभिनयने कॅडबरी, हिंदुस्थान लिव्हर, कोका कोला, स्मिथ क्लाईन, पेप्सी, पार्ले, तोशिबा टीव्ही, टाटा मोटर्स, प्लॅटिनम ज्वेलरी, टाइम्स ऑफ इंडिया, टाटा डोकोमो अशा नामवंत ‘ब्रँड्स’च्या जवळजवळ साडेचारशे ‘टीव्ही कमर्शियल्स’ बनवल्या आहेत. अभिनयने आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार मिळवून जाहिरातक्षेत्रातील भारत देशाचे अस्तित्व खणखणीतपणे सिद्ध केले आहे. ‘मुंबई मिरर’साठी बनवलेल्या ‘आय अॅम मुंबई’ या जाहिरातीसाठी ‘कान्स गोल्ड लायन फॉर बेस्ट डायरेक्शन’ हा पुरस्कार मिळवणारा, अभिनय देव हा पहिला भारतीय दिग्दर्शक ठरला! जाहिरातक्षेत्रामधील सर्वात मोठा असलेला तो पुरस्कार ‘ऑस्कर्स’च्या बरोबरीचा समजला जातो. अभिनयच्या ‘नायके पॅरेलेल जर्निज’ या जाहिरातीने ‘डायरेक्शन, एडिटिंग, साऊंड डिझाइन, बेस्ट युज ऑफ म्युझिक, सिनेममॅटोग्राफी व आर्ट डायरेक्शन’ या सर्व विभागांसाठी एका सुवर्ण, चार रजत आणि एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. एखादे उत्पादन काही क्षणांसाठी का होईना, प्रेक्षकाला भुरळ घालते आणि वारंवार बघितल्यावर त्याला नकळत स्वत:च्या खिशाचा अंदाज घेत, किंवा न घेताही… ती वस्तू त्यांच्याजवळ असायलाच हवी, अशी तीव्र जाणीव होऊ लागते. ही प्रक्रिया घडवण्यामागे किमया असते ती जाहिरात कंपनीची…  म्हणजे त्या जाहिरातीमागील संपूर्ण टीमची! कलाकारांकडून, विशेषत: लहान मुलांकडून जाहिरातीमधील आशय व्यक्त करण्यासाठी आवश्यक तो ‘भाव’ काढून घेणे हे दिग्दर्शकाचे कौशल्य असते. अभिनयने बनवलेल्या ‘सर्फ’ आणि ‘इंडियन एअरलाइन्स’ या जाहिरातीतील ‘मूक’ अभिनय करणारी लहान मुलगी हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. कॅडबरीच्या जाहिरातीतील तरुणी क्रिकेट स्टेडियमवर तिचा जल्लोष वेगळ्याच ढंगात साजरा करते, ती आठवते? प्रेक्षकालाही उगीचच हलकेफुलके… व टवटवीत वाटण्यास लावणारी ही ती जाहिरात! ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या जाहिरातीतील, मिरजकर आजोबा मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श करतात… ‘मुंबई स्पिक्स एव्हरी मॉर्निंग, आर यू लिसनिंग…?’ पाहिल्यावर, ‘आय अॅम मुंबई’ असे प्रेक्षकांपैकी प्रत्येकाला वाटू लागते. ‘दाग अच्छे है…’ ‘सर्फ’ है ना?… अशी एकेक कल्पना त्याच्या मनात जागा करून जाते… ‘नायके’च्या जाहिरातीमधील गाड्यांच्या टपांवर क्रिकेट खेळण्याची भन्नाट कल्पना कशी सुचू शकते आणि त्याही पुढे जाऊन, ‘ह्या जाहिरातीचे चित्रिकरण’ हा केवढा मोठा खटाटोप असू शकतो! त्या कल्पनेनेच प्रेक्षक चक्रावून जातो! अशा जगावेगळ्या कल्पना हाच तर जाहिरातींचा प्राण असतो आणि ती कल्पना तितक्याच कलात्मक पद्धतीने चित्रित करून, आवश्यक तितकेच शब्द, संगीत आणि संवाद वापरून हवा तो परिणाम साधणे… काही सेकंदांचा तो खेळ, तरी परिणामकारकता संपूर्ण लांबीच्या चित्रपटाएवढीच! ‘अभिनय देव’ हे मराठमोळे नाव जाहिरातीच्या नभांगणातील नजरेत भरणारा, स्वयंप्रकाशित तारा ठरला आहे. त्याच्या त्या यशामागे अथक परिश्रम, सातत्य आणि सर्वोत्तमतेचा ध्यास आहे.

मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्ण काळामध्ये लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेले रमेश देव आणि सीमा हे आईवडील व मोठा भाऊ अजिंक्य असा अभिनयाचा वारसा असणाऱ्या घरातील अभिनयने वेगळ्याच क्षेत्रात जिद्दीने पाऊल टाकले आणि कष्टाने स्वतंत्र ओळख मिळवली.

अभिनय म्हणतो, “ मी माझ्या आईवडिलांच्या किंवा भावाच्या नावाचा कधी वापर केला नाही.” त्याने ‘कान्स इंटरनॅशनल अॅडव्हर्टायझिंग फेस्टिव्हल’मध्ये सलग दोन वर्षे पुरस्कार पटकावला व नंतरच्या वर्षी, अभिनयचा समावेश त्या सोहळ्यात ‘ज्युरी मेंबर’ म्हणून होता!

अभिनयचे खरे कौतुक झाले, ते ‘देल्ही बेल्ली’मुळे! आर. बाल्की, जॉन मॅथ्यु बाल्कन, दिबाकर बॅनर्जी, प्रदीप सरकार ह्या काही नावाजलेल्या अॅड फिल्म मेकर्सप्रमाणे अभिनयनेसुद्धा फीचर फिल्म बनवण्याचा प्रयत्न केला. त्याने दिग्दर्शित केलेल्या ‘गेम’ची नोंद फारशी घेतली गेली नाही, पण ‘आमिर खान प्रॉडक्शन’च्या ‘देल्ही बेल्ली’चे दिग्दर्शन करून अभिनयने बॉलिवूडला दिग्दर्शक म्हणून त्याची दखल घ्यायला लावली. “आमिर खानने, जाहिरातविश्वातील माझे काम पाहून, ‘देल्ही बेल्ली’साठी माझा विचार केला.” ‘देल्ही बेल्ली’ तीस कोटींचा व्यवसाय करणाराही ठरला!

“बॉलिवूडमध्ये काम करताना मला जाहिरात विश्वातील ‘डिटेलिंग’, ‘व्हिज्युअल सेन्स’ आणि ‘डिसिप्लिन’ ह्या गोष्टींचा फायदा झाला.” असे अभिनय सांगतो. “चित्रपट असो की जाहिरात, ‘स्क्रिप्ट’ हेच सर्वात महत्त्वाचे असते. ते जर चांगले नसेल, तर ‘अॅक्शन’, व्हिज्युअल इफेक्ट, म्युझिक… अशा कितीही करामती करा, निर्मात्याचा आशय प्रेक्षकांपर्यंत पोचवण्यात दिग्दर्शक अयशस्वी ठरतो. तरी आज चित्रपट माध्यमामध्ये पुष्कळ बदल होत आहेत. मुख्य म्हणजे निरनिराळ्या प्रयोगांचे प्रेक्षक स्वागत करत आहेत; आणि चित्रपटांचा दर्जाही तुलनेने सुधारत आहे.” असे तो सांगतो.

छोट्या पडद्यापासून सुरू झालेला अभिनयचा प्रवास आज ‘कलर्स’वर ‘24’मधून पुन्हा नव्या वेगळ्या पद्धतीने ‘कथा कथनाचा’ आपला उद्देश सफल करू पाहतो. तरी पण केवळ दहा सेकंदांमध्ये ‘गोष्ट’ सांगण्यातच खरी कला असल्याचे अभिनय म्हणतो.
– राजश्री आगाशे

(मूळ लेख ‘आम्ही पार्लेकर’, वार्षिक विशेषांक 2013 )