गेल ऑम्वेट – सहावार साडी, सँडो ब्लाऊझ ! (Gail Omvedt – An American activist in saree

         गेल ऑम्वेट यांच्या निधनाची बातमी (25 जून 2021) आम्हाला वर्तमानपत्र वाचून समजली. लगेच मला आमच्या गावाची आठवण झाली. आमचे गाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील बोरी अरब. गोष्ट 1975-1976 ची. मी सातव्या वर्गात शिक्षण घेत होते. दुर्गादेवीचे नऊ दिवस असतात. त्या नऊ दिवसांत भरगच्च कार्यक्रम असतो. त्यात एक दिवस यवतमाळला गेल ऑम्वेटचे व्याख्यान ठेवण्यात आले होते. लाल निशाण पक्षाचे प्रकाश रावले यांनी त्यांना यवतमाळला आणले होते. तो कार्यक्रम झाल्यानंतर भीमराव बनसोड हे त्यांना बोरीला आमच्या घरी घेऊन आले. भीमरावांच्या शेजारी घरडे गुरूजी राहत होते. ते बेसिक शाळेत शिक्षक होते. ते म्हणालेआपल्या शाळेत त्यांचा एक कार्यक्रम ठेवू. तुम्ही त्यांना घेऊन या.

          ऑम्वेट आमच्या बेसिक शाळा, जिल्हा परिषद येथे विद्यार्थ्यांशी हितगूज करण्यासाठी आल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व उंचपुऱ्या, गोरापान देह, धष्टपुष्ट शरीर, घारे डोळे आणि तपकिरी रंगाचे केस असे होते. त्या आमच्या शाळेत सहावारी साडी आणि सँडो ब्लाऊज अशा पेहेरावात आल्या. अमेरिकेची बाई आणि सहावारी साडीत म्हणजे आश्चर्यच वाटले. आम्ही सर्व विद्यार्थिनी तर क्षणभर त्यांच्याकडे पाहतच राहिलो !

          अमेरिकेतून आलेली बाई इंग्रजीमधून काही तरी बोलेल आणि ते काही आम्हाला समजणार नाही असे आम्हाला वाटले. पण छे ! आमचा समज चुकीचा होता. त्या चक्क मराठीतून बोलू लागल्या. बोलण्याची ढब मात्र इंग्रजी होती. आम्ही जोरदार टाळ्या वाजवल्या. त्यांनी आम्हाला प्रश्न विचारले होते – शाळेत दररोज येता का? शाळेची वेळ किती ते किती? शाळेत कोणकोणते विषय शिकवले जातात? वगैरे वगैरे. आम्ही त्या सर्व प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित दिली.

          त्यांनी भीमराव बनसोड यांच्या घरी शेतमजूर, कष्टकरी, सर्व स्त्रियांना बोलावून घेतले. तोपर्यंत सर्व स्त्रिया कामावरून घरी आल्या होत्या. त्यात मी आणि माझी आई, आम्ही दोघी व आजुबाजूच्या भरपूर स्त्रिया होतो. त्या बाजेवर बसल्या. आम्ही सर्व त्यांच्या आजूबाजूला गोळा झालो. त्या त्यांच्यासोबत आधुनिक साहित्य घेऊन आल्या होत्या- छोटा टेप रेकॉर्डर आणि कॅमेरा. त्या सर्व स्त्रियांना प्रश्न विचारत होत्या; ते असेः- तुम्ही दररोज शेतात जाता का? शेतात कोणकोणती कामे करता? कामाचे तास किती? मजुरी किती मिळते? जेवण्याची सुट्टी होते की नाहीसुट्टी किती तासांची असते? शेतात कोणकोणती कामे चालू आहेत? मुलेबाळे कितीतुम्ही शेतात गेल्यावर मुलाबाळांना कोण सांभाळते? घरातील सर्व काम कोण करतेसर्व स्त्रिया त्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी एकदम गोंगाट करत होत्या. एकाच वेळी, बऱ्याच स्त्रिया बोलण्याचा प्रयत्न करत होत्या. नंतर त्यांनी व्यवस्थित समजावून सांगितले. आधी नाव विचारले, नंतर प्रश्न विचारले आणि स्त्रियांनी सुद्धा व्यवस्थित उत्तरे दिली (तेही हसतच).

          त्यांनी आमचे फोटोसुद्धा काढले. जी प्रश्नोत्तरे झाली ती त्यांनी आम्हाला परत टेपरेकॉर्डरवर ऐकवली. ती गंमतच झाली ! सर्व स्त्रियांना अतिशय आनंद झाला. कारण त्यांचाच आवाज त्यांना परत ऐकण्यास मिळत होता. सर्व स्त्रिया एकदम खूष ! आपले बोललेले आपल्यालाच ऐकण्यास येते ! त्या वेळेस कोणी कधी टेपरेकॉर्डर बघितलाच नव्हता! त्यापुढील गंमत म्हणजे बोरीतील स्त्रियांशी झालेल्या प्रश्नोत्तरांची बातमी अमेरिकेतील आकाशवाणीवर आली. त्यात एक प्रश्न असा होता,

            गेल ऑम्वेटः तुमचा नवरा मेल्यानंतर तुम्ही दुसरे लग्न करता का?

          कामुनाबाईः बाप्पाsss दोन-दोन नवरे करतो का आम्ही (ही आमच्या विदर्भातील भाषा आहे) थोडक्यात सांगायचे, की तरुणपणी जर नवरा मेला तर आई-वडील मुलीचे दुसरे लग्न करून देतात.

अशा प्रकारे अमेरिकन आकाशवाणीवर आमच्या गावाचे नाव आले आणि त्यात कामुनाबार्इंचेही नाव आले. रविशकुमारने ती बातमी पुन्हा एनडीटीव्हीवर (27 ऑगस्ट 2021) दिली. गेल ऑम्वेट यांनी खेडेगावात जाऊन शेतमजूर स्त्रियांची मुलाखत घेतली होती. त्यात आमच्या गावच्या कामुनाबाईचे नाव घेतले होते. आमचे छोटेसे गाव बोरी अरबला गेल यांनी चक्क एनडीटीव्हीवर पोचवले होते ! बातमी ऐकून खूप बरे वाटले.

          पुढे, माझे व भीमराव बनसोड, आमचे लग्न झाले. आम्ही औरंगाबादला राहण्यास आलो. ऑम्वेट औरंगाबादला आमच्या घरीसुद्धा आल्या होत्या. त्या आल्याचा खूप आनंद झाला. गेल ऑम्वेट या महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीवर अभ्यास करण्यासाठी अमेरिकेहून भारतात आल्या. त्यांचा संबंध सर्वप्रथम लाल निशाण पक्षाच्या पुढाऱ्यांशी आला. त्यांचा वसाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड’ (नॉन ब्रॅह्मिन मूव्हमेंट इन वेस्टर्न इंडिया) हा प्रबंधही (इंग्रजी) लाल निशाण पक्षाच्या समाजवादीशिक्षण संस्था, मुंबई या ट्रस्टनेच प्रकाशित केला. गेल यांचा जन्म जरी अमेरिकेत झाला असला तरी त्यांची कर्मभूमी भारतदेश ही आहे. त्या बुद्ध, फुले, आंबेडकर, मार्क्स आणि दलित स्त्रिया यांचा अभ्यास करत होत्या. त्यांनी तुकारामांचे अभंग इंग्रजीत भाषांतरित केले. गेल या संशोधक होत्या. त्यांनी भरपूर पुस्तके लिहिली.

          दरम्यानच्या काळात, भारत पाटणकर व गेल ऑम्वेट यांचा विवाह झाला. त्या विवाहासाठी आप्पासाहेब भोसले व लीलाबाई भोसले यांनी पुढाकार घेतला. गेल यांना एक मुलगी आहे. ती अमेरिकेत स्थायिक असते. तिने तेथेच लग्न केले व तिलाही मुलगी आहे. गेल ऑम्वेट यांची मुलगी आईप्रमाणेच चळवळीचे काम करते. अमेरिकेत राहून आईचा वसा चालवते.

           एक अमेरिकन स्त्री तरुणपणी भारतात येते, एका भारतीयाशी लग्न करते, एका छोट्याशा घरात राहते आणि स्वतःला समाजकार्यात झोकून देते ! दलित, कष्टकरी स्त्रियांचे प्रश्न समजावून घेण्याचा प्रयत्न करते. फुले, शाहू, आंबेडकर यांना समजावून घेऊन त्यावर पुस्तके लिहिते, हे फार महत्त्वाचे आहे. त्यांच्या निधनाचे सर्व श्रमिक महिला, दलित कष्टकरी महिला व तमाम भगिनी यांना दु:ख झाले आहे. त्यांच्या निधनामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांना माझी ही भावनिक शब्दरूपी श्रद्धांजली अर्पण करते आणि अखेरचा लाल सलाम करते !

 रत्नकला बनसोड 9404000202 / 9503877175

रत्नकला भिमराव बनसोडे यांचा जन्म 1961 साली लोणी (तालुका दारव्हा, जिल्हा यवतमाळ) येथे झाला. त्यांनी डी एड आणि समाजशास्त्र विषयातील पदवी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी औरंगाबादच्या खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिक शाळेत सदतीस वर्षे नोकरी केली. त्या रमाई मासिकासाठी नियमित लेखन करतात. त्यांना वाचन, बागकाम आणि जुनी गाणी ऐकण्याचा छंद आहे.

——————————————————————————————–————————————————————–