गावगाथा स्पर्धेचा निकाल

_Gavgatha_1.jpg

महाराष्ट्रातील प्रत्येक गावाची माहिती ललित, परंतु वस्तुनिष्ठ स्वरूपात संकलित करावी या उद्देशाने ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने ‘गावगाथा’ स्पर्धा जाहीर केली होती. तिला वाचकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एकूण 119 (एकशेएकोणीस) वाचकांनी त्यांच्या गावांसंबंधी ठरवून दिलेल्या घटकांआधारे माहितीपर ललित लेखन पाठवले. त्यांचे परीक्षण रमेश पडवळ (पत्रकार, नाशिक), मनीष राजनकर (सामाजिक कार्यकर्ते, भंडारा) आणि नितेश शिंदे (‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ प्रतिनिधी) यांनी केले. त्यानुसार पुढील तीन स्पर्धक पहिला, दुसरा व तिसरा क्रमांकाने विजयी ठरले आहेत.

प्रथम पारितोषिक १. वैशाली तायडे – (जळगाव जिल्ह्यातील फैजपूर गाव) • तीन हजार रुपये •

द्वितीय पारितोषिक २. कमलाकर जाधव – (रत्नागिरी जिल्ह्यातील वेत्त्ये गाव) • दोन हजार रुपये •

तृतीय पारितोषिक ३. अभिजित पानसे – (वर्धा जिल्ह्यातील शहीद आष्टी गाव) • एक हजार रुपये •

पारितोषिक विजेत्यांचे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’कडून अभिनंदन! त्यांच्या पारितोषिक रकमेचे चेक त्यांना रवाना केले जात आहेत. त्यांचे लेख आठवडाभरात ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध होतील.

परीक्षकांनी समालोचनपर काही निरीक्षणे नोंदवली आहेत. तीही प्रसिद्ध करत आहोत. 

‘गावगाथा’ स्पर्धा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ने व्यापक उद्दिष्टाने घेतली होती. त्यामध्ये लेखनाची गुणवत्ता हा महत्त्वाचा भाग आहेच; परंतु राज्यातील सुमारे पंचेचाळीस हजार खेड्यांची व शहरांची माहिती संकलित होणे हे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ला महत्त्वाचे वाटते. त्या दृष्टीने स्पर्धेतील लेख; त्या त्या लेखकाकडून शक्य तेवढे परिपूर्ण करून घेऊन ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’वर प्रसिद्ध करण्याची योजना आहे. त्या बदल्यात प्रत्येक लेखकाला अल्पस्वल्प मानधनही लेख प्रसिद्ध झाल्यानंतर दिले जाईल.

गावागावांची माहिती हा ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या व्यापक उद्दिष्टाचा एक भाग आहे. त्याशिवाय, ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’तर्फे प्रत्येक गावातील कर्तबगार व छांदिष्ट व्यक्ती, उपक्रमशील खासगी व सार्वजनिक संस्था आणि मंदिर-मशिदीपासून वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थांपर्यंतचे संस्कृतिसंचित जमा करण्याचा प्रयत्न चालू आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेले व्यासपीठ असे ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे स्वरूप आहे. क्राउड सोअर्सिंग हे आधुनिक तंत्र त्यासाठी उपलब्ध आहे. कृपया या खटाटोपात सामील व्हावे, आपापल्या गावांची माहिती द्यावी. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलला भेटही द्यावी.

– दिनकर गांगल,
मुख्य संपादक, थिंक महाराष्ट्र डॉट कॉम
info@thinkmaharashtra.com

1 COMMENT

  1. गावगाथा स्पर्धा कशी रंगत…
    गावगाथा स्पर्धा कशी रंगत गेली याचा वरील वर्णनातून अनुभव दिल्याबद्दल धन्यवाद! स्पर्धेपेक्षा माझ्या गावाच्या माहितीचा लेख आपल्या पोर्टलवर झळकल्यावर खरा आनंद होईल! तो आनंद लवकरात लवकर मिळावा…

Comments are closed.