गरूडेश्वरचे वासुदेवानंद सरस्वती

1
39
_Garudeshwar_1.jpg

दत्तभक्तांचे प्रमाण महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांत खूप आहे. गाणगापूर, नरसोबाची वाडी ही जुनी दत्तक्षेत्रे. गुजरातेत नर्मदा ही सगळ्यात मोठी नदी. नर्मदेखेरीज इतर मोठ्या नद्यांमध्ये सुरतेजवळची तापीनदी, अहमदाबादची साबरमती नदी, बडोद्याजवळची महीनदी या आहेत. नर्मदेला मध्यप्रदेशात ‘रेवा’ म्हणतात. तिचे आणखी एक नाव ‘कृपा’ असे आहे. ती तिच्याशी जे नीट वागतात त्यांच्यावरच कृपा करते. नर्मदेकाठी तीर्थक्षेत्रे अनेक आहेत. त्यांपैकी महत्त्वाचे म्हणजे गरूडेश्वर. नर्मदा नदीचे खोरे म्हणजे वैराग्यभूमी आहे हे गरूडेश्वरीला गेल्यावर कळते. तेथेच इतर सर्व तीर्थक्षेत्रांची नावे माहीत होतात. खूप गाजलेले नर्मदेवरील सरदार सरोवर धरण नदीच्या वरील अंगाला, चौदा किलोमीटर दूर आहे.

गरूडेश्वरला नर्मदेकाठी श्री वासुदेवानंद सरस्वती यांची समाधी आहे. ती समाधी एका खोलीत असून, तिला जाळीचे दार आहे. त्यामुळे तिचे छायाचित्र काढता येत नाही. ते परमहंस म्हणजे श्रेष्ठ संन्यासी (उच्च कोटीचे हंस) आणि परिव्राजकाचार्य म्हणजे श्रेष्ठ संन्याशांचे आचार्य होते. दत्ताची महाराष्ट्र-कर्नाटक-गुजरातेत जी स्थाने आहेत त्यांपैकी गरूडेश्वर महत्त्वाचे. स्वामींचा जन्म सिंधुदूर्ग जिल्ह्यातील माणगाव येथे 1854 साली टेंबे यांच्या घरात झाला. वासुदेव गणेश टेंबे ऊर्फ वासुदेवानंद सरस्वती ऊर्फ टेंबे स्वामी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1854 रोजी झाला आणि निर्वाण 24 जून 1914 साली झाले. ते कऱ्हाडे ब्राह्मण होते. त्यांचे आईवडील दत्त भक्त होते. वडील गणेशभट्ट टेंबे व त्यांची आई रमाबाई धार्मिक होती. गणेश भट्टांनी बारा वर्षें गाणगापूरला राहिल्यावर दत्तांनी स्वप्नात येऊन सांगितले, की तू पुन्हा माणगावात परत जाऊन गृहस्थाश्रम सुरू कर. नंतर त्यांना मुलगा झाला, त्याचे नाव वासुदेव ठेवले. स्वामींच्या पत्नीच्या मृत्यूनंतर उज्जैनच्या नारायणानंद सरस्वतींकडून त्यांनी सन्यास दीक्षा घेतली व वासुदेवानंद सरस्वती या नावाचा स्वीकार केला. त्यांना दत्ताचा अवतार मानले जाते. त्यांनी कोठे शिक्षण घेतले त्याची माहिती नाही. त्यांनी भारतभर अनवाणी प्रवास केला – अगदी हिमालयातसुद्धा. साधना, प्रवचन आणि लेखन हा त्यांचा आयुष्यभर दिनक्रम होता. त्यांचे शिष्य अनेक झाले. त्यांनी ‘निसर्गावर प्रेम करा’ असा उपदेश केला; ‘ज्ञानदान हेच श्रेष्ठ’ असेही सांगितले.

_Garudeshwar_2.jpgमी गरूडेश्वरला पहिल्याच भेटीत मुक्काम केला. तेव्हा तो सगळा परिसर सुंदर होता. शेजारी एक टेकडी आहे. त्या टेकडीवर बसून नर्मदेची रेखाचित्रे, रंगचित्रे काढली. नंतर दोन दिवस शूलपाणीश्वराच्या जंगलात फिरलो. तो अनुभव लक्षात आहे. त्याची छायाचित्रे आहेत. तेव्हा धरण बांधण्याच्या कामाला नुकती सुरुवात झाली होती. त्यानंतर धरण बांधणीच्या प्रत्येक अवस्था पाहिल्या, पण तेथे जाताना आधी गरूडेश्वरला जात होतो. तेथील दत्ताची मूर्ती फारच सुंदर आणि प्रभावी आहे. तिला नमस्कार केला, की मग धरणाकडे जायचे असा क्रम असतो. तेथे अनेक जण गुरूचरित्राचे पारायण करतात.

तेथे स्थानाला चिकटून आणखी एक धरण बांधण्याचे काम चालू आहे. ते नवे धरण पाहून पोटात गोळा आला. त्यामुळे सरदार सरोवरातील पाणी गरूडेश्वरच्या धरणात थांबले, की खालील अंगाला नदीतील पाणी फक्त पुराच्या वेळी पाहण्यास मिळेल.

स्वामी जंगलात फिरत असताना वाट चुकले होते, तेव्हा चिरंजीव असलेल्या अश्वत्थाम्याने त्यांना वाट दाखवली होती म्हणे. अश्वत्थामा नर्मदेच्या खोऱ्यात फिरतो अशी आख्यायिका आहे. स्वामी 1913 साली गरूडेश्वरला आले व त्यांनी तेथेच मुक्काम केला. त्यांनी स्वत:च्या देहाचे विसर्जन पुढील वर्षी दत्ताच्या मूर्तीकडे पाहत त्राटक करत केले. नर्मदेकाठीचे गरूडेश्वर हे लहानसे खेडे, परमहंस परिव्राजक श्री. वासुदेवानंद सरस्वती यांच्यामुळे सर्वांना माहीत झाले.

– प्रकाश पेठे, pprakashpethe@gmail.com

About Post Author

Previous articleमाधव बर्वे – विषयवार वृक्षबागांचा अधिकारी माणूस
Next articleगुजराती श्रीमंत का असतात?
प्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन 1964 साली केले. त्‍यांनी वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर 1965 मध्‍ये केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्‍ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्‍ये झाले. त्‍यांंनी 'महाराज सयाजीराव विद्यापीठ' बडोदे येथे 1977 पासूनअतिथी प्राध्यापक, 'सरदार वल्लभभार्इ पटेल इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलाजी' येथे 2001 पासून आर्किटेक्चर आणि आणंद जवळील विद्यानगर येथे नगर रचना शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अतिथी प्राध्यापक म्‍हणून जबाबदारी स्‍वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्‍य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्‍यांची 'स्वप्नगृह', 'धमधोकार', 'आनंदाकार', 'वडोदरा' व 'नगरमंथन' ही पाच पुस्तके 'ग्रंथाली'तर्फे प्रकाशित झाली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 094277 86823

1 COMMENT

Comments are closed.