गणितप्रेमींचे नेटवर्क

0
52

गणिताची आवड मुला-पालकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी गणितप्रेमींचे नेटवर्क तयार करण्याची संकल्पना ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या पुढाकाराने प्रत्यक्षात आणली गेली आहे. मी त्या दिशेने एक पाऊल टाकण्याच्या हेतूने ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या अ.पां. देशपांडे, प्रकाश मोडक व विवेक पाटकर यांच्याशी संपर्क केला. त्यानुसार काही गणितप्रेमींची भेट ‘मराठी विज्ञान परिषदे’च्या कार्यालयात झाली. विवेक पाटकर गणिताचे अभ्यासक आहेत. आचार्य मराठे महाविद्यालयाच्या गणित विभागप्रमुख माणिक टेंबे, गणिताच्या अध्यापक अश्विनी रानडे, गोवंडीतील शाळेच्या मुख्याध्यापक व मी असे पाच जण चर्चेसाठी जमलो होतो.

गणित विषयाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एकूणच भीती आणि अनास्था आहे यावर सर्वांचे एकमत झाले. त्याची कारणे नजरेसमोर आली, ती प्रामुख्याने पुढीलप्रमाणे –

1. विद्यार्थ्यांना पाढे न आल्याने गणित सोडवताना येणाऱ्या अडचणींचे रूपांतर गणिताविषयी कंटाळा येण्यात होते.

2. पालकांनीच गणित हा विषय खूप महत्त्वाचा पण कठीण असल्याचे मुलांच्या मनावर वारंवार बिंबवल्याने भीती निर्माण होते.

3. शिक्षकाने गणित कसे सोडवले हे समजून न घेतल्याने परीक्षेत अडचण येते.

4. शिक्षकांना पाठ्यक्रम पूर्ण करण्यासाठी वेळ पुरत नाही.

5. पालकांना मुलांच्या अभ्यासात लक्ष देण्यासाठी सांसारिक व व्यावसायिक कामांमुळे वेळ मिळत नाही.

6. टेलिव्हिजन, भ्रमणध्वनी आणि संगणक या आधुनिक इलेक्ट्रॉनिक साधनांच्या मोहात सतत गुरफटल्याने अभ्यासाला वेळ मिळत नाही.

मुलांचा कल गणिताकडे वळवण्यासाठी पालकांशी संवाद घडणे जरुरीचे आहे व त्या दृष्टीने प्रयत्न होणे जरुरीचे आहे असे सर्वांचे मत पडले. टेंबे व रानडे ह्या आठवी ते दहावीच्या मुलांसाठी कार्यशाळा घेतात. त्या दोघींनी गणिताची आवड निर्माण करण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

गणित ऑलिम्पियाडमध्ये मुलांना प्राविण्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील असलेले एम. प्रकाश सर, इंजिनीयरिंगचे विद्यार्थी घडवणारे आठवलेसर यांच्याशीही संपर्क साधला. दोघांनीही गणितप्रेमींची माहिती देण्याचे कबूल केले.

– श्रीनिवास दर्प, shri2409@gmail.com