गणदेवी (गुजरात) – राम गणेश गडकरी यांचे जन्मगाव

0
93
_Ram_Ganesh_Gadkari_1.jpg

मी नवसारीला 2013 साली गेलो होतो. गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह जेथे केला त्या दांडीला जाण्यासाठी. राम गणेश गडकरी यांचा जन्म नवसारी तालुक्यात झाला होता हे मला माहीत होते. तेही औत्सुक्य होतेच. तेथे बरीच मराठी वस्ती होती. अजून काही प्रमाणात आहे, पण ते लोक गुजराथी होऊन गेले आहेत. गडकरी यांचे स्मारक होणार अशी तेव्हा बातमी होती. मी आता 2018 साली पुन्हा गेलो, तेव्हा त्याबाबत चौकशी करत फिरलो, पण गडकरी जेथे काही काळ राहत होते ते घर काही सापडले नाही. एका चौकात गडकरी यांचा पुतळा उभारण्याचा बेत होता असे कळले. त्या चौकात नुसता चौथरा दिसला.

गडकरी यांचा जन्म गुजरातेतील नवसारी तालुक्यात गणदेवी या गावात 26 मे 1885 रोजी झाला. नवसारी प्रांत हा सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानाचा भाग होता. बडोदा धरून, मेहेसाणा, अमरेली आणि द्वारका हे विस्तारही गायकवाड यांच्या ताब्यात होते. गणदेवीची लोकवस्ती सतरा हजार आहे.

मी गडकरी यांचा जन्म ज्या घरात झाला ते पाहण्यास बिलिमोरा जंक्शनहून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या गणदेवी या गावी गेलो. माझे तेथील मित्र निखिल देसार्इ यांनी मला ते छोटे हिरवेगार गाव मोटरसायकलवरून (बुलेट) फिरवले. जो रस्ता गडकरी यांच्या घराकडे जातो त्या रस्त्याला त्यांचे नाव आहे. गडकरी हे मराठीत महान नाटककार आणि कवी होऊन गेले हे बऱ्याच गणदेवीकरांना माहीत आहे! राम गणेश गडकरी ज्या जागी राहत होते त्या जागी गांडाभार्इ मुरारभार्इ पटेल नावाचे गृहस्थ राहतात. ते भेटू शकले नाहीत. महाराष्ट्र सरकार ते घर गडकरी जन्मशताब्दीच्या वेळी विकत घेऊन स्मारक बनवणार होते असे स्थानिकांनी सांगितले, पण पटेल घर विकत देण्यास तयार झाले नाहीत, त्यामुळे तो बेत बारगळला.

गडकरी यांचे वडील वयाच्या सहाव्या वर्षीच निवर्तले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांचा धाकटा भाऊ गोविंदही अकालीच मरण पावला. त्या कौटुंबिक धक्क्यातून सावरताना गडकरी यांचे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

_Ram_Ganesh_Gadkari_2.jpgगडकरी महाविद्यालयात शिकत असताना ओळखी ओळखीने ‘किर्लोस्कर नाटक मंडळीत’ दाखल झाले. एकीकडे कविता व अन्य लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करत असत. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरी आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. ‘भावबंधन’, ‘एकच प्याला’ यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. ‘वेड्याचा बाजार’ आणि ‘राजसंन्यास’ ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी यांचा मराठीचे शेक्सपियर असा सार्थ उल्लेख होतो. त्यांची ‘सुधाकर’, ‘सिंधू’, ‘तळीराम’, ‘घनश्याम’, ‘लतिका’ वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर, गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.

गणदेवी हे गाव बागायती आहे; सर्वत्र चिकू, केळी आणि नाना प्रकारच्या फळबागा आहेत. तेथील फळे निर्यात होत असल्याने गाव समृद्ध आहे. तेथे सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या ‘अमिधारा’ फॅक्टरीतून अनेक प्रकारच्या भाज्या, फळे आणि लोणची प्रक्रिया करून परदेशी पाठवली जातात. ‘अमिधारा’ नावाचे शीतपेयही परदेशी जाते. बुर्ज खलिफाला तेथील रोपवाटिकेतून फुले पाठवली होती. तसेच, आमिर खानही तेथून रोपे मागवतो असे कळले.

गणदेवीला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या गावचे लोक हळदीघाटीच्या आणि 1857 च्या लढार्इत सामील झाले होते. तात्या टोपे एकोणीस दिवस त्या गावात राहिले होते असे एकजण सांगत होता. गाव राजकीय बाबतीतही जागरूक आहे. एकदा, ठाकोरभार्इ नायक यांनी गणदेवी विभागातून मोरारजी देसार्इ यांना निवडणुकीत हरवले होते. ‘गणदेवी साखर कारखाना’ हा फार जुन्यांपैकी. गावात सगळी कामे सहकारी तत्त्वावर चालतात. पेट्रोलपंपही सहकारी संस्थेचा आहे.

गणदेवीचे ‘गझदर’ वाचनालय पाहून कोणीही चाट पडेल. ते गडकरी यांच्या जन्माच्या आधी दहा वर्षें स्थापन झाले आहे. गावाला वाचनाचा नाद आहे. इतके नीटनेटके आणि सुस्थितीतील वाचनालय क्वचित पाहण्यास मिळते. ते वाचनालय र्इ पुस्तकांनी भरणार आहेत.

_Ram_Ganesh_Gadkari_3_0.jpgगडकऱ्यांचे जन्मघर पाहण्यास म्हणून गेलो आणि नवसारी व गणदेवी या दोन सुसंस्कृत गावांची ओळख झाली. गणदेवीत प्रदूषण नाही. ते तेथे श्वास घेतानाच कळते.

तेथील जानकीआर्इ नावाचे मंदिर हे सीकेपी लोकांचे आराध्य दैवत आहे. महाराष्ट्रातून बरीच मंडळी तेथे दर्शनाला येतात. अनेक सीकेपी कुटुंबे महाराष्ट्रातून गायकवाड संस्थानात दोनशे वर्षांपूर्वी दाखल झाली. काहींनी त्यांच्या हुषारीने संस्थानात हुद्याच्या जागा मिळवल्या. त्यामुळे ते काठेवाडात अमरेली प्रांतात मेहेसाणा; तसेच, नवसारी प्रांतात सापडत. पण त्यांची वस्ती सगळ्याच ठिकाणची कमी होत आहे असे आढळते.

पूर्वी गणदेवीत दहा-बारा कुटुंब मराठी बोलणारे होते. काही बडोदे, सुरत, वापी गावी नोकरीसाठी गेले. सध्या सूर्यकांत सुर्वे यांचे एकच कुटुंब आहे. ते बँक ऑफ बडोदात नोकरी करतात. त्यांना गणदेवी फार आवडते. ते ते गाव सोडणार नाहीत असे म्हणाले.

जमशेटजी नसरवानजी टाटा यांचा जन्म नवसारीला जेथे झाला ते घर ‘टाटा सन्स’ यांनी जसेच्या तसे जतन केले आहे. तेथे पारशी अग्यारी व सुंदर लायब्ररी आहे. एके काळी, पारशांची बरीच वस्ती तेथे होती.

– प्रकाश पेठे, prakashpethe@gmail.com

About Post Author

Previous articleशोध अस्वस्थ कल्लोळाचा
Next articleचोवीस लाखांतील एक! ईशा चव्हाण (Esha Chavan)
प्रकाश पेठे यांचा जन्‍म अमरावतीचा. ते बडोदा येथे स्‍थायिक आहेत. त्‍यांनी 'सर जे जे कॉलेज ऑफ आर्किटेक्चर' मुंबर्इ येथून शिक्षण पूर्ण केले. पेठे यांनी 'मराठी विश्‍वकोशा'साठी पंधरा जगप्रसिध्द वास्तुकलाकारांच्या चरित्र नोंदींचे लेखन 1964 साली केले. त्‍यांनी वास्तुकलेतील नव्या प्रवाहाची प्रत्यक्ष ओळख करून घेण्याच्या ओढीने अहमदाबाद व चंदिगडची दीर्घ सफर 1965 मध्‍ये केली. त्‍यांचा वडोदरा महानगरपालिकेसाठी शहराचा पहिला विकास आराखडा व नगर रचना योजना बनवण्यात सहभाग होता. त्‍यांनी संगीत विशारद ही पदवी 1989 मध्‍ये मिळवली. ते नगर विकास अधिकारी या पदावरून निवृत्त 1998 मध्‍ये झाले. त्‍यांंनी 'महाराज सयाजीराव विद्यापीठ' बडोदे येथे 1977 पासूनअतिथी प्राध्यापक, 'सरदार वल्लभभार्इ पटेल इन्स्टिटयुट ऑफ टेक्नॉलाजी' येथे 2001 पासून आर्किटेक्चर आणि आणंद जवळील विद्यानगर येथे नगर रचना शास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी अतिथी प्राध्यापक म्‍हणून जबाबदारी स्‍वीकारली आहे. पेठे यांना प्रवास, छायाचित्रण, साहित्‍य, संगीत आणि कला अशा विविध विषयांची आवड आहे. त्‍यांची 'स्वप्नगृह', 'धमधोकार', 'आनंदाकार', 'वडोदरा' व 'नगरमंथन' ही पाच पुस्तके 'ग्रंथाली'तर्फे प्रकाशित झाली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 094277 86823