गढी वास्तू : संरजामी व्यवस्थेतील प्रशासन केंद्र

0
11
_GadhiVaastu_PrachinSaranjamiPrashasan_2.jpg

साम्राज्यांची, राजसत्तांची संस्कृती आणि त्यांचे धार्मिक अधिष्ठान असलेल्या ज्या अनेक प्रकारच्या वास्तू इतिहासक्रमात निर्माण झाल्या, त्यांत विविधतेबरोबर कलात्मकताही आहे. त्यात अभेद्य तटबंदीच्या गडकोटांचा हिस्सा फार मोठा आहे व त्यांचा उल्लेख वारंवार होत असतो. ते गडकोट म्हणजे त्यावेळच्या संरक्षण व्यवस्थेचा कणाच आहे. पण ‘गढी’ हा वास्तुप्रकार अधिसत्तेच्या नियंत्रणाखालील स्थानिक प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याकरता निर्माण झाला. ‘गढी’ वास्तू म्हणजे सपाट भूमी आणि पहाडावरील स्थानिक प्रशासन व्यवस्था सांभाळणारे सत्ताकेंद्र. सत्तेच्या विकेंद्रीकरणाची ती प्राथमिक अवस्था होय. गढ्या त्यांचे अस्तित्व मराठवाडा, खानदेश या प्रदेशांत टिकवून आहेत. गढ्या राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधील सौराष्ट्र-कच्छ या भागांत तर जास्त आढळतात. ‘मिर्च मसाला’ या चित्रपटात गढी वास्तूमधील समाजजीवनाचे चित्रण होते.

स्थानिक अखत्यारीतील परिक्षेत्राच्या संरक्षणासाठी निर्माण केलेली, गडकोटाचे प्रतीक असलेली वास्तू म्हणजे गढी. मर्यादित प्रशासकीय अधिकार वंशपरंपरेने प्राप्त झालेल्या काही परिवारांच्या ‘गढ्या’ म्हणजे प्राचीन सरंजामी व्यवस्थेची केंद्रे होत. तेथून मुलकी-महसूल जमा करण्याच्या व्यवस्थेसह संरक्षणाची जबाबदारी सांभाळली जाई. त्यामुळे पाटील, इनामदार, जहागीरदार, देशमुख यांच्या नावांनी गढी वास्तू ओळखल्या जातात. तेच स्थानिक प्रशासनाचे मुखत्यार असत ना! गढी म्हणजे सुरक्षिततेचे कवच असलेला, दैनंदिन गरजा भागवणारा ऐसपैस वाडाच! काही गढी प्रशासनांनी मोलाची ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

प्रदेशाच्या संरक्षणासह प्रशासन व्यवस्थेसाठी उभारलेली वास्तू म्हणजे किल्ले. इंग्रजीत कॅसल, फोर्ट अशी नावे त्या स्वरूपाच्या वास्तूंना आहेत, तर मराठीमध्ये ते वास्तुप्रकार भुईकोट, गिरिदुर्ग, जंजिरा, बालेकिल्ला अशा संज्ञांनी ओळखले जातात.

गढी वास्तुप्रकाराला काही शतकांचा, किल्ल्यांसारखा इतिहास आहे. गढीचे बांधकाम करताना परिसरातील उपलब्ध दगड, माती, चुना या साहित्याचा उपयोग केल्याचे जाणवते. गढीची तटबंदी ही सुमारे चार-पाच फूट रुंदीची असायची. गढी वास्तूला बहुधा एक प्रवेशद्वार असे. काही गढी वास्तूंना गरजेनुसार जास्त प्रवेशद्वारे ठेवलेली दिसतात. प्रवेशद्वारांची भव्यता हा गढ्यांचा विशेष होता. गढीच्या आतील भागातील छोट्यामोठ्या इमारतींसाठी विटांबरोबर लाकूड-दगडांचा वापर करण्यावर भर होता. गढीत प्रवेश करताच प्रथमत: लागते ती ‘देवडी’, म्हणजे आजच्या काळातील ‘चेकपोस्ट’. गढीत वास्तव्य असलेल्या प्रजेसाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून मोठे धान्य कोठार असायचे. युद्धकाळी, दुष्काळी परिस्थितीत त्याद्वारे रयतेला धान्यसाठा पुरवण्याची व्यवस्था होती. गढ्यांतील विहिरी धान्य कोठाराइतक्याच पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाच्या होत्या.

अनेक गढी वास्तूंची पडझड काळाच्या ओघात आणि नैसर्गिक आपत्तींनी झाली आहे; तर काहींची नामोनिशाणीही राहिलेली नाही. गढ्या म्हणजे इतिहासाचे साक्षीदार असून, त्यातून गत वैभवाचे दर्शन घडते.

_GadhiVaastu_PrachinSaranjamiPrashasan_1.jpgमराठवाड्यात काही गढ्यांचे क्षेत्र हे आजच्या नगराच्या आकारमानाइतके आढळते. गढी वास्तूंमध्ये ज्या कुटुंबाच्या हाती प्रशासनव्यवस्था होती, त्यांच्या निवासस्थानी प्रशस्त विहिरीबरोबर मोठे देवघर, माजघर, मुदपाक खाना, व्हरांडा, तुळशी वृंदावन यांनी मोठी जागा व्यापलेली असे. काही गढ्यांच्या अखत्यारीत सभोवतालच्या बऱ्याच गावांचे प्रशासन सांभाळले जाई. अनेक गावांची कायदा व सुव्यवस्था सांभाळली जायची.

पुणे जिल्ह्यातील ‘इंदुरी’ किल्लागढी, पेशवेकालीन सरदार बाबूजी बारामतीकरांची गढी; तसेच, सोलापूर जिल्ह्यातील धोत्री ही किल्लास्वरूप गढी पाहता येणे शक्य आहे. त्यांपैकी काही गढ्या आणि त्यांचा परिसर यांतून गिर्यारोहण आणि वनपर्यटन असा लाभ घेता येतो. भारताचा शेजारी देश नेपाळमध्येही प्राचीन, इतिहासकालीन गढी वास्तुप्रकार आहे. गढीच्या आश्रयाने काही धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम होत. गढीचे प्रशासक अधिकारक्षेत्रातील समाज एकसंध ठेवण्याबाबतीत दूरदृष्टीचे होते.

गढ्यांप्रमाणे काही प्रशस्त वाडे आणि त्यांची निवासी वास्तुरचनाही काही शतकांपूर्वीच्या समाजरचनेसह प्रशासन व्यवस्थेसंबंधांत खूप काही सांगणाऱ्या आहेत. वाड्यांना गढीची भव्यता नसेल, पण त्यांची सुरक्षित वास्तुरचना, त्यांचे खानदानी सौंदर्य, ऐतिहासिक मोल हेसुद्धा काही शतकांपूर्वीच्या कालखंडाचे जितेजागते पुरावे आहेत. पुणे, नाशिक, कोल्हापूर, मराठवाडा येथे वाडावस्ती गेल्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत अस्तित्वात होती. काळाच्या ओघात काही कुटुंबांच्या नावांनी ओळखल्या जाणाऱ्या वाड्यांच्या जागी सिमेंटच्या मनोरेसदृश्य इमारती उभ्या राहत आहेत.

गढ्या आणि वाडे यांची उभारणी मराठवाडा, विदर्भ, खानदेश प्रदेशांत जास्त आढळते तर कोकण प्रांतात हिरवाईच्या वाड्यांची (वाडी) संख्या मोठी आहे आणि त्या वाड्यांमध्ये उभारलेल्या वास्तूत स्थानिक उपलब्ध जांभा दगड व टिकाऊ लाकूड यांचा वापर करून पारंपरिक काष्ठ शिल्पाकृतींनी त्यांचे सौंदर्य खुलवले गेले आहे.

सिंधू नदीच्या खोऱ्यातील हडप्पामधील प्राचीन नगररचनेचे स्वरूपही गढी वास्तुप्रकाराशी साधर्म्य दाखवणारे आहे.

‘हळवद’ हे गुजरातेत सौराष्ट्रातील मोरबी जिल्ह्यातील रजपूतांनी स्थापन केलेले ऐतिहासिक गाव कच्छच्या छोटया रणाच्या दक्षिणेला आहे. गावाला तटबंदी होती व त्यात सर्वत्र नजर ठेवण्यासाठी एक वास्तू आहे. ती गढी या विषयाशी व तिच्या वर्णनाशी साम्य दाखवणारी वाटली.

चंद्रशेखर बुरांडे लिहितात –

माझ्या माहितीनुसार गढ्यांत राहणारे सरदार वा व्यवस्था सांभाळणारा अधिकारी वर्ग मदतकार्याचे काम करत असत. त्यांचा गडावरील सत्ताकेंद्राशी संबंध नसे. गढी म्हणजे वाडा नव्हे, गढ्यांना गडकोटागत चपट्या विटांची अथवा काळ्या दगडांची उंच व निमुळती तटबंदी असते. तशा प्रकारची तटबंदी उस्मानाबदपासून पंधरा किलोमीटरवर असलेल्या आळण या गावात आहे. ती तटबंदी खूपच सुंदर आहे.
त्या गढीचे छायाचित्र सोबत जोडले आहे.

मराठवाड्यात काही गढ्यांचे क्षेत्र हे आजच्या नगराच्या आकारमानात आढळते… तशी गढी माझ्या ऐकण्यात, पाहण्यात नाही. वाडा व गढी हे दोन वेगवेगळे स्थापत्य प्रकार आहेत. नाशिक जिल्ह्यातील डुबेरे येथील बर्वे यांची वास्तू गढी व वाडा या मिश्र स्थापत्याचा नमुना आहे. आतून वाड्याचे स्वरूप व बाहेरून विटा वापरून केलेला बुरूज आणि उर्वरीत तटबंदी दगड व माती वापरून बांधली आहे.

वाड्याचे बाह्य दृश्य गढीसारखेच दिसते, पण ती वास्तू वाडा म्हणून ओळखली जाते!

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची गढी बाभळगाव येथे आहे. त्या गढीचे आजचे दृश्य मात्र फिल्मी केले आहे. आज ती ना गढी आहे ना बंगली!

अरुण मळेकर
arun.malekar10@gmail.com

(‘लोकसत्ते’च्या वास्तुरंग पुरवणीतून उद्धृत-संस्कारित)
Previous articleरंगभूमीचे मामा – मधुकर तोरडमल
Next articleडॉ. मनीषा रौंदळ यांची पंढरपुरी सायकलवारी
अरुण मळेकर ठाणे येथे राहतात. त्यांनी ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये समाजशास्त्र, मराठी, विज्ञान विषयांचे अध्यापन केले आहे. मळेकर यांनी 'महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळा'त प्रसिद्धी खात्यात माहिती सहाय्यक पदावर काम केले. त्यांनीू तेथेच सहल व्यवस्थापन व प्रत्यक्ष भेटींवर आधारित पर्यटन स्थळांवर लेखन करण्याची जबाबदारी पार पाडली. त्यांचे ‘अरण्यवाचन’, ‘विश्व नकाशांचे’, ‘गाथा वारसावास्तूंची’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. मळेकर गेली चाळीस वर्षे ‘लोकसत्ता’, ‘सकाळ’, ‘तरुण भारत’, ‘सामना’ व ‘महाराष्ट्र टाइम्स’ या वृत्तपत्रांतून लेखन करत आहेत. त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘गुणवंत कामगार पुरस्कार’ (1990) आणि 'ठाणे महानगर पालिका' पुरस्कृत ‘जनकवी पी सावळाराम साहित्यविषयक पुरस्कार’ (2015) प्राप्त झाला आहे. लेखकाचा दूरध्वनी 8369810594