गडकोटाचा अस्सल नमुना – भोरपगड अर्थात सुधागड (Sudhagad)

carasole

सुधागड म्हणजे भोर संस्थानाचे वैभव. सुधागड किल्ल्यास पूर्वी भोरपगड असेही म्हणत असत. शिवछत्रपतींचा पदस्पर्श त्या गडाला झाला आणि त्याचे नाव सुधागड ठेवले गेले.

स्‍वराज्‍याच्‍या राजधानीसाठी रायगडाआधी भोरपगड, म्‍हणजे आताचा सुधागड किल्‍ल्‍याचा विचार करण्‍यात आला होता. नारोमुकुंद यांनी शिवाजी महाराजांना राजधानीसाठी हा किल्‍ला सुचवला होता. शिवाजींना राजधानीसाठी रायगड किल्‍ला योग्‍य वाटला. मात्र महाराजांनी सुधागडाच्‍या बांधकामासाठी पाच हजार होन देऊन किल्‍ला लढाऊ बनवला. त्या काळी गडावर ७०० गडक-यांचा राबता होता. रायगडाचा महादरवाजा आणि सुधागडचा महादरवाजा यात साम्य आहे. सुधागडाला लाभलेली अभेद्य तटबंदी, गडमाथ्यावरील विशाल पठार, पाण्याचे असंख्य टाक, तसेच भौगोलिकदृष्‍ट्या असलेले महत्त्व यामुळे सुधागड हा बळकट किल्‍ला म्‍हणून गणला जातो. हा किल्‍ला म्‍हणजे कोकणात उतरणा-या सवाष्‍णीच्‍या घाटाचा पहारेकरीच!

लोणावळा डोंगररांगेत झाडांमध्‍ये लपलेल्‍या भोरपगडाची उंची पाचशेनव्वद मीटर आहे. गडाचा विस्तार मोठा असून तो ट्रेकींगच्‍या दृष्‍टीने सोपा आहे.

भोरपगड परिसरात अस्तित्वात असणारी ठाणावळे लेणी, ही दोन हजार दोनशे वर्षांपूर्वीची आहेत. त्यावरून असे अनुमान निघते, की भोरपगड हा देखील तितकाच जुना किल्ला असावा. एखाद्या मोठ्या सत्तेखाली त्या गडाची जडणघडण झाली असावी. पुराणात भृगू ऋषींनी तेथे वास्तव केल्याचे उल्लेख आढळतात. सुधागड किल्ला 1648 साली स्वराज्यात सामील झाला. त्याबाबत असा उल्लेख आढळतो, की मालवजी नाईक कारके यांनी साखरदऱ्यात माळ लावली. सरदार मालोजी भोसले यांच्या हाताखाली जाधव आणि सरनाईक हे प्रथम किल्ल्यावर चढले. त्या धारकऱ्यांना उभे करून त्यांच्या पाठीवर हैबतराव चढले. त्यास संभाजीराव पुढे जाऊन माथा गेले. पंचविसाने पुढे जाऊन गस्त मारली. बोकडसिलेचा पहारा मारला. पुढे भोराईच्या टप्प्यावर गेले, तो सदरेतून किल्लेदार व लोक धावत आले. हाण हाण झाली त्या समयी किल्लेदार कामास आले. उपरांतिक जाऊन सदर काबीज केली.

नारो मुकुंद यांनी 1680 मध्ये मोगलांकडून हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला. शिवाजीराजांनंतर औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. त्यावेळी सुधागडावर घनघोर लढाई झाली. नारो मुकुंदा यांचे सुपुत्र शंकराजी नारायण यांनी लढाईत मोठा पराक्रम गाजवला. राजाराम महाराजांनी त्यांचा गौरव केला आणि 1698 मध्ये भोर संस्थानाचे सचिवपद दिले. पुढे 1818 मध्ये इंग्रजांनी स्वराज्य खालसा केल्यावर त्यांनी भोर संस्थान निर्माण करून भोरकरांकडे रोहिडा, राजगड, तोरणा, मौनमावळ व कोकणातील एकमेव सुधागड ताब्यात दिला. ते सारे गड भोर संस्थानात असेपर्यंत उत्तम स्थितीत होते.

शिवरायांनी त्या गडाचे भोरपगडावरून सुधागड असे नामकरण केले. गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘पाच्छापूर’ गावातच संभाजी व औरंगजेबाचा बंडखोर मुलगा यांची भेट झाली होती. महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात असलेल्यांपैकी अण्णाजी दत्तो, बाळाजी आवजी चिटणीस – त्याचा मुलगा आवजी बल्लाळ आणि हिरोजी फर्जंद या सर्वांना भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी संभाजीने सुधागड परिसरात असणाऱ्या परळी गावात हत्तीच्या पायी दिले.

भोरपगड समुद्रसपाटीपासून 2030 फूट उंच आहे. गडाचा तळाकडील घेर पंधरा किलोमीटर आकाराचा आहे. गडावर जाण्यासाठी तीन प्रमुख वाटा आहेत. गडावर पोचण्‍यास अडीच ते तीन तासांचा कालावधी लागतो. गडावर पोचल्‍यावर मिशीवाल्‍या मारुतीच्‍या पुढे काही अंतर चालत गल्‍यानंतर डाव्‍या हाताला पाण्याचे टाके, अर्थात तलाव आढळतात. तेथेच वीर तानाजी मालुसरे यांची लहान मूर्ती कोरलेला दगड आहे. म्‍हणूनच त्‍या टाक्‍यांना ‘तानाजीचे टाके’ असे म्‍हणतात. गडावर पंत सचिवांचा वाडा आहे. त्यात पन्नास जणांची राहण्याची सोय होते.

सुधागडावर जंगलही बऱ्यापैकी आहे. जंगलाच्या परिसरात औषधी वनस्पती आढळतात. गडावरील पंत सचिवांच्या वाड्याच्या बाजूला भोरेश्वराचे मंदिर आहे. तेथून पुढे गेल्यावर चोरदरवाज्याची विहीर आहे. पंत सचिवांचा वाडा 1705 साली बांधण्‍यात आला. तो चौसोपी आहे. त्‍याला दोन दरवाजे आहेत. दोन बंद खोल्‍या आणि एक माडी आहे. वाडा लाकडाने तयार केलेला आहे. सचिवांच्या वाड्यापासून पुढे पायऱ्यांची वाट जाते आणि सरळ भोराई देवीच्या मंदिरात आणून सोडते. तेथे पंचवीस जणांची राहण्याची सोय होते. पुराणकथेनुसार, भृगू ऋषींनी भोरपगडावर दीर्घकाळ तपःसाधना केली. त्‍यांनी गडावर भोराई देवीची स्‍थापना करून गोमाशी गावाकडे प्रयाण केले. भोराई देवी ही तत्कालिन औंध संस्‍थानाचे पंत सचिव यांचे कुलदैवत. नवरात्राच्‍या काळात गडावर भाविकांची गर्दी होते. मंदिरात भली मोठी घंटा आहे. देवीच्‍या मंदिरासमोर दगडी दीपमाळ आहे. त्‍यावर हत्‍तीची प्रतिमा कोरलेली आढळते. मंदिराच्‍या परिसरात अनेक वीरगळ आढळतात. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाधी आहेत. त्यावर सुबक नक्षीकाम केले आहे. मंदिराकडे जाणारी वाट सोडून खालची वाट पकडली तर पुढे पाण्याच्‍या टाकी आहेत. त्या टाक्यांतील पाणी पिण्यासाठी उपयुक्त आहे. टाक्यांच्या डावीकडील वाटही चोरदरवाज्याकडे आणून सोडते. ती वाट अस्तित्वात नाही. भोराईच्‍या मंदिराकडून टकमक टोकाकडे वाट जाते. त्‍या परिसराला ‘एको पॉइन्‍ट’ असेही म्‍हणतात. टकमक टोकाकडे जाणा-या वाटेवर धान्‍याची कोठारे दिसतात. गडाच्‍या ईशान्‍य दिशेला इंग्रजी V आकाराची दरी आहे.

पाच्छापूर दरवाजा – सुधागडाच्‍या पायथ्‍याशी पाच्‍छापूर नावाचे गाव आहे. तो पातशहापूर नावाचा अपभ्रंश असल्‍याचे सांगितले जाते. त्‍या दिशेकडील दरवाजा म्‍हणजे पाच्‍छापूर दरवाजा. त्‍या दरवाज्यातून गडावर शिरल्यास थोडे चढल्यावर पठार लागते. पठाराच्या डावीकडे सिद्धेश्वराचे मंदिर आहे. तसेच धान्य कोठार, भांड्यांचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ आहे. उजवीकडे गडाची नैसर्गिक तटबंदी बघावयास मिळते. गडाच्‍या पूर्वेकडील बाजूस एक विशाल बुरुज आहे.

दिंडी दरवाजा सवाष्णीच्या घाटावरून येणारी वाट दिंडी दरवाज्यात आणून सोडते. तो दरवाजा म्हणजे रायगडावरील ‘महादरवाज्या’ची हुबेहूब प्रतिकृती. ते किल्ल्याचे महाद्वार आहे. द्वाराची रचना गोमुखी बांधणीची आहे. त्‍यावर नक्षीकाम आढळते. दोन भीमकाय बुरुजांमध्ये लपल्यामुळे त्‍या द्वारास मोठे संरक्षण लाभले आहे. दरवाजामध्‍ये बंदुकीसाठी जंग्‍या आहेत. दरवाजात दोन देवड्या असून चौकटीखालून पाणी वाहून जाण्‍यासाठी जागा आहे. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्यात एक भुयार आहे. ते गाळाने पूर्ण भरले आहे. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी चोरवाट पण आहे.

सुधागडावरुन पश्चिमेला असलेले कोराईगड – तैलबैला आणि घनगड हे किल्‍ले नजरेस पडतात. सुधागड किल्‍ल्याचा डोंगर आजही तेथील परिसरात भोराईचा डोंगर या नावाने ओळखला जातो.

– आशुतोष गोडबोले

1 COMMENT

  1. आशुतोष गोडबोले

    आशुतोष गोडबोले
    कृपया तुमचा email खाली देत चला
    म्हणजे काही शंका असल्यास विचारता येईल
    कळावे

Comments are closed.