गडकरी – नाटककाराची विविधांगी प्रतिभा (Tribute to playwright Ram Ganesh Gadkari)

2
49

राम गणेश गडकरी

राम गणेश गडकरी हे नाटककार म्हणून त्यांच्या अलौकिक प्रज्ञेने, प्रतिभाविलासाने, भाषावैभवाने मराठी साहित्यसंस्कृती जगतात वेगळे उठून दिसतात. मराठी नाट्यपंचायतन असे किर्लोस्कर, देवल, कोल्हटकर, खाडिलकर व गडकरी या पाच जणांना म्हटले जाते. त्यांपैकी अन्य चौघांचे नाट्यकर्तृत्व थोर निश्चितच आहे; पण राम गणेश यांची लोकप्रियता आणि त्यांचे लेखन यांनी समीक्षकांना केलेले वैचारिक आवाहन त्यांचा मोठेपणा अधोरेखित करणारे आहे. गडकरी सव्वाशेहून अधिक वर्षांपूर्वी जन्मले. त्या प्रतिभावंताने उमेदीच्या जाणत्या बारा-चौदा वर्षांतच केलेली साहित्यनिर्मिती थक्क करणारी आहे.

गडकरी हे किर्लोस्कर नाटक मंडळी या, त्या काळच्या प्रथितयश नाटकमंडळीत 1905 ते 1908 या काळात द्वारपाल व शिक्षक होते. नाटकमंडळीतील मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देता देता ते स्वतःच कळत-नकळत नाट्यक्षेत्रातील विविध धडे गिरवत गेले. त्यांना त्यांचे वास्तव्य नाटक कंपनीच्या बिऱ्हाडी असल्याने नाट्यलेखन, नाटकाची तालीम, नाट्यप्रयोगाची उभारणी; त्याचबरोबर नटांचे वर्तन, त्या क्षेत्रातील मंडळींचे कलह, त्यांची व्यसने, समाजाचा नटांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, नाटक कसे पाहिले जाते- ते कसे पाहिले जावे इत्यादी अनेक गोष्टी रात्रंदिवस दिसत होत्या. गडकरी यांची ग्रहणशक्ती व कल्पनाशक्ती तीव्र होती. शिवाय, ते ऐन विशीत होते. त्यांनी त्या सर्व गोष्टी आत्मसात केल्या नसत्या तरच नवल! किर्लोस्कर नाटक मंडळीचे व्यवस्थापक शंकरराव मुजुमदार यांनी रंगभूमी हे फक्त नाटक या विषयाला वाहिलेले मासिक1907 मध्ये सुरू केले. गडकरी यांनी सवाई नाटकीया टोपणनावाने त्यात लेखन केलेले आहे. त्यांनी समाजात नटाची जागा’, ‘प्रमादपंचदशी’, ‘नाटक मंडळ्यांच्या हिताचे चार शब्द’, ‘छोट्या जगूचा रिपोर्ट’, ‘नाटक कसे पाहवे’, ‘काहीतरी विनोदअसे लेख लिहिले. त्यांत त्यांचे सूक्ष्म निरीक्षण, विनोदबुद्धी, नाट्यव्यवसायासंबंधीचे विचार दिसतात. वेड्यांचा बाजारहे प्रहसनही रंगभूमीमासिकातच प्रसिद्ध झालेले आहे. त्यांनी गर्वनिर्वाणसुद्धा किर्लोस्कर नाटक मंडळीत असतानाच लिहिले. रंगभूमीमासिकाने गडकरी यांच्या लेखनाची दखलही घेतली आहे. गडकरी यांचे पंचप्राण-प्रस्तावना चिंतामण मनोहर बर्वे (फलटण) हा लेख किंवा त्यांच्या वृंदावन या व्यक्तिरेखेवरील बाळकृष्ण नारायण पांडे (बऱ्हाणपूर) यांचे तीन लेखही रंगभूमीमासिकात प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या लेखनाचा श्री गणेशा त्या नाटक मंडळींत झाला.

प्रेमसंन्यास’ (1912) हे गडकरी यांचे पहिले नाटक. त्यावेळी कोल्हटकर, खाडिलकर हे लेखक ऐन बहरात होते. किर्लोस्कर, देवल हेही लोकप्रिय होते. तो काळ मराठी संगीत रंगभूमीच्या भरभराटीचा होता. तोतयाचे बंडहे न.चिं. केळकर यांचे नाटक 1912 सालचेच. त्याच सुमारास किर्लोस्कर नाटक मंडळी दोनदा फुटली. त्या घटनेचे परिणाम नाट्यसृष्टीवर दूरगामी झाले. बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतून बाहेर पडून गंधर्व नाटक मंडळीची स्थापना 1913 मध्ये केली. किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये दुसर्‍यांदा फूट 1918 मध्ये पडून चिंतामणराव कोल्हटकर, मा.दीनानाथ, कृष्णराव कोल्हापुरे यांनी बलवंत नाटक मंडळीची स्थापना केली. गडकरी यांची नाटके त्या तिन्ही नाटक मंडळ्यांनी केली. प्रेमसंन्यासला गोविंद चिमणाजी भाटे यांची प्रस्तावना आहे. गडकरी हे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांना गुरू मानत असत. त्यांनी त्यांना म्हणून वंदुनि त्या श्रीपादपदांप्रतिः अशी अर्पणपत्रिकाही नाटकास लिहिली आहे. पण आचार्य प्र.के. अत्रे यांनी प्रत्यक्ष गुरुच, शिष्याच्या प्रतिभेपुढे कसे नम्र आणि क्षमाशील होते, ते अप्रकाशित गडकरीच्या प्रस्तावनेत सांगितले आहे. स्वत:च्या गुरूंना तुमची नाटके बुधवारची करून टाकीनअशी धमकी देणारा शिष्योत्तम मराठी रंगभूमीवर अन्य कोणी नसेल ! (नाटके वीकेण्डला झाली की गर्दी होई. बुधवारसारख्या एरवीच्या वारी नाट्यगृह ओस असे. नाटककाराला ती शिक्षाच वाटे!)

गडकरी वृत्तीने कवी होते. त्यांचे राग, लोभ, प्रेम, आदर-अनादर टोकाचे असत. त्यांच्या स्वभावात चंचलता, लहरीपणा, अनावरता होती. ते शंकरराव मुजुमदार यांच्याशी खटका होऊन 1908 मध्ये किर्लोस्करमधून बाहेर पडले, पण परस्परांचा राग आला असला तरी त्या दोघांना मनातून एकमेकांची ओढ होती; दोघेही परस्परांची पात्रता जाणून होते. त्यामुळेच प्रेमसंन्यास हे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळी करत असली तरी पुण्यप्रभावहे नाटक किर्लोस्कर नाटक मंडळीनेच रंगभूमीवर मुंबईला प्रथम 1 जुलै 1916 रोजी आणले. बलवंत संगीत नाट्यमंडळीने भावबंधन18 ऑक्टोबर 1918 रोजी अकोल्याला रंगभूमीवर आणले. एकच प्याला 1917 मध्ये लिहून झाले होते; पण गंधर्व नाटक मंडळीने ते 1919 मध्ये, गडकरी यांच्या निधनानंतर रंगभूमीवर आणले. त्याची पदे व प्रस्तावना वि.सी. गुर्जर यांची आहे. राजसंन्यासअपूर्ण राहिले.

गडकरी यांची नाटककार म्हणून बलस्थाने जबर होती. त्यामुळेच त्यांनी अवघी साडेचार नाटके लिहून उदंड कीर्ती मिळवली. काव्यमयता, नाट्यकुशलता आणि विनोदशक्ती या दुर्लभ एकत्रित गुणांमुळे मराठी नाटककारांत गडकरी यांचे स्थान अनन्यसाधारण आहे असे श्री.के. क्षीरसागर यांनी म्हटले आहे. गडकरी यांनी त्यांच्या गुरूंचे, श्रीपाद कृष्ण यांचे अनुकरण काही बाबतींत केले आहे, पण त्या संदर्भात क्षीरसागर म्हणतात गडकरी त्यांच्या अल्पमतीप्रमाणे तत्कालीन संप्रदाय गिरवत होते; पण सर्वशक्तिमान प्रतिभा त्यांचा हात धरून त्यांच्याकडून नकळत वेगळेच वळण गिरवून घेत होती.” (श्री.के. क्षीरसागर, वाद-संवाद- एकच प्याला-एक विवेचन’, पृष्ठ151). गडकरी यांची विशेष श्रद्धा भारतीय संस्कृतीतील मूल्यांवर, विशेषत: पातिव्रत्य या संकल्पनेवर होती. त्याची प्रचिती पुण्यप्रभावआणि एकच प्याला या नाटकांमध्ये येते. एकच प्यालाही इंग्रजी नाटककार शेक्सपीयर यांच्या धर्तीची शोकांतिका. तो त्यांच्या नाट्यकर्तृत्वाचा कळस होय. त्यांची भाषाशैली भरजरी, प्रमत्त, आवेगी, नटांची दमछाक करणारी आहे; पण त्यांनी ती शैली सर्वत्र वापरलेली नाही. सिंधूच्या तोंडचे संवाद तिच्या शालीन, सुसंस्कृत पतिपरायण व्यक्तिमत्त्वाला साजेसे, मार्दवी, गोड, आर्जवी आहेत; तर गीतेने दारूबाज नवर्‍याची फटकळपणाने केलेली संभावना तिच्या व्यक्तिरेखेला साजेशी आहे. गडकरी यांचे खलनायकही नायक-नायिकांप्रमाणे अविस्मरणीय आहेत. त्यांची गोकुळ, सुदाम, नूपुर, किंकणी ही विनोदी पात्रे नाट्यांतर्गत तणाव दूर करण्याचे काम करतात. इंदू-बिंदू या पात्रांवरील विनोद मात्र, करू नये अशा कुचेष्टेने डागाळलेले, सुसंस्कृत मनाला न पटणारे आहेत. धुंडिराजही भावबंधनमधील व्यक्तिरेखा हद्य आहे. अत्यंत प्रेमळ, भाबडा, सरळ मनाचा, नकळत विनोद निर्माण करणारा तो सालस, सज्जन म्हातारा वाचक-प्रेक्षकांचे मन जिंकतो. गडकरी यांनी सिंधू, कालिंदी, वसुंधरा, लतिका, मालती या स्त्री-पात्रांचे रेखाटन कुशलतेने केले आहे. राजसंन्यासमधील राया-शिवांगी ही जोडीही मन मोहून टाकणारी आहे. मानवी स्वभावाची सूक्ष्म जाण, ठाशीव व्यक्तिरेखा, नाट्यतंत्रावरील पकड, एका बाजूला झपाटून टाकणारी आणि आवश्यक तेथे संयम प्रगट करणारी सुडौल भाषाशैली, विनोद, सामाजिक प्रश्नांचे भान, करुण व हास्य रसांचा प्रभावी आविष्कार, कल्पनावैभव, स्वतंत्र कथानके असे गडकरी यांच्या नाट्यलेखनाचे विशेष सांगता येतात. टीकाकारांनी त्यांच्या नाट्यलेखनातील काही दोष विनोदाचा अतिरेक, उपकथानकांमुळे झालेला विस्तार, वेषांतरे, योगायोग, असंभाव्यता असे दाखवले आहेत.

गडकरी स्वतःला केशवसुतांचा सच्चा चेलाम्हणवतात. ते गोविंदाग्रज या टोपणनावाने कविता मनोरंजनमासिकात लिहीत होते. गोविंदाग्रज यांचा वाग्वैजयंतीहा काव्यसंग्रह 1921 मध्ये प्रसिद्ध झाला. त्याला न.चिं. केळकर यांची प्रस्तावना आहे. त्यांच्या अनेक कविता – मुरली, अरुण, राजहंस माझा निजला, प्रेम आणि मरण, विरामचिन्हे, हलत्या पिंपळपानास, फुटकी तपेली, कृष्णाकाठी कुंडल अशा गाजल्या. त्यांनी प्रेमकवितांमधून प्रामुख्याने विरहवेदना व्यक्त केली. त्यांच्यात वृत्ती भाववेडी क्षण पुरे एक प्रेमाचा वर्षाव पडो मरणांचाअशी, प्रेमासाठी जीव ओवाळून टाकणारी उत्कट होती. त्यांच्या काव्य-नाट्यसृष्टीत प्रेम, त्याग, पातिव्रत्य, वात्सल्य, देशाभिमान ही मूल्ये आविष्कृत त्यांच्या पिंडधर्मानुसार झाली. गडकरी पदवीधर होऊ शकले नाहीत, पण त्यांचे मराठी, इंग्रजी वाचन अफाट होते; त्यांची बुद्धिमत्ता प्रखर होती. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या वयाच्या अठरा ते चौतीस एवढ्या अल्पकाळात साहित्यक्षेत्रात स्वत:चे स्थान मिळवले. त्यांच्या अवतीभवती अनेक दिग्गज होते. त्यांच्या प्रतिभेचे तेज प्रतिकूल परिस्थितीतही प्रकट झाले.

गडकरी यांनी विनोदी लेखन सवाई नाटकी (रंगभूमी मासिक) व बाळकराम(मनोरंजन मासिक) या टोपणनावांनी केले. त्यांच्या विनोदी लेखनाची पहिली पावले रंगभूमीत उमटली. त्या विनोदाचा दर्जा खूप वरचा नाही. छोट्या जगूचा रिपोर्ट मात्र विनोदाचा, कल्पनाशक्तीचा उत्तम नमुना आहे. बाळकरामने लिहिलेली रिकामपणाची कामगिरीविनोद आणि कारुण्य यांचा मनोज्ञ संगम असलेली आहे. त्यांच्या विनोदाची वैशिष्ट्ये अतिशयोक्ती, कोटिबाजपणा, विडंबनपरता ही आहेत. गडकरी यांनी शब्दनिष्ठ,व्यक्तिनिष्ठ, प्रसंगनिष्ठ अशा विनोदाच्या तिन्ही रीतींचा वापर केलेला आहे. त्यांची ठकी, तिंबुनाना ही पात्रे अविस्मणीय आहेत. त्यांनी कवींची विनोदी पद्धतीने उडवलेली टर कविबुवांना विचार करण्यास लावणारी आहे. स्वयंपाकघरातील गोष्टसुद्धा रूचकरपणाची फोडणी दिलेली आहेत. सकाळचा अभ्यासही मुलांसाठी लिहिलेली वास्तवदर्शी सुंदर नाटिका आहे. तसेच, त्यांची जोडाक्षरविरहित चिमुकली इसापनीतीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. दीड शहाणा या टोपणनावाने लिहिलेली संगीत मूकनायक ही नाटिका म्हणजे अतिसामान्य माणसाच्या जिण्यावरील विदारक भाष्य आहे दीडपानी नाटकमधील प्रोफेसर कोटिबुद्धे मानवी वर्तनातील विसंगतीचा विनोदी नमुना आहे. गडकरी यांच्या प्रतिभेचे, निरीक्षणशक्तीचे, भाषाप्रभुत्वाचे, विनोदनिर्मितीचे अनेक विशेष त्या लेखनात दिसतात.

राम गणेश गडकरी यांचा जन्म 26 मे 1885 रोजी झाला आणि मृत्यू 22 जानेवारी 1919 रोजी झाला. चौतीस वर्षांचे आयुष्य. राम गणेश गडकरी यांची ग्रंथसंपदा – नाटके: प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव, एकच प्याला, भावबंधन, राजसंन्यास. प्रहसने: वेड्यांचा बाजार, गर्वनिर्वाण, तोड ही माळ. काव्य: वाग्वैजयंती. बालसाहित्य: सकाळचा अभ्यास (नाटिका), जोडाक्षरविरहित चिमुकली इसापनीती. नाटिका: संगीत मूकनायक, दीडपानी नाटक.

राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज, बाळकराम) त्यांचा ठसा नाटक, काव्य, विनोद या तिन्ही क्षेत्रांत उमटवून गेले.
(साहित्य मंदिर, जानेवारी 2021 वरून उद्धृत, संपादित-संस्कारित)

मेधा सिधये 95884 37190 medhasidhaye@gmail.com

व्यंकटेश अपार्टमेंट्स, 1204 सदाशिव पेठ, लिमयेवाडी, पुणे 411 030

मेधा वासुदेव सिधये या अध्यापन, लेखन आणि व्याख्यानादी कार्यक्रमांतील सहभाग यांत गुंतलेल्या असतात. त्यांचा पीएच डी चा अभ्यास विषय रंगभूमीमासिकातील नाट्यसमीक्षा हा होता. त्यांनी नाट्य- संमेलनाध्यक्षांची भाषणे (स्वातंत्र्योत्तर ते 2000) या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांचे घाटातले आभाळ आणि रानपाखरं हे दोन बालकवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या अभ्यागत प्राध्यापक म्हणून मराठी विषयाच्या अध्यापनासाठी मॉरिशसमध्ये तीन महिने निमंत्रित होत्या. त्या साहित्यवैभव या ग म भ न प्रकाशनच्या दिनदर्शिकेचे अठरा वर्षांपासून संपादन करत आहेत. त्यांचे लेखन आकाशवाणीवर आणि विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते. त्या व्याख्याने, चर्चासत्रे कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालनही करतात.

—————————————————————————————————————————————————————————–

About Post Author

Previous articleयशवंतराव आणि हॅम्लेट (Did Y B Chavhan face Hamlet’s crisis in public life?)
Next articleनाशिकच्या रेडिओवर अमेरिकी शाळा (US Marathi Schools have programme on Nasik Vishwas radio)
मेधा वासुदेव सिधये या मराठी विषयाचे अध्यापन, लेखन, कार्यक्रमांचे निवेदन व सूत्रसंचालन आणि व्याख्यानादी कार्यक्रमांतील सहभाग यांत गुंतलेल्या असतात. त्यांचा पीएच डी चा अभ्यास विषय ‘रंगभूमी’ मासिकातील नाट्यसमीक्षा हा होता. त्यांनी नाट्य संमेलनाध्यक्षांची भाषणे (स्वातंत्र्योत्तर ते 2000) या ग्रंथाचे संपादन केले आहे. त्यांचे ‘घाटातले आभाळ’ आणि ‘रानपाखरं’ हे दोन बालकविता संग्रह प्रकाशित आहेत. त्या ‘साहित्यवैभव’ या ‘ग म भ न’ प्रकाशनच्या दिनदर्शिकेचे संपादन अठरा वर्षांपासून करत आहेत. त्यांचे लेखन आकाशवाणीवर आणि विविध नियतकालिकांत प्रसिद्ध होत असते.

2 COMMENTS

  1. अलका प्रधान कै.गडकरी यांच्या कारकीर्दीचा अभ्यास करून संपूर्ण आढावा घेतला आहे त्याबद्दल मेधाताईंना मनःपूर्वी धन्यवाद. आमच्या विलेपार्ले सिकेपी मंडळात आम्ही दरवर्षी २२ जानेवारीला गडकरी स्मृतिदिन साजरा करतो. त्य सुमारास हा लेख मिळाला असता तर वाचून दाखवला असता. ठीक आहे, पुढच्या वर्षी म्हणजे जानेवारी २०२२ मधे हा लेख नक्की सिकेपी मंडळाच्या कार्यक्रमात समाविष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here