खेळ ‘बुध्दी–बुध्दी’चा

शिवाजी महाराज
शिवाजी महाराज

मराठी भाषिक समुहात ‘हुशार असणे’ या वास्तवाला भयंकर प्रिमियम आहे! तो प्रिमियम ‘वाया गेलेला हुशार’ असण्यालाही आहे. परंतु ‘यशस्वी’ आणि न-हुशार या कॅटॅगरीला मराठी भाषिक समुहात अजूनतरी प्रिमियम नाही.

     मराठी माणूस हुशार समजतो तरी कोणाला? आणि या हुशार समजण्याची परंपरा तपासली तर काय लक्षात येते? आपली हुशारपणाची व्याख्या बदलत चाललीय का?

शिवाजी महाराजपहिला बाजीराव पेशवा     स्वत:ला हुशार समजणा-या; शिवाय, ज्यांच्याकडे यशस्वीतेचे ठोस ब्रॅंडिंग आहे अशा माणसांना जर मराठी इतिहासातली ‘हुशार’ नावे विचारली तर त्यात शिवाजी महाराज, पहिला बाजीराव– द ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट आणि नाना फडणवीस या कॉमन थीम्स दिसतात.  पोस्ट-पेशवाई हुशारीत राजवाडे-केतकर-टिळक आणि स्वातंत्र्यकालीन हुशारीत एकीकडे तर्कतीर्थ टाईप मंडळी तर दुसरीकडे सीडी देशमुख या उच्चवर्णीय नावांचे उल्लेख दिसतात.

     डॉ. आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले यांना त्यांच्या बौद्धिक कामगिरीबद्दल नावाजण्याची चाल उच्चवर्णियांमध्ये नाही हेही खेदाने जाणवते. इतकेच काय सावरकरांच्या हुशारीचे कौतुक करताना राजारामशास्त्री भागवत किंवा कर्मवीरांसारखा जिनिअस पुण्यामुंबईकडे पूर्णत: नजरेआड होतो.

     हुशार समजण्याच्या प्रक्रियेत ‘जेंडर’ ही पण दुफळी दिसते. पंडिता रमाबाई, इरावती कर्वे आणि दुर्गाबाई यांच्याखेरीज हुशार बायकांच्या नामावळीत नावे सापडत नाहीत. ताराबाई शिंद्यांच्या थेट जिनिअसचा उदोउदो ऐंशीच्या दशकात, स्त्रीमुक्तीचे वारे वाहता असताना दिसतो.

     एकीकडून ‘हुशार’ कोणाला म्हणायचे? हे जातिनिहाय ठरत जाताना – स्वातंत्र्योत्तर काळात ते विचारप्रणालीनिहाय ठरलेले दिसते. एकीकडे डांगे, कर्णिक, तळवलकर परंपरा, दुसरीकडे व्हाया तर्कतीर्थ, मे.पुं.रेगे वाई परंपरा, तिसरी प्रोफेशनल लोकांना बुद्धिमान मानण्याची परंपरा म्हणजे डॉ. शिरोडकर किंवा आयएएस अधिकारी किंवा लेखक यांच्यांतली हुशारी मराठी भाषिक समुहाने नावाजलेली दिसते. हुशार असण्याच्या व्याख्येत – विविध विषयांमधली व्युत्पन्नता, सोबत मराठी भाषिक समुहाशी जोडून घेण्याची क्षमता आणि काही प्रमाणात लेखन व वक्तृत्व गुण हे जणू काही आवश्यक घटक होते. समाजवाद्यांच्या गटात त्यामुळे अच्युतराव पटवर्धन, नाथ पै ते मधू लिमये ही नावे, तुम्ही समाजवाद्यांपैकी कोणते समाजवादी आहात यावर अवलंबून घेतली जातात.

     काही वेळा मराठवाड्यात कुरुंदकर, विदर्भात जिचकार किंवा सध्याच्या महाराष्ट्रात मुंबई-पुण्यात टिकेकर अशी विभागवार हुशारांची नामावळी देखील दिसते. याशिवाय विज्ञान विषयात नारळीकर किंवा संत साहित्यासाठी यू. म. पठाण , सदानंद मोरे अशी विभागणी दिसून येते.

     स्वातंत्र्योत्तर काळात मराठी भाषिक समुहाने दोन परिमाणे शोधून काढली. दहावी परीक्षेत बोर्डात नंबर येणे आणि त्या खालोखाल आयआयटीमध्ये प्रवेश मिळवणे. अमेरिकेचा व्हिसा प्रोफेशनल्ससाठी सत्तरच्या दशकात खुला झाल्यावर डॉक्टर होऊन अमेरिकेत जाणे हेदेखील ‘हुशार’ असण्याचे लक्षण बनून गेले. मेनस्ट्रीम मराठी समुहाला या तिन्ही गोष्टी अजून महत्त्वाच्या वाटतात.

     शरद जोशी ते अविनाश धर्माधिकारींच्या पिढीपर्यंत आयएएस होण्यात ‘हुशार’ असण्याची ग्लोरी आहे असे मराठी समाजाला वाटत होते. मात्र आता, पोस्ट-भूषण गगराणी काळामध्ये (भूषण गगराणी आठवण्याचे कारण, त्यांनी मराठी वाड्मय हा विषय ऐच्छिक म्हणून घेतला होता, त्याचा उल्लेख सतत होतो!) सरकारी बाबूंना हुशार समजायची चाल फारशी उरलेली नाही. कदाचित गगराणी हे त्या यादीतले अपवाद असतील.

     मराठी भाषिक समुहात चिंतक, विद्वान, विचारवंत, लेखक यांची मांदियाळी निर्माण झाली – तशीच कार्यकर्त्यांची आणि नेत्यांचीही; परंतु हुशारपणाच्या पॅरामिटर्सवर अधिराज्य बहुतांश ‘ब्राह्मणी’ कल्पनांचे होते. ( जसे परवा मुकादमसर म्हणाले, की बाबा आढावांना कुठे आम्ही विचारवंत मानतो अजून?)

     याला थोडासा छेद देणारी व्यक्तिमत्त्वे म्हणजे तेंडुलकर आणि कुमार केतकर. ज्यांना पठडीपलीकडच्या मतांचे कौतुक आहे अशाच लोकांना तेंडुलकर-केतकरांसारखे क्रिटिकल लेखक आवडतात आणि त्याच क्रिटिकल समुहात मेघा पाटकरांबद्दल आदर-पुष्पा भाव्यांच्या राजकारणाचे कौतुकही वाटते. मात्र ‘प्रमाण’ मराठी भाषिक समुहाची ही चाल नाही.

     नव्वदच्या दशकात, आयटी क्षेत्राने बाजी मारल्यावर, फक्त बुद्धिमता नाही तर त्याबरोबर ‘पैसा’ हे प्रामाण्यदेखील आवश्यक झाले. आता नारायणमूर्ती, नंदन नीलेकनी हे ‘हुशार’ असण्याचे आणि डॉ. अभय बंग किंवा डॉ. प्रकाश आमटे हे सामाजिक भान असण्याचे मानदंड झाले.

     पुण्यात जन्माला आला असाल तर कपाळावर ज्ञान प्रबोधिनीचा ठप्पा हा अनेक काळ बुद्धिमान असण्याची पावती मानला जायचा. ज्ञानप्रबोधिनी, आयआयटी आणि अमेरिका या तीन गोष्टी म्हणजे पोस्ट-पेशवाई पुण्यात अजूनही हुशारीची चलनी नाणी आहेत. प्रबोधिनी नसली तर निदान पक्षी दहावी-बारावीची मेरिट लिस्ट हे नाणे तर कालपरवा, मेरिट लिस्ट खारीज होईपर्यंत चालायचे.

     ‘ज्ञानप्रबोधिनी’त प्रवेश परीक्षेत IQ टेस्ट घ्यायचे किंवा अजूनही घेतात. माझा मास्तर पॉल प्रायव्हेटिअर याचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ हे पुस्तक वाचत असताना मराठी ‘हुशारपणा’च्या व्याख्येचा हा इतिहास, त्यातले महत्त्वाचे नामोल्लेख मनात येत होते. पॉल प्रायव्हेटिअरने तर IQ या प्रकाराची सामाजिक मुळे शोधून काढून हा कोशंट ठरवणे हे सांस्कृतिक दृष्टया भेद करण्यासाठी निर्माण केलेले साधन कसे आहे याचा इतिहास लिहिलाय. ज्ञानप्रबोधिनी-ठप्पा, हुशारांचा IQ यांवरच पॉल प्रायव्हेटिअरचे पुस्तक प्रश्नचिन्ह निर्माण करते. पॉल सोबत शिकताना ‘हुशारीकडे’ एक स्वायत्त, निसर्गदत्त वस्तू म्हणून न बघता एक सामाजिक प्रोडक्ट म्हणून बघण्याची सवय लागली. मराठी हुशारीच्या perceptions म्हणून तपासणं महत्वाचं ठरत गेलं.

     कोणता ही समाज ‘बुद्धिमत्ता’ म्हणजे काय, हे कसे ठरवतो? मी एखाद्या आदिवासी पाड्यावर जन्माला आले असते तर माझे रान वाचायचे स्किल हे माझ्या हुशारीत गणले गेले असते का? की नाही?

     मात्र सध्या ब्राह्मणी हुशारीचे-मानदंड कोसळतायत, अशा वेळी नवे मानदंड नसल्यामुळे, सर्वात सोपे – म्हणजे पैसा-प्रामाण्य हुशारीला सब्स्टिट्युट म्हणून वापरले जाते.

     मात्र मी आता एका दुस-या डायनॅमिक्सकडे बघत आहे. मला वाटते, की जेव्हा रिसोर्सेस मर्यादित असतात तेव्हा त्या मर्यादित रिसोर्सेसवर कुणाचा हक्क आहे यातून सत्ता निर्माण होते आणि ती सत्ता एका विशिष्ट प्रकारच्या व्यक्तिमत्त्वांना, बुद्धिमत्तेला उत्तेजन देते. सध्याच्या सगळ्या हुशार ‘डिजायनर्स’च्या पिढीकडे बघितल्यावर मला हे कुठेतरी जाणवते. NID किंवा IDC मध्ये प्रवेश मिळवणे दुरापास्त आणि म्हणून ही मायनॉरिटीतली ‘डिजायनर्स’ मंडळी दिवसेंदिवस ‘निश’ म्हणून बुद्धिमान गणली जातात. नव्या पोस्टमॉडर्न बाजारात अँडव्हर्टायजिंगला किंमत नाही. आता मानाचे स्थान आहे ते डिजायनर्सना.

     मात्र मराठी भाषिक समुहात हे नवीन परिमाण अजून आलेले नाही. आम्हाला अजूनही टीव्हीवरची चमको मंडळीच ‘हुशार’ वाटतात! अजूनही आमचे लेखक त्यांच्या परदेशी डिग्र्या आणि मेरिट लिस्टमधल्या नंबरांवर खूष आहेत. आम्हाला ‘डिजायनर्स’मधली हुशारी समजेस्तोवर – डिजायनर्सच्या सात पिढ्या झालेल्या असतील. हे सगळे बघताना मन आतून खंतावते. पण मग ज्यांनी आपलं आयुष्यं डिजाईन केलं त्यांचं काय?

     माणसाला माणूस म्हणून ओळखणा-या, अंतर्बाह्य integrity असणा-या, आपण जे कोणी आहोत त्या आपल्या स्पिरिटला पूर्ण उपलब्ध होणा-या ‘हुशार’ माणसांबद्दल सध्या तरी मराठी भाषिक समुहाला काही ठाऊक नाही.

     आणि व्हिज्युअल भाषेत बोलणारे नवे हुशारप्राणी शब्दांतून दूर जायला लागल्यामुळे आता ‘माध्यम-चतुर’ आणि ‘व्हिज्युअल-तल्ल्ख’ अशा नव्या कॅटॅगरीज तयार होताना दिसतात.

     पॉल प्रायव्हेटिअरचे ‘सोशल हिस्टरी ऑफ स्मार्ट’ वाचून झाल्यावर जुन्या परिमाणांवरचा माझा क्रिटिकल रोष मलाच उमजून आला आणि त्याच प्रकाशात, ‘बुद्धी-बुद्धी’च्या मराठी खेळाची झालेली गोचीदेखील मला स्पष्ट दिसते..

ज्ञानदा देशपांडे
भ्रमणध्वनी : ९३२०२३३४६७
इमेल – dnyanada_d@yahoo.com