खानदेशचा पोळा

0
59
पोळ्यासाठी सजवलेला बैल
पोळ्यासाठी सजवलेला बैल

पोळ्यासाठी सजवलेला बैलखानदेशात ‘पोळा’ हा सण श्रावणी अमावस्येला बैलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. पोळ्याच्या दोन दिवस आधी बैलांच्या खांद्यांना तेल, तूप लावून मळले जाते. शिंगांना व खुरांना शस्त्राने टोकदार केले जाते……. बैलांकडून दोन दिवसांपासून काम करवले जात नाही. त्यांच्या खांद्यावर दुसर ठेवली जात नाही. यास ‘खांदेपूजा’ असे म्हणतात. नाभिकांकडून बैलांच्या शेपटीचा गोंडा सजवला जातो.

बैलांना पोळ्याच्या दिवशी सकाळपासून रानात मनसोक्त चरायला सोडतात. त्यांना नदीत, तलावात अथवा गावकुंडात अंघोळ घालतात. त्यांना घरी आणल्यावर सजवले जाते. बैलांच्या शिंगांना रंग लावतात. ऑईल पेंटचे रंग सर्वदूर सर्रास वापरले जात असले तरी पारंपरिक रंग म्हणून ‘गेरू’ अथवा ‘ढाव’चा वापर काही ठिकाणी केला जातो. जुन्या ‘नाथां’ना काढून नवीन ‘नाथ’ बैलांच्या नाकात ओवली जाते. गोंडे, आरसे, पायात तोडे, गळ्यांत घागरमाळा, चंग, गेठा, घोगर, घण्टी, पितळाची साकळी, शिंगाला फुगे, कणकेचे शेंगाळे, फुले, पायाला केसारी, तोडे, पाठींवर मखमली झुल, माथोटी, दोर लावले जातात.

सजलेल्या बैलाचे औक्षण करणारे शेतकरी दाम्पत्यमातीचे बैल, गुराखी, सात प्रकाचे धान्य बैलांच्या डोळ्यांत सुरमा भरला जातो. रूईच्या फुलांच्या माळादेखील घातल्या जातात. सजवलेल्या बैलांना घरांसमोर आणले जाते. घरोघरी शेतीच्या साधनांची, अवजारांची पूजा केली जाते…. खाटेवर दुसर ठेवून विविध कडधान्ये, डाळींच्या मूठ मूठ राशी ठेवल्या जातात…. धान्यांच्या सात प्रकारच्या राशींना ‘शिधा’ म्हणतात. बैल ज्या धान्याला सर्वप्रथम तोंड लावेल ते पीक चांगले येईल असा समज आहे. घर मालकीण बैलांचे औक्षण करते. बैलाला पुरणपोळीचा नैवेद्य खायला घालते. पायांवर पाणी टाकते. रानफळांचा वापर करून बनवलेली माळ शिंगांत अडकावली जाते. दृष्ट लागू नये म्हणून केसारीमध्ये ‘भिलावा’ अडकावून पायांत अथवा शिंगांत गुंफले जाते.

हनुमान हा शिवाचा अवतार आहे आणि शिवशंकराचे वाहन म्हणजे नंदी. म्हणूनच गावातल्या महादेवाच्या तसेच हनुमानाच्या दर्शनासाठी बैलांना सजवून नेले जाते. गावातला मातंग तसेच ढोलताशे वाजवणारे देवळाबाहेर वाद्ये वाजवतात.

बैल सजवून गावाच्या वेशीवर नेताना (पोळा फुटणे) गावातल्या पाटलाचा बैल वेशीपर्यंत वाजत-गाजत परतल्यावर गावातले इतर बैल वेशीपर्यंत जातात. त्यालाच ‘पोळा फुटणे’ असे म्हणतात. पोळा फुटल्यावर घरमालक पुरणपोळीचे जेवण करून उपवास सोडतो. नंतर ज्या आप्तेष्ट मित्रांनी बैलाला जेवणाचे आमंत्रण दिलेले असते, अशांकडे घरोघरच्या बैलांना नेले जाते…. बैलांना औक्षण, नैवेद्य दिल्यावर भेट म्हणून ‘श्रीफळ’- नारळ अथवा पैसे दिले जातात.

खानदेशात जळगाव तालुक्यातील ‘वराडसीम’ या गावाचा पोळा प्रसिद्ध आहे. त्या गावातल्या जुन्या भव्य ऐतिहासिक दरवाजाच्या खिडकीतून बैल कुदवला जातो. शेकडो वर्षांपासूनची परंपरा कायम टिकून आहे.

पोळ्याच्या दिवशी घरोघरी कुंभाराकडून आणलेल्या मातीच्या बैलांचे पूजन होते. त्यांनाही नैवेद्य दाखवला जातो. इतर जनावरांनाही अंघोळ घालून त्यांचे औक्षण केले जाते. मानाच्या बैलाची गावभर मिरवणूक निघते. त्यालाच ‘बाशिंग्या बैल’ म्हणतात. त्याच्या माथ्यावर शिंगांमध्ये मोठे बाशिंग बांधले जाते. त्याला अंगभर सजवले जाते.

गावोगावी संध्याकाळी ‘तोरण तोडण्या’ची स्पर्धा आयोजित केली जाते. गावाबाहेरच्या मैदानात अथवा महादेव मंदिरासमोर नारळांचे तोरण लावले जाते. गावातले तरुण शेतकरी एकेक करून आपापल्या बैलासमवेत धावत जाऊन उडी मारत तोरण तोडण्याचा प्रयत्न करतात. गावागावात, घराघरात आनंद आणणारा ‘पोळा’ प्रत्येक खानदेशी शेतकर्‍याच्या जिव्हाळ्याचा सण आहे.

महादेव शंकराच्या देवळाबाहेरील नंदीची मूर्तीटिप : * दुसर– बैलांच्या खांद्यावर असलेला व बैलगाडी अथवा वखर, नांगर, कोळप व औताला जोडणारे लाकडी अवजार.

* कणकेचे शेंगाळे– कणकेपासून बैलाच्या शिंगाच्या आकाराचे गोल शेंगोळे बनवून तेलात तळले जातात

* केसारी – बैलांना दृष्ट लागू नये म्हणून स्त्रियांच्या डोक्यावरून गळणार्‍या केसांपासून गुंफण करून केसारी बनवली जाते. ही केसारी शिंगांना वा समोरील दोन्ही पायांना बांधली जाते.

* माथोटी – आपला ‘नंदी’ सुंदर दिसावा म्हणून व त्याला दृष्ट लागू नये म्हणून चामड्यापासून काही आभूषणे बनवलेली असतात. त्यापैकी माथोटी हे बैलाच्या माथ्यावरील चामडी आभूषण आहे.

* वराडसीम– खानदेशात अनेक गावांच्या नावापुढे सीम हा शब्द जोडलेला आहे. सीम शब्द गावाची सीमा दर्शवतो. उदा. पिंपळेसीम, वडगावसीम, वराडसीम आदी. वराड हा शब्द वर्‍हाड किंवा ववरची आळ असा होतो.

संकलन व शब्दांकन : प्रा. नामदेव कोळी – कडगाव, ता.जि. जळगाव,
संकलन सहाय्य : प्रफुल्ल पाटील, धनराज धनगर, प्रा.टी.एस.पाटील

भ्रमणध्वनी : 9404051543,
इमेल : pranaammarathi@gmail.com