कोल्हापूरची शतमानपत्रे : शतकभराचा इतिहास

1
475

जी.पी.माळी यांचे ‘कोल्हापूरची शतमानपत्रे’ हे पुस्तक म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. गेल्या शतकभरातील 101 मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळ व मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते. ती मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना तो फारच मोठा फायदा आहे…

व्यक्तीला मानपत्र तिचा सार्वजनिक गौरव करावा म्हणून सत्कारपूर्वक दिले जाते. त्याचे जाहीर वाचनही समारंभात होते. अशी मानपत्रे लिहिणे ही एक कसोटीच असते! त्याचे कारण त्या सन्माननीय व्यक्तीचा संपूर्ण जीवनपट आणि तिच्या हातून झालेले गौरवपूर्ण काम हे सारे मोजक्या शब्दांत बसवायचे असते; त्या शब्दचित्रातून त्या गौरवमूर्तींचा अवघा कर्तृत्वपट उभा करायचा असतो. मला त्यासाठी पडणाऱ्या कष्टांची जाणीव आहे. मी तो अनुभव सांगलीकरांच्या वतीने सर्व मंगेशकर कुटुंबीयांना सोन्याच्या पत्र्यावर ठशाच्या रूपात उमटवलेली मानपत्रे लिहिताना घेतलाही आहे! मला अनेक मानपत्रे नंतरही लिहावी लागली. स्वत: लिहिलेली ती सारी मानपत्रे संग्रही बाळगताना होणारा आनंद अपार आहे. कोल्हापूरचे डॉ. जी.पी. माळी हे तसाच अनुभव घेत असतील, यात शंका नाही!

कोल्हापूरची शतमानपत्रे’ हा जी.पी. माळी यांनी संपादित केलेला नवा ग्रंथ आहे. तो संग्रह 1922 ते 2021 या कालखंडातील निवडक अशा एकशेएक मानपत्रांचा आहे. त्यांतील अपवाद वगळता ती सगळी मानपत्रे ही कोल्हापुरातून दिली गेलेली आहेत. त्यांची विभागणी अशी – शिवाजी विद्यापीठाकडून एकवीस, डॉ.डी.वाय. पाटील विद्यापीठाकडून एक, भाई माधवराव बागल विद्यापीठाकडून पंधरापुणे विद्यापीठाकडून एक, ताराराणी विद्यापीठाकडून चार, कोल्हापूर महानगरपालिकेकडून आठ, राजर्षी शाहू स्मारक विश्वस्त मंडळाकडून एकतीस, निरनिराळ्या गौरव समित्यांकडून नऊ, जयशंकर दानवे कलायात्री पुरस्कार समितीकडून दहा आणि मुरगूडच्या प्रजेकडून व अन्य विविध मंडळांकडून प्रत्येकी एक अशा एकूण एकशेएक मानपत्रांचे संकलन ग्रंथात आहे.

संग्रहातील पहिले मानपत्र आहे मुरगूडच्या प्रजेच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांना दिलेले. तारीख आहे 24 जानेवारी 1922. तर दुसरे मानपत्रही तितकेच महत्त्वाचे असे आहे ते कोल्हापुरातील नऊ महिला मंडळांमार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले गेलेले. त्यावर तारीख आहे 25 डिसेंबर 1952. ती दोन्ही मानपत्रे अभ्यासकांसाठी खूपच महत्त्वाची. संग्रहात पुढे विद्यमान शाहू छत्रपतींना दिलेले मानपत्रही वाचण्यास मिळते. राजर्षी शाहू छत्रपती ते विद्यमान शाहू छत्रपती आणि कोल्हापूरची भूमी असा वाचकाचा प्रवास सहज घडून जातो. तो प्रवास आनंदाचा, वाचकाला समृद्ध करणारा असा आहे. त्या प्रवासात भेटतात यशवंतराव चव्हाण यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंतचे राजकारणी, वि.स. खांडेकर यांच्यापासून आ.ह. साळुंखे यांच्यापर्यंतचे प्रतिभावंत, लता-आशापासून सुबोध भावे यांच्यापर्यंतचे कलावंत, गोवारीकर-माशेलकर यांच्यापासून सॅम पित्रोदा यांच्यापर्यंतचे शास्त्रज्ञ. सामाजिक कार्यकर्त्यांची तर जणू मांदियाळीच तेथे भरलेली आहे. त्या वारीतील प्रत्येक वारकरी तितक्याच तोलामोलाचा. त्यांच्या सन्मानार्थ कागदावर उतरलेले शब्दही तसेच!

या संकलनाला अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक अशी प्रस्तावना आहे सुनीलकुमार लवटे यांची. लवटे यांनी मानपत्रांचे स्वरूप आणि त्यांतील भाषा कशी असावी याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. ते मानपत्रे लिहिणाऱ्यांसाठी मोलाचे आहे. त्यांनी दिलेल्या मानपत्रांची लेखनपद्धत, त्याच्या आकृतिबंधाची दशपदी आणि मानपत्रे लिहिताना पाळण्याची पथ्ये या संबंधीच्या सूचना मानपत्रे लिहिणाऱ्यांनी कसोशीने पाळल्या तर लिहिली जाणारी ‘मानपत्रे’ ही खरेच ‘मान’पत्रे होतील, ती वैयक्तिक माहितीची निव्वळ गोळाबेरीज होणार नाही. त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत विश्वनाथराव वाबळे, भीमराव कुलकर्णी आणि रवींद्र पिंगे यांच्या मानपत्र लेखनाचा उल्लेख करून त्या प्रत्येकाच्या लेखनशैलीवर भाष्य केले आहे. पण त्याशिवायही अनेक जण मानपत्रे लिहिण्याची, देण्याची परंपरा गेल्या शतकात जोपासत होतेच! पुण्याहून निघणाऱ्या ‘रुद्रवाणी’ मासिकाचे संपादक जीवन किर्लोस्कर यांनी अनेक मान्यवरांना मानपत्रे दिली आहेत. त्यांचे लेखनही त्यांनी स्वत: केलेले असे. त्यात आझाद हिंद फौजेमधील झांशी राणी रेजिमेंटच्या कर्नल डॉ. लक्ष्मी सेहगल यांच्यापासून मागील पिढीतील कला आणि संगीत क्षेत्रांतील सर्व मान्यवर यांचा समावेश आहे. त्यांनी ‘गानहिरा’ हिराबाई बडोदेकर, ज्योत्स्ना भोळे, ‘संगीत शिलेदार’ जयराम, भीमसेन जोशी अशा अनेक दिग्गजांना सन्मानित केले आहे. ती सारी मानपत्रे माझ्या संग्रही आहेत. शिवाय, करवीर पीठाच्या शंकराचार्यांनीही 12 एप्रिल 1975 रोजी वीस जणांना मानपत्रे दिली, पण ती प्रत्यक्ष समारंभात न देता जीवन किर्लोस्कर यांच्याकडून पाठवली. ती त्या त्या गौरवमूर्तींपर्यंत पोचलीच नाहीत. ती सगळी मानपत्रेही माझ्या संग्रहात आहेत. त्यात ‘ज्ञानपीठ’प्राप्त वि.स. खांडेकर यांच्यापासून ‘संगीत अलंकार’ जयमाला शिलेदार यांच्यापर्यंतचे दिग्गज आहेत.

या संकलनाला ‘संकल्प आणि सिद्धी’ नावाचे संपादकांचे मनोगत आहे. त्या मनोगतात त्यांनी केलेली धडपड आणि त्या सगळ्यामागील त्यांची भावना लक्षात येते. त्यांनी लिहिलेली चौदा मानपत्रे, ती लिहिताना आलेले अनुभव हे मुळातून वाचण्यासारखे आहेत. त्यांनी त्यांच्या गुरूजनांबद्दल आणि मार्गदर्शकांबद्दल व्यक्त केलेले प्रेम शब्दाशब्दांतून प्रत्ययास येते. ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांनीही मानपत्र लेखन केल्याची माहिती कळते. तसेच मानपत्र ‘लिहिण्याचे राहून’ गेलेले कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि अभिनेते निळू फुले यांच्या विषयीचा संपादकांचा आंतरिक जिव्हाळाही अनुभवास येतो. हे संकलन सोपे नव्हते आणि नाही. म्हणूनच खूप प्रयत्न करूनही ‘स्वामी’कार रणजित देसाई आणि ‘विशाखा’कार वि.वा. शिरवाडकर यांना दिलेली मानपत्रे त्यांच्या हाती लागलेली नाहीत, माळी यांना त्या विषयी वाटत असणारी खंत वाचून वाचकही हळहळेल. संपादकांनी ती सगळी मानपत्रे ‘जशी होती तशी’ दिल्याने त्या त्या काळची शब्दकळाही समजते. गेल्या शतकभरातील मानपत्रांतील बदलत गेलेली भाषा लक्षात येते.

एखाद्या व्यक्तीला मानपत्र देणे म्हणजे तिने तोवर केलेल्या कामाचे जाहीर रीत्या कौतुक करणे. समाजाने त्या व्यक्तीला, तिच्या अजोड कर्तृत्वाला दिलेली ती मानवंदना असते. लवटे यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे ही एकोणिसाव्या शतकापासूनची परंपरा. पण मला आठवते ते मानपत्र साडेतीनशे वर्षांपूर्वी एका सिद्धहस्त प्रतिभावंताने लिहिलेले. अवघ्या बत्तीस ओळींचे. इतक्या कमी शब्दांत, इतक्या मोठ्या व्यक्तीचा केलेला, इतका ‘समर्थ’ गौरव आणि सन्मान माझ्यातरी पाहण्यात… वाचनात नाही. ते मानपत्र श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे शहाजीराजे भोसले यांना दिलेले होते ‘समर्थ’ नारायण सूर्याजी ठोसर अर्थात, संत रामदासस्वामी यांनी. त्या मानपत्राच्या सुरुवातीचे शब्द आहेत, ‘निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी…’ अवघ्या बत्तीस ओळींत शिवछत्रपतींना संपूर्ण साकारणारे दुसरे लेखन आजवर झालेले नाही; यापुढे होण्याची शक्यताही नाही. मानपत्राचा देखणा आणि हृदयस्पर्शी नमुना… ते इतिहासाला ज्ञात असलेले पहिले मानपत्र.

मानपत्रांमधून जशी ती व्यक्ती कळते, तसा तो काळही डोळ्यांसमोर उभा राहतो; राहण्यास हवा. त्या दृष्टीने जी.पी. माळी यांनी केलेले हे संकलन खूपच महत्त्वाचे आहे. त्यात गेल्या शतकात सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात कर्तृत्वाची पताका फडकावत ठेवणारे अनेक दिग्गज आहेत. त्यांच्या यशाच्या नौबती तर अजूनही सारीकडून ऐकू येतात. त्यांना दिलेली मानपत्रे तो सगळा काळ वाचकापुढे उभा करतील. अभ्यासकांना होणारा तो फारच मोठा फायदा. ती सगळी मानपत्रे एका ठिकाणी मिळण्याची सोय या ग्रंथामुळे झाली आहे. त्यातील गौरवमूर्तींच्या नावावरून नुसती नजर फिरवली तरी या ‘महा’राष्ट्राची कल्पना येते. त्या मान्यवरांनी करून ठेवलेले काम आणि विद्यमान ‘कथित’ मान्यवरांच्या उचापती पाहिल्या, की अंतर्मुखही होण्यास होते.

विद्यमान बरेच ‘कथित’ मान्यवर पैसे टाकून मानपत्रे लिहून घेतात आणि समारंभही घडवून आणतात! पण या संग्रहातील माणसे आणि त्यांना दिलेली मानपत्रे, त्यांतील भाषाशैली आणि नोंदले गेलेले त्यांचे कर्तृत्व वाचकाला ‘महा’राष्ट्राची खरी ओळख पटवते. जी.पी. माळी यांनी या संकलनाच्या निमित्ताने गेल्या शतकातील करवीरच्या व काही प्रमाणात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचाच धांडोळा घेतला आहे.

‘कोल्हापूरची शतमानपत्रे’ यांत राहून गेलेल्या मानपत्रांची जाणीव संपादकांना आहेच. ती मानपत्रे म्हणजे केवळ गेल्या शतकाचा इतिहास नाही, तर वाचकांना, अभ्यासकांना अनेक संदर्भ पुरवणारा मौल्यवान ऐवज आहे. संकलनाच्या अखेरीस एकापेक्षा अधिक मानपत्रांचे मानकरी (दहा), अनुपलब्ध मानपत्रे (पंधरा) आणि स्वत: संपादकांनी लिहिलेली मानपत्रे (चौदा) यांची स्वतंत्र यादी दिलेली आहे. मानपत्रांखाली ती शब्दांकित करणाऱ्यांची नावे काही ठिकाणी नमूद केली आहेत, तर ती काही ठिकाणी नाहीत. ती मिळाली नसल्याचे संपादकांनी नमूद केले आहे.

जी.पी. माळी यांनी उभारलेली ही गुढी एक नवा पायंडा पाडणारी आहे. यापूर्वीचे असे संकलन म्हणजे रवींद्र पिंगे यांचे ‘मानवंदना’. मुंबईच्या ‘चतुरंग प्रतिष्ठान’कडून दिली गेलेली आणि रवींद्र पिंगे यांनी लिहिलेली ती मानपत्रे. त्यानंतर तसा प्रयत्न कोणी केलेला नाही. अन्य नगरांतून दिल्या गेलेल्या मानपत्रांचेही असे संकलन व्हावे. कारण ती केवळ मानपत्रे नसतात तर, तो त्या त्या शहरांचा सांस्कृतिक इतिहासच असतो!

कोल्हापूरची शतमानपत्रे’ हा देखणा ग्रंथ मोठ्या आकारातील तीनशेआठ पृष्ठांचा. मोहोरदार छपाईतील आहे. ग्रंथाचे मुखपृष्ठ आणि बांधणीही आतील मजकुराइतकीच देखणी आहे. ती किमया गौरीश सोनार यांची. मुद्रणदोषविरहित असलेला आणि उच्च निर्मितिमूल्ये असलेला हा ऐवज कोल्हापूरच्या ‘अक्षर दालन’ प्रकाशनाने प्रसिद्ध केला आहे.

जी.पी. माळी – 94209 31240

सदानंद कदम 9420791680 kadamsadanand@gmail.com

कोल्हापूरची शतमानपत्रे
संपादक : जी. पी. माळी.
अक्षर दालन प्रकाशन, कोल्हापूर.
पृष्ठे : ३०८ किंमत : ८०० रुपये

——————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. सुंदर ऐ्वज लोकांसमोर आणणा-या माळीसरना आणि त्या ऐवजाची ओळख शब्दालंकारांत सजवून लोकांसमोर आणल्याबद्दल सन्मित्र कदमसर आपणासही धन्यवाद. शुभेच्छा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here