कोकणातील गाबित शिमगोत्सव

carasole

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाबित (मच्छिमार) समाजाचा शिमगोत्सव, हा अन्य प्रांतांतील होलिकोत्सवापेक्षा आगळावेगळा आहे. दशावतार, बाल्या नृत्य, जाखडी नृत्य, नमनखेळे अशा ग्रामीण लोककला, हीच कोकणातील परंपरा आणि संस्कृती यांची ओळख मानली जाते. परंतु सिंधुदुर्गातील वीरवाडी, गिर्ये, मोंड, वाडातर, मणचे, मिठमुंबरी, तांबळडेग, वतिवडे, विजयदुर्ग, तळवडे, मोर्वे गावांमध्ये  ‘हुडोत्सव’ या परंपरेमध्ये एक वेगळाच विधी कम खेळ आहे. होळीसाठी उभ्या केलेल्या झाडावर एक व्यक्ती चढत असते. गावकरी खालून फेकत असलेल्या वस्तूंचा मार चुकवत आणि तोल सांभाळत, तिला होळीच्या टोकाशी असलेले निशाण खाली आणायचे असते. ‘शिमगोत्सवा’त होळीच्या आदल्या दिवसापासून सुरू होऊन ते होळी संपेपर्यंत जवळपास आठवडाभर मुखवटेधाऱ्यांकडून सोंगे रंगवण्यात येतात. होळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रंग खेळून धुलिकोत्सव साजरा होतो. तिथीनुसार रंगपंचमी साजरी करूनच होलिकोत्सवाची सांगता होते. प्रत्येक गावातील ग्रामदैवताला उत्सवात महत्त्वाचे स्थान असते. गावरहाटी सुखी राहवी यासाठी धार्मिक परंपरेनुसार शिमगोत्सव धुमधडाक्यात साजरा केला जातो.

देवगड-विजयदुर्ग या किनारपट्टीच्या भागात गाबित समाजातील बांधवांची वस्ती मोठी असल्याने ‘शिमगा’ खेळायचा मांड प्रत्येक वाडीत असतो. उत्सवाचे नियोजन मुंबईतच गावकऱ्यांची बैठक घेऊन गावपाटलाच्या अखत्यारीत केले जाते. कोकणचा चाकरमानी हा सण आणि त्या अनुषंगाने येणारा उत्सव यासाठी आतुर असतो. प्रत्येक घरातून एक वा दोन व्यक्ती त्या उत्सवासाठी गावी जातातच. चाकरमान्यांच्या आगमनामुळे कोकणात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते.

उत्सवात गावपाटलांना विशेष महत्त्व असते. त्यांच्या देखरेखीखाली कुलदैवत, ग्रामदैवत, मांडकरी यांचे स्मरण व पूजन केले जाते. गावचा पाटील व मानकरी (बारा बलुतेदारांचे प्रमुख) हे एकत्र येऊन त्यांच्या मदतीने शिमगोत्सव साजरा केला जातो. दरम्यानच्या काळात देवतापूजन, गाऱ्हाणे व घुमट वाद्यांचे पूजन यांना विशेष महत्त्व असते. गावातील पाटलाचे घर, ज्याला ‘मांड’ असे म्हटले जाते. तेथे रंगरंगोटी करून, मंडप बांधून विद्युत रोषणाईही केली जाते. गावातील ग्रामदैवताच्या मंदिरात होलिकोत्सव सुरू असल्याने तेथील देवतांचे तरंगपालख्या वाडीतील मांडांवर आल्यानंतर कापडखेळे (डोक्याला आणि हाताला कापड गुंडाळून सादर केले जाणारे नृत्य) त्यांचे नृत्य सादर करतात. ढोलताश्यांच्या गजरात आनंदाला उधाण आलेले असते. गाबित समाजातील युवक लहान मुलांचे गोफनृत्य गावात; त्याचप्रमाणे, अन्य नातेवाइकांच्या घरी जाऊनही सादर करतात.

धुलिवंदनाच्या दिवशी गावातील सर्व पाटलांच्या मांडांवर ‘शिमगा’ खेळाला प्रारंभ होतो. शिमग्याचा खेळ हा पाच, सात, नऊ दिवस चालतो. अडीचशे वर्षांपूर्वी विजयदुर्ग येथील संभाजी आंग्रे यांनी सुरू केलेल्या शिमग्याच्या ऐतिहासिक प्रथेनुसार तो पंधरा दिवस चालतो. तो सोंगांचा खेळ असून, तो फक्त रात्रीच्या वेळेस गावपाटलांच्या मांडावर चालतो. त्यात ‘घुमट’ हे वाद्य महत्त्वाचे असते आणि सोबत ढोल, ताशा व झांज असते. शिमगोत्सवाला प्रारंभ रोज रात्री गणेशपूजन व मांडकऱ्यांचे पूजन करून केला जातो. घुमट वाद्यावर या विधिनाट्याचा प्रारंभ करताना ‘फाग’ (ग्रामीण लोकगीते) गायनात गायल्या जाणाऱ्या गौळणीवर नाच्याला अर्थात राधेला नाचवत गणपती, सरस्वती व शिवपार्वती यांची मुखवटाधारी सोंगे आणली जातात. नमनाने प्रारंभ करून शेवट मात्र विठोबाच्या आरतीने केला जातो. गणपतीचा मुळारंभी रामायणी, कृष्णावतारी, डफगाणी, झुलवे, धीबडे, कारला, पाळणा, गौळण व आरती असे विविध ‘फाग’ म्हटले जातात. मांडावर जमलेल्या आबालवृद्धांचे सामाजिक, पौराणिक आशयाची व देखाव्यांची सोंगे आणून मनोरंजन केले जाते.

‘फाग’ हे लिखित काव्य नाही. ते मौखिक परंपरेने चालत आलेले काव्य आहे. त्यात प्रामुख्याने सामाजिक प्रबोधन, नैतिक, धार्मिक मूल्यसंस्कार व कलात्मक गुणांची जाणीव करून दिली जाते. ‘शिमगा खेळ’ हा नाट्यप्रकार असून त्यातून गायन, वादन, अभिनय इत्यादींचे दर्शन घडते. त्या खेळाचे उगमस्थान गोवा हे असल्याने जवळच्या कारवारमध्ये व कोकणात ती परंपरा प्रचलित झाली. काही फागांमध्ये गोवा, विजयदुर्ग यांचे वर्णन दिसून येते. सोंगेरूपातील देवतांचे पूजन व त्यानंतरचे दैवी लीलावर्णनपर प्रसंग रंगवून नाटक खेळले (सादर केले) जाते, त्यालाच ‘शिमगा खेळणे’ असे म्हणतात.

तो खेळ फक्त मांडावर खेळला जातो. फाल्गुन प्रतिपदेपासून सुरू झालेले ‘शिमगोत्सव’ मात्र ग्रामदैवतांच्या वाडीतील आगमनाच्या पुढील दिवशी संपतात. म्हणजेच देवखेळे येऊन गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी जाऊन घुमट वाद्य वाजवले जाते व फाग म्हटले जातात. रात्री शिंपणे वा धुळवड खेळून संपूर्ण रात्र जागवली जाते. नवस बोलणे, फेडणे इत्यादी प्रकार झाल्यानंतर उभारलेल्या होळीसमोर धार्मिक विधी केले जातात. शिमग्याचा शेवट करण्याची प्रत्येक गावाची परंपरा भिन्न असते. त्याप्रमाणे शेवटी रंगपंचमी खेळून उत्सवाची सांगता केली जाते. त्यानंतर प्रत्येक जण त्याचे घुमट वाद्य घेऊन घरी जातो. कोकणातील गावरहाटीला अधीन राहून तो उत्सव पार पाडला जातो. नवोदित कलाकारांमधील सुप्त गुणांना वाव देणारा शिमगोत्सव कोकणच्या सांस्कृतिक परंपरांचा, जीवनाचा अविभाज्य भाग आहे.

– पांडुरंग बाभल

(मूळ आधार – ‘दैनिक प्रहार’ १२ मार्च २०१४)

About Post Author

1 COMMENT

  1. खूप छान लेख लिहिला!!!!
    खूप छान लेख लिहिला!!!!

Comments are closed.